Home LATEST NEWS ताजी बातमी ‘नामदेव ढसाळांची कविता पोस्ट केल्यावर पोलीस ठाण्यात बोलावलं’; अहिल्यानगरमधील कवीचे गंभीर आरोप

‘नामदेव ढसाळांची कविता पोस्ट केल्यावर पोलीस ठाण्यात बोलावलं’; अहिल्यानगरमधील कवीचे गंभीर आरोप

4
0

Source :- BBC INDIA NEWS

नामदेव ढसाळांची कविता पोस्ट केल्यावर लेखकाला पोलीस ठाण्यात बोलावलं; फेसबुक पोस्टमधून गंभीर आरोप

फोटो स्रोत, FACEBOOK

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील लेखक आणि कवी संतोष दौंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करत गंभीर आरोप केले.

पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर केल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आणि त्यांना चौकशीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

संतोष दौंडे यांनी म्हटलं की, गुरुवारी (6 ऑगस्ट) रात्री त्यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर नामदेव ढसाळ यांची ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय…’ ही कविता पोस्ट केली. त्यानंतर गावातील काही लोकांनी या पोस्टविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असा आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात पाथर्डी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “ही कविता नामदेव ढसाळांची आहे. ढसाळांच्या कवितेतील 4 वेद 18 पुराणं 6 शास्त्र या आणि त्याच्या पुढच्या अशा 2 ओळींबद्दल तक्रार होती. ही कविता प्रसिद्ध होऊन अनेक वर्षं झाली आहेत, ती तेव्हा प्रकाशित झाली म्हणजे तिला मान्यता मिळालेली आहे.”

“ही कविता पोस्ट करणारेही कवीच आहेत. त्यामुळे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. या सर्व प्रकरणाला गावातील अतिक्रमणाच्या वादाची पार्श्वभूमी आहे. त्यातील शिवीगाळीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

संतोष दौंडे काय म्हणाले?

कवी संतोष दौंडे यांच्या म्हणण्यानुसार, ” गुरुवारी सायंकाळी काही साध्या वेशातील पोलीस माझ्या घरी आले आणि मला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. आरोग्याच्या कारणास्तव मी माझी पत्नी अर्चना दौंडे यांनाही सोबत घेतले. पाथर्डी पोलीस ठाण्यात पीआय कोकरे यांनी माझ्याकडे कवितेबाबत स्पष्टीकरण मागितले आणि त्यांनी पोस्ट केलेला मजकूर नामदेव ढसाळ यांच्या मूळ कवितेतीलच असल्याची पडताळणी केली.”

“चौकशीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाली. पोस्टमधील मजकूर हा नामदेव ढसाळ यांच्या कवितेतीलच असल्याने तक्रार निकाली काढण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी कळवले,” असंही दौंडे यांनी नमूद केलं.

संतोष दौंडे

फोटो स्रोत, Santosh Daunde/Facebook

तथापि, दौंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये काही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर आणि समर्थकांवर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी काही व्यक्तींची नावे घेत राजकीय दबावाचा आरोप केला.

दौंडे यांनी आपण कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्य बजावल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणामुळे आपल्याला पुन्हा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दौंडे म्हणाले, “गावपातळीवर काही राजकीय वातावरण तयार झालं आहे. त्यावर मी एक लेखक म्हणून भूमिका मांडत असतो. गावातील अतिक्रमण आणि इतर प्रकाराविरोधात मी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर केलेल्या अन्य एका पोस्टमध्ये कवी नामदेव ढसाळ यांची कविता होती. ढसाळ यांच्या त्या कवितेतील काही शब्दांवरून त्यांनी मला जातीयवादी म्हणत मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार नोंदवली.

याला राजकीय लॉबी जबाबदार असल्याचा आरोप दौंडे यांनी केला.

“प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बोलतो म्हणून मला दाबायचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. ते पुढेही माझ्याविरोधात कुरघोडी करू शकतात. मी याबाबत पोलिसांना सांगितलं असून त्यांनी संरक्षण देऊ असं म्हटलंय”, असं दौंडे यांनी सांगितलं.

दुसरीकडे, तक्रार करणाऱ्यांनी आरोप केलाय की जाणूनबूजून कवितेतील ठराविक ओळी पोस्ट करून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत.

‘ती कविता आमच्या वाचनात नव्हती’

याप्रकरणात तक्रार दाखल करणारे अमोल नलवडे हे भाजप तालुका सरचिटणीस तसेच सोमठाणे नलवडे गावातील जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष आहेत.

ते म्हणाले, “त्यांनी नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केली. मात्र, त्यांनी ती कविता पूर्ण टाकली नव्हती, त्यातील काही आक्षेपार्ह शब्द बोल्ड करून ठराविक भाग टाकला होता. दुसरा मुद्दा म्हणजे, आम्ही जेव्हा तक्रार दाखल करायला गेलो, तेव्हा आम्हाला कळालं की, ही कविता प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची आहे आणि तो मजकूर त्या कवितेतील होता.”

“ती प्रकाशित झालेली कविता आहे. त्यामुळे या संदर्भात तक्रार दाखल झाली नाही. पंरतु, गावातील शिवीगाळीशी संबंधित प्रकरणात आम्ही 5 ऑगस्ट 2026 ला तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यात संतोष दौंडे यांचं नाव नाही.”

ग्राफिक्स

अमोल नलवडे पुढे म्हणाले, “कवितेबाबत सांगायचं तर, ती कविता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. आमचा उल्लेख कवितेशी 100 टक्के निगडीत आहे. कारण आज कोणीही कवितेतील तो मजकूर वाचला, तर ते वाक्य हिंदू धर्म आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असं आहे. म्हणूनच आमचा त्यावर आक्षेप होता.”

“ती कविता आमच्या वाचनात नव्हती. ती कोणी लिहिली हे माहीत नव्हतं आणि ती अर्धवट असल्याने त्याचा मतितार्थ आम्हाला कळाला नाही. त्यांनी पूर्ण कविता टाकली असती, तर वेगळं वाटलं असतं. परंतु त्यांनी अपूर्ण कविता टाकली. अर्धवट बोलल्याने काय कळणार आहे? म्हणजे यामागे त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ दडलेला आहे”, असा आरोप त्यांनी केला.

“नामदेव ढसाळ यांच्या काळात त्यांच्या कविता समाजप्रबोधनासाठी असतील; मात्र आजच्या काळात जनजागृतीच्या नावाखाली कोणाच्याही भावना दुखावतील. त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्टचं समर्थन करायला नको, असं मला वाटतं”, असं मत नलवडे यांनी व्यक्त केलं.

नामदेव ढसाळ यांच्या कवितेवरून वाद होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. याआधीही ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणाऱ्या कवितांवरून वाद पाहायला मिळाले आहेत. याबाबत आम्ही ज्येष्ठ साहित्यिकांचं मत जाणून घेतलं

‘..तर मग सगळंच मराठी साहित्य मोडीत काढावं लागेल’

याबाबत बोलताना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण दशरथ बांदेकर म्हणतात, “नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी मराठी साहित्य आणि समाजात जी क्रांती घडवून आणली, त्याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. मात्र, आज त्यांच्या एखाद्या कवितेचा संदर्भ समाजमाध्यमांवर देताना, ती समजून न घेता किंवा पोस्ट करणाऱ्याचा भाव लक्षात न घेता त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल, तर ती निश्चितच निषेधार्ह बाब आहे.”

“आज साहित्यिकच काय, कोणीच अशाप्रकारचं काही लिहायचंच नाही किंवा पूर्वीच्या साहित्याचा नव्याने संदर्भ देणंही गुन्हा ठरावं, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. यातून एक प्रकारची सांस्कृतिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका येते,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

नामदेव ढसाळ आणि दलित पँथर (सौजन्य - विक्रांत भिसे)

फोटो स्रोत, Vikrant Bhise

पुढे बोलताना बांदेकर म्हणाले, “साहित्यात भाषेचा विविधांगी वापर असतो. काही शब्द संसदीय भाषेत नसले, तरी त्यातून व्यक्त होणारा संताप, विद्रोह आणि भावना त्या काळाची गरज असते. त्याचा संदर्भ न समजून घेता केवळ एखाद्या शब्दावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. असंच सुरू राहिलं, तर सगळंच मराठी साहित्य मोडीत काढावं लागेल.”

“साहित्य, भाषा ही सर्व शब्दांसकट असते आणि हा भाषेच्या वैशिष्ट्याचाच एक भाग आहे. त्यामुळे जर आपल्याला हे समजून घेता येत नसेल, तर आपली ही सांस्कृतिक पिछेहाट होत आहे, असंच म्हटलं पाहिजे”, असंही मत बांदेकर यांनी व्यक्त केलं.

‘आजच्या काळात ही कविता अधिक प्रस्तुत ठरतेय’

लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार याबद्दल बोलताना म्हणाल्या, “ही नामदेव ढसाळ यांची दीर्घ कविता आहे. ती पूर्ण न वाचता केवळ काही शब्द तोडून तक्रार केली असेल, तर तक्रारकर्त्यांची गफलत झाली आहे किंवा त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं आहे, असं दिसतं.”

“समाजमाध्यमांवर मजकूर शेअर करताना संदर्भाकडे दुर्लक्ष केलं जातं, हेही यातून दिसतं. वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्राचं ज्या प्रकारे सपाटीकरण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कविता आज अधिकच प्रस्तुत ठरते. कदाचित म्हणूनच दौंडे यांनी ती शेअर केली असावी, त्याचा नेमका गाभा समजून न घेतल्याने हा सगळा प्रकार घडल्याचं दिसतंय.”

“दुसरी बाब म्हणजे ‘समग्र नामदेव ढसाळ’ हे महाराष्ट्र शासनानेच प्रकाशित केलं आहे. त्यामुळे त्याच कवीची कविता दुसऱ्या कवीने समाजमाध्यमावर शेअर केल्याबद्दल तक्रार होणं, हे अज्ञानाचं किंवा सध्याच्या काळातील वाईट राजकारणाचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल,” असं मत प्रज्ञा पवार यांनी यांनी व्यक्त केलं.

डॉ. प्रज्ञा दया पवार

फोटो स्रोत, facebook/pradnya.d.pawar

नामदेव ढसाळ यांच्या कवितेवरून वाद होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. याआधीही ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणाऱ्या एका चित्रपटात वापरण्यात आलेल्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता.

सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने कोण ढसाळ, आम्ही ओळखत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून विविध स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. याबाबतही प्रज्ञा पवार यांनी भाष्य केलं.

त्या म्हणाल्या, “मागे देखील कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न एका चित्रपटाच्या संदर्भाने सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने उपस्थित केला होता. त्याचा निषेध म्हणून आम्ही ‘तुही इयत्ता कंची’ हा सांस्कृतिक हस्तक्षेप सुरू करून त्यांच्या कवितांचं ठिकठिकाणी वाचन केलं होतं.”

“मुळात, कवी कवितेतून काय मांडतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या कवितेचं वेगळेपण म्हणजे ती आजच्या काळात ती अधिक समर्पक ठरतेय. आज अशा कविता आणि चित्रपटांवर बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचे प्रकार वाढले आहेत.”

“असं असलं तरीही यामुळे विचार करणारी आणि लिहिणारी माणसं गप्प बसलेली नाहीत. काळ कोणताही असो सत्ता कायम कवीला घाबरलेली आहे. अशा घटनांविरोधात लेखक, कवी आणि विचार करणारी माणसं एकत्रितपणे लढत राहतील,” असंही प्रज्ञा पवार यांनी नमूद केलं.

नामदेव ढसाळांना मुंबई का आवडायची?

नामदेव ढसाळ यांचा पुण्याच्या खेड तालुक्यातील (आताचे राजगुरूनगर) कनेरसर-पूर या गावात जन्म झाला.

तत्कालीन उच्चवर्णीयांची चाकरी करण्याचं काम त्यांच्या कुटुंबाकडं होतं. गावात दवंडी पिटणं, निरोप पाठवणं, लाकडं फोडणं, रखवाली करणं अशा कामांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर होती.

त्यांचे वडील मुंबईत नोकरी करत होते. ढसाळ हे आईसोबत गावी राहत असत. लहानपणीच त्यांच्या वाट्याला काम करणं आलं. हसण्या-बागडण्याच्या वयातच या जबाबदारीचं ओझं आणि त्यातून होणारा अपमान-अवहेलना देखील त्यांच्या वाट्याला आली.

जातीचं वास्तव हे लहानपणीच आपल्याला कळल्याचं ते आपल्या लिखाणात नमूद करतात. त्यांची ‘हाडकी हाडवळा’ ही कादंबरी त्यांच्या याच अनुभवांवर आधारित आहे.

नामदेव ढसाळांना मुंबई का आवडायची?

फोटो स्रोत, SHABD PARAKASHAN

त्यांच्या आईची इच्छा होती की, नामदेव यांनी खूप शिकावं. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून कोटी कोटी कुळांचा उद्धार केला तसा नामदेवनं देखील करावा असं त्या म्हणत.

त्यामुळं शाळा सोडून ढसाळ मित्रांसोबत खेळायला गेले किंवा शाळेला दांडी मारली, तर त्यांच्या आईचा धपाटा त्यांना खावाच लागायचा.

पुढच्या वर्गात गेल्यावर दुसरे मास्तर आले. मात्र, ते जातीयवादी होते. त्यामुळे मन पुन्हा शाळेत लागत नव्हतं, असंही ढसाळांनी नमूद केलं होतं.

याबद्दल त्यांनी ‘माझं शापित बालपण’ या लेखात म्हटलं, “गावच्या शाळेचे दिवस संपले ते मुंबईला आल्यामुळे – खरेच वडिलांना आजही मी धन्यवाद देतो – त्यांनी एकार्थी नरकातून आमची सुटका केली. नरक गावगाड्याचा नरक – अजून कितीतरी गोष्टी या नरकाशी जोडलेल्या आहेत.”

“माझ्या चरित्राशीसुद्धा – वाटते आपले चारित्र्य – या नरकानं कलंकित करून सोडले होते! माझं बालपण शापित करून टाकणारे गावचे ते दिवस आठवले की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.”

ढसाळांच्या कवितेत-लेखनात वेश्याव्यवसाय कसा आला?

ढसाळ मुंबईत आल्यावर कामाठीपुरा या भागात राहत असत. ही वस्ती कष्टकऱ्यांची आणि गरीब लोकांची होती.

मोलकरीण, हातगाडीवाले, कारखान्यात काम करणारे, कत्तलखान्यात काम करणारे लोक या ठिकाणी राहत. तिथे राहताना आजूबाजूच्या लोकांची सुख-दुःखं त्यांनी पाहिली आणि ती त्यांनी शब्दबद्ध केली आणि चित्रबद्ध देखील केली.

ढसाळांच्या कवितेत लेखनात वेश्याव्यवसाय कसा आला?

फोटो स्रोत, Getty Images

उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते टॅक्सी ड्रायव्हिंग करू लागले. एकीकडे टॅक्सी चालवणं आणि त्याच वेळी कविता रचणं या दोन्ही गोष्टी ते करू लागले. एकदा एका कविता संमलेनात ते पोहचले आणि त्यांनी तिथे कविता म्हणू देण्याची विनंती केली.

अनंत काणेकर हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ‘एका टॅक्सी चालकाला आपली कविता म्हणून दाखवायची आहे,’ अशी एक विनंती त्यांच्याकडे आली. त्यांनी संधी दिली आणि ढसाळांनी एक कविता म्हटली.

त्यातील नवीन भाषा, नवीन प्रतिमा, दाहकता या सर्व गोष्टींमुळं त्यांच्या कवितेनं मराठी साहित्य विश्वाला एक धक्का दिला. ज्या बंधनात, छंदात अनेक वर्षांपासून मराठी कविता अडकून पडली होती ते साखळदंड नामदेव ढसाळांनी घणाचे घाव घालून तोडले.

अर्थात त्यावेळच्या सर्वांनाच हे आवडले असे नाही. कारण प्रस्थापित वर्गासाठी तर ही कविता म्हणजे त्यांचं असलेलं-नसलेलं राज्य हिरावून घेण्याची नांदीच वाटली.

त्यांनी त्या कवितेला रांगडं म्हटलं, रासवट म्हटलं तरीही नामदेव ढसाळांवर याचा परिणाम झाला नाही. ते आपल्या कविता लिहितच राहिले. यानंतर ती वेळ आली की त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झाला. त्या काव्यसंग्रहाचं नाव ‘गोलपिठा’.

‘गोलपिठा’ म्हणजे मुंबईत वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी एक चौक आहे. त्याला गोलपिठा म्हटलं जातं. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जगात माणसाला आपल्या शरीराची देहविक्री करावी लागते आणि त्याचं रूपक म्हणून त्यांनी या काव्यसंग्रहाला ‘गोलपिठा’ हे नाव दिलं.

टॅक्सी ड्रायव्हर ते पद्मश्री

आपल्या मनातील खदखद आणि आजूबाजूच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायामुळं ते 70 च्या दशकात चळवळीत आले.

कामाठीपुऱ्यातील वेश्या, तृतीयपंथी, त्यांच्याकडं काम करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या जाचाला सामोरं जावं लागायचं. त्यांना माणूस म्हणून सारे हक्क नाकारण्यात आले होते. त्यांच्यासाठी नामदेव ढसाळांनी मोर्चा काढला. या मोर्चाला विजय तेंडुलकर आणि सतीश काळसेकरांसारखे ज्येष्ठ साहित्यिक देखील उपस्थित होते.

नामदेव ढसाळांचे 10 कविता संग्रह प्रकाशित आहेत. या पैकी अनेकांना पुरस्कार मिळाला. त्या कवितांचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झालं. पण त्या तुलनेत त्यांच्या गद्यात्मक लिखाणाची चर्चा नेहमीच कमी झालेली दिसते.

नामदेव ढसाळांनी केलेल्या अतुलनीय कामासाठी त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि 2004 साली त्यांना साहित्य अकादमीकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला.

त्यांना मायस्थेनिया ग्राविस हा दुर्धर आजार झाला आणि त्यामुळे त्यांना व्हीलचेअरवरून हालचाल करावी लागायची. असं असलं तरी त्यांच्यातील नेहमी लोकांमध्ये जाण्याचा, मिसळण्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. पण आजाराने त्यांचे शरीर हळूहळू थकू लागले आणि 2014 साली त्यांचे निधन झाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC