Home LATEST NEWS ताजी बातमी शहाळ्याचे पाणी रोज पिताय? ‘या’ लोकांनी राहावे सावध; या प्रश्नांतून समजून घ्या...

शहाळ्याचे पाणी रोज पिताय? ‘या’ लोकांनी राहावे सावध; या प्रश्नांतून समजून घ्या तज्ज्ञांचे मत

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

ऋतू कोणताही असो, त्वरीत हायड्रेड होण्यासाठी किंवा आजारपणात बहुतेकांची पसंती शहाळ्याच्या पाण्याला असते. आजकाल तर बॉटल्समध्ये देखील ‘फ्रेश कोकोनट वॉटर’ उपलब्ध असते.

शहाळ्याचा नैसर्गिक गोडवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी अमृततुल्य असते असे डॉक्टर मानत असले, तरी एका विशिष्ट गटातील लोकांनी मात्र ते पिणे टाळायला हवे, असा इशाराही वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

शहाळ्याच्या पाण्यामध्ये नेमके कोणते आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत? आणि ते कोणी अजिबात पिऊ नये, याविषयीची महत्त्वाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

भारतात आणि त्यातही प्रामुख्याने दक्षिण भारतात नारळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जगभरातील एकूण नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. देशभरातील 1 कोटी शेतकऱ्यांसह तब्बल 3 कोटी लोकांचं पोट याच कामावर भरतं.

आहारतज्ज्ञ रेश्मा अलीम यांच्या मते, शहाळ्याचं पाणी म्हणजे निसर्गाने दिलेलं एक नैसर्गिक ‘इलेक्ट्रोलाइट’च आहे. इतर फळांच्या रसांच्या तुलनेत शहाळ्याच्या पाण्यात कॅलरी खूपच कमी असतात, असंही त्या सांगतात.

शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशिअम भरपूर असतं आणि साखरेचं प्रमाणही अगदी कमी असतं. एखाद्या इलेक्ट्रोलाइटमध्ये जे काही गुणधर्म असायला हवेत, ते सगळे शहाळ्याच्या पाण्यात निसर्गतःच भरलेले असतात.

“हे पाणी शरीराला ताजतवानं ठेवतं आणि डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता होऊ देत नाही. त्यामुळे इतर कोणत्याही पेयांपेक्षा शहाळ्याचं पाणी निवडणं हे कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी अगदी उत्तम ठरतं.

“काही इलेक्ट्रोलाइट पेयांमध्ये पोटॅशिअम आणि मिठाचे प्रमाण जास्त असते. खूप जास्त अंगमेहनत किंवा कष्टाची कामे करणाऱ्यांसाठीच अशी पेये फायदेशीर ठरतात. त्यामुळे प्रत्येकालाच अशा इलेक्ट्रोलाइट पेयांची गरज नसते,” असे रेश्मा अलीम सांगतात.

शहाळ्याचे पाणी आणि सुकलेल्या नारळाचे पाणी यांत काय फरक असतो?

शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि आयर्न यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक असतात ज्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार, दर 100 ग्रॅम नारळ पाण्यात तब्बल 250 मिलीग्रॅम पोटॅशियम आणि 100 मिलीग्रॅम सोडियम असते.

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील एका अभ्यासानुसार, नारळ पाण्यात जवळपास 95.5% पाणी, 0.1% फॅट्स, 4% कार्बोहायड्रेट्स, 0.02% कॅल्शियम आणि 0.01% फॉस्फरस असते. सोबतच काही अमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. याशिवाय नारळ पाण्यात निसर्गतःच वनस्पतींमधील अनेक गुणकारी पोषणतत्वे दडलेली असतात, असेही हा अभ्यास सांगतो.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

अभ्यासातील नोंदीनुसार, नारळ जसजसा सुकत जातो, तसतसे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्या पाण्याच्या रासायनिक घटकांमध्येही फरक पडतो. म्हणजेच पाण्यातील एकूण विरघळणारे घन पदार्थ, खनिजे आणि इतर मूलद्रव्ये कमी होतात. तर त्याउलट फॅट्स आणि प्रथिनांचे प्रमाण मात्र वाढू लागते.

शहाळ्याचे पाणी पिताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?

शहाळ्याच्या पाण्यात फॅट्स आणि प्रोटीन्स नगण्य असतात. तर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही खूप कमी असते. त्यामुळेच खेळाडूंसाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी हे एक सर्वोत्तम नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक मानले जाते.

एका संशोधनानुसार, नारळ पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातून कमी झालेली आवश्यक सूक्ष्म पोषणद्रव्ये पुन्हा भरून काढण्यासाठी खूप मोठी मदत होते.

व्यायाम करणाऱ्यांसाठी केवळ शहाळ्याचे पाणी पुरेसे ठरते का?

मॅरेथॉन धावणाऱ्या किंवा जिममध्ये अतिशय कसून व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातून पोषकद्रव्ये वेगाने कमी होतात, असे रेश्मा अलीम नमूद करतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, “अशा व्यक्तींना पोटॅशियमसारखी पोषणद्रव्ये अतिरिक्त प्रमाणात लागतात. त्यामुळेच ही खनिजे भरून काढणारी खास स्पोर्ट्स ड्रिंक्स पिणे गरजेचे असते. नारळ पाणी शरीरासाठी खूप पोषक असले, तरी भरपूर व्यायाम करणाऱ्यांसाठी केवळ तेवढेच पुरेसे ठरू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या व्यायामाची तीव्रता आणि शरीराची नेमकी गरज ओळखून नारळ पाण्याबरोबरच इतर पौष्टिक पेयांचाही आहारात समावेश करावा.”

शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण जास्त असते का?

शहाळ्याच्या पाण्यात निसर्गतःच गोडवा असला, तरी बाजारातील पदार्थांमध्ये वरून मिसळल्या जाणाऱ्या साखरेपेक्षा ही साखर पूर्णपणे वेगळी असते, असे रेश्मा अलीम सांगतात.

त्या सांगतात, “नारळ पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढेल अशी भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही.”

शहाळ्याचे विविध प्रकार असतात. शहाळ्याच्या गुणधर्मानुसार, वरून कोणतीही साखर न मिसळलेल्या 240 मिली शहाळ्याच्या पाण्यात साधारणपणे 9 ते 10 ग्रॅम साखर असते,” असेही रेश्मा अलीम यांनी नमूद केले.

अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शहाळ्याचे पाणी प्यावे की नाही, असा प्रश्नही साहजिकच उपस्थित होतो.

यावर सविस्तर बोलताना रेश्मा अलीम सांगतात, “मधुमेह असलेल्या लोकांनी साखर अजिबातच खायची नाही असा काही नियम नसतो. ते त्यांच्या आहारात 5% पर्यंत साखर घेऊ शकतात. पण त्यावर ताबा असणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहाचे रुग्ण एका वेळी साधारण 100 मिलीपर्यंत नारळ पाणी पिऊ शकतात. मात्र हे प्रत्येकाच्या रक्तातील साखरेची पातळी नेमकी किती आहे यावर अवलंबून असते. ज्यांची साखर सतत खूप जास्त राहत असेल त्यांनी मात्र नारळ पाणी न पिणेच जास्त हिताचे ठरेल.”

शहाळ्याचे पाणी दररोज प्यावे का? कोणी ते पिणे टाळायला हवे?

एका संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांना, किडनीचा विकार असणाऱ्यांना आणि पोटॅशियम वाढवणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींना ‘हायपरकलेमिया’चा (रक्तात पोटॅशियमचे प्रमाण अचानक वाढण्याचा) मोठा धोका असतो. त्यामुळे अशा लोकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे अशा लोकांनी शहाळ्याचे पाण्याचे अतिसेवन कटाक्षाने टाळायला हवे, असे रेश्मा अलीम स्पष्ट करतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्या पुढे सांगतात, “ज्यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे, ते रोज नियमितपणे एका योग्य प्रमाणात नारळ पाणी नक्कीच घेऊ शकतात. पण ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे, हृदयाशी संबंधित तक्रारी आहेत किंवा ज्यांच्या औषधांमुळे पोटॅशियम वाढण्याची शक्यता असते, अशांनी मात्र शहाळ्याचे पाणी पिणे पूर्णपणे टाळायला हवे.”

6. शहाळ्याचे पाणी आणि नारळाचे दूध यांतील पोषक घटकांचा फरक काय?

दक्षिण भारतात जेवणासोबत नारळाचे दूध आवडीने पिण्याची किंवा जेवणात वापरण्याची पद्धत खूप आधीपासून आहे. कोकणातही नारळ्याच्या दुधापासून बनलेली सोलकढी अनेकांना आवडते.

मात्र, नारळ पाणी आणि नारळाचे दूध या दोन्हीमध्ये पोषणाच्या दृष्टीने मोठा फरक असतो, असे अनेक अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. ‘हेल्थलाइन’ या आरोग्य मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, नारळाच्या दुधामध्ये कॅलरीज, कार्ब्स आणि फॅट्सचे प्रमाण नारळ पाण्याच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते.

“दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहेत. नारळ पाणी हे मुळात पाणीच असल्याने त्यात प्रोटीन्स आणि फॅट्स नगण्य असतात. पण नारळाचे दूध मात्र याच्या अगदी विरुद्ध असते. त्यात प्रोटीन्स, फॅट्स आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नारळाचे दुधाचे अतिसेवन टाळायला हवे,” असे रेश्मा अलीम सांगतात.

7. ताजे शहाळ्याचे पाणी आणि पॅकबंद नारळ पाणी यांतील पोषक घटकांमध्ये फरक असतो का?

कोणत्याही पेयावर जेव्हा प्रक्रिया करून ते पॅक केले जाते, तेव्हा त्यातील नैसर्गिक पोटॅशियम बऱ्याच अंशी नष्ट होते आणि त्यात टिकवण्यासाठी इतर घटक टाकले जातात, असे रेश्मा अलीम सांगतात.

त्या म्हणतात, “असे पॅकबंद पाणी म्हणजे निव्वळ फ्लेवर टाकलेले एक कृत्रिम ड्रिंक होऊन जाते. त्यामुळे त्याच्या मूळ पोषणद्रव्यांमध्ये खूप तफावत येते. ते विकत घेताना पाकिटावर दिलेले घटक नेहमी वाचायला हवेत. म्हणूनच, शरीराला अस्सल नैसर्गिक पोषण मिळावे म्हणू न जे नारळ पाणी पितात, त्यांनी पॅकेज्ड नारळ पाणी टाळलेलेच सर्वात उत्तम.”

(हा लेख केवळ माहितीस्तव आहे. आरोग्यविषयक समस्या असतील तर आपल्या डॉक्टर किंवा डाएटिशिएनचा सल्ला घ्यावा.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC