Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मुलांनी अजून जास्त शिव्या का नाही दिल्या?’ जेन-झीच्या आंदोलनातील भाषेबाबत प्रा. गणेश...

‘मुलांनी अजून जास्त शिव्या का नाही दिल्या?’ जेन-झीच्या आंदोलनातील भाषेबाबत प्रा. गणेश देवींची काय मतं आहेत? वाचा

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रा. गणेश देवी

Published

वाचन वेळ: 14 मिनिटे

जेन-झीच्या आंदोलनांमध्ये वापरली जाणारी भाषा, अपशब्द आणि अनफिल्टर्ड अभिव्यक्ती यावरून मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाषातज्ज्ञ आणि लेखक प्रा. गणेश देवी यांनी वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी तरुणांच्या भाषेकडे केवळ शब्दांच्या चौकटीत न पाहता त्यांच्या अनुभवलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वास्तवाच्या संदर्भात पाहण्याची गरज असल्याचं सांगितलं. “या मुलांवर जेवढा अन्याय झाला, त्यामानाने त्यांनी अजून जास्त शिव्या का नाही दिल्या?” असा सवाल करत त्यांनी जेन-झीच्या आंदोलनांमागील असंतोष, भाषेची भूमिका आणि बदलत्या पिढीच्या अभिव्यक्तीवर भाष्य केलं.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची प्रतिभा शिरीष यांनी प्रा. गणेश देवी यांची ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत कोड स्विचिंग, नेटवर्क कम्युनिटी, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा भाषेवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

याशिवाय शिक्षण पद्धतीतील त्रुटी, खेळाच्या मैदानांची कमतरता, रोजगाराचे प्रश्न, निर्णय प्रक्रियेतील मानवी कौशल्याचे महत्त्व आणि संविधानात्मक मूल्यांचे रक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रा. गणेश देवी यांनी भाष्य केले आहे.

1. आज अनेकजण म्हणतात की जेन-झीची भाषा आणि संवादाची पद्धत खूप बदलली आहे. तुम्हाला हा बदल कसा दिसतो?

डॉ. गणेश देवीः दर पिढीमध्ये भाषा नवीन बनत असते. आपल्याकडचं जर घ्यायचं झालं तर 1960-70 मध्ये भालचंद्र नेमाडेंची ‘कोसला’ कादंबरी आणि तरुण मुलं वेगळी भाषा बोलायला लागली.

दर पिढीमध्ये तरुण मुलं, पिढी स्वतःची एक नवीन बोलण्याची ढब निर्माण करत असतात. मी ‘कोसला’चं उदाहरण देतो. त्यावेळी ‘वैताग’ हा शब्द आला. तो वैताग शब्द आता रुळला.

त्याच्यानंतर अजून काहीतरी दुसरा शब्द येतो. एखाद्या पिढीमध्ये ‘कुल’ असा शब्द येतो. एखाद्या पिढीमध्ये अजून काहीतरी असा शब्द येतो. तर हे शब्द तरुण पिढी नेहमीच काढत असते.

कारण हे असे शब्द जे असतात, ते पिढीचं, पिढीतल्या व्यक्तींचं एकमेकांशी जे बंधन असतं ते नक्की करत असतं. एवढंच काय तर आपण काही कॅम्पसेस पाहत असतो.

उदाहरणार्थ मद्रासच्या (चेन्नई) एखाद्या कॉलेजचा कॅम्पस किंवा दिल्लीमधल्या एखाद्या कॉलेजचा कॅम्पस किंवा पुण्यातील फर्ग्युसनचा कॅम्पस, तर तिथल्या मुलांची बोलण्याची ढब, त्यांचे काही विशिष्ट ठरलेले शब्द हे त्यांच्या आई-वडिलांच्या पिढीपेक्षा वेगळे असतात. ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे.

पण तुम्ही जर असं म्हणत असाल की अपशब्द वापरू नयेत तर नक्कीच अपशब्द वापरू नयेत.

उदाहरणार्थ, आता समजा आपल्या देशाचं अगदी सर्वात वरचं कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सर्वात मुख्य न्यायाधीश असतील. तर त्यांनी एखादा अपशब्द वापरू नये कारण तो त्यांना शोभून दिसत नाही.

2. प्रत्येक पिढीसोबत भाषा बदलत असते. पण जेन-झी ही सोशल मीडिया, मिम्स आणि चॅटिंगच्या काळात वाढलेली पिढी आहे. त्यामुळे भाषेतील आणि संवादातील बदल यावेळी जास्त वेगानं होत आहेत का

डॉ. गणेश देवीः बदलाचा वेग अधिक आहे, असं म्हणू शकत नाही. कारण दर 15 ते 20 वर्षानंतर जी तरुण मुलं असतात, तरुण पिढी असते ते नवीन शब्द काहीतरी निर्माण करत असतात आणि ते जास्त वेगानं करताहेत असं नाही. पण आता ज्या वेगानं शब्द फिरतात त्या फिरण्याचा वेग वाढला आहे.

कारण पूर्वी 50 वर्षांपूर्वी पत्रामधून शब्द लिहिले जायचे किंवा वर्तमानपत्रात यायचे. किमान 24 तासांनंतर वर्तमानपत्र येतं. नंतर मग मोबाइल फोन आला, तेव्हा 10-15 मिनिटं किंवा एक तासांनंतर जात असेल.

पण आता एका सेकंदात शब्द बाहेर जातो आणि तो एकाकडून हजारो जणांकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्या सर्क्युलेशनचा (वितरण) वेग वाढला आहे.

पण याचा अर्थ जास्त नवीन शब्द असे निर्माण होतात का? तर त्याचं उत्तर आहे, ‘नाही’ कारण त्याची एक मर्यादा असते. आणि जसं अगदी लहानपणापासून अगदी बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत येईपर्यंत वेगवेगळी रिच्युअल्स (चालीरिती) असतात.

तसे ही ‘टिन्स’मध्ये नवीन शब्द निर्माण करणे ‘ॲडोलसन्ट’मध्ये नवीन शब्द निर्माण करणे हे एक सामाजिक रिच्युअल्स आहेत. ते ‘राइट ऑफ पॅसेज’ आहे.

ते रिच्युअल्स त्या पॅसेजमधून जाताना व्हायलाच लागतात. ते जर नाही झाले तर मग न विचार करणारी पिढी तयार होते आणि मग आपल्या आई-बापांसारखंच केवळ बोलणारी, त्यांचीच नक्कल करणारी अशी पिढी तयार झाली तर त्यांचं वय बायोलॉजिकल असतं. पण त्यांची मानसिकता 100 किंवा 50 वर्षे जुनी असते.

प्रा. गणेश देवी

3. एकाच वाक्यात अनेक भाषा मिसळून बोलणं वाढलं आहे. हा भाषेचा ऱ्हास मानायचा की उत्क्रांती?

डॉ. गणेश देवीः ज्या ठिकाणी या 2-3 भाषा मिक्स केल्या जातात, त्या ठिकाणच्या समाजाची रचना आहे, तिथे ‘मायग्रेशन्स’ (स्थलांतर) पुष्कळ झालेत. व्यवसायाच्या कारणांनी झालेत. आणि जी भाषा सरमिसळ करून बोलत आहेत, ती त्या व्यक्ती त्या सामाजिक स्तरावर आहेत.

पण जे फक्त एकाच गावात राहिलेत, तिथून बाहेर कधी गेले नाहीत, त्यांची भाषा ऐकली. उदाहरणार्थ- काही आदिवासींची किंवा अगदी काही खेड्यातील किंवा शहरामधील एका विशिष्ट भागातील भाषा. तिथेच आयुष्य संपूर्ण काढले. त्यांची भाषा ते त्यांच्या भागातील भाषेप्रमाणे बोलतात.

आत्ता जी पुण्यातील भाषा आहे ‘इट्स अ मिक्स ऑफ लॅग्वेज्स कोड स्वीचिंग’ आहे. त्यात 2-3 भाषा येतात. कुठल्या वेळेस ते ‘कोड स्वीचिंग’ करायचं याचं एक ग्रामर (व्याकरण) बनलेलं असतं.

उदाहरणार्थ, आपण मराठी सुरुवात करतो म्हणजे आत्ताची पिढी. आताची पिढीच नाही सगळे लोक. मराठी सुरुवात करतात आणि वाक्य अर्धं झालं की मग हिंदी किंवा इंग्रजीकडे वळतात. मग 2-3 शब्द ते झाले की, परत मराठीकडे येतात. याचा अर्थ कर्ता मराठी, कर्म हिंदी किंवा इंग्रजी आणि क्रियापद काहीतरी परत मराठीच. अशारितीने ते वाक्य चाललेलं असतात.

‘इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस’ आणि अशा प्रकारच्या कोड स्वीचिंगमुळे त्याचा जर नीट अभ्यास केला तर सामाजिक जे तणाव आहेत, सामाजिक मायग्रेशन्स आहेत त्याचा नक्की अंदाज येऊ शकतो.

आत्ता आपल्या देशामध्ये आणि सगळीकडे हे मायग्रेशन वगैरे जे आहे ते संख्यात्मक रीतीने सांगितले जातं की, कुठल्या-कुठल्या राज्यातून किती संख्येने आले.

देशामध्ये नवीन कम्युनिटी कमिटी बसवली आहे. ‘हाय लेव्हल कम्युनिटी ऑन डेमोग्राफिक चेंज’. कुठल्या राज्यात, कुठल्या भाषा बोलणारे जास्त झाले, कुठल्या धर्माचे जास्त झाले वगैरे. पण त्याचा खरोखर जर अभ्यास करायचा असेल तर संख्येवरून काहीच अंदाज येत नाही.

पण त्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या अशा मिक्स समाजामधील जे भाषेचे ग्रामर आहे. त्याचे जे तुकडे तुकडे आहेत, ज्याला इंग्रजीत ‘पॅचवर्क क्विल्ट’ बनवून गोधडी बनवली आहे.

ठिगळा-ठिगळाची गोधडी. ती ठिगळं जर व्यवस्थित तपासली तर फार सुंदररितीने समाजावर भाष्यही करता येईल, समजता येईल, समाजाची दुःख सुद्धा कमी करता येते. मग समाजामध्ये शिव्या देणारी जी तरुण मंडळी आहेत ना, त्यांची शिव्या देण्याची प्रवृत्ती थोडी कमी होईल.

4. आजकाल चॅटिंगमध्ये शॉर्ट फॉर्म्स आणि ॲक्रोनिम्सचा वापर वाढलाय. यामुळे भाषेवर काही परिणाम होईल का, की हा फक्त संवादाचा बदलता प्रकार आहे?

डॉ. गणेश देवीः व्हेरी इंटरेस्टिंग! एक अशी कल्पना करा. 100 किंवा 80 वर्षांपूर्वी, घरात किंवा एखाद्या गावामध्ये किंवा शहरामध्ये संध्याकाळच्या वेळी वयस्कर लोक एकत्र येऊन कुठल्यातरी ओट्यावर बसायचे. गप्पा मारत, शिळोप्याच्या गप्पा म्हणायचे त्याला.

बायका कुठेतरी देवळामध्ये एकत्र भेटत. वाती वळतायत. मुलं खेळतायत, विटी-दांडू, कबड्डी वगैरे. असं त्या समाजाचं स्वरूप होतं. नंतर मग ज्याला न्युक्लियर फॅमिली म्हणतो, आई-वडील आणि एक मूल किंवा दोन मूल असे आणि मग ते सगळे टीव्हीसमोर बसून खात किंवा टीव्ही बघत असत.

हे समाजाचं नवीन स्वरूप होतं. सध्या एका घरामध्ये जर 4 माणसं असली तर प्रत्येकजण आपापल्या मोबाइलकडे बघत असतो. कुणी एकमेकांशी बोलत नाही. पण त्या मोबाइलमध्ये असलेले जे ग्रुप्स आहेत, त्याच्याशी ते कनेक्टेड असतात. याचा अर्थ समाज तुटला आहे.

पण नेटवर्क कम्युनिटी झालेली आहे. आता सामाजिक वीण कमी झाली. एकाच भौगोलिक किंवा विस्तारात राहणारी लोक, याला समाज मानला जायचा. हे संपलंय. एक कुटुंबही संपलंय. कुटुंब ही संस्था संपत आलेली आहे.

आता नेटवर्क कम्युनिटी नेटवर्कमध्ये तुम्ही आणि मी समोरासमोर आहोत. तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये तुमच्या 1, 5, 6 अशा अनेक ग्रुप्स त्यांच्यातील शेकडो जणांशी कनेक्टेड असता आणि मीही तसंच माझ्या ग्रुपशी कनेक्टेड असतो. हे सगळे व्हर्च्युअल लोक आहेत.

एक तर ते प्रत्यक्ष एकमेकाला चेहऱ्याने ओळखत नसतील, लिहिलेल्या नावावरून ओळखत असतील. पण याचा अर्थ त्यांच्यात मानवी भावनांचा व्यवहार होत नाही असे नाही.

प्रा. गणेश देवी

मानवाच्या नव्या समाजाची ही रचना सुरू आहे आणि म्हणून त्यावेळेस त्या ग्रुप्समध्ये जी भाषा बोलली जाते, ज्या भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा बोलल्या जातात आणि पण त्यात लांब-लांब वाक्यं नसतात. या सध्याच्या नेटवर्क कम्युनिटीमध्ये धावपळीच्या जीवनातले संवाद येतात.

कारण सगळ्या गोष्टींचा स्पीड वाढलाय आणि स्पीड असणं हे प्रगतीचं लक्षण मानलं गेलं. जास्त स्पीडने आयुष्य चालवत राहणं. त्या जास्त स्पीडच्या आयुष्यामध्ये थोडक्यात बोललेले, तुटक-तुटक शब्दांचे, अशा अर्ध्या वाक्यांचे किंवा अर्धवट वाक्यांचे संवाद असू शकतात. काही ठिकाणी तर असे शब्दही नसतात.

फक्त इमोजीस असतात आणि काही ठिकाणी इमोजीही कमी होऊन इमोजीची जी सवय होती त्याची काही चिन्हं निर्माण होत आहेत आणि केवळ त्या चिन्हांच्यामध्ये हे संवाद होतात. हा एक फार इंटरेस्टिंग सामाजिक बदल आहे.

यात वाईटही काही नाही आणि चांगलंही काही नाही. कारण दर पिढीमध्ये अशा प्रकारचा बदल होत असतो. पण संवाद हा सगळ्याचा पाया आहे.

किती शब्दातला संवाद आहे, याच्यावर संवादाचं महत्त्व नाही. पण संवाद आहे की नाही, कितीही कमी शब्दाचा किंवा कितीही जास्त शब्दाचा असो, तर तो असतोच.

आणखी एक गोष्ट की, अगदी कमी शब्दांत मोडक्या शब्दांमध्ये, मोडक्या वाक्यात अर्ध्या-अर्ध्या वाक्यांच्यामध्ये बोलणारी ही जी तरुण पिढी आहे, ती जेव्हा अभिव्यक्ती करण्याची वेळ येते, तेव्हा पल्लेदार वाक्य बोलू शकतात.

उदाहरणार्थ, जंतर-मंतरला त्यांना बोलण्याची जेव्हा गरज निर्माण झाली, तेव्हा ते कबीरापासून, नानकांपासून, तुकारामांपासून सगळ्यांच्या ओळीच्या ओळी त्यांना पाठ असल्याचं दिसलं. ते केवळ मोडक्या शब्दात बोलत नव्हते. उलट ते तर म्हणत होते की, काळजी कशाला करता? अजून पण तुमचे ओठ आहेत ना? ते शिवलेले नाहीत ना? बोलू शकता ना? तर बोलायचं.

म्हणून भाषेपासून फार दुरावलोत असं नाही. पण त्यांचा एक ज्याला ‘रिच्युअल ऑफ द राइट ऑफ दॅट पॅसेज’, मार्गक्रमणातला एक जरुरी टप्पा आहे. म्हणून त्यांना ही अशी सगळी भाषा शिकायला लागते.

5. इमोजी किंवा जेन-झी वापरत असलेले काही शब्द असे असतात की त्यांचा शब्दशः अर्थ नसतो, पण ते भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात. असे अर्थ नसलेले शब्द लोकप्रिय कसे होतात? आणि त्यातील काही शब्द नंतर शब्दकोशात कसे पोहोचतात?

डॉ. गणेश देवीः मराठीमध्ये ‘भंकस’ असा एक शब्द आला होता. तर त्या शब्दाला काहीच अर्थ नव्हता. कारण त्या शब्दाचं काही मूळ नाहीये. ‘रुट ऑफ द वर्ड’ असतं ना तसं अर्थपूर्ण. त्याच्यात अर्थ शब्द, पूर्ण शब्द आहे. मग त्यातून अर्थपूर्ण शब्द झाला. त्या भंकसला काहीच नव्हतं. म्हणजे कशालाही काही अर्थ नसलेला असा शब्द.

केवळ त्याच्या आवाजावरून, साऊंडवरून त्याचा अर्थ स्पष्ट होत होता. म्हणजे ‘काहीतरी फालतू’.

त्याच्या आधी ‘डब्बा’ असा शब्द होता. काही वेळा ‘डालडा’ असा शब्द वापरायचे. त्याचा अर्थ होता असंच ‘काहीतरी फालतू’. मी हे जुने शब्द सांगतोय.

पण ज्याला इंग्रजीमध्ये ‘फॅटिक कम्युनिकेशन’ म्हणतो. आपण ‘फॅटिक कम्युनिकेशन’ म्हणजे शब्द उच्चारायचे असतात. पण त्याला त्याचा अर्थ नसतो, हे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही समजत असते. म्हणजे फक्त शब्द असतात. पण त्याला काही अर्थ नसतात.

तशाच प्रमाणे असेही काही शब्द असतात की ज्याची ‘इटॅमॉलोजी’, ज्याचा उगम आहे तो दुसऱ्या कुठल्या शब्दात नाही. त्या शब्दाचा आकार फार विचित्र आहे. पण तरी पण तो शब्द फार अर्थपूर्ण आहे आणि त्याचा अर्थ नक्की काय आहे हे कुणीच सांगू शकत नाही.

पण तो अर्थ आहे, हे सांगू शकतात. आणि भारतीय भाषांमध्ये तशा शब्दांची फार पूर्वीपासून रेलचेल आहे. फार पूर्वीपासून रेलचेल आहे.

इतकंच काय, जगातील इतर कुठल्याही भाषेमध्ये जवळपास कुठल्याही प्रमुख भाषेमध्ये बघायला मिळत नाही, अशी एक विशिष्ट लकब भारतीय भाषांमध्ये आहे. ते म्हणजे आपल्या शब्दांची पुनरावृत्ती होत असते.

म्हणजे आपण असं जोरजोराने किंचाळणं किंवा गडबडीने चालत, धपाधपा पळाला असं म्हणतो. तर ते धपाधपा दोनदा कुठल्याही दुसऱ्या फ्रेंच, इंग्रजी, रशियनमध्ये म्हणजे कुठेही बोलत नाहीत. पण आपल्यामध्ये बोलतात, कारण आपल्याकडे शब्दांचा फक्त अर्थ असण्यापेक्षा त्या शब्दांच्या ध्वनीवरून नक्की न केलेला अर्थ प्रतीत करण्याची एक सामाजिक सवय आहे, आणि ती ऐकण्याची आपल्यालाही सवय आहे.

तर त्याच्यामुळे असे नवीन शब्द आपल्याकडे फार लवकर निर्माण होतात.

6. मोठ्या पिढीला जेन-झीची भाषा खटकते. पिढ्यांमधला हा भाषेचा संघर्ष नवीन आहे का?

डॉ. गणेश देवीः हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय आणि बऱ्याच ठिकाणी विचारला गेलाय. पण त्याचं नीट उत्तर मिळाल्याचं मला दिसलं नाही. मी एक प्रयत्न करतो.

काही दशकांपूर्वी पुण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे असे भाषातज्ज्ञ होऊन गेले. त्यांचं नाव होतं अशोक केळकर. डॉ. केळकरांची इच्छा होती की, शिव्यांचा शब्दकोश करावा.

मी त्यांना तुम्ही हा शब्दकोश का करताय? असं विचारलं होतं. ते म्हणाले होते की, एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी असलेला संबंध आणि एका जेंडरचा दुसऱ्या जेंडरशी असलेला संबंध शिव्यांमधून फार चांगल्यारितीने स्पष्ट होतो. एक अँथ्रोपोलॉजीकल अभ्यास म्हणून फार महत्त्वाचा असतो.

त्यावेळी त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं. ते त्यांच्या काळातील होतं. 1960-70चं उदाहरण आहे. ते मला आज आठवतंय म्हणून सांगतो.

त्यावेळी मुलं गोट्या खेळायची. आता तो खेळ बंद झालाय. त्यात एक गद असायची. एक खड्ड्यासारखा भाग असायचा आणि त्यात जर त्या गोट्या गेल्या तर त्याला ‘बल्ल्या’ म्हणायचे.

ज्याप्रमाणे कॅरममध्ये ‘डीऊ’ असतो. तर तो शब्द नंतर समाजात फार फिरायला लागला. तरुण पिढीमध्ये काय गडबड केली? काय घोटाळा केला? ‘व्हॉट अ टेरिबल डिझास्टर’ अशारितीने ‘बल्ल्या’. असं त्या ‘बल्ल्या’ या शब्दाला तसा काही अर्थ नव्हता.

पण त्या पिढीमध्ये तो झाला आणि तो शब्द उच्चारल्यामुळे बऱ्याच तरुण मुलांना त्यांच्या आई-बापांच्याकडून थोबाडीत खायला लागली होती. ही घटना मला केळकरांनी सांगितली.

तर ते असं म्हणाले की, प्रत्येक पिढी, प्रत्येक मोठी झालेली पिढी नव्या पिढीवर भाषिक कारणांनी काही हिंसा करत असते. दमन करत असते, काहीतरी रिप्रेशन करत असते आणि ते करण्यासाठी काही ना काही शब्दाचे कारण शोधून काढत असते.

एक फ्रेंच सोशोलॉजिस्ट एमिल डर्खाइम होते. ते तर असं म्हणाले की, नवी पिढी अत्यंत सभ्य बोलली आणि त्यांनी एकही अपशब्द बोलला नाही. तरीसुद्धा जुनी पिढी ते बोलतायत, त्या दोन शब्दांमधला गॅप कमी जास्त का झाला, म्हणून मुस्काटात मारतीलच. यात चूक नव्या पिढीची नाही.

जुन्या पिढीला त्यांच्यावर मनात धुमसत असलेली हिंसा व्यक्त करण्याची दुर्दम्य इच्छा असते ना ती चूक आहे. आणि ते म्हणजे तरुणाईला जागा न देणारी समाजव्यवस्था. आपण शतकानुशतकं पाळली. म्हणजे फक्त वयोवृद्ध. बऱ्याच वेळा आपण ऐकतो वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध.

आता ज्ञानवृद्ध समजतंय. वयोवृद्ध म्हणजे काय?

फक्त वय वाढलं म्हणजे, शहाणपण वाढतं असं नाही. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे तरुण राजा होते. पण त्यांचं ज्ञान किती अफाट होतं. त्यांची जी समज होती संपूर्ण देशाची किंवा जगाची, ‘इट वॉज एक्स्ट्राऑर्डनरी’. किंवा विवेकानंद.

पण ते वय झालेली माणसं म्हणजे त्यांच्या पाया पडायलाच पाहिजे, असा समाज एकदा निर्माण केल्यानंतर जर काही प्रश्न विचारणारी मुलं असतील तर त्यांना दडपून टाकणं, ‘हे चुप बैस रे, तू कशाला मधे?’ हा जो ॲटिट्यूड आहे, तो ॲटिट्यूड आत्ता दिसला.

ही मुलं फार अपशब्द वापरतात. पण बायबलमध्ये गोष्ट आहे ना की, पहिला दगड कोणी उचलावा. तुम्ही पाप केलं नसेल तर उचला आणि मारा.

तुम्ही तरुण असताना अपशब्द वापरले होते का नाही? नसतील तर तुम्ही जरूर म्हणा हे अपशब्द वापरतात.

ते शब्द ठीक नाहीत असं जरी वाटत असलं तरी त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. आणि तो प्रश्न असा आहे की, तुम्ही आम्हाला 35व्या वर्षापर्यंत बेकार ठेवताय आणि आम्ही इतक्या फी देऊन ज्या कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीत शिकलो, तिथं तुम्ही आम्हाला इतकं भिकार शिक्षण दिलं. यात दोष तुमचा आहे का, आमचा आहे?

हा प्रश्न विचारतायत आणि तो प्रश्न ते कुठल्याही दुसऱ्या हिंसक रूपाने विचारत नाहीत. शब्द वेडावाकडा गेला असेल, जाऊ देत. पण ज्या देशामध्ये पंतप्रधानापासून ते वेगवेगळ्या ऑफिसर्स पण आणि कोर्टामध्ये जर अपशब्द वापरत असतील.

जे जज (न्यायाधीश) त्यांना झुरळ म्हणाले. तो अपशब्द आहे का?… नाही? तर त्यासंबंधी मीडियामध्ये जज अपशब्द का वापरतात असं आलंय का? तसं जर नसेल आलं, तर आपल्याला कुठला अधिकार आहे, तरुण पिढीला की तुम्ही अपशब्द का वापरता म्हणायला?

आत्ता देशातील युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 4 कोटी मुलं शिकतात. या 4 कोटी मुलांसाठी आपल्याकडे 4 लाख चांगली प्ले ग्राऊंड्स (मैदान) आहेत का? त्याचं उत्तर आपल्याकडे नाही असं आहे.

मी कितीतरी अशी कॉलेजस बघितलीत की, त्यांनी मल्टिस्टोरी (बहुमजली) काहीतरी बनवलेलं असतं. त्यात आज प्रवेश घेताना कुठलातरी क्लार्क मोठी लठ्ठ फी घेतो. त्यातनं पोरगं बाहेर पडतं. त्या डीग्रीचा कागद हातात घेऊन येतो. त्यांनी कॉलेजचं जीवन अनुभवलेलंच नसते.

‘हूज फॉल्ट इट इज?’

आणि असा विद्यार्थी, असा तरुण जर बाहेर येऊन, जर शिव्या द्यायला लागला तर मी ते चूक मानत नाही. मी असं नाही म्हणत की, प्रत्येक तरुणांनी फक्त शिवीगाळच करावी, असं मी मानत नाही.

पण हिंसेचं स्वरूप दोन प्रकारचं असतं. एक शाब्दिक असतं आणि एक स्ट्रक्चरल असतं. आपली सिस्टिमच अशी निर्माण करायची की, त्यात हिंसा आहे आणि मग त्याच्याविरुद्ध का बोललात, तुम्ही असे अपशब्द, म्हणून त्याला वरून चाबुक मारायचा ही अजून जास्त हिंसा आहे.

7. जेन-झी अनेकदा कुठलाही संकोच न ठेवता आपलं मत मांडताना दिसते. ही बेधडक अभिव्यक्ती तुम्हाला कशी वाटते?

डॉ. गणेश देवीः ही मुलं फार विचारी होती. मला तर आश्चर्य वाटले की, यांनी अजून जास्त का नाही शिव्या दिल्या? त्यांच्यावर जो अन्याय झाला तो व्यक्त करण्यासाठी.

आपल्या शेजारच्या सगळ्या देशांमध्ये त्याच वयाच्या मुलांनी जे प्रकार केले त्यातला एकही प्रकार आपल्या देशातल्या त्या वयाच्या मुलांनी केला नाही. म्हणजे केवढी मोठी जबाबदारीची भावना त्यांनी दाखवली.

जर आपल्या देशाची दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या क्रमांकावर इकॉनॉमी असं काहीतरी म्हणून सारखे डंके वाजवले जातात. त्यात शिक्षणासाठी 4 टक्के बजेट ठेवायला आपण का विसरलो?

इतकंच काय, एक देश जिथं किमान आत्ता 1 हजारपेक्षा जास्त विद्यापीठं आहेत. एक हजारपेक्षा जास्त विद्यापीठं असलेले फारच थोडे देश आहेत आणि कॉलेजसची संख्या अक्षरशः लक्षावधींमध्ये आणि कोट्यवधींमध्ये विद्यार्थी आहेत.

अशा देशाला शिक्षणमंत्री म्हणून नेमताना केवळ एसएससी पास झालेल्या व्यक्तीला जर नेमलं जात असेल तर तो गुन्हा केवढा मोठा आहे. म्हणजे ते फक्त शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या त्या व्यक्तीचा दोष नाहीये.

पण फक्त शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीला संपूर्ण देशाचा शिक्षणमंत्री म्हणून नेमताना या देशात असलेल्या सगळ्या आयआयटीन्सला, सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटना, सगळ्या यूनिव्हर्सिटींना, पोस्ट ग्रॅज्यूएट कोर्सेसना, त्या कॉलेजसाठी लिहिणाऱ्या टेक्स्टबुकवाल्यांना, पब्लिकेशर्सना, अभ्यास करणाऱ्यांना दिलेली मोठी शिवी होती.

ती शाब्दिक नव्हती, कृतीने होती ती. पण ती होती ना?

एकदा त्या व्यक्तीला काढल्यानंतर अजून दुसऱ्या कुठल्यातरी बीए पास झालेल्याला एज्युकेशन मिनिस्टर करायचं. आत्ता एका शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला लागल्यानंतर नवीन नेमताना पुन्हा एकदा बीए वाला. ही त्या पिढीला दिलेली एक प्रकारची अपशब्दाची भेटच आहे.

8.उघडपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता बोलणं आणि अर्वाच्च भाषा वापरणं यांची सरमिसळ होण्याची शक्यता आहे का? आणि त्याचा भाषेवर पुढे काय परिणाम होऊ शकतो?

डॉ. गणेश देवीः ऑस्कर वाइल्डचं एक फार प्रसिद्ध वाक्य ‘द इम्पॉर्टन्स ऑफ बीईंग अर्नेस्ट’ या नाटकामध्ये ते वाक्य असं, ‘द ट्रॅजेडी इज एव्हरी यंग वुमन बीकम्स लाइक हर मदर’. आता त्यावेळेस ते हसले होते.

जेंडर चार्ज आहे आणि आय एम नॉट शेअरिंग दॅट. पण दुसरं एक गाणं ‘जनरेशन जनरेशन डज द सेम’ नावाचे इंग्रजीमध्ये एक फार प्रसिद्ध गाणं आहे.

जे लोक आज आपल्याला शिवराळपणा करताना वाटतायत, हीच मंडळी 15-20 वर्षांनी पंढरपूरच्या वारीत सामील होताना दिसतील. असंच होत आलेलं आहे आणि असंच होत राहील.

उलट असं होतंय ही, आपल्या एका निरंतरच्या सामाजिक प्रवाहाची प्रवाहित समाजाची एक निशाणी. अगदीच वेल बिहेव्ह तरुण मंडळी जर आली आणि ती अगदीच आल्या आल्या ‘हाऊ आर यू?’ ‘गुड मॉर्निंग’, ‘नमस्कार’, ‘शुभचिंतन’, ‘शुभरजनी’ असं बोलायला लागली तर माणसाला काहीतरी झालंय असं वाटायला काही हरकत नाही.

बनगरवाडीमध्ये मास्तर तिथे गेला, ते गावातील लोक काय बोलतात? पण ती नंतर या मास्तर सारखंच बोलायला लागली.

तरुणांनी जर असं नाही केलं तर इतर कोण करतील?

9. प्रत्येक नव्या पिढीसोबत भाषा बदलते. मग जेन-झीच्या भाषेबाबत इतका विरोध आणि अस्वस्थता का दिसते?

डॉ. गणेश देवीः जो विरोध करतो त्याला काही ना काही तरी नाव ठेवणं. उदाहरणार्थ, जेव्हा साहित्यिकांनी बक्षीसं दिली परत, तेव्हा ते तुकडे तुकडे गँग झाले किंवा इतर कोणी जर विरोध केला तर ते देशद्रोही होतात. तर त्या तरुणांनी विरोध केला, तर त्यांना काय आपण देशद्रोही म्हणू शकू का?

नाही. बिचाऱ्यांना त्यांच्याकडे पासपोर्ट पण नाही किंवा कुठे बाहेरही गेलेले नाहीत तर त्यांना हे शिव्या का देतात?

‘त्यांच्यावर जी टीका झालीय ती टीका, हे विरोध का करतायत म्हणून आहे. अपशब्द का वापरतायत हा त्या टीकेचा वरकरणी चेहरा आहे.’

पण या पिढीनी आत्ता जे काही आंदोलन झालं ते आणि त्यात नंतर जी एक आंदोलनाची मालिका सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या त्या सगळ्या आंदोलकांनी आपल्या देशात एक नवीन चैतन्य निर्माण केलेलं आहे.

भीती समाजात होती ती मोडलेली आहे आणि कुठेतरी आशा आहे असं दाखवलंय.

माझा जन्म 1950चा आहे. ज्यावेळेस आपल्याला भारत रिपब्लिक (प्रजासत्ताक) बनला त्या वर्षीचा जन्म. मला नेहमी असं वाटत आलं की, आमच्या पिढीने या देशाला जेवढं द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही.

पण आता मला असं वाटतं की, ही जी नवीन पिढी आलीय ना, कुठलेही शब्द असू देत त्यांचे ते सुधारतील. पण त्यांची वागणूक जी आहे, ती शिवराळ नाहीये. ती चांगल्या अंतःकरणाची आहे.

ते प्रश्न विचारतायत तो प्रश्न योग्य आहे आणि तो योग्य मार्गाने ते विचारतायत. किती तरी जणांनी हातात तिरंगा घेतलाय, किती तरी जणांनी आंबेडकरांचं चित्र धरलंय, गांधींचं धरलंय, बुद्धाचं धरलंय, नानकांचं धरलंय.

त्यांनी जो मार्च काढला तो कॉन्स्टिट्यूशनल (घटनात्मक) मार्गाने काढला होता.

मला असं वाटतंय की, ही पिढी आता ॲक्शनमध्ये आली ना तर मी मरताना शांतपणाने आणि आनंदाने मरु शकेन.

काही वर्ष आधीपर्यंत मला असं वाटत होतं की, आपला देश खरोखरच सुरक्षित आहे का? सुरक्षित राहील का? बदल काही होईल का? की असंच चालत राहील.

आपलं एक संविधान म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेकडे काही सोनं असतं. गोल्ड स्टॉक असतो, तो शेकडो टन, हजारो टन, लाखो टन, करोडो टन किती का असेना?

त्याहीपेक्षा जास्त ज्याची किंमत आहे, अशी एकच गोष्ट आपल्या देशात आहे. म्हणजे रिझर्व्ह बँककडे जेवढं सोनं आहे त्याच्या कितीतरी शेकडो पटींनी ज्याची किंमत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘संविधान’. ‘इट्स प्राइसलेस’.

त्या संविधानाचं जीवन. पुढे सुरक्षित आहे का नाही, अशी जी भीती होती ती या मुलांनी दूर केली.

पुन्हा एकदा पहाट होताना मी बघतोय. यात मी कुठल्या सरकारच्या विरुद्धच्या कुठल्या पक्षाच्या असं बोलत नाहीये.

पण एकंदरीत भीतीचे दडपण होतं, त्या मुलांनी काढून टाकलं आणि त्यासाठी जर काही शब्द उपयोगी आले असतील, तर पुढे पुढे ते शब्द सुद्धा महत्त्वाचे ठरतील.

एकदा एकनाथ संस्कृत आणि मराठीबद्दल म्हणाले होते की, संस्कृत देवाने निर्माण केली. मग मराठी काय गाढवाने निर्माण केली काय?

तर हे प्रश्न जे कुणी म्हणजे गांधींनी विचारले असतील, आंबेडकरांनी, लोहियांनी अजून कुणी भगतसिंगांनी विचारले असतील, ते प्रश्न एका सभ्य भाषेत असेल थोडे असभ्य भाषेत प्रश्न विचारले गेले म्हणून ते प्रश्न खराब होत नाही.

यांची भाषा बदलेल. नंतर हेही स्थिर होतील. हेही जुन्यासारखी भाषा बोलायला लागतील. काही यातले शब्द स्टँडर्ड भाषेमध्ये रूढ होतील.

प्रत्येक नवीन पिढी ही संवेदना बदल ‘सेन्सिबिलिटी ऑफ द टाइम चेंजेस’ आणि ही सेन्सिबिलिटी एक नव्या प्रकारच्या भाषेमध्ये म्हणजे तद्दन नवी वेगळी भाषा असं नाही म्हणत. नव्या प्रकारच्या भाषेच्या लकबीमुळे येत असते आणि ती जर करण्याचं काम भाषा करत असेल तर भाषा इज ग्रेट, भाषा विजयी ठरली.

‘लेट भाषा ट्रायम्फ’, ‘भाषेचा विजय होवो’ याच्या पुढं येणाऱ्या पिढ्या सुद्धा नवे नवे शब्द काढेल. त्या वेळच्या लोकांना थोडं वाईट वाटेल. पण भाषेचं काम असतं संवाद करणं, भाषेचं काम असतं प्रश्न विचारणं आणि ते काम जोरदारपणाने झालं त्याच्यावर मी आनंदाने टाळ्या पिटू शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC