Home LATEST NEWS ताजी बातमी पुण्यातील राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मनुस्मृतीचा उल्लेख; भाजपनं केली ‘अशी’...

पुण्यातील राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मनुस्मृतीचा उल्लेख; भाजपनं केली ‘अशी’ टीका

5
0

Source :- BBC INDIA NEWS

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'मध्ये मनुस्मृतीचा उल्लेख; भाजपनं काय म्हटलं?

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यामध्ये महिलांच्या हक्कांबद्दल बोलताना मनुस्मृतीचा उल्लेख केला.

मनुस्मृतीमधील स्त्रियांविषयीच्या एका विधानाचा त्यांनी उल्लेख केला आणि हा उल्लेख ‘लज्जास्पद’ असल्याचं त्यांनी म्हटलं.

“स्त्रिया कुणाच्याही अधीन असू शकत नाहीत,” असं ते म्हणाले.

‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात ते विद्यार्थिनी आणि तरुणांशी संवाद साधत होते.

भाजपने राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी राहुल यांच्यावर ‘हिंदूफोबिया’ अर्थात हिंदू धर्माबद्दलची द्वेषपूर्ण भीती कायम ठेवल्याचा आरोप केला आहे.

‘एक्स’वर राहुल गांधींच्या भाषणाची एक क्लिप शेअर करत तुहिन सिन्हा यांनी लिहिलं की, “राहुल गांधींची हिंदू-विरोधी मानसिकता (हिंदूफोबिया) कायम आहे. ते इतर धर्मांच्या धर्मग्रंथांशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करायला कधी सुरुवात करतील? हे तर तरुण मनांमध्ये विष कालवण्यासारखं आहे. भारताचे हे विरोधी पक्षनेते डॉ. झाकीर नाईक यांची इंग्रजी बोलणारी एक आवृत्ती आहेत.”

राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सर्वप्रथम, या कार्यक्रमासाठी परवानगी मिळण्यापूर्वीच अनेक अटी घालण्यात आल्या होत्या.

त्यानंतर, कार्यक्रम होण्यापूर्वीच पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये एबीव्हीपी आणि एनएसयूआय यांच्यात संघर्ष झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले.

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी आरोप केला आहे की, शुक्रवारी रात्री पुण्यातील COEP विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात ABVP चे सदस्य घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींवर हल्ला केला.

‘X’ वरील एका पोस्टमध्ये पवन खेडा यांनी म्हटलं आहे की, “या विद्यार्थिनी प्रशासनाने केलेल्या शुल्क वाढीविरुद्ध आवाज उठवत होत्या आणि पुण्यातील ‘छात्राओं की गूंज’ (विद्यार्थिनींचा आवाज) या आंदोलनाला पाठिंबा देत होत्या.”

राहुल गांधी काय म्हणाले?

महिलांच्या हक्कांविषयीही राहुल गांधींनी मत मांडलं. “एक समस्या आहे आणि ती खूप मोठी आहे. मी जेव्हाही पुरुषांशी बोलतो, तेव्हा महिलांना तीन चौकटीत बसवले जातं. महिला म्हणजे मुलगी, पत्नी किंवा आई.

आई, पत्नी आणि मुलगी म्हणून ओळखले जाण्यात काही गैर नाही. पण तीच एकमेव ओळख असू शकत नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

“महिला व्यावसायिक, खेळाडू, नेत्या, निर्मात्या, उद्योजिका आणि बरंच काही आहेत. तरीही पुरुष त्यांना फक्त ह्याच तीन ओळखी देतात. ह्या तिन्ही ओळखी पुरुषांशी संबंधित आहेत. मग ती आई असो, पत्नी असो किंवा मुलगी असो.”

राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'मध्ये मनुस्मृतीचा उल्लेख; भाजपनं काय म्हटलं?

फोटो स्रोत, @INCIndia

मी येथे मनुस्मृतीचा संदर्भ देऊ इच्छितो, ज्यात म्हटलं आहे की, बालपणी स्त्रीने आपल्या वडिलांच्या, तारुण्यात आपल्या पतीच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलांच्या अधीन राहावे. स्त्री कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं.

“हे मनुस्मृतीमध्ये थेट लिहिलेले आहे. या शब्दांची लाज वाटली पाहिजे. हे शब्द कधीच बोलले जायला नको होते,” असा दावा त्यांनी केला.

“या देशाची सर्वात मोठी ताकद ही आहे की, महिला स्वतंत्र असाव्यात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. तुम्ही कोणाच्याही अधीन राहू शकत नाही. तुम्ही स्वतःशिवाय कोणाच्याही अधीन राहू शकत नाही.

तुमचे तुमच्या वडिलांशी, पतीशी आणि मुलाशी नातं असू शकतं, पण तुम्ही त्यांच्या अधीन राहू शकत नाही,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC