Home LATEST NEWS ताजी बातमी काश्मीरमध्ये उंट विकत घेणं एका माणसाला ‘यामुळं’ महागात पडलं, न्यायालयापर्यंत पोहोचलं प्रकरण

काश्मीरमध्ये उंट विकत घेणं एका माणसाला ‘यामुळं’ महागात पडलं, न्यायालयापर्यंत पोहोचलं प्रकरण

3
0

Source :- BBC INDIA NEWS

काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात राहणाऱ्या गुलाम रसूल भट यांनी काही दिवसांपूर्वी एक लाख रुपयांहून अधिक कर्ज घेऊन हा उंट खरेदी केला होता.

काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात राहणाऱ्या गुलाम रसूल भट यांच्या घरी एके दिवशी काही लोक अचानक आले आणि त्यांनी त्यांचा उंट ताब्यात घेतला.

तोपर्यंत हे लोक कोण आहेत आणि त्यांनी उंट का नेला, याची भट यांना काहीच कल्पना नव्हती.

श्रीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा उंट जप्त केला होता.

भट ईदच्या दिवशी उंटाचा बळी देण्याच्या तयारीत असल्याचा त्यांना संशय होता. भारतात उंटाची हत्या करणे बेकायदेशीर आहे.

भट यांनी काही दिवसांपूर्वी एक लाख रुपयांहून अधिक कर्ज घेऊन हा उंट खरेदी केला होता. आपण उंटाचा बळी देणार नव्हतो, असा दावा त्यांनी केला आहे.

तर पर्यटकांसाठी त्याचा उपयोग करून आपण चार पैसा कमावणार होतो, असं ते सांगतायत.

पण, प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हेतूबाबत संशय वाटला. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुलाम रसूल भट सांगतात की, काश्मीरमध्ये उंट पाहणं पर्यटकांसाठी वेगळा अनुभव ठरेल, या विचाराने त्यांनी यावर्षीच्या सुरुवातीला उंट खरेदी केला.

पण एक दिवस विकत घेतलेल्या उंटाच्या मालकी हक्कासाठी भट यांना न्यायालयात जावं लागेल, अशी कल्पनाही त्यांना नव्हती.

भट यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, उंट खरेदी करण्यासाठी त्यांनी 1 लाख 20 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. हा उंट काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ दूधपाथरी येथे नेण्याचा त्यांचा विचार होता.

गुलाम रसूल भट म्हणाले, “दूधपाथरीला मोठ्या संख्येने पर्यटक येतात. उंटावर स्वारी करणं किंवा त्याच्यासोबत फोटो काढणं पर्यटकांना आवडेल, असं मला वाटलं. काश्मीरमध्ये हा पहिलाच असा उंट असेल आणि त्यातून मला उत्पन्नही मिळेल.”

बडगाम जिल्ह्यातील दूधपाथरी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे (फाइल फोटो).

फोटो स्रोत, Getty Images

तर दुसरीकडे, काश्मीरमध्ये प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘ॲनिमल राइट्स काश्मीर’ या संस्थेच्या मते त्यांना सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे संशय आला होता.

संस्थेचे संस्थापक दाऊद मोहम्मद यांनी सांगितलं की, यंदाच्या मे महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. त्यात भट ईदच्या दिवशी या उंटाचा बळी देणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

इस्लाममध्ये ईद-उल-अजहाच्या निमित्ताने प्रेषित इब्राहीम यांनी अल्लाहप्रती दाखवलेल्या समर्पणाच्या स्मरणार्थ मेंढी, शेळी, म्हैस किंवा उंटाचा बळी दिला जातो.

इस्लाममध्ये उंटाचा बळी देण्याची परवानगी आहे. मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्येही ही प्रथा आहे.

 भारतात प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 नुसार उंटाची हत्या करण्यास बंदी आहे.

मात्र, भारतात प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 आणि इतर कायद्यांनुसार उंटाची हत्या करण्यास बंदी आहे.

याच आधारावर, ईदच्या एक दिवस आधी म्हणजे 26 मे 2026 रोजी श्रीनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांनी बडगाममधील भट यांच्या घरी जाऊन कारवाई केली.

सध्या अधिकाऱ्यांनी विशेष वाहनातून उंटाला श्रीनगरला नेलं आहे.

कोर्ट ठरवणार उंटाचा मालक कोण

भट सांगतात की, सुरुवातीला उंट घेऊन गेलेले लोक कोण होते, हेही त्यांना माहीत नव्हतं.

ते म्हणाले, “मी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते श्रीनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते असल्याचं समजलं.”

मग भट खरोखरच ईदला उंटाचा बळी देणार होते का?

या आरोपावर उत्तर देताना ते म्हणाले, “मी गरीब माणूस आहे. मी त्याची योग्य काळजी घेईन, असं लेखी देण्यास तयार आहे. गरज पडल्यास मी हा उंट पुन्हा जम्मूमध्ये घेऊन जाईन आणि ज्या व्यापाऱ्याकडून विकत घेतला त्याच्याकडे परत करेन, जेणेकरून माझं कर्ज फेडता येईल.”

उंट परत मिळावा, यासाठी भट यांनी आता श्रीनगरमधील न्यायालयात धाव घेतलीय.

ते म्हणाले, “न्यायालयाने श्रीनगर महानगरपालिका आणि संबंधित स्वयंसेवी संस्थेला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही. आता महिनाभर झाला आहे. मी खूप चिंतेत आहे. काय करावं तेच कळत नाही?”

या प्रकरणाबाबत बीबीसीने श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त फैज लुल हसीब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या प्रकरणाबाबत बीबीसीने श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त फैज लुल हसीब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, दाऊद मोहम्मद यांनी सांगितलं की, हा उंट काश्मीरचा नाही. त्यामुळे खोऱ्यातील कडाक्याच्या थंडीत तो टिकू शकणार नाही.

त्यांनी सांगितले की, त्यांची संस्था सरकारच्या मदतीने उंटाला राजस्थानला नेण्याची योजना आखत आहे. तिथे त्याला एका वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात येईल.

“आम्हाला न्यायालयाचा कोणताही आदेश मिळालेला नाही. या प्राण्याची सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवलं जाईल,” असं त्यांनी सांगितलं.

उंटाला मिळालं नवं नाव आणि नवं ठिकाण

बचाव पथकाने या उंटाचं नाव ‘शेट्टी’ ठेवलं आहे.

त्याची देखभाल करणाऱ्यांच्या मते, हा उंट सुमारे तीन वर्षांचा आहे. सध्या श्रीनगरमधील तेंगपोरा भागातील श्रीनगर महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय सेवा संकुलात तो आकर्षणाचा विषय ठरलाय.

या संकुलात बॅडमिंटन कोर्टाएवढी जागा ‘शेट्टी’साठी राखून ठेवण्यात आली आहे. तो बहुतांश वेळ तिथेच घालवतो.

मात्र, त्याची देखभाल करणाऱ्यांसाठी त्याची काळजी घेणं काहीसं आव्हानात्मक ठरत आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने, ” ‘शेट्टी’साठी योग्य खाद्य मिळवणं आमच्यासाठी कठीण ठरतंय”, असं सांगितलं.

काश्मीर (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे म्हणाले, “त्याला पोट फुगण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांचं पथक तयार करावं लागलं. आमच्या डॉक्टरांना अशा प्राण्यांवर उपचार करण्याची सवय नाही.”

सध्या अनेक जण या उंटासोबत सेल्फी काढत आहेत. मात्र, गुलाम रसूल भट यांनी या उंटासाठी अशी परिस्थिती कधीच अपेक्षित केली नव्हती. आता या उंटाचं आणि भट यांचं भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC