Home LATEST NEWS ताजी बातमी कच्चे तेल विकणाऱ्या रशियातच इंधन टंचाई कशी? पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा;...

कच्चे तेल विकणाऱ्या रशियातच इंधन टंचाई कशी? पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; भारताचाही उल्लेख

3
0

Source :- BBC INDIA NEWS

रशियातील गंभीर इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, तिथले कार चालक तेल मिळत नसल्याची तक्रार सोशल मीडिया आणि जाहीरपणे उघडपणे करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

रशिया जगभरातील अनेक देशांना कच्च्या तेलाची विक्री करतो. पण सध्या तो स्वतःच मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे.

‘एपी’ (AP) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर लागोपाठ हल्ले केले आहेत. यामुळे संपूर्ण देशातील इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तिथल्या सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड निराशा आणि भीतीचे वातावरण आहे.

बऱ्याच भागांत आता मोजून-मापून तेल दिले जात आहे. रस्त्यांच्या कडेला वाहनांच्या तासंतास लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओंमध्ये चालक या गर्दीला पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच अनेक नागरिक रिकामे पेट्रोल पंप आणि वाढत्या किमतींवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

सायबेरियातल्या इरकुत्स्क शहरात तर परिस्थिती इतकी बिकट झाली की, तिथल्या महापौरांना रांगेत थांबलेल्या लोकांसाठी रस्त्यावर फिरती शौचालयं (पोर्टेबल टॉयलेट्स) उभी करावी लागली.

जगाला सर्वात जास्त ऊर्जा आणि तेल पुरवणाऱ्या रशियासारख्या महासत्तेवर अशी वेळ येणे हे खरोखरच यापूर्वी कधीही न घडलेले असे मानले जात आहे.

स्वतः राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परिस्थितीची गांभीर्य स्वीकारत म्हटले, “सामान्य वाहनचालक आणि व्यापारी या दोघांनाही सध्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल पंपांवर अजूनही गर्दी कमी झालेली नाही.”

रशियाच्या ‘तास’ या सरकारी न्यूज एजन्सीनुसार, तिथल्या मोठ्या तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव महागाईच्या प्रमाणात नियंत्रणात ठेवले असले तरी खासगी पंपांवर मात्र मनमानी किमती वसूल केल्या जात आहेत.

दरम्यान उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली जाईल, असे म्हटले आहे.

रशियाच्या सेंट्रल बँकेच्या एका आर्थिक परिषदेत ते म्हणाले, “या संकटाचा इंधनाच्या दरांवर काय फरक पडतोय हे पाहिले तर आमच्या मोठ्या सरकारी तेल कंपन्यांनी किमती अजून तरी आवाक्यात ठेवल्या आहेत.”

पण ‘रॉयटर्स’ न्यूज एजन्सीच्या एका अहवालानुसार, रशियातल्या शेतीप्रधान भागातील शेतकरी आता चिंतेत पडले आहेत. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे तेल शुद्धीकरण कारखाने आणि डेपोंचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन कापणीच्या हंगामात इंधनच नसल्यामुळे पिके कशी काढायची, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले असून लोकांचे रोजचे जगणे कठीण झाले आहे.

हा फोटो मॉस्कोमधील एका पेट्रोल पंपावरील आहे. जिथे तीव्र इंधन टंचाईमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

युक्रेन थेट रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करत आहे. जेणेकरून मॉस्कोवर शांततेसाठी दबाव आणता येईल.

तेलाचा मोठा साठा असणाऱ्या रशियात या हल्ल्यांमुळे इंधनाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, कोणत्या पंपावर तेल शिल्लक आहे आणि कुठे गर्दी कमी आहे, हे शोधण्यासाठी वाहनचालकांनी स्वतःच मिळून डिजिटल नकाशे बनवायला आणि माहिती शेअर करायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हीडिओ व्हायरल होत आहेत ज्यात पेट्रोल-डिझेल मिळवण्यासाठी तासन्‌तास रांगेत थांबलेल्या चालकांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर ‘द अल्टीमेट लग्झरी 2026’ नावाचा एक व्हीडिओ चांगलाच गाजत आहे. यात जेरी नावाचा माणूस एका कॅनमधून अगदी जपून-जपून आपल्या गवत कापायच्या मशीनमध्ये पेट्रोल भरताना दिसतोय.

हे करत असताना तो मजेत म्हणतो, “काय ही श्रीमंती! हल्ली हे पेट्रोल विकत घ्यायची ताकद तरी कुणामध्ये उरली आहे का?”

भारताकडून तेल खरेदी

‘रॉयटर्स’च्या आणखी एका बातमीनुसार, सध्याच्या इंधन संकटातून बाहेर पडण्यासाठी रशिया चक्क भारताकडून तेल खरेदी करत आहे.

रॉयटर्सने म्हटले, “इंधनाचा भीषण तुटवडा भरून काढण्यासाठी रशियाने समुद्रमार्गे भारतातून पेट्रोल मागवायला सुरुवात केली आहे. उद्योग जगताशी संबंधित दोन सूत्रांनी ही माहिती दिली.”

तत्पूर्वी रशियाचे सरकारी कार्यालय ‘क्रेमलिन’ने सांगितले होते की, ते इतर देशांच्या संपर्कात असून परवडणाऱ्या दरात इंधन मिळवण्यासाठी चर्चा सुरू आहे.

‘रॉयटर्स’ने आपल्या अहवालात लिहिले की, या संपूर्ण प्रकरणावर रशियाच्या ऊर्जा मंत्रालयाने आणि भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तेल उद्योगातील एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, भारताकडून कमीत कमी 60,000 मेट्रिक टन पेट्रोल रशियाला पाठवण्यात आले आहे.

तर दुसऱ्या एका सूत्राने माहिती दिली की, प्रत्येकी 30,000 ते 40,000 टन क्षमतेची 2 जहाजे (टँकर्स) रशियासाठी रवाना झाले आहेत.

तिसऱ्या सूत्राच्या मते, रशिया दरमहा विविध देशांमधून एकूण 4 लाख टन पेट्रोल आयात करण्याची योजना आखत आहे.

‘रॉयटर्स’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेनेनुसार, रशिया आपल्या देशातील पेट्रोलचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता थेट भारताकडूनही तेल खरेदी करत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

यात रशियाचा शेजारी देश बेलारूस देखील मदतीला धावून आला आहे जो आधीपासूनच रशियाला तेल विकत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत रशियात पेट्रोलची मागणी खूप वाढते. त्यामुळे तिथे रोज कमीत कमी 1 लाख 10 हजार टन पेट्रोल लागते.

रॉयटर्सनुसार, मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांच्या तुलनेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत बेलारूसने रेल्वेद्वारे रशियाला पाठवले जाणारे पेट्रोल थेट तिपटीने वाढवले आहे. ते आता 70,000 टनांच्या पुढे गेले आहे.

अमेरिकेचे प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नुसार, “युक्रेन गेल्या काही वर्षांपासून रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करत आहे, पण आता युक्रेनकडील ड्रोन आणि मिसाईल्सची ताकद आणि संख्या दोन्ही खूप वाढली आहे.”

“यामुळेच युक्रेन आता जवळपास 1,200 मैल दूर असलेल्या सायबेरियातील ट्युमेनसारख्या दुर्गम भागातल्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंतही सहज पोहोचू लागला आहे. या वाढलेल्या ताकदीच्या जोरावरच युक्रेनने 18 जूनला रशियावर मोठा हल्ला केला.”

“या हल्ल्यात रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला (एअर डिफेन्स) चकवा देत युक्रेनने मॉस्कोची मुख्य तेल रिफायनरी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली.”

संकट कसे वाढले?

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले, “या हल्ल्याला सध्याच्या इंधन संकटाचा एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. 20 जूनपर्यंत रशियाच्या एकूण तेल शुद्धीकरण क्षमतेचा सुमारे 28 टक्के हिस्सा ठप्प झाला होता.”

हा अंदाज रशियन तेल कंपनी ‘गझप्रॉम नेफ्ट’चे माजी रणनीती प्रमुख आणि सध्या बर्लिनमधील ‘कार्नेगी रशिया युरेशिया सेंटर’चे वरिष्ठ सल्लागार असलेल्या सर्गेई वाकुलेन्को यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले, “युक्रेनने अचानक ड्रोन हल्ल्यांचा मारा वाढवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा प्रश्न फक्त मालाची वाहतूक किंवा बाजारातील चढ-उताराचा राहिलेला नाही, तर खरी अडचण ही आहे की देशात प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलचा साठाच संपत चालला आहे.”

रशियाचे सरकारी प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या कित्येक वर्षांत रशिया पहिल्यांदाच दुसऱ्या देशांकडून पेट्रोल-डिझेल मागवण्याच्या तयारीत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

रशियाच्या सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले होते की, गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच रशिया इंधनाची आयात करण्याची तयारी करत आहे.

रशिया या संदर्भात बऱ्याच देशांशी बोलणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी त्या देशांची नावे जाहीर केली नव्हती.

तज्ज्ञांच्या मते, रशियातील हा मोठा तुटवडा फक्त भारतासारखे मोठे तेल शुद्धीकरण कारखानेच पूर्ण करू शकतात, जरी भारत रशियापासून खूप दूर असला तरी.

पण सागरी मार्गाने होणारी ही आयात रशियात पोहोचण्यासाठी अनेक आठवड्यांचा काळ लागेल.आधीच युक्रेन युद्धाच्या खर्चामुळे रशियाची आर्थिक स्थिती कोलमडली असताना या नव्या संकटामुळे त्यांच्या खर्चावर आणखी मोठा भार पडणार आहे.

रशियाला पेट्रोल पाठवण्याच्या या संपूर्ण प्रकरणावर भारताने अधिकृतपणे अजून काहीही म्हटलेले नाही.

फोटो स्रोत, Getty Images

जगात सर्वात जास्त तेल विकणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या रशियाने, युक्रेनचे हल्ले वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि विमानाचे इंधन बाहेर देशांत पाठवणे पूर्णपणे बंद केले आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तर असेही संकेत दिले की, ते आता डिझेलच्या निर्यातीवरही बंदी आणू शकतात. या परिस्थितीमुळे किर्गिस्तानने कझाकस्तान, बेलारूस, अझरबैजान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांकडे इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत मागितली आहे.

जवळपास 70 लाख लोकसंख्या असलेला किर्गिस्तान आपल्या गरजेच्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त पेट्रोल रशियाकडून मागवायचा, पण आता रशिया स्वतःच गंभीर इंधन संकटाचा सामना करत आहे.

संकट कधी संपणार?

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, रशियाकडे सध्या असणारा पेट्रोलचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 4 टक्क्यांनी कमी आहे.

यावर तज्ज्ञ क्रिस वीफर म्हणतात, “कागदावर किंवा आकडेवारीनुसार देशात पुरेसे पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. अडचण एवढीच आहे की, हे इंधन सध्या चुकीच्या ठिकाणी पडून आहे.”

म्हणजेच ज्या भागात तेलाचा तुटवडा आहे तिथपर्यंत हा साठा वाहतुकीद्वारे पुन्हा व्यवस्थित पोहोचवणे गरजेचे आहे.

वीफर यांच्या मते, रशियासारख्या एवढ्या मोठ्या देशात ही यंत्रणा एका रात्रीत सुधारणे अशक्य आहे.

ते म्हणाले, “तेल साठा भरपूर आहे, पण सध्या जिथे त्याची सर्वात जास्त गरज आहे तिथे ते पोहोचवायला काही आठवडे लागतील. हे काम म्हणजे वाहतूक आणि वितरणाचे एक खूप मोठे आव्हान आहे.”

‘एपी’ न्यूज वृत्तसंस्थेनुसार, मॉस्कोची मुख्य रिफायनरी जी राजधानी आणि आजूबाजूच्या भागातील 40 टक्के पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करायची, तिची दुरुस्ती करायला कमीत कमी 3 महिने लागतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC