Home LATEST NEWS ताजी बातमी इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

4
0

Source :- BBC INDIA NEWS

इंडोनेशियात ज्वालामुखीचा भडका, 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

फोटो स्रोत, EPA

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या घटनेळे दीड लाखांहून अधिक प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ विमानतळांवर अंदाजे 1 लाख 70 हजार प्रवासी अडकून पडले आहेत. या विमानतळांवरून होणारी विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

जकार्ताचे सोकार्नो-हाटा आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी (6 सप्टेंबर) सकाळी बंद करण्यात आलेले पहिले विमानतळ होते.

विमानतळाजवळील हवाई क्षेत्रात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीची राख आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, 1558 विमानांना उड्डाणासाठी उशीर झाला आहे.

विमानतळ सोमवारी (7 सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखीचा उद्रेक शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री उशिरा सुरू झाला.

यानंतर आजूबाजूच्या परिसरात भूकंपासारखी परिस्थिती सतत निर्माण होऊ लागली.

लाव्हाच्या फवारण्यांचा आणि मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकू येतच राहिला.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा भडका, 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

फोटो स्रोत, Getty Images

रविवारी (6 सप्टेंबर) पहाटे आणखी दोन स्फोट झाले. वाहतूक मंत्रालयानं सांगितलंय की, या व्यत्ययामुळे प्रामुख्यानं सिंगापूरला येणाऱ्या आणि सिंगापूरहून जाणाऱ्या विमानसेवांवर परिणाम झाला.

याव्यतिरिक्त, दोहा, सिडनी आणि क्वालालंपूरसह इतर आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवांवरही परिणाम झाला आहे.

ज्वालामुखीची राख पश्चिम जावाच्या दिशेनं पसरल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आल्यानंतर, आणखी काही विमानतळ तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री दुडी पुरवागांधी यांनी सांगितलं आहे.

विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया जलद गतीनं करावी, तसेच विमानतळांवरील गर्दी टाळण्यासाठी ज्यांची विमानं आगामी काळात आहेत अशा प्रवाशांना वेळेवर माहिती द्यावी, असं आवाहन त्यांनी विमान कंपन्यांना केलं आहे.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा भडका, 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

फोटो स्रोत, Getty Images

इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र संस्थेच्या (BMKG) माहितीनुसार, ज्वालामुखीची राख जावा बेटावर ज्वालामुखीच्या पूर्वेकडे 20,000 फूट (6,000 मीटर) उंचीपर्यंत आणि सुमात्राच्या दिशेनं पश्चिमेकडे 50,000 फूट (15,000 मीटर) उंचीपर्यंत पोहोचली.

श्वसन, डोळे आणि त्वचेसंबंधीच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी, बाधित क्षेत्रांतील रहिवाशांनी घरातच राहावं आणि चेहऱ्यावर मास्क वापरावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

स्थानिक वृत्तपत्र ‘कोम्पास’च्या वृत्तानुसार, ज्वालामुखीच्या राखेमुळे डोळ्यांची जळजळ होत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांनी केली. त्यानंतर, शनिवारी अनेक शाळांनी आपलं कामकाज बंद केलं. तसेच, डोळ्यांच्या त्रासामुळे काही मच्छिमारांनीही समुद्रातील मासेमारीच्या फेऱ्या रद्द केल्या.

अल्डी चंद्रा प्रयाोगी या एका रहिवाशानं संबंधित प्रसारमाध्यमाला सांगितलं की, शुक्रवारच्या संध्याकाळपासून त्याला अस्वस्थता जाणवत होती. तसेच, “डोळ्यांत वाळूचे बारीक कण गेल्यासारखं” वाटत होते. या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी त्याला आय-ड्रॉप्स वापरावे लागत आहेत.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा भडका, 8 विमानतळं बंद, दीड लाखांहून अधिक प्रवासी अडकले

फोटो स्रोत, Getty Images

धूळ इतकी दाट आहे की त्याला आपल्या घरापुढील अंगण दर पाच मिनिटांनी झाडून काढावं लागतंय, असंही त्यानं सांगितलं.

‘अनाक क्राकाटोआ’ (ज्याचा अर्थ ‘क्राकाटोआचे अपत्य’ असा होतो) हा ज्वालामुखी, 1883 मधील माऊंट क्राकाटोआच्या उद्रेकानंतर तयार झालेल्या विवरामध्ये (कॅल्डेरामध्ये) गेल्या शतकाच्या सुरुवातीला समुद्रातून वर आल्यापासून अधूनमधून सक्रिय राहिला आहे.

‘अनाक क्राकाटोआ’ म्हणून ओळखला जाणारा हा ज्वालामुखी डिसेंबर 2018 मध्ये कोसळला. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड त्सुनामीमध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच, सुमात्रा आणि जावाच्या लगतच्या किनारपट्टीवरील हजारो लोक विस्थापित व जखमी झाले.

शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, ज्वालामुखी कोसळला तेव्हा त्यातून खाली घसरलेल्या खडकांच्या काही तुकड्यांची उंची सुमारे 70 ते 90 मीटर होती.

‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ (Pacific Ring of Fire) म्हणजे पॅसिफिक महासागराभोवती असलेली ज्वालामुखी, भूकंप-क्षेत्रे आणि टेक्टोनिक प्लेट्स यांची एक साखळी होय. ही साखळी दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून ते न्यूझीलंडपर्यंत तब्बल 40,000 किलोमीटर (25,000 मैल) अंतरापर्यंत पसरलेली आहे.

जगातील एकूण भूकंपांपैकी सुमारे 90 टक्के भूकंप याच पट्ट्यात होतात आणि पृथ्वीवरील एकूण सक्रिय ज्वालामुखींपैकी 75 टक्के ज्वालामुखी (म्हणजेच 452 सक्रिय ज्वालामुखी) याच ‘रिंग’मध्ये (वलयात) आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC