Home LATEST NEWS ताजी बातमी नरेंद्र मोदींनी ‘कणखर प्रतिमा’ बनवण्यासाठी अनेक वर्षे घालवली, आता ‘जेन-झी रील्स’ का...

नरेंद्र मोदींनी ‘कणखर प्रतिमा’ बनवण्यासाठी अनेक वर्षे घालवली, आता ‘जेन-झी रील्स’ का बनवतायेत?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Reuters

भारताची ‘जेन झी’ पिढी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला ‘फ्रेंड’ मानत नसेलही; पण मोदी मात्र या तरुण पिढीशी ‘फ्रेंड’सारखं बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत.

नरेंद्र मोदी आता 75 वर्षांचे आहेत. त्यांनी आजवर त्यांची ओळख ‘कणखर नेता’ अशीच बनवण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी ठरवून केलेली भाषणं, औपचारिक मुलाखती आणि सुनियोजित कार्यक्रमांनी त्यांना मदत केलीय.

मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून ते तरुणाईचा सर्वाधिक वावर असलेल्या इन्स्टाग्राम या फोटो-व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. आपली जुनी शैली बदलून अगदी हलकीफुलक्या संवादाची नवी वाट त्यांनी निवडली आहे.

महिन्याभरापूर्वीपर्यंत मोदींच्या टाइमलाइनवर अत्यंत निवडक पोस्ट्स पाहायला मिळायच्या. पण आता तिथे अधिक कॅन्डिड म्हणजे सहज आणि मोकळेपणाने बनवलेले व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. यात ‘गेट-रेडी-विथ-मी’ (GRWM) रील तसेच तरुणांशी थेट संवाद साधत त्यांना ‘फ्रेंड्स’ अशी हाक मारणारे सेल्फी-स्टाईल व्हीडिओही पाहायला मिळतात.

इतकेच नाही तर दिल्लीतील एका पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी ‘Gen Z’ या नव्या पिढीमधील एक लोकप्रिय वाक्य वापरत म्हटले की, “माझ्या संपूर्ण पिढीत रॉकेट, चिप आणि ड्रोन बनवणारा मी पहिलाच आहे.”

इन्स्टाग्रामवर मोदींचे 106 दशलक्षाहून (10.6 कोटी) अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फऑलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांपैकी ते एक आहेत.

2014 ची निवडणूक जिंकण्यात भाजपच्या सोशल मीडिया रणनीतीचा मोठा वाटा मानला जातो. तरीही इन्स्टाग्रामला भाजपने कधी फारसे प्राधान्य दिले नव्हते.

परंतु, भारतातील तरुणाईने महिन्याभरापूर्वी पुकारलेल्या आंदोलनांनी संपूर्ण समीकरणांना कलाटणी दिली.

राजकीय व्यंग म्हणून पुढे आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या बॅनरखाली हे आंदोलन मीम्स, थेट प्रक्षेपण आणि इन्स्टाग्राम रील्सवरून पेटत गेले. पाहता पाहता या चळवळीने इतका प्रचंड जोर धरला की, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले.

सुरुवातीला केवळ एक हलकीफुलकी मस्करी वाटणाऱ्या CJP ने सोशल मीडियावरील चर्चेचे रस्त्यावरील मोठ्या जनआंदोलनात आणि राजकीय दबावात रूपांतर करून दाखवले, ज्यामुळे भाजपच्या रणनीतीकारांना मोठा धक्का बसला.

“गेल्या 10 वर्षांहून अधिक काळात या भाजपनं व्हॉट्सॲप ग्रुप्स, फेसबुक पेजेस आणि ‘एक्स’ अकाऊंट्सच्या माध्यमातून आपल्या विचारांचा वेगाने प्रसार करत इंटरनेटवर एक अत्यंत भक्कम राजकीय ताकद निर्माण केली,” असे मत लेखक आणि राजकीय भाष्यकार अनुराग मायनस वर्मा यांनी मांडले आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images

परंतु, आजची नवी पिढी सोशल मीडियावरील कंटेट आणि राजकारणाची भाषा अगदी वेगळ्या पद्धतीने समजून घेते.

भारतात 35 वर्षांखालील तरुणांचे प्रमाण 60% हून अधिक आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते, 2029 च्या लोकसभा निवडणुकीत हा ‘जेन झी’ वर्ग देशातील सर्वात मोठा आणि निर्णायक व्होट बँक गट म्हणून पुढे येऊ शकतो.

या नव्या पिढीशी नाळ जोडायची असेल तर इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर सक्रिय राहणे राजकीय पक्षांसाठी अनिवार्य झाले आहे. कारण तिथे जुन्या पद्धतीची औपचारिक राजकीय भाषणे ऐकण्याऐवजी, वास्तववादी, थेट आणि फिल्टर नसलेला मोकळा संवाद तरुणांना अधिक जवळचा वाटतो.

मोदींच्या अशा अनौपचारिक पोस्ट्स पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर आल्या, तेव्हाच हा बदल ठळकपणे दिसून आला. परंतु तरुणाईनेही यावर तातडीने व्यंगात्मक आणि खोचक प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली.

तरुणांचे आंदोलन सुरू असताना पहिल्यांदाच त्यावर भाष्य करणाऱ्या त्यांच्या या सेल्फी रीलची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली गेली. त्यातही, मोदींनी “फ्रेंड्स…” उच्चारल्यानंतर घेतलेला अनपेक्षित आणि लांब पॉज नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही.

पाहता पाहता या व्हीडिओचे अनेक एडिट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यात नेटकऱ्यांनी मिश्कील मीम्स तयार करत त्यातील कॅमेरा अँगल आणि लाइटिंगवरही भरपूर जोक्स बनवले.

यानंतर आलेल्या पोस्ट्समध्ये मोदींची टीम अशा काही टीकेला उत्तर देताना दिसली, ज्यामध्ये कॅमेरा अँगल्स, बॅकड्रॉप्स आणि चांगल्या लायटिंगमध्ये नवे बदल करून पाहिले गेले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Reuters

नरेंद्र मोदींच्या या नव्या डिजिटल संवादाचे काही तरुणांनी कौतुक केले, तर अनेकांच्या मनात या अचानक बदललेल्या संवादाच्या वेळेबाबत अजूनही अविश्वास आणि साशंकता कायम होती.

“भाजपला माझ्या वयाच्या तरुण पिढीशी नाळ का जोडायची आहे, हे मी समजू शकते. पण अचानक सुरू झालेल्या या वाढत्या संवादाची वेळ संशयास्पद असून त्यावर विचार व्हायला हवा,” असे 22 वर्षीय गिन्नी मालिया यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, या व्हीडिओंमध्ये आजच्या तरुणाईची भाषा आणि सोशल मीडिया ट्रेंड्स अगदी हुबेहूब वापरलेले दिसतात. पण ज्या ज्वलंत प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते, त्या मूळ मुद्यांना स्पर्श करण्याचे मात्र यात टाळले गेले आहे.

हा बदल केवळ पंतप्रधानांच्या सोशल मीडियापुरता मर्यादित नसून संपूर्ण भाजपच्या अधिकृत पेजेसवरही आता तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मीम्स, ट्रेन्डिंग शब्द आणि पॉप-कल्चरचा सर्रास वापर दिसू लागला आहे.

आंदोलन संपताच भाजपने जिममधील एका प्रसंगावर आधारित रील शेअर केली होती. यात एका ज्येष्ठ ट्रेनरच्या माध्यमातून तरुणांना आंदोलनांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु सोशल मीडिया युझर्सना हा प्रयत्न अजिबात भावला नाही आणि कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी या व्हीडिओला ‘क्रिंज’ (Cringe) म्हणजे अनावश्यक म्हणत त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजपच्या आणखी एका व्हीडिओमध्ये 90 च्या दशकातील गाजलेल्या ‘फ्रेंड्स’ या अमेरिकन मालिकेचे थीम साँग वापरण्यात आले होते, ज्याला “PM Modi is there for you” म्हणजे पंतप्रधान मोदी तुमच्यासोबत आहेत… असे कॅप्शन दिले होते. ही मालिका मिलेनियल्स पिढीमध्ये तुफान लोकप्रिय ठरली असली तरी आजच्या ‘जेन झी’ तरुणाईला मात्र या संदर्भाशी स्वतःला जोडून घेणे कठीण जाते.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

“माझ्या मित्रपरिवारात या व्हीडिओंना राजकीय विचार किंवा प्रचारापेक्षा निव्वळ ‘कॉमेडी कंटेन्ट’ म्हणूनच बघितले जाते,” असे गिन्नी मालिया यांनी सांगितले.

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी केलेल्या या प्रयोगांचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे पडत नसल्याची कल्पना भाजपच्या रणनीतीकारांनाही आली असल्याचे दिसते.

तरुणांच्या या आंदोलनांची तीव्रता पाहून पंतप्रधानांनी कॅबिनेट मंत्र्यांना सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहून तरुणाईशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या होत्या.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या सोशल मीडियावरील कामाचे ‘रिपोर्ट कार्ड’ दाखवण्यात आले आणि सर्व डिजिटल माध्यमांवर स्वतःची पोहोच वेगाने वाढवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

दरम्यान भाजपने आपल्या सोशल मीडिया विभागात मोठा खांदेपालट करत 2015 पासून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. आंदोलनांच्या काळात पक्षावर इंटरनेटवर झालेला टीकेचा भडिमार रोखण्यात आणि सोशल मीडियावरील चर्चांचा रोख स्वतःच्या बाजूने वळवण्यात भाजपची रणनीती कमी पडल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे विश्लेषक सांगतात.

केवळ सत्ताधारी भाजपच नव्हे तर विरोधी पक्षही तरुणाईची नस पकडण्यासाठी सोशल मीडियाचा असाच वापर करत आहेत.

इन्स्टाग्रामवर अनेकदा कॅन्डिड फोटो पोस्ट करणारे आणि सेल्फी व्हीडिओंमुळे चर्चेत राहणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनांनंतर युझर्ससाठी ‘आस्क मी एनीथिंग’ (AMA) सेशन आयोजित केले होते. यात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी, “तुम्ही मला आणि बॅटमॅनला कधी एकाच खोलीत एकत्र पाहिले आहे का?” अशी मिश्कील आणि विनोदी उत्तरे देत तरुणाईशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, narendramodi/instagram

शेवटी इन्स्टाग्रामवर तात्पुरती लोकप्रियता किंवा लक्ष मिळवणे सोपे असले तरी तिथल्या जनमताचा आणि संवादाचा रोख नियंत्रित करणे राजकीय पक्षांसाठी अजिबात सोपे नाही.

“आपला राजकीय संदेश वेगाने पसरवण्यासाठी आणि जनतेतील चर्चांचा रोख आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने आजवर एक्स आणि व्हॉट्सॲपवरील मजबूत नेटवर्कचा पुरेपूर वापर केला. पण ही रणनीती इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदम आणि तिथल्या कार्यपद्धतीमध्ये यशस्वी ठरत नाही,” असे मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक आणि सोशल मीडियाचे राजकीय विश्लेषक जोयोजीत पाल सांगतात.

इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम अशा कंटेन्टला प्राधान्य देतो, ज्यावर युझर्स जास्त वेळ थांबतात, तो पुन्हा पाहतात, इतरांना पाठवतात किंवा त्यावर चर्चा करतात.

“इन्स्टाग्रामवर फक्त 200 फॉलोअर्स असणाऱ्या एखाद्या साध्या युझरची रील थेट 10 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा ओलांडू शकते, तर कोट्यवधींचा चाहतावर्ग असलेल्या नेत्यांच्या किंवा सेलिब्रिटींच्या पोस्ट्स काही हजारांतच अडखळू शकतात,” असे स्पष्टीकरण जोयोजीत पाल देतात.

भाजपची जुनी डिजिटल यंत्रणा ही व्हॉट्सॲप किंवा फेसबुकसारख्या नेटवर्कवर पकड ठेवण्यासाठी तयार केली गेली होती. मात्र आजचे सोशल मीडिया अल्गोरिदम लोकांच्या भावना आणि तात्कालिक प्रतिक्रियांवर जास्त काम करतात, ज्यामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.”

त्याचबरोबर एकदा रील किंवा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर सोशल मीडिया युझर्स काय प्रतिक्रिया देतात आणि त्यातून कोणता नवीन ट्रेंड सुरू होतो, यावर पक्षाचे कोणतेही थेट नियंत्रण उरत नाही. ही भाजपसाठी आणखी एक मोठी अडचण ठरू शकते.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @narendramodi Instagram/ANI Video Grab

400 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवणारी पंतप्रधान मोदींची पहिलीच रील या परिस्थितीचे उत्तम उदाहरण आहे. या रीलने विक्रमी व्ह्यूज खेचून आणले असले, तरी तरुणाईने त्यावर खोचक आणि व्यंगात्मक री-एडिट्स करत ती व्हायरल केली. त्यामुळे पंतप्रधानांच्या मूळ उद्देशापेक्षा या रीलचा सूर पूर्णपणे बदलून गेला. सोशल मीडियावरील हा अनपेक्षित प्रतिसाद स्वीकारणे भाजपसाठी एक मोठी कसोटी ठरू शकते, असे वर्मा सांगतात.

इन्स्टाग्राम हे मुळातच उपहास आणि व्यंगावर आधारलेले आहे. त्यामुळे गंभीर राजकीय विचार रील्सच्या रूपात कितीही आकर्षक करून मांडले, तरी ते ट्रोल होण्याची शक्यता नेहमीच असते,” असे वर्मा यांनी नमूद केले.

दुसरीकडे अभ्यासकांच्या मते जेन झी मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या भाजपच्या या सोशल मीडिया धडपडीवरून लगेच मोठे निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण निवडणुकीच्या रिंगणात भाजपची खरी ताकद पक्षाची तळागाळातील मजबूत संघटना आणि हक्काची व्होट बँक यातच दडलेली आहे, इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदममध्ये नाही.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, facebook/Narendra Modi/Getty Images

“सोशल मीडियावरील चर्चा आपल्या बाजूने वळवणे आणि जमिनीवर प्रत्यक्षात निवडणूक जिंकणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत,” असे पाल म्हणतात. त्यांच्या मते, “सोशल मीडियावर ‘जेन झी’ पिढीने कितीही तीव्र विरोध दर्शवला, तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एकतर्फी विजय खेचून आणण्याची क्षमता भाजप निश्चितपणे ठेवतो.”

तूर्तास तरी देशातील इतर राजकीय पक्षांप्रमाणेच भाजपनेही या अनपेक्षित आणि आव्हानात्मक डिजिटल मैदानात नवे राजकीय डावपेच शिकण्यास सुरुवात केली आहे.

“भाजपने या नव्या डिजिटल आव्हानावरही मार्ग काढला, तर कोणालाही नवल वाटायला नको,” असा विश्वास जोयोजीत पाल व्यक्त करतात.

प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वप्रथम वापर करण्यापासून ते आजच्या काळातील पॉडकास्ट्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या मुलाखतींना आपलेसे करण्यापर्यंत, राजकीय संवादाच्या नवनवीन प्रयोगांशी स्वतःला जुळवून घेण्याची मोठी परंपरा भाजपमध्ये दिसून येते.

“परंतु यासाठी निश्चितच काही काळ जावा लागेल. आज उद्भवलेली ही परिस्थिती हेच दर्शवते की पक्षाला या नव्या माध्यमात संवाद साधण्याचे पूर्णपणे नवे तंत्र आणि नियम आत्मसात करावे लागतील,” असे पाल यांनी शेवटी स्पष्ट केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC