Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
जगाचं तापमान वाढत असून, येत्या काही वर्षांत ते 1.5°C ची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा, पूर, वणवे आणि समुद्राच्या पातळीत वाढ असे धोके आणखी गंभीर होऊ शकतात.
परंतु, तापमानवाढ पुन्हा कमी करण्याची आपल्याला अजूनही संधी आहे. त्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन त्वरीत कमी करून आत्तापासूनच ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) नवीन अहवालात म्हटलं आहे.
या अहवालानुसार, तापमान 1.5°C पेक्षा थोडंसं वाढलं तरी ते फार काळ वाढलेलं राहू नये, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर तापमान पुन्हा कमी करून शक्य तितक्या लवकर 1.5°C च्या खाली आणणं, हा सध्या सर्वात योग्य पर्याय आहे.
“या उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, वणवे आणि पूर हे भविष्यातील धोक्याचे संकेत आहेत. तापमान 1.5°C पेक्षा वाढले, तरी ही वाढ शक्य तितकी कमी आणि कमी काळासाठी ठेवली पाहिजे. त्यासाठी आत्ताच प्रयत्न केले पाहिजेत,” असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे.
या मार्गाने तापमानवाढ कमी ठेवता येईल. त्यासाठी कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन लगेच कमी करावे लागेल. पुढे उत्सर्जन शून्याच्या खाली नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचबरोबर झाडे लावून आणि इतर मार्गांनी हवेमधला कार्बन काढून संतुलन राखणे आवश्यक आहे.
यासोबतच, हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. तापमानवाढ जितकी कमी ठेवता येईल, तितके नुकसान कमी होईल. त्यामुळे हवामान बदलाशी जुळवून घेणं सोपं आणि कमी खर्चिक होईल आणि तापमान पुन्हा कमी करण्याची शक्यताही वाढेल.
फोटो स्रोत, Getty Images
“तापमान 1.5°C पेक्षा जास्त राहिलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील. वाढत्या उष्णतेचे परिणाम दिसून येतच आहेत. पुढे यामुळे अधिक लोकांचा मृत्यू आणि जनजीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो,” असं यूएनईपीच्या प्रमुख इंगर अँडरसन यांनी म्हटलं आहे.
“आता हवामान बदल रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची वेळ आली आहे. हरितगृह वायू कमी करणे आणि तापमानवाढ शक्य तितकी कमी ठेवणं गरजेचं आहे,” असंही त्या म्हणाल्या.
हवामान बदलाचे भीषण परिणाम
जगाचे तापमान वाढण्याची सर्वात चांगली परिस्थिती धरली तरी ते औद्योगिक काळापूर्वीच्या तुलनेत 1.8°C पर्यंत वाढू शकते. हे पॅरिस करारात ठरवलेल्या 1.5°C च्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. इतर अनेक अंदाजांनुसार तापमान यापेक्षाही जास्त वाढू शकते.
तापमान 1.5°C पेक्षा वाढलं तर उष्णता, पूर आणि अतिवृष्टीचा धोका वाढेल. काही बेटं आणि समुद्रकिनाऱ्याजवळची शहरं पाण्याखाली जाऊ शकतात. याचा माणसांचे आरोग्य, अन्न-पाणी, निसर्ग आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
अहवालानुसार, तापमान जास्त वाढलं तर काही बदल कायमचे होऊ शकतात. मोठे बर्फाचे थर वितळू शकतात, ॲमेझॉनचं जंगल खराब होऊ शकतं आणि समुद्राच्या प्रवाहात बदल होऊ शकतो. काही परिणाम अचानक, तर काही हळूहळू दिसून येतील.
कोळसा, तेल आणि गॅसऐवजी स्वच्छ ऊर्जेकडे लवकर वळणं गरजेचं आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि आरोग्यही सुधारेल. तापमानवाढ रोखण्यासाठी सर्व देशांनी मिळून तातडीने ठोस पावलं उचलावीत, असं या अहवालात म्हटलं आहे.
तापमानवाढ रोखण्यासाठी काय गरजेचं?
हवामान बदल रोखण्यासाठी सरकारांची ठाम भूमिका, देशांमधील परस्पर सहकार्य, योग्य नियम आणि पुरेसा पैसा गरजेचा आहे. याचा फायदा सर्वांना समान मिळायला हवा. हवामान बदलाला सर्वाधिक जबाबदार असलेल्या देशांनी सर्वात आधी आणि वेगानं पावलं उचलणं गरजेचं आहे.
या अहवालानुसार, तापमानवाढ कमी करणे आणि त्याचे परिणाम सहन करण्याची तयारी करणे, ही दोन्ही कामं एकाच वेळी करावी लागतील. त्यासाठी झाडे लावणं, सावली वाढवणं यांसारखे निसर्गाच्या मदतीने उष्णता कमी करणारे उपाय प्राधान्याने केली पाहिजेत.
फोटो स्रोत, Getty Images
आतापर्यंत हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी केलेली तयारी पुढील उपायांसाठी महत्त्वाची आहे. परंतु, बदलत्या आणि अचानक येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी ही तयारी आणखी मजबूत करावी लागेल. कारण अशा धोक्यांमुळेच तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांचेही नुकसान होऊ शकते.
अहवालानुसार, नेट-झिरो हा शेवटचा टप्पा नाही. उत्सर्जन कमी करण्यासोबतच हवेतला कार्बनही कमी करावा लागेल. तापमानवाढ 2°C पेक्षा कमी ठेवण्यासाठी कार्बन कमी करण्याच्या उपायांचे योग्य नियमन आवश्यक आहे.
अनेक वर्षे योग्य उपाय न केल्यामुळे तापमान पुन्हा 1.5°C च्या खाली आले तरी काही नुकसान कायमचं होणार आहे. अनेकांना घर किंवा कामं सोडावी लागू शकतात, रोजगार बदलावा लागू शकतो. त्यामुळे या बदलांमध्ये सर्वांना न्याय मिळणे गरजेचं आहे.
अहवाल सांगतो की, तापमानवाढ कमी करण्यासाठी आत्ताच ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पुढच्या पिढीवर हे काम सोपवून चालणार नाही. तापमान वाढून पुन्हा कमी करण्याचा मार्ग खुला ठेवायचा असेल, तर आताच कृती करावी लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




