Home LATEST NEWS ताजी बातमी दिसायला अगदी फिट असणाऱ्या तरुणांमध्येही ‘हार्ट अटॅक’ का वाढतोय? हृदयविकार तज्ज्ञांनी सांगितलं...

दिसायला अगदी फिट असणाऱ्या तरुणांमध्येही ‘हार्ट अटॅक’ का वाढतोय? हृदयविकार तज्ज्ञांनी सांगितलं कारण

3
0

Source :- BBC INDIA NEWS

तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यामागे बिघडलेली जीवनशैली हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पूर्वी ‘हार्ट अटॅक’ हा शब्द ऐकला तरी डोळ्यांसमोर एखादी वयस्कर व्यक्तीच यायची. पण आता चित्र वेगाने बदलत चाललं आहे. आजच्या तरुणांमध्येही हे प्रमाण वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे.

कित्येकदा एखादी व्यक्ती बाहेरून एकदम फिट, धडधाकट आणि निरोगी दिसते. पण शरीराच्या आत मात्र हृदयाशी संबंधित गंभीर आजार अगदी शांतपणे हातपाय पसरत असतात.

बीबीसी पंजाबीच्या ‘सेहत सीक्रेट्स’ या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये याच गंभीर विषयावर देशातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केवल किशन तलवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. तलवार सध्या दिल्लीतील पीएसआरआय हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.

याआधी त्यांनी नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुखपद भूषवले आहे, तसेच चंदीगडच्या पीजीआय येथे संचालक म्हणूनही सेवा दिली आहे.

‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. के. के. तलवार यांना हृदयविकार उपचारांच्या क्षेत्रातील 4 दशकांहून अधिक प्रदीर्घ अनुभव आहे.

तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण इतक्या वेगाने का वाढते आहे, हे या खास संवादात समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सोबतच, आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि या संकटापासून दूर राहण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, हेही जाणून घेण्यात आले.

बीबीसी प्रतिनिधी प्रियांका धीमान यांनी डॉ. केवल किशन तलवार यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तरुणांनी काय करावे?

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी लिफ्ट वापरण्याऐवजी जिन्यांचा वापर करा आणि दिवसभर शरीराची हालचाल चालू राहील याकडे लक्ष द्या.

दररोज 30 ते 40 मिनिटे चालणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातही 10 ते 12 मिनिटांत 1 किलोमीटर अंतर पार करता येईल, अशा गतीने चालायला हवे.

खाण्यापिण्याच्या सवयींवरही विशेष लक्ष द्यायला हवे.

रोजच्या आहारात भरपूर ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या ठेवा. अंड्यांचा समावेश करणेही फायदेशीर ठरते; सोबतच थोडे ड्रायफ्रूट्सही खावेत. जे लोक मांसाहार करतात, त्यांनी चिकन किंवा फिश तळून खाण्याऐवजी रोस्ट करून खाणे अधिक चांगले.

तरुणांमध्ये वाढणाऱ्या हार्ट अटॅकच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक मोठे कारण आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मटणामध्ये फॅट्स खूप जास्त असतात, म्हणून आम्ही ते कमीत कमी खाण्याचा सल्ला देतो. याशिवाय हृदयविकारांमध्ये अनुवंशिकता हा घटकही महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घेणे गरजेचे आहे. अर्थात समस्या समजताच थेट पहिल्या दिवसापासून औषधे सुरू करावीत, असा याचा अर्थ नाही.

खरं तर, सुरुवातीला औषधांऐवजी चांगला आहार आणि नियमित व्यायामाच्या जोरावरच शरीर पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यासोबतच धूम्रपान आणि दारूपासून चार हात लांब राहणंच फायद्याचं ठरेल.

धूम्रपान हे एकाच वेळी अनेक भयंकर आजारांना आमंत्रण देते. मग तो हार्ट अटॅक असो, ब्रेन स्ट्रोक किंवा कॅन्सरसारखा जीवघेणा आजार. तरुणांनी ‘पॅसिव्ह स्मोकिंग’बाबतही तितकेच सावध राहायला हवे.

म्हणजे तुम्ही स्वतः सिगारेट ओढत नसला, तरी तुमच्या बाजूला बसून कोणी धूर सोडत असेल, तर त्याचाही विषारी फटका तुमच्या शरीराला तेवढाच बसतो. त्यामुळे अशा धुरापासूनही स्वतःला वाचवणं तितकंच गरजेचं आहे.

जिम जॉईन करण्याआधी हृदयाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे का?

व्यायाम तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि तो अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने यापूर्वी कधीही व्यायाम केला नसेल आणि तिने अचानक अतिप्रमाणात व्यायाम करण्यास सुरुवात केली, तर फायद्याऐवजी शरीराचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे व्यायामाची सुरुवात करताना एकदम अतिउत्साही न होता आधी शरीराला हळूहळू त्याची सवय होऊ द्या. सुरुवात नेहमी हलक्या व्यायामानेच करा.

हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

व्यायाम शरीरासाठी आणि हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. एखाद्या मशिनला सुरळीत चालण्यासाठी जशी ऑइलची गरज असते, अगदी तसंच आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायामाची गरज असते.

पण नवीन वर्कआउट सुरू करण्यापूर्वी स्वतःची साधी वैद्यकीय तपासणी करून घेणं नेहमीच चांगलं.. जसं की रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर तपासून पाहणं.

याशिवाय आमचा एक सल्ला असतो की, एकदम जड व्यायामाला हात घालण्याआधी थोडा वेळ ट्रेडमिलवर चालून पाहावं. जर शरीरात काही गडबड असेल किंवा छातीत, श्वासात काही त्रास जाणवत असेल, तर तो अगदी सुरुवातीलाच वेळेवर लक्षात येतो.

शरीराला सवय नसताना अचानक अतिव्यायामामुळे अनेकदा शरीरातील पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकतं.

यामुळे हृदयाशी संबंधित अचानक उद्भवणाऱ्या गंभीर आजारांचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो.

दिवसातून किती वेळ व्यायाम करणं योग्य आहे?

रोजच्या दिनक्रमात किमान 30 ते 45 मिनिटे व्यायामासाठी काढायलाच हवीत. तुम्ही तरुण आणि पूर्णपणे फिट असाल, तर 10 मिनिटांत 1 किलोमीटर अंतर वेगाने चालण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्हाला शक्य असेल तर बॅडमिंटन, टेनिस किंवा फुटबॉलसारखे मैदानी खेळ नक्की खेळा. तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे शरीर अधिक हलके आणि ताजेतवाने राहण्यास मदत होते.

कारण मॉर्निंग वॉक किंवा चालताना आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार चालूच असतात. याउलट एखादा खेळ खेळताना तुमचे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त त्या खेळावरच केंद्रित असते.

तसं तर आम्ही आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम करण्याचा सल्ला देतो. परंतु जर आठवड्याचे 7 दिवस व्यायाम करणे शक्य असेल तर ते अधिक उत्तम ठरते.

तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही पूर्वलक्षणे किंवा संकेत मिळतात का?

तरुणांच्या बाबतीत सर्वात धोक्याची गोष्ट हीच असते की, कित्येकदा शरीर कोणताही पूर्वइशारा देत नाही. आणि क्षणात अचानक हार्ट अटॅक येऊन कोसळतो.

वयस्कर व्यक्तींमध्ये मात्र अटॅक येण्याआधी शरीर काही संकेत नक्की देतं. जसं की थोडं चालल्यावरही धाप लागणं, पायऱ्या चढताना श्वास कोंडल्यासारखा होणं किंवा छातीवर अनामिक दडपण-जडपणा जाणवणं.

पण तरुणांमध्ये बहुतांश वेळा अशी कोणतीही लक्षणं आधी दिसत नाहीत, म्हणूनच हा झटका अनपेक्षित आणि अधिक घातक ठरतो.

तरीही चालताना किंवा रोजची कामं करताना जर अचानक धाप लागत असेल, छातीत जडपणा जाणवत असेल, तर ते अजिबात अंगावर काढू नका ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण तो हृदयाकडून मिळणारा धोक्याचा पहिला इशारा असू शकतो.

हार्ट अटॅकचं दुखणं शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात जाणवतं?

हार्ट अटॅकचं दुखणं प्रामुख्याने छातीच्या मधोमध, छातीच्या हाडाभोवती दाटून येतं. हे असह्य दुखणं वर जबड्यापर्यंत, किंवा डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांमध्ये पसरू शकतं.

काही वेळा हे दुखणं पोटाच्या खालच्या भागातही जाणवतं. पण लोक याला साधा गॅस किंवा पोटाची कळ समजून दुर्लक्ष करण्याची मोठी चूक करतात असं अजिबात करू नये.

हार्ट अटॅकच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘वेळ’. अटॅक आला असताना रुग्णाला जेवढ्या तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, तेवढ्याच वेगाने त्याचे प्राण वाचवणं शक्य होतं.

आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रामुख्याने 3 मुख्य रक्तवाहिन्या असतात.

जर या तिन्हींपैकी एकाही रक्तवाहिनीत ब्लॉकेज निर्माण झाला, तर जराही वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे असते.

उपचार जितक्या वेगाने मिळतील, तितक्याच लवकर रुग्ण धोक्यातून बाहेर पडू शकतो. सध्या वैद्यकीय क्षेत्रात ‘पीसीआय’ नावाची एक प्रभावी प्रक्रिया उपलब्ध आहे.

या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रक्तवाहिनीमध्ये साकळलेली रक्ताची गाठ अगदी सहजपणे बाजूला काढता येते.

पण वेळेत हा अडथळा दूर केला नाही, तर हृदयाच्या स्नायूंना कायमचे मोठे नुकसान पोहोचू शकते आणि हृदयाचे कार्य कायमस्वरूपी निकामी होण्याचा धोका वाढतो.

तरुणांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं सहसा आधी दिसत नाहीत आणि तो अचानक येऊ शकतो, असं डॉ. तलवार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

हार्ट अटॅक आल्यावर सर्वात पहिले काय करायला हवे?

सर्वात आधी रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही तातडीची औषधे जवळ ठेवता येऊ शकतात..जसे की, ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन.

अशी गोळी चावून खावी. यामुळेही तात्काळ आराम मिळण्यास मदत होते.

परंतु जितक्या लवकर शक्य होईल तितक्या तातडीने योग्य वैद्यकीय मदत मिळवणे हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे कोणत्या चाचण्या करायला हव्यात?

शरीराला एकदम ताण न देता सुरुवातीला अगदी सोप्या व्यायामाने सुरुवात करावी, असे डॉ. तलवार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि युरिक ॲसिड या सर्व अत्यंत आवश्यक तपासण्या आहेत.

याव्यतिरिक्त, सध्याच्या काळात सीआरपी चाचणी करून घेण्याचा सल्लाही दिला जातो. मात्र याविषयी माझे असे मत आहे की शरीरातील सीआरपी वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

कदाचित यापूर्वी शरीरात एखादे इन्फेक्शन झाले असेल, तर त्यामुळेही सीआरपी पातळी वाढू शकते. यामुळे लोकांच्या मनात विनाकारण भीती निर्माण होते.

अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजची तरुण पिढी आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी लगेच गुगल सर्च करते किंवा एआय टूल्सवर विसंबून राहते.

पण आजारांच्या बाबतीत फक्त यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, असा माझा स्पष्ट सल्ला आहे. कारण यामुळे डोक्यात नसलेला गोंधळ अधिकच वाढतो.

असे करणे अंगाशी येऊ शकते. कारण इंटरनेटवर मिळणारी माहिती प्रत्येक वेळी खरी आणि योग्य असतेच असे नाही. कित्येक लोक तर डॉक्टरांकडे जाणे टाळून थेट गुगल किंवा एआयच्या सल्ल्याने स्वतःच औषधे घेऊ लागतात.

पण बऱ्याच प्रकरणांमध्ये यामुळे आजार बरा होण्याऐवजी तब्येत आणखी बिघडण्याचाच धोका जास्त असतो.

हार्ट अटॅक आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारांची पहिली पायरी नेमकी काय असते?

सद्यस्थितीत सीपीआरबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

हार्ट अटॅकचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होताच तिथली संपूर्ण इमर्जन्सी कार्डिॲक टीम तत्पर असते.

सर्वप्रथम पेशंटचा ईसीजी काढला जातो, ज्यामुळे हार्ट अटॅकची तीव्रता आणि स्थिती लगेच समजून येते. पाठोपाठ तातडीने रक्ताच्या टेस्ट केल्या जातात आणि वेळ कोणतीही असो मग दिवस असो वा रात्र.. संपूर्ण विभागाला सतर्क केले जाते.

डॉक्टरांपासून ते नर्सेस आणि लॅब टेक्निशियन्सपर्यंत संपूर्ण मेडिकल टीमला रुग्णाच्या प्रकृतीची क्षणाक्षणाची माहिती दिली जाते.. कारण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचा असतो.

रुग्णाला ॲडमिट करून जेवढ्या तातडीने योग्य उपचार सुरू होतील, तेवढेच त्याच्या हृदयाचे स्नायू निकामी होण्यापासून वाचवण्याची शक्यता वाढते.

अँजिओप्लास्टी जितकी वेगाने केली जाईल, रुग्णाची प्रकृती सुधारण्याचे प्रमाण तितकेच चांगले राहते.

हार्ट अटॅकचे संकेत मिळताच एका क्षणाचाही उशीर न करता वैद्यकीय मदत घ्यायला हवी.

फोटो स्रोत, Getty Images

समजा आजूबाजूला अशा विशेष उपचारांची सोय असलेले कोणतेही रुग्णालय उपलब्ध नाही. तर अशा परिस्थितीत आजकाल बऱ्याच ठिकाणी ‘थ्रोम्बोलाइटिक थेरपी’ सहज उपलब्ध असते.

रुग्णाला ताबडतोब तिथे नेऊन ही थेरपी द्यावी. यात केवळ एक साधे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर रुग्णाची स्थिती स्थिर झाल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी एखाद्या मोठ्या रुग्णालयात हलवता येते.

यासोबतच, आपल्या समाजात ‘सीपीआर’विषयी जागरूकता निर्माण होणे ही काळाची मोठी गरज आहे. सीपीआर म्हणजेच कार्डिओपल्मनरी रिसुसिटेशन.

समजा एखाद्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि ती व्यक्ती तिथेच बेशुद्ध पडली.

तर अगदी त्याच क्षणी जर त्या व्यक्तीला तातडीने कार्डिओपल्मनरी रिसुसिटेशन (सीपीआर) दिले आणि नंतर लगेच रुग्णालयात हलवले, तर अशा गंभीर परिस्थितीतही अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC