Home LATEST NEWS ताजी बातमी घर गळतं म्हणून जमिनीत पुरले 5 लाख रुपये; वाळवीनं पाडला फडशा

घर गळतं म्हणून जमिनीत पुरले 5 लाख रुपये; वाळवीनं पाडला फडशा

4
0

Source :- BBC INDIA NEWS

पावसापासून संरक्षण करण्यासाठी मांगीलाल यांनी या नोटा जमिनीत पुरून ठेवल्या होत्या.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

सोशल मीडियावर एका वयस्कर व्यक्तीचा आणि एका महिलेचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये ते दोघेही पाचशे रूपयांच्या फाटलेल्या आणि जीर्ण झालेल्या नोटांच्या मोठ्या ढिगाऱ्यातून चांगल्या नोटांची छाननी करताना दिसत आहेत.

राजस्थानमधील पचपदरामधील नेवाई गावातील 60 वर्षीय मांगीलाल मेघवाल आणि त्यांच्या पत्नी सियाली देवी यांचा हा व्हीडिओ आहे.

मांगीलाल मेघवाल सांगतात की, त्यांनी आपल्या जमीनीचा एक तुकडा विकला होता, त्यानंतर त्यांना जे पाच लाख मिळाले होते, ते हेच आहेत.

या दाम्पत्याचं असं म्हणणं आहे की, वाळवी लागलेल्या या नोटा पाहून त्यांना रडू येतंय. खाण्या-पिण्याची इच्छा होत नाहीये. त्यांच्या मनात सतत हाच विचार येतोय की, या नोटा आता कशाप्रकारे बदलून मिळू शकतील?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मांगीलाल मेघवाल हे बालोतरा ​​जिल्ह्यातील नेवाई गावातील एका पाड्यावर आपल्या कुटुंबासह राहतात.

त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बीबीसी न्यूज हिंदीनं त्यांच्याशी संपर्क साधला.

फोनवर झालेल्या संभाषणात मांगीलाल म्हणाले की, “मी साधारण वर्षभरापूर्वी पाच लाख रुपयांना पाचपद्रामधील माझा एक प्लॉट विकला. त्या पैशांचा वापर करून माझ्या कुटुंबासाठी पक्कं घर बांधण्याचा माझा विचार होता.”

पुढे ते सांगतात की, “तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि माझं घर पक्कं नसल्यामुळे, पावसात पैसे भिजतील याची मला काळजी वाटत होती. म्हणून, एके रात्री मी पाच लाख रुपये एका पिशवीत भरले आणि शेतातील जमिनीत गाडून ठेवले. त्यानंतर जोराचा पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी शेतात गेलो, तेव्हा ते पैसे नेमके कुठे गाडले होते, हेच मला आठवेना.”

मांगीलाल आणि त्यांची पत्नी वाळवी लागलेल्या चलनी नोटांसह.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

त्यांनी ते पैसे बँकेत का भरले नाहीत, असं विचारल्यावर मांगीलाल म्हणाले की, “मला वाटलं की दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे काढून बँकेत भरेन. पण ते पैसे मी कुठे लपवून ठेवले होते, हेच मी विसरलो होतो.”

मंगीलाल सांगतात की, पैसे लपवून ठेवलेली जागा शोधण्यात त्यांनी बराच वेळ घालवला, पण त्यांना यश आलं नाही. आपल्या कुटुंबाला याबद्दल सांगण्याचं धाडस त्यांना होत नव्हतं. तरीही, काही दिवसांनंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला आणि मुलाला सांगितली.

मंगीलाल यांचा धाकटा मुलगा दीपक मेघवाल बीबीसी न्यूज हिंदीला सांगतो की, “आम्ही खूप शोध घेतला, पण पैशांची पिशवी शेतात कुठंही सापडली नाही.”

फोनवरील संभाषणादरम्यान मांगीलालही भावूक झाले. ते म्हणतात की, “बँकेचे अधिकारी सांगत आहेत की आता हे पैसे स्वीकारले जाणार नाहीत; आणि जर तसं झालं, तर मी माझं घर कसं बांधणार?”

एका वर्षानंतर कसे मिळाले पैसे?

पचपदरा भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे, इथले शेतकरी सहसा वर्षातून केवळ एकच पीक घेऊ शकतात.

मंगीलाल सांगतात की, या भागात अलीकडेच चांगला पाऊस झाला आहे. त्यानंतर, पेरणीच्या तयारीसाठी शेतकरी आपली जमीन नांगरून घेत होते.

जवळपास एका वर्षानंतर, 6 ऑगस्टच्या संध्याकाळी मांगीलाल यांच्या कुटुंबानं शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर भाड्यानं घेतला.

मांगीलाल यांनी एक प्लॉट विकून हे पाच लाख रुपये कमावले होते.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

मांगीलाल सांगतात की, “शेतात सुमारे पाच तास नांगरणी चालली. रात्र झाल्यावर सर्वजण घरी परतले.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मांगीलाल यांच्या पत्नी सियाली देवी आणि त्याचा मुलगा शेतात आले.

सियाली देवी सांगतात की, “नांगरणी केल्यानंतर शेतजमिनीतून बाहेर आलेली एक पिशवी दिसली. ती बाहेर काढल्यावर आत चलनी नोटा असल्याचं दिसलं, पण त्या वाळवीमुळे खराब झाल्या होत्या. ते पाहून मला रडूच कोसळलं. नीट निरखून पाहिल्यावर एकही नोट सुस्थितीत असल्याचं आढळलं नाही.”

गेल्या दोन दिवसांपासून चिंता आणि दु:खावेगामुळं आपण काही खाल्लेलंही नाहीये, असं मांगीलाल सांगतात.

ते सांगतात की, “आता काय करायचं तेच कळत नाहीये.”

रोजंदारीवर चालतं घर

मांगीलाल यांच्या मालकीची सुमारे 60 बिघे वडिलोपार्जित जमीन आहे. पावसाळ्यात ते या जमिनीवर बाजरी आणि कडधान्यं पिकवतात. पाऊस चांगला झाला तर पीक चांगलं येतं, अन्यथा काहीच पीक येत नाही.

मंगीलाल आणि त्यांची पत्नी सियाली देवी हे अशिक्षित आहेत. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

मुलीनं आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असून, लग्नानंतर ती आपल्या सासरी राहते. तीन मुलांपैकी सर्वात धाकट्या दीपकने दहावीपर्यंत, तर इतर दोघांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.

कुटुंब सध्या कच्च्या घरात राहतं, ज्याचं छप्पर पावसाळ्यात गळतं.

मांगीलाल म्हणतात की, त्यांना आपल्या कुटुंबासाठी पक्कं घर बांधायचं होतं.

ते म्हणाले की, “पचपदरामध्ये घर बांधण्यासाठी एक प्लॉट होता. तो मी विकला होता. पण आता ते पैसेही वाया गेले आहेत. वाळवीनं त्या नोटा खाऊन टाकल्या.”

बहुतांश नोटा फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आहेत. काही तर पूर्णपणे चिंध्या झाल्या आहेत.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

दीपक मेघवाल यांनी सांगितलं की, त्यांच्या आईनं वाळवीमुळे खराब झालेल्या नोटा पचपदरामधील बँकेत नेल्या होत्या. परंतु, त्या नोटांचं खूप जास्त नुकसान झालेलं असल्याने बँकेने त्यांना बालोत्रा ​याठिकाणी जाण्यास सांगितलं.

मांगीलाल यांची पत्नी सियाली देवी म्हणतात की, “आम्ही बालोत्राला गेलो, पण तिथल्या बँकेनंही त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असं सांगितलं. त्यांनी आम्हाला जयपूरला जाण्यास सांगितलं आहे. आम्ही अशिक्षित आहोत आणि आता या नोटा कशा बदलायच्या, याची आम्हाला चिंता वाटत आहे.”

सियाली देवी यांना आशा आहे की त्यांच्याकडील नोटा बदलून मिळतील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला डोक्यावर पक्कं छत उभारणं शक्य होईल.

मांगीलाल आणि त्यांचं कुटुंब आता खराब झालेल्या नोटांचा प्रश्न सोडवण्याच्या आणि बँकेतून त्या कसंही करून बदलून मिळवण्याच्या आशेवर आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (जयपूर विभाग) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, “जर नोटांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असेल, तर त्या बदलून घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक विशेष प्रक्रिया उपलब्ध आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC