Home LATEST NEWS ताजी बातमी एकमेकांवर प्रेम जडलं, नंतर भाऊ-बहीण तर नाही अशी शंका आली; आणि मग...

एकमेकांवर प्रेम जडलं, नंतर भाऊ-बहीण तर नाही अशी शंका आली; आणि मग त्यांनी कायदा मोडला

4
0

Source :- BBC INDIA NEWS

ऑड्रे आणि आर्थर दोघेही त्यांच्या जन्माबद्दल जाणून घेण्याच्या हक्कासाठी मोहीम चालवत होते आणि याच काळात त्या दोघांची भेट झाली.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey and Arthur Kermalvezen

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

“तुमचा जन्म ज्यांच्यामुळं झाला ते स्पर्म डोनर कोण? हे तुम्हाला माहीत नसतं तेव्हा कोणाबद्दलही ही तीच तर व्यक्ती नाही ना? अशी शंका मनात येऊ शकते आणि ही एक मोठी समस्या आहे.”

आर्थर केरमालवेझन यांचा जन्म स्पर्म डोनरच्या शुक्राणूंच्या मदतीनं झाला होता. त्यामुळं अनेक वर्षे ते पॅरिसमध्ये जिथं जिथं जायचे, तिथं ते त्यांच्या जैविक वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहिले.

“माझे शिक्षक, बसमध्ये दिसणारी एखादी व्यक्ती असं कुणीही माझे वडील असू शकतात, असं मला सारखं वाटत राहायचं. त्यामुळं मी खूप रागात असायचो. कारण अशा पद्धतीनं जगणं फार कठिण असतं,” असं आर्थर म्हणाले.

पॅरिसमधील ऑड्रे यांच्याशी जेव्हा त्यांचे प्रेमसंबंध जुळले तेव्हा तर हा मुद्दा त्यांच्यासाठी आणखी महत्त्वाचा ठरला होता. त्याचं कारण म्हणजे ऑड्रे यांचा जन्मही अशाच प्रकारे स्पर्म डोनरच्या शुक्राणुंद्वारे झाला होता.

ऑड्रे त्यांच्या नात्याचं वर्णन पहिल्या भेटीत जडलेलं प्रेम असं करतात. पण हे आकर्षण प्रेमाचं होतं की अनुवांशिक नात्याचं? हा प्रश्नही आ वासून होता.

त्यांचा जन्म झाला त्यावेळी पॅरिसमध्ये फक्त दोन स्पर्म बँक होत्या. त्याठिकाणी अनेक पुरुष स्पर्म डोनेट करायचे. त्यामुळं आर्थर आणि ऑड्रे हे दोघं जैविक भावंडं असण्याची शक्यताही पूर्णपणे नाकारणं शक्य नव्हतं.

ऑड्रे आणि आर्थर यांना एकमेकांसोबत नवीन जीवनाची सुरुवात करण्याआधी त्यांच्यात रक्ताचं नातं तर नाही, हे जाणून घेणं गरजेचं होतं. पण, फ्रान्समध्ये आनुवंशिक चाचण्या आणि स्पर्म डोनरची ओळख गुप्त ठेवण्याशी संबंधित कडक कायद्यांमुळं त्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर शोधणं कठीण ठरत होतं.

फ्रान्समध्ये स्वतः डीएनए चाचणी करणे गुन्हा

फ्रान्समध्ये असलेल्या नियमानुासर फक्त संशोधक, डॉक्टर किंवा न्यायाधीश यांनाच आनुवंशिक चाचणी करण्याचे आदेश देता येतात. तसंच तेच त्याची निगराणी करू शकतात.

घरी स्वतः डीएनए चाचणी करण्याची किट बाळगली तर याठिकाणी 3500 युरो (सुमारे 3 लाख 83 हजार भारतीय रुपये) पेक्षा जास्त दंडही आकारला जाऊ शकतो.

फ्रान्समध्ये घरी डीएनए चाचणी करणे हा गुन्हा आहे.

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळंच 23andMe, Ancestry आणि MyHeritage यांसारख्या कंपन्या त्यांच्या चाचणी किट फ्रान्समध्ये उपलब्ध करून देत नाहीत.

अशा प्रकारच्या चाचण्या घरी केल्यास संवेदनशील आनुवंशिक माहिती व्यावसायिक कंपन्यांच्या हाती जाण्याचा धोका तसंच अचानक समोर येणाऱ्या निष्कर्षांमुळं होणाऱ्या कौटुंबिक वादांपासूनही संरक्षण होतं, असं या कायद्याचे समर्थक म्हणतात.

पण, आर्थर यांच्यामध्ये अशा प्रकारे चाचण्यांना गुन्हा ठरवण्यात आलेला फ्रान्स युरोपातील एकमेव देश आहे.

कशी झाली दोघांची भेट?

ऑड्रे आणि आर्थर दोघांनाही त्यांच्या जन्माविषयी आणि जन्मदात्याविषयी जाणून घेण्यात रस होता आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते.

ऑड्रे यांना त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा जन्म डोनरच्या मदतीने झाल्याचं त्या प्रौढ झाल्यानंतर सांगितलं. त्यापूर्वीच त्या जैव-नैतिकता कायद्यात तज्ज्ञ असलेल्या वकील बनल्या होत्या.

या विषयातील कायद्याच्या शिक्षणामुळं त्यांना याची जाणीव होती की, फ्रेंच कायद्यानुसार डोनरची ओळख तीन दशकांहून अधिक काळ गुप्त ठेवली जात होती. विशेष म्हणजे डोनरच्या मृत्यूनंतरही ती गुप्त ठेवली जात होती हे त्यांना माहिती होतं.

ऑड्रे त्यांच्या भेटीला 'पहिल्या नजरेतील प्रेम' म्हणते.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey and Arthur Kermalvezen

पण, ऑड्रे यांचा जन्म 1979 मध्ये झाला होता. त्यावेळी अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात नव्हता. अशाच डोनरच्या मदतीने 1994 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींचा त्या शोध घेत होत्या, तेव्हा त्यांची आर्थरशी भेट झाली होती.

आर्थर यांनी लिहिलेल्या पुस्तकात आपल्या जैविक मुळांविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ऑड्रे यांना ज्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या, त्या आर्थर यांनी पुस्तकात अगदी अचूकपणे मांडल्या होत्या. त्याचा प्रभाव पडल्याचं ऑड्रे सांगतात.

आर्थर आणि ऑड्रे दोघांचीही कुटुंबं अगदी प्रेमळ होती, तरीही त्यांच्या मनात कायम त्या माहिती नसलेल्या व्यक्तीबद्दल कायम विचार सुरू असायचे.

त्यामुळंच या दोघांना पहिल्याच भेटीत एकमेकांबाबत आकर्षण जाणवलं त्याचबरोबर भविष्यातल्या समस्येचीही शंका मनात आली. दोघांना जन्मदात्याबाबत माहिती हवी होती, पण ती माहिती त्यांनी कोणताही अधिकारी देत नव्हता.

सत्याचा शोध

आर्थर आणि ऑड्रे यांनी अनेक महिने प्रयत्न करून केल्यानंतर दक्षिण फ्रान्समध्ये एक डॉक्टरनं 900 युरो रोख घेऊन त्यांची डीएनए चाचणी करण्याची तयारी दर्शवली.

चाचणीनंतर त्या दोघांमध्ये अनुवांशिक संबंध नसल्याचं समोर आलं. पण, तरीही त्यांना त्यावर विश्वास बसला नाही.

“त्यानं आमची फसवणूक तर केली नसेल, अशी भीती आम्हाला होती,” असं ऑड्रे म्हणतात.

त्यामुळं त्यांनी पुन्हा खात्री करण्यासाठी घरीच डीएनए चाचणी करण्याच्या किटचा वापर करण्याचाही विचार केला. पण वकील असलेल्या ऑड्रे यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जायचं नव्हतं.

त्यामुळं 2010 पासून त्यांनी फ्रेंचमधील प्रशासनाच्या विरोधात अनेक अनेक कायदेशीर आव्हानं उभी केली.

त्यांच्या जन्मासाठी वापरलेलं स्पर्म डोनेशन केलेली व्यक्ती जीवंत आहे का? आणि असेल तर त्या व्यक्तीला अजूनही त्याची ओळख गुप्त ठेवायची आहे का, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.

त्या डोनरनं किती वेळा स्पर्म डोनेशन केलं होतं आणि आर्थरशी त्यांचे जैविक संबंध असू शकतात का? याची माहिती मिळू शकते का? याचा प्रयत्न त्या करत होत्या पण, त्यांना यश आलं नाही.

ऑड्रेला कायद्याची जाण होती, ज्यामुळे तिला दात्यांच्या गोपनीयतेच्या कायद्यांना आव्हान देण्याचे धैर्य मिळाले.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey Kermalvezen

फ्रान्समधील सर्वोच्च प्रशासकीय न्यायालयानं 2015 मध्ये त्यांचं शेवटचं अपीलही फेटाळून लावलं. त्यानंतर 2013 मध्ये दोघांनी विश्वासाच्या आधारे लग्न केलं.

त्यानंतर त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या काही काळ आधी एका डॉक्टरनं त्यांच्या डोनरविषयी उपलब्ध माहिती तपासण्यास सहमती दर्शवली.

फ्रेंच कायद्यानुसार डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांविषयीच्या अशा माहितीपर्यंत पूर्ण प्रवेश असतो. फक्त त्यांना ती माहिती रुग्णांसोबत शेअर करता येत नाही.

त्यानुसार त्यांचे डोनर वेगवेगळ्या वर्षांत जन्मलेले होते, हे डॉक्टरांनी शोधून काढलं. त्यामुळं दोघांचे स्पर्म डोनर एकच व्यक्ती असू शकत नव्हते.

ही माहिती त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी होती. फक्त एका डॉक्टरनं नियम मोडण्याचं ठरवल्यानं त्यांना ही माहिती मिळाली होती.

“हे खूप विचित्र आहे. कारण याचा अर्थ असा होतो की डॉक्टरांना माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते,” असं ऑड्रे म्हणतात.

ही माहिती मिळाल्यानंतरही आर्थर यांना त्यांचं एकमेकांशी चुलत भावंडांचं किंवा दुसरं नातं असू शकतं अशी भीती कायम होती. पण, अखेर अनेक वर्षांनंतर त्यांनी घरगुती किटद्वारे डीएनए चाचणी करून घेतली.

बंदी असूनही फ्रान्समध्ये लाखो लोकांनी अशा चाचण्या करून घेतल्याचं या मोहिमेतील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या चाचणीच्या निकालातून त्यांच्यात कोणतंही नातं नव्हतं, हे स्पष्ट झालं.

वडिलांचा शोध

डीएनए चाचणीच्या निकालानं लवकरच नव्या शक्यताही निर्माण केल्या.

ज्या व्यक्तीविषयी 30 वर्षे विचार केला त्या स्पर्म डोनरशी 2017 च्या ख्रिसमसच्या दिवशी संपर्क साधण्यात आर्थर यशस्वी झाले होते. पण ऑड्रे यांच्याबाबत आणखी मोठा झाला आणि त्यांनं त्यांना हादरा बसला.

त्यांच्या डीएनए मॅचमध्ये सोफी नावाच्या एक महिला होत्या. ऑड्रे यांनी त्यांचं न्यायालयात प्रतिनिधित्वही केलं होतं. त्या दोघीही समान कायदेशीर अधिकारांसाठी लढत होत्या.

ऑड्रे आणि आर्थर यांचे लग्न 2013 मध्ये झाले.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey Kermalvezen

“मला कळलं की ज्या सोफीची मी न्यायालयात बाजू मांडली होती, ती माझी जैविक बहीण होती,” असं ऑड्रे म्हणाल्या.

ऑड्रे आणि आर्थर यांनी त्यांच्यासारख्या आणखी आठ जणांसह ही डीएनए चाचणी केली होती. त्यात 10 जणांपैकी चार जणांचा डोनर एकच असल्याचं आढळलं होतं. ऑड्रे , त्यांचा भाऊ पीटर, सोफी आणि सोफीचा भाऊ डेव्हिड.

यामुळं एकाच डोनरशी संबंधित असण्याचा धोका खरोखरच अस्तित्वात असल्याची शंका खरी ठरली होती.

शेवटी, बऱ्याच वर्षांनंतर, त्यांनी घरीच डीएनए चाचणी केली आणि चाचणीच्या निकालातून असे दिसून आले की त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey Kermalvezen

मौल्यवान भेट

अनेक वर्षांनंतर एका अमेरिकन व्यक्तीच्या डीएनएशी संबंध समोर आल्यानं ऑड्रे यांना त्यांच्या डोनरपर्यंत पोहोचता आलं.

त्यांचं नाव फिलिप होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

ऑड्रे यांच्या आईनं फिलिप यांच्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी त्यांचे आभार मानत ही ‘अमूल्य’ मदत असल्याचं म्हटलं होतं. फिलिप यांच्या कुटुंबानंही ऑड्रे यांचं मनापासून स्वागत केलं.

ऑड्रे म्हणतात की, “त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.”

फिलिप स्पर्म डोनर होते, हे त्यांच्या बहिणीला कधीच समजू शकलं नव्हतं.

आज ऑड्रे आणि आर्थर यांना तीन मुले आहेत.

फोटो स्रोत, Courtesy of Audrey and Arthur

या सर्वानंतर ऑड्रे यांना त्या अनेक दशकांपासून ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होत्या, ती मिळाली होती. त्यांना जैविक कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास समजला होता.

त्यांनी फिलिप यांचे फोटो आणि जुने व्हीडिओ पाहिले.

ऑड्रे यांची कायदेशीर मोहीम आणि आर्थर यांच्या पुस्तकानं फ्रान्समधील डोनरच्या मदतीने गर्भधारणेशी संबंधित कायद्यांमध्ये बदल घडवून आणण्यासही मदत झाली.

या बदलांनुसार एप्रिल 2025 नंतर डोनरच्या मदतीनं जन्मलेल्या लोकांना प्रौढ झाल्यानंतर डोनरच्या ओळखीशी संबंधित माहिती मिळवता येणार होती.

अजूनही फ्रान्समध्ये घरी डीएनए चाचणी करण्यास मनाई आहे. त्यामुळं अजूनही मोठी लढाई सुरू असल्याचं ऑड्रे यांचं मत आहे.

“प्रत्येक व्यक्तीला आपल्या जन्माविषयी आणि मुळांविषयी आणि आपला इतिहास जाणून घेण्याचाही अधिकार आहे,” असं त्यांचं ठाम मत आहे.

(बीबीसी रेडिओ 4 वरील ‘द गिफ्ट’ या कार्यक्रमाच्या एका भागावर आधारित.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC