Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मी श्रीमंत शिक्षिका आहे’; महापालिकेच्या शाळेचा चेहरा बदलू पाहणाऱ्या शिक्षिकेची गोष्ट

‘मी श्रीमंत शिक्षिका आहे’; महापालिकेच्या शाळेचा चेहरा बदलू पाहणाऱ्या शिक्षिकेची गोष्ट

3
0

Source :- BBC INDIA NEWS

कुंदा बच्छाव

फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC

  • Published

  • वाचन वेळ: 5 मिनिटे

महानगरपालिका शाळेच्या वर्गात मुलं कविता म्हणत आहेत. कुठे बाहुल्यांच्या माध्यमातून गोष्ट सुरू आहे, तर कुठे संविधान सापशिडीच्या खेळातून मुलं हक्क आणि कर्तव्य शिकत आहेत.

या सगळ्या गोंधळात एक शिक्षिका मुलांमध्ये मिसळून जाते. वर्ग संपल्यानंतरही मुलं तिच्याभोवतीच असतात.

ती हसत एक वाक्य म्हणते, “ते जेवढं प्रेम देतात, त्या प्रेमामुळे मी स्वतःला नेहमी एक श्रीमंत शिक्षिका म्हणते. आणि या मुलांमुळे खरंच मी एक श्रीमंत शिक्षिका आहे.”

ही गोष्ट आहे नाशिकच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिरातील शिक्षिका कुंदा बच्छाव यांची. यंदा त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पण त्यांच्या प्रवासाची खरी ओळख पुरस्कारापेक्षा वेगळी आहे.

एका महानगरपालिका शाळेबद्दलची धारणा बदलण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो मुलींच्या शिक्षणापर्यंत पोहोचला आहे.

कुंदा बच्छाव या शाळेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान अभ्यासक्रम नव्हतं; तर लोकांची मानसिकता होती.

“मनपा शाळेत शिक्षण मिळत नाही, मनपा शाळेत गुणवत्ता नाही, अशी लोकांची धारणा होती. या सगळ्या गोष्टी समाजाच्या आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही बिंबल्या होत्या. त्यामुळे शिक्षणातला आनंदच त्यांना वाटत नव्हता. आणि हेच मोठं आव्हान होतं,” असं त्या म्हणतात.

त्यांच्या मते, बदल फक्त मुलांमध्ये नव्हे तर पालकांमध्येही घडवणं गरजेचं होतं.

कुंदा बच्छाव म्हणाल्या, “लोकांचा दृष्टिकोन बदलायचा होता. मुलांना शाळेची गोडी लावायची होती. त्यांच्या आई-वडिलांनाही वाटू नये की मनपा शाळेत मुलांना घालणं म्हणजे कमीपणा आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड माझी शाळा करायची, हा निर्धार आम्ही तेव्हाच घेतला.”

हा निर्धार वर्गाच्या चार भिंतींपुरता मर्यादित राहिला नाही.

वर्गात पुस्तकांपेक्षा अनुभव मोठा झाला

कुंदा बच्छाव यांची वर्गात शिकण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी सारखी नसते, या तत्वानुसार त्या शिकवण्याचं काम करतात.

“काही मुलं अभ्यासात खूप पुढे असतात. काही मागे असतात. जे अभ्यासात कमी आहेत, निपुण नाहीत, त्यांच्यासाठीही काम करणं गरजेचं वाटलं. म्हणून माझ्या वर्गापासून सुरुवात करून प्रत्येक वर्गात निपुण कोपरा तयार केला.

या निपुण कोपऱ्यात मुलं स्वतः शिकतात, खेळतात, समजून घेतात. पण एखादा विषय समजला नाही, तर शिक्षकच मदतीला धावून येत नाही. त्यासाठी आहे ‘दत्तक मैत्रीण’.” दत्तक मैत्रीण या त्यांच्या उपक्रमाला शासनाचा पुरस्कार असल्याचंही त्या म्हणाल्या.

कुंदा बच्छाव

फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC

“दत्तक मित्र-मैत्रीण उपक्रमातून मुलांची मैत्री दृढ होणारच पण सोबतच अभ्यासही होतो. माझ्या वर्गात एका मुलाचंही भांडण ऐकू येत नाही. प्रत्येक विषयासाठी वेगळा दत्तक मित्र किंवा मैत्रीण आहे. मुलं एकमेकांना शिकवतात,” असं कुंदा बच्छाव म्हणाल्या.

शिक्षण म्हणजे स्पर्धा नाही, तर सहप्रवास आहे, हा विचार या उपक्रमातून मुलांमध्ये रुजतो.

संविधान खेळातून शिक्षण

या वर्गात संविधान पुस्तकात बंद नाही. ते खेळात उतरलं आहे.

कुंदा बच्छाव यांनी तयार केलेली ‘संविधान सापशिडी’ मुलांना खेळता खेळता लोकशाही, हक्क आणि कर्तव्य शिकवते.

कुंदा बच्छाव

फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC

“आज मुलांनी पुस्तकातला एखादा धडा कमी शिकला तरी चालेल. पण चांगलं काय, वाईट काय हे ओळखण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणं ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. व्याख्यानातून मुलांना सगळं आवडत नाही. म्हणून खेळाच्या माध्यमातून संविधान सापशिडी तयार केली,” असं कुंदा बच्छाव म्हणतात.

त्यांच्या मते, माहिती देणं सोपं आहे; पण विचार करण्याची क्षमता निर्माण करणं हे शिक्षणाचं खरं काम आहे. या प्रयोगांबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधवही बोलतात.

अनिता जाधव म्हणाल्या, “आमच्या या शाळेच्या विकासामध्ये कुंदा बच्छाव मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या शाळेच्या प्रगतीसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात.”*

खरी लढाई वर्गाबाहेर

शाळेतले प्रयोग सुरू असतानाच 2021 मध्ये कोरोना काळ आला. शिक्षकांना घराघरात सर्वेक्षणासाठी पाठवलं गेलं. त्या सर्वेक्षणात कुंदा बच्छाव यांना त्यांच्या वर्गाबाहेरचं वास्तव दिसलं.

“माझ्याच वर्गातली एक मुलगी भेटली. आठवी नंतर तिने शाळा सोडली होती. ती मला भेटली आणि खूप रडली. ती म्हणाली, ‘टीचर, मला शिकायचं आहे. पण आई मला तिच्याबरोबर धुण्याभांड्याला घेऊन जाते.'” ही फक्त एका मुलीची गोष्ट नव्हती.

“एकीकडे आर्थिक परिस्थिती होती आणि दुसरीकडे मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांची अनास्था होती. सर्वेक्षणात खूप मुली माझ्यासमोर आल्या. एका ठिकाणी माझ्या दोन विद्यार्थिनींची लग्न झालेली पाहिली. त्या मुली खूप रडल्या. तेव्हा मला वाटलं, एक शिक्षिका म्हणून यांच्यासाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे.”

कुंदा बच्छाव

फोटो स्रोत, PrajwalBhalerao/BBC

त्या दिवसापासून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वेगळी लढाई सुरू केली. कुंदा बच्छाव दुसऱ्याच दिवशी त्या मुलींच्या घरी गेल्या.

त्यांनी सांगितलं, “मी त्यांच्या आई-वडिलांना समजवलं. त्यांना सांगितलं, ‘तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी उचलेन. तुम्ही फक्त माझ्या भरवशावर तिला शाळेत पाठवा.’ अशा पाच मुलींना मी शिक्षणासाठी दत्तक घेतलं.” यातून जन्माला आला ‘शैक्षणिक पालकत्व’ हा उपक्रम.

हळूहळू समाजातील अनेक लोक या उपक्रमात सहभागी झाले. आज या उपक्रमातून अनेक मुली पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात परतल्या आहेत.

“दीडशे मुली आज उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण प्रवाहापासून दूर जाणाऱ्या मुली पुन्हा शिक्षणात आल्या. आणि त्या स्वतः मला म्हणतात, ‘टीचर, भविष्यात आम्हीही तुमच्यासारखंच दुसऱ्या मुलींना मदत करू.’ आज दीडशे कुंदा बच्छाव भविष्यात त्या मुलींच्या माध्यमातून तयार होत आहेत, याचा मला आनंद वाटतो.”

हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं.

पुस्तकं कपाटात नाहीत, मुलांच्या हातात

या शाळेत आणखी एक गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर, भिंतींवर आणि मैदानात दोऱ्यांवर पुस्तकं टांगलेली दिसतात. कुंदा बच्छाव याला ‘तरंग वाचनालय’ म्हणतात.

“प्रत्येक शाळेत वाचनालयात पुस्तकं कपाटात बंद असतात. पुस्तक काढा, नोंद करा, सही करा याला मुलं कंटाळतात. म्हणून आम्ही सगळी पुस्तकं बाहेर काढली. तीन मजली इमारतीत, भिंतींवर, मैदानात सगळीकडे पुस्तकं लावली. मुलांना पुस्तक दिसलं की त्यांनी ते उचलून वाचावं, एवढाच उद्देश,” असं त्यांनी सांगितलं.

त्यांच्या मते, पुस्तक मुलाच्या हातात पोहोचलं की वाचनाची सवय आपोआप लागते. कुंदा बच्छाव यांच्या कामामागे एक वैयक्तिक अनुभव आहे, जो त्या आजही विसरलेल्या नाहीत.

तरंग वाचनालय

फोटो स्रोत, BBC/PrajwalBhalerao

स्वतःच्या आयुष्यातला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, “जेव्हा माझे आई-वडील माझं अकरावीत लग्न करत होते, तेव्हा माझे शिक्षक माझ्यासाठी उभे राहिले नसते, तर कदाचित मी आज इथे नसते. त्यामुळे जसे माझे शिक्षक माझ्यासाठी उभे राहिले, तसे आज मला या मुलींसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे.”

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या कामाचा सन्मान आहे. पण कुंदा बच्छाव यांच्यासाठी खरी श्रीमंती पदकात नाही, तर वर्गातल्या त्या मुलांच्या आणि शिक्षणाच्या प्रवाहात परत आलेल्या मुलींच्या स्वप्नांमध्ये आहे.

कदाचित म्हणूनच त्या स्वतःला आजही एका शब्दात ओळख करून देतात ‘श्रीमंत शिक्षिका’.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC