Source :- BBC INDIA NEWS

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली असून, आगीत तीन लहान चिमुकल्यांचा होरळपळून मृत्यू झाला आहे.
अनेक चिमुकल्यांचा जीव वाचवण्यात यश आलंय. मात्र, तिघांचा या मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका कक्षात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहे.
या कक्षाची क्षमता 39 लहान बाळांना ठेवण्याची आहे. आगीची घटना घडताच चिमुकल्यांना डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं. मात्र, तीन चिमुकल्यांचा यादरम्यान जीव गेला.
वाचण्यात आलेल्या चिमुकल्यांपैकी 6 जणांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली.
जुन्या बिल्डिंगमध्ये काही दोष होते, म्हणून या नवीन बिल्डिंगचं नियोजन केलं. त्यात मोठ्या प्रमाणावर बेड्स उपलब्ध करून दिले. NICU ची व्यवस्था केली. पण इथे जर इनव्हर्टर सप्लाय किंवा कनेक्शन सप्लायमधे हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला माफ करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सप्लायर कोण होता, इनव्हर्टरमध्ये दोष होता का, व्हेंटिलेटरमध्ये दोष होता का याची चौकशी व्हायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

या घटनेबद्दल माहिती देताना अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी म्हटलं की, पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्या वॉर्डात 9 बालकं होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहा बालकांना सुखरूप बाहेर काढलं. पण तीन बालकांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश आलं.
ज्या सहा बालकांना बाहेर काढलं त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहितीही डॉ. पवार यांनी दिली.
अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे, अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली, असंही त्यांनी म्हटलं.
(ही बातमी अपडेट होत आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन
SOURCE : BBC




