Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
बंगालमध्ये आणि फ्रेंचांविरुद्धच्या युद्धांमध्ये इंग्रजांना विजय मिळाला होता. परंतु, हैदर अली आणि त्यानंतर टिपू सुलतान यांच्या विरोधात इंग्रजांना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. 1767 ते 1799 या काळात हा संघर्ष सुरू होता.
हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला आव्हान देण्याची ताकद होती. परंतु, त्यांचा प्रभाव प्रामुख्याने दक्षिण भारतापुरताच मर्यादित होता. हे लक्षात घेऊन त्यांनी मराठे, हैदराबादचे निजाम दुसरे आसफ शाह आणि अवधचे नवाब शुजा-उद्-दौला यांच्यासोबत एकत्र येऊन ब्रिटिशांचा सामना करण्याचा विचार केला.
पण, हैदर अलीचा वाढता प्रभाव पाहून आसफ शाह आणि शुजा-उद्-दौला घाबरले. त्यामुळे त्यांनी हैदर अलीला पूर्णपणे साथ देण्यास नकार दिला.
दुसरीकडे, अपमान सहन करावा लागूनही आपली सत्ता टिकवण्यासाठी मराठे आणि राजपूतांनी इंग्रजांना साथ दिली. परंतु, शेवटी त्यांचीही फसवणूक झाली.
याउलट, हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिशांशी हातमिळवणी करून भारतीय राजांविरोधात लढायचं नाही, असा निर्णय घेतला होता.
त्यांनी शेवटपर्यंत परकीय इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळे इतिहासात त्यांच्या नावाची कायमची नोंद झाली.
1784 पर्यंत इंग्रजांनी टिपू सुलतानला क्रूर शासक, धर्मांध किंवा धर्मवेडा म्हणून चित्रित केलं नव्हतं.
दुसऱ्या म्हैसूर युद्धानंतर इंग्रजांना खात्री झाली की, टिपू सुलतानला विकत घेता येणार नाही किंवा त्याला आपल्या ताब्यात आणता येणार नाही. त्यामुळे त्याला सत्तेवरून हटवण्यासाठी इंग्रजांनी त्याची क्रूर आणि धर्मांध अशी प्रतिमा निर्माण केली.
अशा राजापासून आपण जनतेचं रक्षण करत आहोत, असं सांगून त्यांनी म्हैसूरवरील आपली आक्रमणं योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला.
भारतातील फ्रेंच आक्रमकांचं वर्चस्व पूर्णपणे संपवलं आहे, असं इंग्रजांना वाटत होतं. परंतु, टिपू सुलतानच्या फ्रेंचांशी असलेल्या संबंधांमुळं इंग्रज घाबरले. त्यामुळे इंग्रजांच्या नजरेत टिपू सुलतानच त्यांचा मुख्य शत्रू बनला.
आपसांत लढण्याचा फटका
1782 मध्ये हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान सत्तेवर आला. इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या लंडनमधील ‘लीडनहॉल स्ट्रीट’साठी टिपू मोठे आव्हान ठरला होता. मात्र, 1790 ते 1792 या काळात झालेले तिसरे म्हैसूर युद्ध दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनीच्या पथ्यावर पडणारे होते.
गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने मराठे आणि हैदराबादच्या निजामासारख्या प्रमुख प्रादेशिक सत्तांना आपल्या बाजूने घेण्यात यश मिळवलं. म्हैसूरची ताकद वाढू नये, असं या दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती.
फोटो स्रोत, PRINT COLLECTOR
मागील युद्धात टिपू सुलतानला मदत करणारे फ्रेंच या वेळी त्याला मदत करू शकले नाहीत. कारण त्याच काळात फ्रान्समध्ये क्रांती (फ्रेंच राज्यक्रांती) सुरू झाली होती आणि ते त्यात गुंतले होते.
युद्धात काही वेळा इंग्रजांना माघार घ्यावी लागली, तरी 3 वर्षे चाललेल्या या युद्धात कॉर्नवॉलिसने टिपूच्या ताब्यातील अनेक मजबूत किल्ले जिंकले. त्यानंतर त्याने युद्ध म्हैसूरच्या मध्यवर्ती भागापर्यंत नेले.
टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपट्टण ताब्यात घेतली जाण्याची वेळ आली. तेव्हा त्याला इंग्रजांशी शांतता करार करावा लागला. 1792 मध्ये झालेल्या श्रीरंगपट्टण करारानुसार टिपूला मोठा भूभाग गमवावा लागला.
त्याचबरोबर नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमही द्यावी लागली. शांतता कराराची हमी म्हणून त्याला त्याची दोन मुले अब्दुल खालिक आणि मुईझ-उद-दिन यांना कॉर्नवॉलिसकडं ओलीस ठेवावं लागलं.
म्हैसूरचं शेवटचं युद्ध
तिसऱ्या म्हैसूर युद्धात झालेलं मोठं नुकसान भरून काढण्यासाठी टिपू सुलतानने फ्रान्सच्या क्रांतिकारी सरकारकडे लष्करी मदत मागितली. परंतु, भविष्यात मदत करण्याच्या अस्पष्ट आश्वासनांशिवाय त्याला काहीही मिळालं नाही. टिपूचे फ्रेंचांशी असलेले संबंध हेच निमित्त पुढे करत नवीन गव्हर्नर जनरल रिचर्ड वेलस्लीने टिपूविरोधात नवीन युद्ध सुरू केलं.
चौथं आणि शेवटचं म्हैसूर युद्ध (1799) सुरू होण्याच्या 6 महिने आधीपासूनच ईस्ट इंडिया कंपनीने आपलं सैन्य बळकट करण्यास सुरुवात केली होती. आर्थर वेलस्लीच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हैदराबादच्या निजामाच्या आणि मराठ्यांच्या सैन्यासोबत मिळून श्रीरंगपट्टणला वेढा घातला.
फोटो स्रोत, Getty Images
टिपू सुलतानने इंग्रजांसमोर शरणागती पत्करण्यास नकार दिला. त्यानं श्रीरंगपट्टणच्या किल्ल्याच्या तटबंदीवर शेवटपर्यंत इंग्रजांशी लढा दिला आणि 14 मे 1799 रोजी त्याचा मृत्यू झाला.
टिपू सुलतानच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याला प्रत्यक्ष पाहिलेल्या एका तज्ज्ञ साक्षीदारानं म्हटलं की, “टिपूने आपल्या वडिलांचा, स्वतःचा आणि आपल्या देशाचा अभिमान वाढेल अशा पद्धतीने राजधानीचं रक्षण केलं. त्याने राष्ट्राला खऱ्या अर्थानं गौरव मिळवून दिला.”
टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सेनापती जॉर्ज हॅरिसनं, “आता भारत आपला आहे,” अशी घोषणा केली.
प्लासीच्या लढाईमुळं ईस्ट इंडिया कंपनीला भारताच्या एका भागावर सत्ता मिळाली होती. परंतु, श्रीरंगपट्टणच्या पतनामुळे दक्षिण भारतात इंग्रजांची सत्ता अधिक मजबूत आणि कायमची झाली.
पाश्चात्य पद्धती स्वीकारणारा पहिला भारतीय शासक
‘ग्रेट मेन ऑफ इंडिया’ या पुस्तकातील टिपू सुलतानवरील लेखात एच. एच. डॉडवेल यांनी लिहिलं आहे की, प्रशासनात पाश्चात्य पद्धती लागू करण्याचा प्रयत्न करणारा टिपू सुलतान हा पहिलाच भारतीय शासक होता.
टिपूवर अनेकदा टीका करणारे कर्नल विल्क्स यांनीही म्हटलं आहे की, “म्हैसूरच्या सरकारने पलायकरांवर (पलायनवादी) बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं होतं. पुढे हैदर अलीने त्यांच्या जमिनींपैकी दहावा हिस्सा वगळता जवळपास सर्व जमीन आपल्या ताब्यात घेतली होती.”
टिपू सुलतानची जमीन महसूल व्यवस्था
मिल यांनी आपल्या ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “टिपूच्या राज्यात शेती अतिशय चांगली होती आणि तिथले लोक भारतातील इतर भागांच्या तुलनेत जास्त समृद्ध होते.”
त्या काळातील अनेक इंग्रजांनीही मिल यांच्या या मताला दुजोरा दिला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
हैदर अलीने केलेल्या पद्धतशीर जमीन मोजणीच्या आधारे कर आकारणी केली जात होती. त्याने कर वाढवला असला तरी त्यासाठी एक ठराविक व्यवस्था तयार केली. चांगल्या प्रशासनामुळे तो हा कर पूर्णपणे वसूलही करू शकला.
नांगरणी केलेल्या सुपीक जमिनीवर मिळणाऱ्या एकूण पिकापैकी दोन तृतीयांश हिस्सा सरकारचा आणि एक तृतीयांश हिस्सा शेतकऱ्यांचा असला, तरी कर मात्र ‘वीरराय पणम’ या चलनाच्या हिशोबाने रोख रकमेतच ठरवला आणि वसूल केला जात होता.
त्यामुळं कर वसूल करणं सोपं झालं आणि ही पद्धत जुन्या वाटणीच्या पद्धतीपेक्षा अधिक चांगली ठरली.
टिपू सुलतानची नाणी
भारतीय नाणेव्यवस्था विकसित करणाऱ्या महत्त्वाच्या शासकांपैकी टिपू सुलतान एक होता. विशेषतः सुंदर आणि कलात्मक नाणी तयार केल्यामुळं इतिहासात त्याला महत्त्वाचं आणि वेगळं स्थान आहे.
‘फणम’ हे त्या काळात वापरात असलेलं सोन्याचं एक सामान्य नाणं होतं. नंतरच्या चलनाच्या हिशेबानं त्याची किंमत सुमारे 5 आणे 5 पैसे इतकी होती. परंतु, टिपू सुलतानच्या काळात सोने, चांदी आणि तांबे यांची अनेक नवीन नाणी चलनात आणली गेली.
टिपूच्या नाण्यांमध्ये ‘मोहर’ हे सर्वात जास्त किमतीचं सोन्याचं नाणं होतं. त्याची किंमत 4 पगोडा म्हणजेच अंदाजे 14 रुपये किंवा इंग्रजी चलनानुसार 1 पौंड इतकी होती.
चांदीच्या नाण्यांमध्ये टिपूचे ‘दुहेरी रुपया’ किंवा डबल रुपया विशेष महत्त्वाचे मानले जाते. ते भारतात आतापर्यंत तयार झालेल्या सर्वात सुंदर नाण्यांपैकी एक मानले जाते. त्याची किंमत नंतरच्या चलनाच्या हिशोबाने 1 रुपया 12 आणे इतकी होती.
तांब्याच्या नाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पैशांची नाणी चलनात होती.
टिपू सुलतानचे आर्थिक धोरण
टिपू सुलतानला आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध, तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आणि लष्करीदृष्ट्या शक्तिशाली बनवण्यात विशेष रस होता.
टिपू सुलतानला आपल्या जनतेच्या कल्याणाची काळजी होती. त्यामुळे त्याने जमीन, कारखाने आणि खाणी सरकारच्या थेट नियंत्रणाखाली आणल्या. एक सुधारक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. शेती न करणाऱ्या जमीनमालकांचे हक्क कमी करून, प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांना मान्यता दिली.
टिपू सुलतानने जमीन महसूल कर वसुलीसाठी मध्यस्थांना परवानगी दिली नाही. हे काम त्याने सरकारी महसूल अधिकाऱ्यांवर (अमिलदार) सोपवली. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा दिली.
फोटो स्रोत, Getty Images
म्हैसूरमध्ये मिळणारे सोने, चांदी, हस्तिदंत तसेच वेलची, मिरी, चंदनाच्या वस्तू आणि कापसाचे धागे यांची विक्री करण्यासाठी जगातील विविध ठिकाणी व्यापारी केंद्रं उभारण्यात आली होती.
कराची, ओमान, बगदाद आणि कॉन्स्टँटिनोपल यांसारख्या ठिकाणी ही केंद्रं होती. तसेच, परदेशातून रसायने, बंदुका आणि तोफा मागवल्या जात होत्या.
या व्यापार व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने 9 प्रमुख व्यापाऱ्यांची नियुक्ती केली होती. वस्तू खरेदी आणि विक्रीसाठी प्रतिनिधीही नेमले होते. टिपू सुलतान काही परदेशी व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधून त्यांना म्हैसूरमध्ये बोलवत असत. आज म्हैसूरची रेशीम उत्पादनं जगभर प्रसिद्ध आहेत, त्यामागे टिपू सुलतानचे मोठं योगदान मानलं जातं.
ईस्ट इंडिया कंपनीसारखीच एक ‘सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी’ उभारण्याचा टिपू सुलतानने प्रयत्न केला होता. या बाबतीत तो आपल्या काळातील इतर भारतीय राजांपेक्षा अधिक दूरदृष्टीचा होता. कारण इतर राजांनी अशा प्रकारच्या शक्यतांकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं.
टिपू सुलतानने जारी केलेल्या ‘हुकूमनामा’ (आदेश) मधून त्याचा व्यापारावर थेट देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. म्हैसूरमधील तसेच परदेशातील व्यापारी संस्थांच्या कामकाजावर तो लक्ष ठेवून होता. तसेच, मालाची निर्यात वाढवणे आणि परदेशातून मालाची आयात वाढवणे, हा त्याचा उद्देश होता.
नौदल उभारणीचा प्रयत्न
मलबार किनारपट्टी जिंकल्यानंतर तिथली प्रसिद्ध बंदरे आणि जहाजबांधणीची ठिकाणं म्हैसूरच्या ताब्यात आली. 1792 मध्ये झालेल्या पराभवानंतर, टिपू सुलतानने स्वतःचं नौदल उभारण्यावर विशेष लक्ष दिले.
सप्टेंबर 1796 मध्ये नौदलासाठी स्वतंत्र प्रशासकीय मंडळ स्थापन करण्यात आले. त्याचबरोबर जुमलाबाद, वाजिदाबाद आणि माजिदाबाद या जहाजबांधणी केंद्रांसह पश्चिम किनाऱ्यावरील इतर ठिकाणी 40 युद्धनौका आणि अनेक मालवाहू जहाजे बांधण्याचे आदेश देण्यात आले.
जहाजबांधणी आणि नौदलाचा विस्तार यांना टिपू सुलतानने विशेष महत्त्व दिलं होतं. त्यामुळे समकालीन इतर राजांच्या तुलनेत तो अधिक पुढारलेला दिसतो. व्यापार वाढवण्यासाठीही त्याने जहाजबांधणीच्या उद्योगात मोठी गुंतवणूक केली होती.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासावर विशेष भर
टिपू सुलतानने आपल्या दूतांना फ्रान्समधून कारागीर आणि तज्ज्ञांना कामावर आणण्याचे आदेश दिले होते. तसेच, फ्रान्समधून काही वनस्पती आणि उपकरणे आणण्यासही सांगितले होते.
टिपू सुलतानला बॅरोमीटर, थर्मामीटर, चष्मे, घड्याळे आणि छपाईची यंत्रे यांसारख्या वस्तूंमध्ये विशेष रस होता. त्याने मागवलेल्या बहुतेक वस्तू, विशेषतः ज्या वस्तूंची त्याने वारंवार मागणी केली, त्या फ्रेंचांनी त्याला पुरवल्या होत्या.
टिपू सुलतानचे वडील हैदर अली यांच्या कबरीजवळच टिपूचेही दफन करण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या ‘लाल बाग’मधील सायप्रसची झाडे टिपूने दूतांमार्फत फ्रान्समधून मागवली होती.
परदेशी विज्ञान आणि लष्करी तंत्रज्ञानाचा वापर करून म्हैसूरमध्येही शस्त्रांची निर्मिती केली जात होती. टिपू सुलतानला युरोपीय शस्त्रांमध्ये असलेल्या आवडीमुळे म्हैसूरमध्ये खास स्थानिक पद्धतीची ‘स्वदेशी रॉकेट्स’ विकसित करण्यात आले होते.
ब्रिटिशांविरोधात टिपू सुलतानने वापरलेल्या रॉकेटचे काही अवशेष आजही ब्रिटनमधील संग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. तसेच, टिपूने फ्रान्सचा राजा सोळावा लुई याला भेट दिलेल्या म्हैसूरमध्ये तयार केलेल्या दोन बंदुका पाहून फ्रेंच तज्ज्ञही त्यांच्या उत्कृष्ट कारागिरीने प्रभावित झाले होते.
1780 मधील पोलिलूरच्या लढाईत आणि 1799 मधील श्रीरंगपट्टणच्या वेढ्यादरम्यान वापरलेले टिपू सुलतानचे रॉकेट्स ब्रिटिशांसाठी मोठा धक्का ठरले होते.
धार्मिक सलोख्याची भूमिका
इस्लाम धर्माची शिकवण न मानणाऱ्या लोकांवर हैदर अली आणि विशेषतः टिपू सुलतान याने अत्याचार केल्याची गंभीर टीका केली जाते.
परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. दक्षिण भारतात इस्लामचा प्रसार करण्याची हैदर अलीला विशेष इच्छा होती, असं दिसून येत नाही.
टिपू सुलतानबद्दल संतुलित मत मांडताना एच. एच. डॉडवेल यांनी लिहिलं आहे की, “त्याच्या कार्यांचा अभ्यास केला तर तो धर्मांध किंवा क्रूर शासक होता, असं वाटत नाही. उलट, नव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत उत्साहाने आणि पुढाकाराने काम करणारा एक कर्तबगार व्यक्ती म्हणून तो समोर येतो.”
डॉ. एस. एन. सेन यांनी आपल्या ‘स्टडीज इन इंडियन हिस्टरी’ या पुस्तकात म्हटलं आहे की, टिपू सुलतानने केलेली इस्लाम धर्मातील धर्मांतरं केवळ धार्मिक कारणांसाठी नव्हती. त्यामागे प्रामुख्याने राजकीय हेतू किंवा कारणं होती.
फोटो स्रोत, Getty Images
मुस्लीम आणि हिंदू लेखकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिल्यामुळे टिपू सुलतानच्या नावाशी अनेक अतिरंजित कथा जोडल्या गेल्या आहेत. त्याच्या काळात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं झाली होती, हे नाकारता येणार नाही.
पण, यातील बहुतेक धर्मांतरं तुरुंगातील कठीण परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी किंवा राजाची मदत मिळवण्यासाठी झाली होती. ती केवळ धार्मिक छळामुळे झाली, असं म्हणता येणार नाही.
मुस्लीम नसलेल्या लोकांना पकडणं किंवा तुरुंगात डांबणं हे प्रामुख्याने राजकीय कारणांमुळे होत असत. धार्मिक कारणांमुळं अशी कारवाई क्वचितच केली जात होती. हैदर अली आणि टिपू सुलतान या दोघांच्या दरबारात ब्राह्मणांना महत्त्वाची आणि उच्च पदं दिली जात होती.
कोईम्बतूर आणि पलक्कड या दोन्ही ठिकाणचे ‘आसफ’ म्हणजेच प्रशासकीय प्रमुख म्हणून ब्राह्मणांचीच नियुक्ती करण्यात आली होती.
टिपू सुलतानने धार्मिक बाबतीत तटस्थ भूमिका घेतली. त्याने सरकारमधील अनेक महत्त्वाच्या पदांवर हिंदूंना नियुक्त केले होते. त्यापैकी दिवाण पूर्णय्या आणि अर्थमंत्री कृष्णराव हे प्रमुख होते.
हैदर अलीने कांची (कांचीपुरम) येथे एका गोपुराच्या बांधकामाचा पाया घातला. तर टिपू सुलतानने दक्षिण कॅनरामध्ये नष्ट झालेले चर्च पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.
टिपू सुलतानच्या राज्यातील प्रत्येक भागात एक काझी आणि एक पंडित नियुक्त केलेले असत. अपील न्यायालयात एक हिंदू आणि एक मुस्लीम न्यायाधीशही असायचा.
टिपूने हिंदू धार्मिक संस्था आणि मंदिरांना जमीन व आर्थिक मदत दिली. गुरुवायूर मंदिराला 613.2 एकर जमीन आणि वार्षिक 1428 रुपये 9 आणे 2 पैसे इतकी मदत दिल्याचे पुरावेही आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
1791 मध्ये मराठा सेनापती रघुनाथ राव यांनी शृंगेरी मठावर हल्ला करून तेथील संपत्ती लुटली होती. त्यानंतर शंकराचार्यांनी टिपू सुलतानकडे मदतीची मागणी केली. टिपूने त्यांना पैसे आणि अन्नधान्याची मदत तर केलीच, शिवाय शारदा पीठाची पुनर्बांधणी करण्यासाठीही मदत केली.
शंकराचार्य आणि टिपू सुलतान यांचे संबंध 1785 पासूनचे होते. त्या वर्षी टिपू सुलतानने शृंगेरी मठाला ‘सर्वमान्यम’ (करमुक्त जमीन) देऊन सन्मान केला होता. तसेच, शृंगेरी मठाचे प्रमुख स्वामी सच्चिदानंद भारती यांचा टिपू सुलतान ‘जगद्गुरू’ म्हणजेच ‘संपूर्ण जगाचे गुरू’ असा उल्लेख केला होता.
दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात (1780–84) टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढत असताना नायरांनी इंग्रजांना साथ देऊन टिपूला विरोध केला. युद्ध संपल्यानंतर मलबारचा प्रदेश टिपूच्या ताब्यात आला. त्यानंतर सुमारे 6 वर्षे मलबार थेट टिपूच्या नियंत्रणाखाली होते.
त्या काळात टिपूने केलेल्या जमीनविषयक सुधारणांचा नंबुद्री आणि नायर जमीनदारांना मोठा फटका बसला. पण, भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या माप्पिला मुस्लीम शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
याशिवाय व्यापार आणि उद्योगही म्हैसूर सरकारच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे उच्चवर्गातील अनेक लोक टिपू सुलतानच्या विरोधात होते.
त्यांच्या या विरोधाला त्यावेळच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मार्क विल्क्सने धार्मिक रंग दिला. पुढे इतिहासातही त्यांच्या याच मताच्या आधारे टिपूविषयी लिहिले जात राहिलं.
जबरदस्तीच्या धर्मांतराबाबत टिपू सुलतानने स्वतः मान्य केलं होतं की, कूर्ग आणि मलबारमधील नायरांनी 6 वेळा मिळालेल्या माफीचा गैरफायदा घेतला आणि सातव्यांदा बंड केलं. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून धर्मांतर करण्याची शिक्षा देण्यात आली होती.
मद्रासच्या गव्हर्नरने केलेलं कौतुक
1783 च्या सुरुवातीला मद्रासचे गव्हर्नर मॅकार्टनी यांनी टिपू सुलतानबद्दल बोलताना म्हटलं की, “हैदर अलीचा मुलगा टिपू तरुण आणि उत्साही आहे. त्याच्यावर वडिलांचे दुर्गुण किंवा जुलमीपणाचा प्रभाव पडलेला नाही.
जनतेला आवडतील अशी काही पावलं, नवीन राजवटीकडून असलेल्या अपेक्षा आणि युरोपीय पद्धतीचे शिस्तबद्ध लष्कर यामुळे तो आपल्या वडिलांपेक्षाही अधिक शक्तिशाली शत्रू ठरू म्हणून उदयास येऊ शकतो.”
कदाचित याच विचारामुळे युद्ध संपल्यानंतर टिपू सुलतानसोबत राजनैतिक संबंध वाढवण्याच्या धोरणाला मॅकार्टनी यांनी प्रोत्साहन दिलं असावं.
लष्करी कारवाईदरम्यान ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य टिपू सुलतानच्या राज्यात घुसले, तेव्हा लोकांमध्ये टिपूविरोधात बंड करण्याची कोणतीही भावना दिसून आली नाही. उलट, लोकांचा टिपूवर मोठा विश्वास आणि निष्ठा होती. त्यांनी इंग्रजांच्या सैन्याचा जोरदार विरोध केला, हे पाहून कंपनीचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले होते.
12 जुलै 1791 रोजी भारतातून आलेलं एक पत्र ‘द मॉर्निंग क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं.
त्या पत्रात लिहिलं होतं की, “ज्याला सर्वजण क्रूर शासक म्हणत होते, तो टिपू सुलतान प्रत्यक्षात आपल्या सर्व प्रजेचा लाडका होता, हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. आमच्या सैन्याला त्याच्या राज्यातील उत्तम प्रशासनाचीही जाणीव झाली.”
“तिथले लोक मुक्तपणे, सुरक्षितपणे आणि सुखाने राहत होते. ते टिपूला आपल्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे मानत होते आणि त्याच्या कारभारात त्यांना कोणताही बदल नको होता. त्याची खरी प्रजा त्याला सोडून गेली नाही किंवा त्याचा विश्वासघात केला नाही. ही सगळी सत्य परिस्थिती होती आणि तिथे लोकांवर अत्याचार किंवा दडपशाही होत असल्याचा कोणताही पुरावा दिसून आला नाही.”
रॉड्रिक मॅकेन्झी यांनीही आपल्या इतिहासाच्या पुस्तकात याच मताला दुजोरा दिला आहे. टिपू सुलतानने सामान्य लोकांवर अत्याचार केले, हा आरोप खरा होता, अतिशयोक्ती होती की पूर्णपणे खोटा होता, हे बाजूला ठेवले तरी एक गोष्ट महत्त्वाची आहे. टिपूच्या राज्यातील लोकांना सत्ता बदलणं मान्य नव्हतं आणि त्यांनी त्याला विरोध केला. मॅकेन्झी यांच्या मते, त्या काळातील पूर्वेकडील देशांमध्ये लोकांकडून असा विरोध क्वचितच पाहायला मिळत असत.
मॅकेन्झी यांनी पुढे लिहिलं आहे की, “कुराणाच्या शिकवणीत धार्मिक कट्टरतेचे काही विचार असले तरी म्हैसूरमध्ये अनेक सुंदर हिंदू मंदिरं होती आणि ती लुटली किंवा पाडलीही गेली नव्हती. तसेच, तेथील लोकांनी इंग्रजांच्या सैन्याला साथ देण्याऐवजी स्वतःच आपला भाग उद्ध्वस्त करून तिथून निघून जाणं पसंत केलं होतं.”
भारतीय इतिहासात इंग्रजांच्या साम्राज्यवादाला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये टिपू सुलतानचं स्थान वेगळं आहे. टिपूमुळे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी, लष्करी अधिकारी आणि इंग्लंडमधील लोकांमध्ये निर्माण झालेली भीती पुढील 30 वर्षे कायम होती.
त्याच्या मृत्यूनंतर दोन पिढ्यांनंतर राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेले होते. तेव्हा ते ब्रिस्टलच्या रस्त्यावरून जात असताना काही तरुणांनी ‘टिपू, टिपू’ अशी घोषणा देत त्यांच्यावर दगडफेक केली होती.
(या लेखाचे लेखक के. ए. मणिकुमार हे तिरुनेलवेली येथील मनोन्मणियम सुंदरनार विद्यापीठातील इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
या लेखातील माहिती खाली दिलेल्या पुस्तकांमधून आणि स्रोतांमधून घेतली आहे:
- मोहम्मद मोईनुद्दीन, सनसेट ऑफ श्रीरंगपट्टणम: आफ्टर द डेथ ऑफ टिपू सुलतान, संगम बुक्स, 2000.
- एफ. ए. निकोल्सन, मॅन्युअल ऑफ द कोईम्बतूर डिस्ट्रिक्ट, (मद्रास: गव्हर्नमेंट प्रेस, 1887), पृ. 93–94.
- एम. अरोकियास्वामी, द कोंगु कंट्री: हिस्ट्री ऑफ द कोईम्बतूर अँड सालेम डिस्ट्रिक्ट्स फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम्स टू द ॲडव्हेंट ऑफ द ब्रिटिश (चेन्नई, मद्रास विद्यापीठ, 1956), पृ. 403.
- एफ. ए. निकल्सन, कोईम्बतूर डिस्ट्रिक्ट मॅन्युअल, पृ. 93.
- एम. अरोकियास्वामी, कोंगू नाडू, पृ. 402.
- के.ए. मणिकुमार, द ॲडमिरेबल टिपू, थेक्काथिर, 23-11-2020.
- इफ्तिखार ए. खान, द रेग्युलेशन्स ऑफ टिपू सुलतान फॉर हिज स्टेट ट्रेडिंग इंटरप्राईज, प्रोसिडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्ट्री काँग्रेस, खंड 53 (1992), पृष्ठे 225-235.
- राजकुमार, द म्हैसूर नेव्ही अंडर हैदर अली अँड टिपू सुलतान, प्रोसिडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्ट्री काँग्रेस, 52 वे अधिवेशन, 1991-92, पृ. 91.
- एम. पी. श्रीधरन, टिपूज लेटर्स टू फ्रेंच ऑफिशियल्स, प्रोसिडिंग्ज ऑफ द इंडियन हिस्ट्री काँग्रेस, खंड 45 (1984), पृष्ठे 503-508.
- के.ए. मणिकुमार, प्रशंसनीय टिपू.
- एम. अरोकियास्वामी, कोंगू नाडू, पृ. 394.
- भूपेंद्र यादव, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, खंड. 25, क्रमांक 52, 1990, पृ. 2836.
- के. एन. पणिक्कर, अगेन्स्ट लॉर्ड अँड स्टेट: रिलिजन अँड पेझंट अपरायझिंग्ज इन मलबार, 1836-1921 (दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1989), पृ. 52.
- मायकल सोराको, टायरंट टिपू सुलतान अँड द रिकन्सेप्शन ऑफ ब्रिटिश इम्पीरियल आयडेंटिटी, 1780-1800, मेरीलँड विद्यापीठात सादर केलेला डॉक्टरेट प्रबंध, 2013.
- के. ए. मणिकुमार, फोरशॅडविंग द ग्रेट रिबेलियन: वेल्लोर रिव्होल्ट, 1806 (हैदराबाद: ओरिएंट ब्लॅकस्वान, 2021).
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




