Home LATEST NEWS ताजी बातमी ‘अक्का महादेवी नग्न वावरल्या, राहुल गांधी आणि कृती सेननच्या निमित्तानं त्यांची आठवण...

‘अक्का महादेवी नग्न वावरल्या, राहुल गांधी आणि कृती सेननच्या निमित्तानं त्यांची आठवण व्हावी’ – ब्लॉग

3
0

Source :- BBC INDIA NEWS

कृती सेनन, राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images/ANI

“स्त्रीचं शरीर म्हणजे पुरुषांच्या मालकीची, झाकण्याची, प्रदर्शनाची किंवा नियंत्रणाची वस्तू नाही,” असं म्हणत कन्नड संत कवयित्री अक्का महादेवीनं बाराव्या शतकात स्वतःच्या शरीरावरील सगळ्या कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर नग्न वावरल्या.

समाजानं स्त्रियांच्या शरीराशी जोडलेली लाज त्यांनी काढून टाकली. समाजाची स्त्रीच्या लैंगिकतेच्या बाबतीत असणारी चौकट सपशेल त्यांनी नाकारली, मोडली.

ज्या युगात स्त्रीसाठी फक्त विवाह आणि मातृत्व हेच कर्तृत्व होतं, त्याकाळी त्यांनी लग्न, वस्त्र आणि मातृत्व या सगळ्यांचा त्याग करून स्त्रियांसाठी ‘पुरुषसत्ताकता उद्ध्वस्त करा’ म्हणत स्वातंत्र्याचं एक नवं दालन उघडं केलं. त्याकाळी ईश्वरभक्ती ही उच्चवर्णीय पुरुषांची मक्तेदारी होती.

एखाद्या स्त्रीनं देवाशी वैयक्तिक, थेट संबंध प्रस्थापित करण्याचा दावा करणं, हे बंड मानलं जात असे, अशावेळी त्यांनी शिवाची भक्ती करण्यात आपलं आयुष्य व्यतीत केलं.

स्त्रियांनी लिहिणं वाचणं प्रतिबंधित होतं अशावेळी त्यांनी प्रचलित संस्कृतऐवजी कन्नड भाषेत 350 भक्तीपर कविता रचल्या.

एवढी ताकदवान स्त्री समाजाच्या पचनी पडली असती तर नवल.

अर्थातच, कर्मठ समाजाकडून त्यांना प्रचंड त्रास झाला कारण स्त्रियांच्या शरीरसंबंधातील अनेक कडक निर्बंध असण्याच्या समाजात स्त्रीसाठी नग्नता हे मोठं पातक समजलं जात होतं. त्यांना कर्मठ पुरुषप्रधान समाजासमोर स्वतःची भूमिका ठामपणे स्पष्ट करावी लागली, प्रतिभा सिद्ध करावी लागली.

अक्का महादेवी यांची आठवण येण्याचं कारण नुकत्याच घडलेल्या दोन घटना आहेत.

राहुल गांधी यांनी ‘छात्रोंकी गुंज’ या कार्यक्रमाद्वारे पुण्यात मुलींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनुस्मृती ग्रंथाचं उदाहरण देत स्त्रीवर असणारी बंधनं कशी पूर्वापार चालत आली आहेत यावर भाष्य केलं.

त्यातील एका संवादाच्या वेळी स्टेजवर अनेक मुली येऊन समस्या मांडत होत्या. त्यातील एक मुलगी बुरखा घातलेली होती. यावरून काही मंडळीनी राहुल गांधीवर ‘ते मनुस्मृतीवर बोलले, मात्र बुरख्यावर बोलले नाहीत’, असं म्हणत त्यांच्याविरुद्ध राळ उठवली.

अक्का महादेवी यांची आठवण येण्याचं दुसरं उदाहण म्हणजे क्रिती सेनन या अभिनेत्रीनं रक्षाबंधनाच्या जाहिरातीत खोल गळ्याचा ब्लाऊज (ब्रासेट) घातला म्हणून तिची मिडिया ट्रायल केली. दबाव आल्यानं संबंधित कंपनीनं ती जाहिरात काढून टाकली.

या दोन्ही घटनांमुळे एकीकडं भारतातील पुरुषांना मुस्लीम समाजातील स्त्रियांची चिंता वाटू लागली आहे असं आभासी वातावरण तयार झालं. दुसरीकडे हिंदू महिला भारतीय संस्कृती नष्ट करत आहे, असंही वाटू लागलं आणि हीच पितृसत्ताक मनुवादी विचारसरणी आहे. त्याच्याच विरोधात बाराव्या शतकात अक्का महादेवीला लढावं लागलं.

स्त्रीला संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही हे फक्त तिच्या कपड्यांच्या निवडीवरूनच का ठरतं?

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक मुली होत्या. विविध मुद्दे मांडणाऱ्या ‘फक्त मुली’. काहींनी जीन्स टी शर्ट घातले होते. एकीनं बुरखा घातला होता. टीकाकारांना मुली स्टेजवरून कोणते प्रश्न मांडत होत्या, याच्याही काहीही देणंघेणं नाही.

दुसरं म्हणजे, बुरखा घातलेल्या मुलीच्या जागी एखादी साडी, घुंघट किंवा स्कर्ट घातलेली ख्रिश्चन नन असती तर एवढा गहजब केला असता का की ती फक्त मुस्लिम मुलगी होती म्हणून तिच्या कपड्यात त्यांना तिचं पारतंत्र्य दिसलं हा विचार करण्याचा मुद्दा आहे.

टीका करणाऱ्यांना मुस्लिम किंवा हिंदू समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांबाबत बोलायचं नाही. त्यावर कुणीही काम करत नाही. मात्र बुरखा घातलेली स्त्री म्हणजे अबला आणि जीन्स घातलेली हिंदू स्त्री म्हणजे सबला असं बाळबोध वर्गीकरण करून हिंदू समाजातील स्त्रियांना कमी बंधने घालून जास्त सुधारणावादी विचारांचे आहोत हे दाखवून द्यायचं असतं.

मात्र, जीन्स घातलेल्या मुलीला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, सुरक्षा, समान संधी रोजच्या जगण्यात आहे का हा विचार त्यावेळी केला जात नाही.

साधं लग्न झाल्यावर स्त्रीनेच आपलं घर का सोडायचं, नाव, आई वडील, लग्न, मुल झाल्यावर तिनेच नोकरी का सोडायची, कमावलेले पैसे फक्त सासरीच का ठेवतात, वारसाच्या संपत्तीत समान हक्क असलेल्या मुलीला इमोशनल ब्लाकमेल करून तिला संपत्ती सोडण्याची जबरदस्ती का केली जाते.

बायको तुमची मोलकरीण नाही, लग्न झाल्यावर ती आई वडिलांना भेटू शकते, माहेरी जाऊ शकते अशी कोर्टाला ऑर्डर काढावी लागते या पितृसत्तेबद्द्ल बोलणार की नाही?

ग्रामीण भागात अजूनही महिलांनी साडी सोडून साधा गाऊन घालण्यावर बंदी आहे, डोक्यावरील पदर खांद्यावर आला, वाकडा भांग पाडला म्हणून त्या स्त्रीला “वाईट चालीची” म्हणतात किंवा उत्तरेकडील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये स्त्रीचे तोंड पर पुरुषाला दिसू नये म्हणून अजूनही लांबच्या लांब घुंघट घेतलं जातं हा हिंदू स्त्रियांवरचा अन्याय म्हणायचा नाही का?

पुरुषांनी चारित्र्यावर संशय घेऊन हजारो स्त्रियांचे बळी घेतले आहेत. अजूनही महिलांना ‘अग्निपरीक्षा’ द्यावी लागते. अशावेळी सीतेलाच कायम प्रश्न विचारणारा समाज पुरुषांना प्रश्न विचारणार की नाही?

स्त्रियांच्या बाबतीत ‘भारत सर्वाधिक धोकादायक देश’?

NCRB च्या ताज्या अहवालानुसार, देशात वर्षभरात महिलांवरील अत्याचाराचे 4,41,534 गुन्हे नोंदवले गेले आहेत. संपूर्ण भारतात वर्षभरात 29,536 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात 93,940 महिला गायब झाल्या आहेत.

स्त्रिया गायब होण्याच्या संस्कृतीबाबत कुणी संस्कृतीरक्षक बोलणार आहेत का? की केवळ बुरखा, ब्लाउज, स्तन आणि संस्कृती यातच खेळत राहणार?

2018 साली झालेल्या एका अभ्यासात स्त्रियांच्या बाबतीत 193 देशांच्या यादीत भारत सर्वाधिक धोकादायक देश म्हणून घोषित केला आहे. सांस्कृतिक परंपरा, लैंगिक हिंसा आणि मानवी तस्करी याबाबतीत सर्वात वर होता.

स्त्रीला संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही हे फक्त तिच्या कपड्यांच्या निवडीवरूनच का ठरतं?

फोटो स्रोत, Getty Images

2022 च्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवालात 82 टक्के स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्यानं त्यांच्यावर एकदा तरी बलात्कार केला आहे असं म्हटलं आहे. नवऱ्यानं केलेल्या लैंगिक हिंसेला भारतीय कायदा बलात्कार म्हणत नाही ही भारताची संस्कृती आहे.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात हिंदूंची लोकसंख्या 80% तर मुस्लीम 15% आहेत. हिंदू स्त्रियांची संख्या 80% असेल तर या हिंदू बहि‍णींचे रक्षण कोण करणार?

मुळात कोणत्याही धर्माच्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्याबाबत स्वतंत्रपणे बोलतं यायला हवं. मुस्लीमबद्दल बोलला नाही म्हणून हिंदूंचे स्त्रियांचे मुद्दे नाकारणे रास्त नाही.

धर्म आणि पितृसत्ता

मुस्लिम समुदायाने बदलावे, मुलींचा बुरखा हटवावा असं म्हणणाऱ्या भक्तांना स्त्रियांवर बंधने घालणाऱ्या हिंदू धर्म ग्रंथांवर केलेली चिकित्सा मान्य नसते. याला दांभिकता म्हणतात.

प्रत्येक धर्माच्या प्रगतीसाठी त्या धर्माची, धर्मग्रंथांची चिकित्सा होणं गरजेचं असतं. ज्यांना लोकांना अंधारात ठेवून त्यांच्यावर सत्ता गाजवायची असते, त्यांना धर्म चिकित्सा नको असते.

मुळात आधीच्या धर्म ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये लिहिलं आहे ते चुकीचं आहे का, ते बदलण्याची गरज आहे का यावर लोक विचार करत नाहीत. आणखी एक दांभिकता, बुरखा पितृसत्ता आहे मात्र घुंघट नाहीये. ब्रासेट घालणं अश्लील आहे, मात्र कावड यात्रेत मुलींना नाचवणं, गणपतीच्या, दहीहंडी, नागपंचमी, होळी सणाच्यावेळी, मिरवणुकीत पुरुषांनी, लहान लहान मुलांनी कावड यात्रेत बीभत्स, घाणेरडे हातवारे करणं, स्त्रियांना सुपारी देऊन कोणत्याही संवेदनशील माणसाला लाजवेल असे हावभाव करायला लावणं यातलं काहीच अमानवीय, अश्लील आणि संस्कृती नष्ट करणारं नाही? इथं स्त्रीची इज्जत जात नाही? या मुलांना कधी काही सुनावलं, शिकवलं जाणार की नाही?

प्रत्येक स्त्रीसाठी सक्षमतेची परिभाषा आणि प्रवास वेगवेगळा आहे. कोणताही पेहराव स्त्रीच्या प्रगतीमधील अडथळा होऊ नये याकडेही लक्ष द्यायला हवं. नुकतीच अलाहाबाद कोर्टानं मुस्लिम मुलींना शाळेच्या ड्रेसवरून बुरखा घालण्यास परवानगी नाकारली.

कर्नाटक राज्याने 2022 मध्ये शिक्षण संस्थांमध्ये केलेल्या हिजाब, बुरखा बंदीनंतर 1000 च्यावर मुलींना शिक्षण बंद करावे लागले. त्यास जबाबदार कोण?

हिंदू स्त्रियांचा जसा गोशा ते जीन्स असा प्रवास झाला आहे, तसा मुस्लिम मुलींचाही झाला आहे, होतो आहे आणि होईल. त्याची झलक इराणमधील स्त्रियांनी स्वतःच्या मर्जीनं बुरखा काढून फेकून देऊन आणि जाळून दाखवली आहे.

मुस्लीम स्त्रियांना अशी पावलं उचलण्यासाठी इतर धर्मीय स्त्री, पुरुषांचा पाठींबा आणि सोबतीची गरज आहे.

मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं आहे?

इसवी सनाच्या अंदाजे दुसर्‍या तिसर्‍या शतकाच्या सुरुवातीला मनुस्मृती लिहिली गेली. इंग्रजांच्या काळात तिला धार्मिक ग्रंथाचं स्थान मिळालं. महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांनी तिला विरोध केला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करून स्त्रिया आणि शुद्रांवर अन्याय करणाऱ्या मनुस्मृतीच्या विखारीपणाला ओळखून डॉ. आंबेडकरांनी तिचं सार्वजनिक दहन केलं.

उदा. ‘”पिता रक्षति कौमार्ये भरता रक्षति यौवने।

रखिती स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हती ।।” (9:3)

याचा अर्थ स्त्रीने आयुष्यभर पुरुषावर अवलंबून असावे पण स्वतंत्र असू नये असा आहे. स्त्रियांना गौणत्व देणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख आहे. मात्र मनुवादी विचारसरणी असणारे अर्थ लावताना मनूने कसं स्त्रियांच्या हिताचं लिहीलं आहे हे सांगतात.

स्त्रीला संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही हे फक्त तिच्या कपड्यांच्या निवडीवरूनच का ठरतं?

फोटो स्रोत, Getty Images

कोणताही धर्मग्रंथ हा त्या त्या काळाचे अपत्य असतं. त्याचं अस्तित्व त्या काळापुरतं सीमित असतं, असायला हवं. मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही मनुवादी विचारसरणी जपून तिला संस्कृतीचं गोंडस नाव देणं म्हणजे पितृसत्ता जपणं होय.

पितृसत्ता म्हणजे पित्याची किंवा पुरुषाची सत्ता. ही अशी विचारसरणी आहे ज्यानुसार स्त्रिया, शूद्र, पारलिंगी यांना दुय्यम ठरवून पुरुषाला श्रेष्ठत्व बहाल करते. कवि तुलसीदास यांनी ‘रामचरितमानस’ मध्ये “ढोल गँवार शूद्र पशु नारी, सकल ताड़ना के अधिकारी,” असं लिहून ठेवलं ज्यानुसार ढोल, अज्ञानी, शुद्र, जनावर आणि स्त्री यांना शिक्षा देऊन ताब्यात ठेवावं.

मनुस्मृती हा फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ नाहीये, त्यातील विचार सर्वच धर्मातील स्त्री पुरुषांसाठी लागू होतात. शिवाय सर्व धर्मातील ग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले असल्यामुळे स्त्रियांना कसं दडपून ठेवता येईल ही मनुवादी मानसिकता त्यांच्या लिखाणातून त्यांनी समाजमनापर्यंत पोहोचवली.

‘माय बॉडी माय क्लोथ्स’

गीवाच्या जाहिरातीत क्रितीला खोल गळ्याच्या ब्रालेट घालायला देणं हे तिला कमोडिटी बनवणं आहे स्त्रियांना माहिती आहेच. मात्र, मुळात कोणत्याही स्त्रीला तिचे कपडे निवडण्याचा अधिकार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. स्त्रियांचे कपडे घालायचे हे पुरुषांचे क्षेत्र नाही. स्त्रियाही पुरुषांनी काय घालायचं हे ठरवत नाहीत.

मुली शिकल्या तरी त्यांना कपड्यांवरून जज करणं सुरु आहे. यात काही पितृसत्तेचा वाहक स्त्रियाही आहेत, ज्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांच्या मुलींना कंट्रोलमध्ये ठेवलं तरच त्या आदर्श स्त्रिया बनू शकतील.

स्त्रीचं कर्तृत्व नाकारून तिचं अस्तित्व, चारित्र्य कपड्यांवरून ठरवणं सडक्या पितृसत्तेचं उदाहरण आहे.

बलात्कार झाला की, “अरे मुलीने कपडेच छोटे घातले असतील (बलात्कारी पुरुषाबाबत कधी बोलणार?)”

“मी स्त्री फेमिनिस्ट आहे, पण सामाजिक संकेत पाळायला हवेत. लग्नाच्या वेळी जीन्स घालत नाहीत ना? मग रक्षा बंधनला ब्रासेट घालणं हा स्वैराचार आहे (सॉफ्ट पेट्रीआर्की)”

पुरुषांनी मात्र कपडे घातले काय किंवा ते नग्न फिरले काय, त्यामुळं संस्कृती नष्ट होत नाही!

माय बॉडी माय क्लोथ्स

फोटो स्रोत, Getty Images

खरंतर स्त्रियांनी काय करायला हवे याचे इंडिकेटर पुरुषांच्या तुलनेत ठरवू नये. स्त्रिया पुरुषाच्या स्पर्धक नाहीत. म्हणजे पुरुष जे करतात ते स्त्रियांनी करावे किंवा करू नये. स्त्रिया स्वतंत्र, स्वायत्त आहेत. आणि संस्कृती म्हणजे नेमकी कोणती?

अजिंठा वेरूळची संस्कृती, आदिवासी संस्कृती, कामसूत्र ही भारतीय संस्कृती नाहीये का? संस्कृती कधीच स्थिर नसते, काळानुसार बदलते. पुरुषांनी नाही का बदल केले त्यांच्या कपड्यांमध्ये? स्त्रियांना कसे कपडे घालावेत याचं ज्ञान आहे. ती पुरुषांच्या मताचा आदर करतेही. मात्र निवड तिचीच हवी. स्त्रिया फक्त कपड्यात पुरोगामित्व शोधत नाहीत, कपड्यांच्या खूप पुढे जाऊन त्यांनी स्वतःला सक्षम बनवलं आहे. त्या फक्त भावाकडून ओवाळणी घेत नाहीत तर त्या भावाची, आई वडिलांची जबाबदारी घेत आहेत.

भारतीय समाजाची दांभिकता : स्त्री शरीराचं राजकारण

स्त्रीला संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही हे फक्त तिच्या कपड्यांच्या निवडीवरूनच का ठरतं? शिवाय सणाच्या दिवशी बहिणीने जर भावाला हवे तसेच कपडे घातले (इतर वेळी तेच कपडे घातले तर ती मुलगी गॉर्जीयस दिसते. पोर्न विडीओमध्ये असे कपडे घातल्यास त्याला ‘पारंपरिक सेक्स’च्या वर्गवारीत टाकून त्याचा पुरेपूर आनंद पुरुषांकडून घेतला जातो. सभागृहात पोर्न पाहणारे आमदार खासदार आठवले का?) तरचं तो तिचं रक्षण करणार, अन्यथा नाही, याला भारतीय संस्कृती म्हणायचं का हाही प्रश्न आहेच.

भाऊ समोर आहे म्हणून तिनं स्वतःला कसे कपडे घालायचे आहेत, यापेक्षा भावाला प्राथमिकता द्यायला हवी अशा ‘त्याग आणि ‘नैतिकतेची’ अपेक्षा भावांकडून केली जात नाही हीच पितृसत्ता आहे.

त्यानं टी शर्ट, जीन्सऐवजी भारतीय संकृती असणारे धोतर, सदरा, पटका घालूनच सण साजरे केले जावेत अशी अपेक्षा करताना समाज दिसत नाही. पुरुषांसाठी नैतिकता ठरवली जात नाही.

भारतीय पितृसत्ताक समाज दांभिक आहे. फक्त स्त्रियांनीच ‘मर्यादा’ तारतम्य ‘ बाळगायला हवं,’ संस्कृती जपण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांचीच. ‘कारण त्या स्त्रिया आहेत.’

स्त्रियांच्या नॉर्मल शरीराला योनीशिचितेच्या संकल्पनामध्ये अडकवून, त्याला हत्यार बनवून स्त्रियांच्या लैंगिकतेवर आणि पूर्ण आयुष्यावर पुरुषाला ताबा मिळवायचा आहे. स्त्रीची इज्जत (?) स्तन आणि योनीत जखडून ठेवली आहे. पुरुषांनाही स्तन आहेत. मात्र त्यांच्या स्तनांचा आकार लहान असल्यामुळं त्याचं राजकारण होत नाही आणि ते उघडे पडले तर त्यानं संस्कृती नष्ट होत नाही. मात्र, स्त्रीचे स्तन आकाराने मोठे असल्याने त्याने पुरुष उत्तेजित होतात आणि त्यामुळं भारतीय संस्कृती नष्ट होते.

स्त्रियांच्याच स्तनांमध्ये अश्लीलता असते, या सिद्धांताचा मूळ आधार काय आहे? स्त्रियांच्या शरीराचा, स्तनांचा पुरुषांना एवढा प्रॉब्लेम का आहे? एनसीइआरटीच्या पुस्तकामधील मोहेंजदाडो संस्कृतीमधील नग्न डान्सिंग गर्लच्या पुतळ्याच्या फोटोला कपडे चढवण्यात आले. पुरुषांनी स्वतःच्या अश्लील मानसिकतेवर काम करण्यापेक्षा समोरच्या स्त्रीने अंग झाकावे ही अपेक्षा करणे पितृसत्ता आहे.

स्त्रीला संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही हे फक्त तिच्या कपड्यांच्या निवडीवरूनच का ठरतं?

फोटो स्रोत, Getty Images

स्त्रियांना स्तन असणं नैसर्गिक आहे, मात्र ते बघितल्यावर पुरुषांच्या भावना चाळवणे आणि त्यांनी घाणेरड्या नजरेनं स्त्रियांकडे पाहणे, बलात्कार करणे हे नैसर्गिक नाहीये. यात नेमकं कोण संस्कृती नष्ट करत आहे?

अमेरिकेमध्ये एका शहरातील महिलांनी कोर्टात केस टाकली, “स्त्रियांनाही टॉपलेस फिरायची परवानगी हवी.”

त्यांचा मुद्दा होता, ” केवळ स्तनांच्या आकारावरून अश्लीलतेची व्याख्या होऊ शकत नाही.”

त्या केस जिंकल्या. आता अमेरिका आणि काही युरोपियन देशात स्त्रिया टॉपलेस फिरू शकतात (स्त्रिया टॉपलेस दिसल्या म्हणून तिथले पुरुष त्यांच्यावर बलात्कार करत नाहीत ! आपल्याकडे गोव्याला अनेक पुरुष फक्त बीचवर बिकिनीत असणाऱ्या परदेशी स्त्रिया बघायला जातात.)

भारतातदेखील कलम 15 नुसार,”धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करण्यास” प्रतिबंध केला आहे. कलम 25 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देतं. ही दोन्ही कलमे स्त्रियांना बुरखा घालण्यास परवानगी देतात आणि क्रिती सनॉनला ब्रासेट घालायलाही.

पुरुषांना या सगळ्याचा त्रास होत असेल तर त्यांनी आपले छोटे स्तन दाखवत बनियनवर फिरू नये, शर्ट पँट घालायची सोडावी कारण तो पश्चिमात्य वेश आहे. त्याऐवजी धोतर सदरा आणि पटका घालून पुरुषांची संस्कृती वाचवावी. बुरखा घातलेली एखादी अमिना किंवा खोल गळ्याचा ब्लाऊज घातलेली क्रीती दिसली तर डोळे बंद करावेत. दोन्ही गोष्टी केल्यानं भारतीय संस्कृती वाचणार आहे.

पुरुषांना समस्या आहे म्हणून स्त्रिया बुरखा, साडी, जीन्स शर्ट, खोल गळ्याचे टॉप, ब्लाऊज घालणं बंद करणार नाहीत तर त्या ते सगळं घालून मिरवतील आणि मुक्त राहतील. स्त्रियांचं स्वतःच्या शरीरावर प्रेम आहे आणि त्यांच्या शरीरात त्यांना काहीही अश्लील दिसत नाही. राहुल गांधी म्हणतो तसं, स्त्रियांचे कुणीही मालक नाही आणि त्यांना कोणते कपडे घालायचे हे इतर कुणी शिकवू नये. या पितृसत्तेविरुद्धच्या लढाईत राहुलसारखे अनेक संवेदनशील पुरुष स्त्रियांच्या सोबत उभे आहेत ही बाबही सुंदर आहे.

पितृसत्तेविरुद्धचा अविरत लढा

स्त्रियांना कुणीही स्वातंत्र्य आंदण म्हणून बहाल केलेलं नाहीये, बहुत मेहनत से उन्होंने इसको कमाया है! त्यासाठी एक दीर्घ लढा दिला गेला आहे.

राहुल गांधीने जरी पितृसत्ता, मनुस्मृती हे शब्द वापरले असले तरी हा पितृसात्तेविरोधातला लढा हजारो वर्षांपूर्वी सुरु झाला आहे. राहुल गांधी राष्ट्रीय पक्षाचा पॉवरफुल नेता असल्या कारणानं हा मुद्दा सर्वदूर पोहोचायला मदत झाली. मात्र, संत अक्का महादेवीपासून ते जिजाऊ, सावित्री, जोतिबा, बाबासाहेब आंबेकर आणि इतर अनेक ते संविधानापर्यंतचा स्त्री हक्काचा आणि #SmashThePatriarchy चा मोठा प्रवास झाला आहे.

पुरुषांनी स्त्रियांना काय हवं आहे, त्या स्वतःकडे, पुरुषांकडे कसं पाहतात, याचा गंभीरपणे विचार करण्याची, शिकण्याची गरज आहे. स्त्रिया पुरुषाच्या स्पर्धक नाहीत, कधीच नव्हत्या. जोडीदार म्हणून पुरुषाच्या सावलीखाली नव्हे तर त्यांना स्वतंत्र वाढायचं आहे. हा अवकाश पुरुषांनी त्यांना घेऊ दिला नाही तर स्त्रिया तो पुरुषाशिवाय घेतील. त्याची सुरुवात कधीच झाली आहे. आताच्या जेन झी पिढीच्या अजेंड्यावर कपडे हा मुद्दाच नाहीये.

“भावाच्या समोर जर बहिण हवे तसे कपडे घालू शकत नसेल तर तो तिचं रक्षण कसं करणार आहे?” असा प्रश्न ही पिढी विचारत आहे.

“तुम्ही कोण स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे, स्त्रिया जन्मत: स्वतंत्र आहेत,” हे वाक्य ही पिढी पुरुषांच्या तोंडावर फेकून मारते (ही मागच्या पितृसत्ताक पिढीनं जेन झीला दिलेली भाषा आहे.).”

रक्षाबंधनाला ड्रेस कोड नसतो यावर विश्वास ठेवणाऱ्या जेन झीशी मागच्या पिढ्यांना जोडून घ्यायचं असेल तर स्वतःवर खूप काम करावं लागेल हा आणखी महत्वाचा मुद्दा आहे.

स्त्रिया आता विचारांनी खूप पुढे गेल्या आहेत. त्या स्वतःचं व्यक्तित्व, चारित्र्य ब्लाउच्या गळ्याच्या खोलीवरून ठरवत नाहीत. जर पुरुषांनी आपलं वर्तन आणि मनुवादी मानसिकता बदलली नाही तर स्त्री पुरुषातील अंतर वाढत जाणार.

स्त्रिया एकट्याच आनंदानं पुढं निघून जाणार. स्त्रिया सबल झाल्यात, होत आहेत. त्यांच्या हक्कांबाबत खूप काम झालं आहे. आता पुरुषांसोबत ‘मर्यादे’बाबत काम करण्याची, त्यांना शिकवण्याची जास्त गरज आहे. त्याची सुरुवात पुरुष रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हिश्याची प्रॉपर्टी हक्क सोड्पत्राद्वारे न घेता तिला करू शकतात.

“हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!”

तुला असतेच जर मोठे स्तन

तर तुलाही तुझ्या कपड्यांवरून दिसणाऱ्या

स्तनांच्या आकाराची चर्चा करणाऱ्या

तुझ्याच देशबांधवांची शरम वाटली असती

तुझ्या कपड्यातून त्यांनी तुझं शरीर

आरपार नग्न करून पाहिलं

हे ऐकून तुझ्या अंगावर घृणेचे शहारे उमटले असते

बाईला वाटू नये स्तनांचं ओझं

बाई असल्याचा होऊ नये पश्चात्ताप

तुझ्या निर्मळ नजरेनं

करशील का आश्वस्त बाईला

देशील तुझी साथ

फक्त माणूस म्हणून?

जमेल एवढं?

जमव.

तोवर मी चालत राहीन

स्वतः निवडलेल्या वाटेवरून

एकटीच. बिनधास्त!

(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC