Home LATEST NEWS ताजी बातमी दिल्ली इमारत दुर्घटना : ‘तिथं जेवायला जायचो, आज बाहेर होतो म्हणून वाचलो’;...

दिल्ली इमारत दुर्घटना : ‘तिथं जेवायला जायचो, आज बाहेर होतो म्हणून वाचलो’; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

खबरदारी म्हणून या परिसरातील आसपासच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये रविवारी (6 सप्टेंबर) दुपारी पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेनंतर रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू होता. या घटनेतील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे.

जखमींवर उपचार सुरू असून, किरकोळ दुखापत झालेल्या एका जखमी व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

रात्रभर सुरू होतं बचावकार्य

दुर्घटनाग्रस्त इमारतीत बहुतेक विद्यार्थी राहत होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन दल आणि डीडीएमए यांची पथकं आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

त्यानंतर लगेचच बचावकार्यही सुरू करण्यात आलं होतं, असं सांगण्यात आलं.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त, पोलीस सहआयुक्त, आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांच्या देखरेखीत बचावकार्य सुरू होतं.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यात सहभागी होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरही पाठवण्यात आले होते.

बचावकार्य रात्रभर सुरू होते.

फोटो स्रोत, ANI

सुरुवातीच्या बचावकार्यात स्थानिकही मदत करत होते. त्यांनी हातानेच आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

ढिगाऱ्याखालून 11 जणांना बाहेर काढण्यात आल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी (6 सप्टेंबर) संध्याकाळी सांगितलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या स्निफर कुत्र्यांची मदत घेतली जात आहे .

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे फोन येत असून बचाव पथकं त्यांच्या संपर्कात असल्याचं घटनास्थळी उपस्थित भाजप आमदार अनिल शर्मा यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं.

एका पोलीस अधिकाऱ्यानंही या माहितीला दुजोरा दिला.

नेमकं काय घडलं?

दिल्लीच्या सत्य निकेतन मार्केट परिसरातील पाच मजली पीजी इमारत रविवारी (6 सप्टेंबर) दुपारी कोसळली. याठिकाणी काहीजण अजूनही अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“या इमारतीच्या मालकाविषयी माहिती गोळा केली जात आहे. आमच्याकडे सर्व माहिती असून त्याला लवकरच अटक करून निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला जाईल,” असं दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिमन्यू पोसवाल यांनी पत्रकारांना सांगितलं.

“बचावलेल्या मुलांपैकी एकानं आत 15-16 मुलं असल्याचं सांगितलं. पण, अद्याप खात्रीशीर माहिती नाही,” असंही पोसवाल म्हणाले.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले

ही इमारत कोसळली, तेव्हा परिसरात मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आला असं सांगितलं जात आहे.

स्फोटाचा आवाज ऐकताच लोक बाहेर पळाले असं, जवळच्या दुकानात बसलेल्या एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यानं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.

“आम्हाला अचानक भूकंपासारखा आवाज ऐकू आला. आम्ही लगेच बाहेर पळालो. तिथे खूप धूर आणि धूळ होती. संपूर्ण इमारत कोसळली होती,” असं त्यानं सांगितलं.

ढिगाऱ्याखालून अजूनही आवाज येत आहेत. मुलं ‘वाचवा, वाचवा!’ असे ओरडत आहेत. तिथे किमान 25-30 मुले आहेत. जवळच मुलामुलींसाठी एक पीजी (पेइंग गेस्ट) होते.

या इमारतीच्या तळघरात नुतनीकरणाचं काम सुरू असल्याचंही त्या विद्यार्थ्यानं सांगितलं

प्रत्यक्षदर्शी

फोटो स्रोत, ANI

या इमारती 100 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या होत्या. उत्पन्न वाढवण्यासाठी या लोकांनी तळघर बांधले. वरची इमारत मजबूत केली, पण खालचे खांब कमकुवत होते. त्यामुळे इमारत कोसळली.

“तळघरात अनेक कामगार काम करत होते, ते सर्व गाडले गेले. इमारतीसमोर फळे वगैरे विकणारे पथविक्रेतेही होते आणि तेही गाडले गेले,” असंही त्या विद्यार्थ्यानं सांगितलं.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यानंही एएनआयशी बोलताना या घटनेची माहिती दिली.

“या पाच मजली इमारतीत ‘हॉस्टेल डेज’ हे मुलांसाठीचं पीजी होतं. तिच्या बाजुची इमारतही कोसळली आणि आणखी दोन इमारती हादरत होत्या. यांमध्येही पीजी चालतात. ढिगाऱ्यामुळे त्यांची दारं बंद झाली आहेत,” असं तो म्हणाला.

खोल्यांमध्ये असलेली सर्व मुलं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. इमारत कोसळल्यापासून अग्निशमन आणि बचाव पथकं घटनास्थळी काम करत आहेत. अनेक मुलांना बाहेर काढले, असं तो म्हणाला.

…तर इथे राहावे लागणार नाही?

बीबीसीच्या प्रतिनिधी शुभ राणा यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यापैकी काहींचे ओळखीचे लोक अपघात झालेल्या इमारतीत राहत होते.

कॉलेजमध्ये वसतिगृहाच्या सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी पीजीमध्ये राहतात असं दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसमधील व्यंकटेश्वर कॉलेजचा विद्यार्थी सवाई शर्मा यानं सांगितलं.

“ज्या इमारतीत अपघात झाला, तिथेच माझा एक मित्र राहत होता. तो थोडक्यात बचावला. मी अनेकदा त्याच्या घरी जेवायला जायचो, पण आज मी बाहेर होतो. इथे हॉस्टेल खूप समस्या आहेत,” असं तो म्हणाला.

दिल्लीत इमारत कोसळली

फोटो स्रोत, Getty Images

“समाजशास्त्र ऑनर्समध्ये 75 विद्यार्थी आहेत, पण हॉस्टेलमध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांना जागा मिळते. बाकीचे सर्व विद्यार्थी इथेच राहतात. इथे एका बेडसाठी 18,000 रुपये लागतात. विद्यार्थ्यांना इथं राहणं भाग आहे,” असं सवाई शर्मा म्हणाले.

बीबीसीबरोबर बोलताना दीपेंद्र सिंग नावाच्या एका विद्यार्थ्यानं दावा केला की, “ही इमारत एका वर्षापूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आली होती. पण जेव्हा 2026 मध्ये नवीन विद्यार्थी पुन्हा इथे राहू लागले. ती पुन्हा कशी उघडण्यात आली हे मला माहीत नाही.”

मात्र, बीबीसीनं या दाव्याची पुष्टी केलेली नाही.

दिल्लीच्या सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपाची पाच मजली इमारत कोसळली.

फोटो स्रोत, ANI

“हा खूप गर्दीचा परिसर आहे आणि 10 मिनिटांच्या पावसातही इथे गुडघ्यापर्यंत पाणी साचते, तर दुसरीकडे याला दक्षिण कॅम्पसचे केंद्र मानले जाते कारण इथे 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी राहतात. इथं 100 पेक्षा जास्त हॉस्टेल्स आहेत,” असंही दीपेंद्र म्हणाले.

साहिल नावाच्या एका विद्यार्थ्यानंही विद्यापीठात वसतिगृहाची सोय नसल्याचं सांगितलं. त्याचे कॉलेजमधील मित्र मोतिलाल आणि रामलाल ज्या इमारतीत अपघात झाला, तिथेच राहत होते.

“या इमारतीत अनेक विद्यार्थी राहत होते. तळघरात काम सुरू झाल्यामुळे आणि खांब मजबूत नसल्यामुळे ती कोसळली,” असं स्वाती नावाच्या एका विद्यार्थिनीनं सांगितलं.

तर आद्या नावाची विद्यार्थिनी म्हणाली की, “इथल्या समस्येवर फक्त DUSU निवडणुका झाल्यावरच चर्चा होते. चांगली निवासव्यवस्था आणि चांगल्या सुविधा मिळतील अशी आश्वासनं दिली जातात. आमच्या कॉलेजने वसतिगृहं दिली, तर कदाचित मुलांना अशा जागेत राहावं लागणार नाही,” असंही ती म्हणाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC