Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, R. SATISH BABU/AFP via Getty Images
कोइम्बतूर जिल्ह्यातील अन्नूर येथे डास पळवणाऱ्या औषधाच्या धुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.
दोघांचीही प्रकृती आधीपासूनच खराब होती. परंतु, त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे घरात करण्यात आलेला धूर कारणीभूत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. या दोन्ही मृत्यूंबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नगरपंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी बीबीसीला सांगितलं की, दोघांनाही पूर्वीपासूनच आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या आणि त्यांचा मृत्यू धुरामुळे झालेला नाही.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, डास पळवणाऱ्या औषधांचा वापर करताना आवश्यक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्यातील रसायन फुफ्फुसांशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, कोईम्बतूर जिल्ह्यातील अन्नूर नगरपंचायत हद्दीतील सत्यमंगलम रोड उप्पाथोट्टम परिसरात गेल्या आठवड्यात 3 मुलांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने एक मोहीम सुरू केली. 11 तारखेला परिसरातील अनेक ठिकाणी डास-प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली.
स्थानिकांचा आरोप आहे की, नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या देखरेखीखाली कर्मचारी डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करत होते. त्यावेळी काही भागातील रहिवाशांनी हा धूर घरात जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितलं.
परंतु, अधिकाऱ्यांनी लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. उलट, ते घरांच्या आतही गेले आणि दरवाजे उघडे असतानाही औषधाची फवारणी केली.
यानंतर काही तासांतच परिसरातील मोहन (वय 65) आणि त्याच वॉर्डमधील दुसऱ्या भागात राहणाऱ्या प्रेमा उर्फ राणी (वय 75) यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. मोहन हे ऑटो-रिक्षा चालक होते.
दोघांचाही काही वेळाच्या अंतराने मृत्यू झाल्यामुळे, परिसरातील अनेक लोकांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, जास्त प्रमाणात कीटकनाशक मिसळून वापरण्यात आलेल्या डास प्रतिबंधक औषधामुळे आणि त्यातून निघालेल्या दाट धुरामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मृत मोहन यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी सांगितलं की, घरात कीटकनाशक फवारू नका, असं सांगूनही मोठ्या प्रमाणात पायरेथ्रम या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे गुदमरल्याने मोहन यांचा मृत्यू झाला.
परंतु, नगरपरिषद आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यानंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी दोघांची प्रकृती आधीपासूनच खराब होती आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, असं सांगितलं.
अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली विधानं बदलली, असा आरोप स्थानिक माजी नगरसेवक शेखर यांनी केला.
बीबीसीशी बोलताना ऑटो-रिक्षा चालक मोहन यांचे नातेवाईक महेंद्रन यांनी सांगितलं, “मोहन यांची प्रकृती आधीपासूनच खराब होती, हे खरं आहे. परंतु, रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्यानंतरच ही घटना घडली. घरात धूर जाऊ नये म्हणून त्यांनी घराचा पुढचा दरवाजा बंद केला होता. घरात एक रुग्ण असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. पण, ते मागच्या उघड्या दरवाजाजवळ गेले असताना तिथे औषधाची फवारणी केली आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरला.”

महेंद्रन म्हणाले, “घराचा एक दरवाजा बंद असल्यामुळे आत गेलेला धूर बाहेर पडू शकला नाही आणि घरातील लोकांना गुदमरायला झालं. निरोगी लोकांनाही या धुरामुळे थोडा त्रास झाला असेल. परंतु, आधीपासून आजारी असलेल्या लोकांवर त्याचा जास्त परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. मात्र मोहन यांच्या मृत्यूचं हेच एकमेव कारण असेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही.”
बीबीसी तमिळशी बोलताना, त्याच वॉर्डमध्ये त्याच दिवशी निधन झालेल्या प्रेमा उर्फ राणी यांच्या घराजवळ राहणाऱ्या प्रेमदेवा यांनी सांगितलं, “राणी यांच्यावर आधीपासूनच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना घरी आणण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.”
प्रेमदेवा यांनी सांगितलं, “त्यांना पूर्वीपासूनच अस्थमाचा त्रास होता. पण, डास पळवणाऱ्या औषधाचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे की नाही, हे आम्हाला माहिती नाही. कारण आमच्या परिसरात अनेक वृद्ध आणि लहान मुलं आहेत. त्यापैकी कोणालाही यामुळे काहीही त्रास झाला नाही. त्यामुळे डास पळवणाऱ्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असं आम्हाला वाटत नाही. म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.”
अधिकाऱ्यांच्या तपासात नेमकं काय आढळून आलं?
मोहन यांच्या कुटुंबीयांनीही पोलिसांत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तक्रार न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या दोन्ही मृत्यूंबाबत अन्नूर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
परंतु, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
अन्नूरच्या सात नंबर वॉर्डचे माजी नगरसेवक शेखर यांनी बीबीसीला सांगितलं, “नगरपंचायतीचे अधिकारी लोकांचं म्हणणं ऐकत नाहीत. आमच्या वॉर्डमधील अनेक लोक घरात गेले होते. त्यांनी मनाई करूनही घरांमध्ये कीटकनाशकाची फवारणी केली.”
शेखर म्हणाले, “एका भागातील घरांमध्ये डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली, तेव्हा तिथल्या महिलांनी त्याला विरोध केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची टीम तिथून दुसऱ्या भागात गेली आणि तिथे फवारणी केली.”

“त्या ठिकाणी तर परिस्थिती आणखी गंभीर होती. प्रेमा यांना आधीपासून अस्थमाचा त्रास होता आणि फवारणी केल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांचा मृत्यू झाला.”
“त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. मात्र, नंतर तक्रारी आणि कायदेशीर कारवाई होईल, या भीतीने त्यांनी माघार घेतली. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.”
अन्नूर नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी हे आरोप फेटाळून लावत बीबीसीला सांगितलं, “गेल्या महिन्यात या भागातील तिघांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर परिसरातील लोकांनी आम्हाला डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्याची विनंती केली होती.”
“म्हणूनच आम्ही रस्त्यांवर या औषधाची फवारणी केली. आम्ही कोणत्याही घरात जाऊन धूर सोडला नाही. पण, ज्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या होत्या, त्या घरांमध्ये धूर गेला असण्याची शक्यता आहे.”
ते म्हणाले, “यात जास्त प्रमाणात कीटकनाशक मिसळलं होतं, हा दावा चुकीचा आहे. तसेच कीटकनाशक जुने होते, ही माहितीदेखील असत्य आहे. नगरपंचायतीचे सहाय्यक संचालक आणि आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी घटनास्थळी येऊन तपासणी करून गेले आहेत.”
“या कीटकनाशकाची मुदत ऑगस्ट 2027 पर्यंत आहे. त्यात योग्य प्रमाणातच कीटकनाशक मिसळण्यात आलं होतं. एकाच रस्त्यावर 200 घरांसमोर फवारणी करूनही कोणालाही, कोणताही त्रास झालेला नाही.”
त्यांनी सांगितलं की, ऑटो-रिक्षाचालक मोहन आणि प्रेमा या दोघांवरही त्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी प्रमाणित केलं होतं की, मोहन यांना हृदय निकामी होण्याचा (हार्ट फेल्युअर) त्रास होता, तर प्रेमा यांना फुफ्फुसांचा आजार आणि अस्थमाचा त्रास होता.
नगरपंचायतीचे सहाय्यक संचालक अबू बकर यांनीही प्रसारमाध्यमांना हीच माहिती दिली. कोईम्बतूर जिल्हा आरोग्य विभागाचे उपसंचालक बालुसामी आणि झोनचे प्रभारी कीटकशास्त्रज्ञ शिवकुमार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अन्नूरमध्ये तपासणी पूर्ण केली आहे.
डॉ. बालुसामी यांनी बीबीसीला सांगितलं, “आमच्या तपासात मोहन हे यकृत निकामी झाल्याच्या समस्येने ग्रस्त होते, असं समोर आलं. त्यांच्या फुफ्फुसातही द्रव साचला होता आणि त्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे त्यांना घरी आणण्यात आलं होतं.”
बालुसामी यांनी सांगितलं, “राणी यांना सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज- फुफ्फुसांचा आजार) होता. त्यांच्यावर घरीच सीपीएपी (कंटीन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीनच्या मदतीने उपचार सुरू होते.”
“त्या दिवशी सकाळी 7 वाजता नगरपरिषदेचे कर्मचारी डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यासाठी आले होते. पण, कुटुंबीयांनी त्यांना फवारणी करू नका, असं सांगितलं. त्यानंतर ते तिथून निघून गेले.”
“औषधाची फवारणी रस्त्यावरच केली होती. राणी यांच्या मृत्यूची वेळ आणि डास प्रतिबंधक औषधाची फवारणी एकाच वेळी झाली, हा केवळ योगायोग आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. औषधात जास्त प्रमाणात कीटकनाशक मिसळण्यात आलं नव्हतं, याचीही आम्ही खात्री केली आहे. लवकरच जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल सादर केला जाईल.”
डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाने धूर फवारणी (फ्युमिगेशन) करण्याची शिफारस केली आहे.
अभ्यासांनुसार, स्थानिक प्रशासन मोकळ्या भागात फवारणी करण्यासाठी मॅलॅथिऑनसारख्या वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करत आहे. मॅलॅथिऑन हे रासायनिक पद्धतीने तयार केलेलं एक कृत्रिम ऑर्गेनोफॉस्फेट कीटकनाशक आहे.
डास पळवणाऱ्या औषधात नेमकं काय असतं?
डासांना पळवणाऱ्या औषधाच्या धुरामुळे मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, जनरल प्रॅक्टिशनर आदित्यन कुगन यांनी हे औषध वापरताना प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, “आपल्या देशात पावसाळ्यात डास मारण्यासाठी फॉगिंग मशीनचा वापर केला जातो. या मशीनमध्ये केरोसीन किंवा डिझेलमध्ये पायरेथ्रॉइड आणि मॅलॅथिऑनसारखी कीटकनाशकं मिसळली जातात. त्यातून निघणारा धूर रसायनं मिसळलेल्या म्हणजे दूषित हवेसारखा परिसरात पसरतो.”
“त्यामुळे फुफ्फुसांचा आजार असलेल्या व्यक्ती, अस्थमाचे रुग्ण आणि वृद्धांनी हा धूर मोठ्या प्रमाणात श्वासावाटे घेतला, तर त्यांचं फुफ्फुस काम करणं थांबवू शकतो.”
डॉ. आदित्यन कुगन यांनी सांगितलं की, डास पळवून लावणारा धूर मोठ्या प्रमाणात श्वासातून गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी आणि अंग थरथरण्यासारखा त्रास होऊ शकतो.
त्यांनी सांगितलं की, अभ्यासांतून असं दिसून आलं आहे की खूप जास्त धूर श्वासातून गेल्यास काही लोकांना फिट्स (झटके) येऊ शकतात. आधीपासून ताप असलेल्या आणि कॅन्सरसाठी केमोथेरपी घेत असलेल्या लोकांवर या धुराचा जास्त परिणाम होऊ शकतो.
ते म्हणाले, “अन्नूर येथे मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी एकाला न्यूमोनिया होता, असं दिसतं. जर त्यांची ऑक्सिजनची पातळी आधीपासूनच 85 ते 88 दरम्यान असेल आणि त्यांनी हा धूर श्वासातून घेतला असेल, तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.”
“पाश्चिमात्य देशांमध्ये डास पळवण्यासाठी या औषधाचा वापर एका खास मिश्रणासोबत केला जातो. पण, इथे केरोसीन आणि डिझेल एकत्र मिसळल्याने त्याचा वासही श्वास घेण्यास त्रासदायक ठरू शकतो. केरोसीनच्या वासाचा मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकतो.”
फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP via Getty Images
बचावासाठी काय काळजी घ्यावी?
डॉक्टर आणि विविध अभ्यासांनुसार, डास पळवणाऱ्या औषधाची फवारणी करताना घ्यायची सुरक्षिततेची खबरदारी खालीलप्रमाणे:
– डास पळवणाऱ्या औषधाची फवारणी कधी होणार, याची माहिती जाहीर केली जावी.
– डास प्रतिबंधक औषधाची फवारणी केवळ मोकळ्या जागेत, घराबाहेर करावी. घराच्या आत त्याचा वापर करू नये.
– रस्त्यावर डास-प्रतिबंधक औषधाची फवारणी सुरू असताना घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात.
– फवारणी सुरू असताना प्रत्येकाने मास्क घालावा आणि रस्त्यावर फिरणं टाळावं.
– खाद्यपदार्थ आधी बाजूला ठेवून ते व्यवस्थित झाकून ठेवावेत.
– फवारणी सुरू असताना मुलांना बाहेर खेळू देऊ नये. फवारणी झाल्यानंतर किमान अर्ध्या तासानेच त्यांना बाहेर जाऊ द्यावं.
फोटो स्रोत, R. SATISH BABU/AFP via Getty Images
पर्यावरण संशोधक स्वाती आर. अय्यर यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे की, डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धुरामुळे मानवाला कोणताही मोठा धोका निर्माण होत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वारंवार स्पष्ट केलं आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकाचं प्रमाण खूप कमी असतं. तेही इतक्या कमी प्रमाणात पसरवलं जातं की, त्याचा परिणाम प्रामुख्याने डासांसारख्या छोट्या जीवांवरच होतो.
मुंबईतील फुफ्फुसरोग तज्ज्ञ आणि साथरोग तज्ज्ञ डॉ. लॅन्सलॉट पिंटो यांच्या मते, हा धूर श्वासावाटे घेतल्यास काही लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यांना चिंताजनक लक्षणं जाणवू शकतात.
डॉ. पिंटो यांच्या मते, ज्यांना पूर्वीपासूनच फुफ्फुसांचा आजार आहे, त्यांना या धुरामुळे अधिक त्रास होऊ शकतो आणि त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते.
डॉ. पिंटो सांगतात की, पूर्वीच्या अभ्यासांतून असं दिसून आलं आहे की, स्टेज म्हणजेच रंगमच आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सतत धूर आणि धुक्याच्या संपर्कात राहावं लागतं. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ श्वास घेण्यासंबंधीचे विकार जडू शकतात.
त्यांच्या मते, हे लोक जेवढ्या मोठ्या प्रमाणात धूर श्वासावाटे घेतात, ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
बंगळूरू येथील एका खासगी रुग्णालयातील सेंटर फॉर पल्मोनरी अँड स्लीप डिसऑर्डर्सचे संस्थापक संचालक आणि पल्मोनरी मेडिसिन विभागाचे प्रमुख रवींद्र मेहता यांच्या मते, फुफ्फुसांचे विकार किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांना डास पळवून लावणाऱ्या धुरामुळे त्रास वाढू शकतो.
त्यांच्या मते, एकदाच या धुराच्या संपर्कात आल्याने गंभीर त्रास होईलच असं नाही. पण, वारंवार आणि दीर्घकाळ या धुराच्या संपर्कात राहिल्यास तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




