Home LATEST NEWS ताजी बातमी प्रिन्सेस डायना यांचा ‘रिव्हेंज ड्रेस’चं होणार ऑक्शन, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याशी संबंधित आहे...

प्रिन्सेस डायना यांचा ‘रिव्हेंज ड्रेस’चं होणार ऑक्शन, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याशी संबंधित आहे याची गोष्ट

3
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रिन्सेस डायना यांनी परिधान केलेला आणि त्यांचा

फोटो स्रोत, Martin Keene/PA Wire

प्रिन्सेस डायना यांनी परिधान केलेला आणि त्यांचा “रिव्हेंज ड्रेस” म्हणून ओळखला जाणारा ड्रेस लिलावासाठी ठेवला जात आहे.

दिवंगत प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी हा स्ट्रॅपलेस काळ्या सिल्कचा इव्हिनिंग ड्रेस लंडनमधील एका पार्टीत परिधान केला होता.

त्याच दिवशी काही तास आधी त्यांचे त्यावेळी विभक्त झालेले पती प्रिन्स चार्ल्स यांनी वैवाहिक आयुष्यात व्यभिचार केल्याची कबुली दिली होती.

1994 मध्ये डायना सर्पेन्टाईन गॅलरीत हा पोशाख परिधान करून दाखल झाल्याचा क्षण पुढं एक प्रसिद्ध असा क्षण ठरला.

लिलाव करणारी संस्था सोथेबीजच्या मते, हा ड्रेस 9 डिसेंबर रोजी लिलावात 2,20,000 पौंड (सुमारे 2 कोटी 53 लाख रुपये) किंमतीपर्यंत विकला जाऊ शकतो.

1997 नंतर हा ड्रेस पहिल्यांदाच लिलावात येत आहे. 1997 मध्ये प्रिन्सेस डायना यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी कर्करोग आणि एड्सविषयक धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने त्यांचे 79 ड्रेसचे लिलाव केले होते.

सोथेबीजच्या ग्लोबल हेड ऑफ हँडबॅग्स अँड फॅशन मॉर्गन हलीमी यांनी एका निवेदनात म्हटलं की, ‘प्रिन्सेस डायना यांना फॅशनमधूनही प्रभावी संदेश देता येतात’ याची सहज जाणीव होती.

त्या म्हणाल्या, “त्या काळात प्रिन्सेस डायना प्रचंड चर्चेत होत्या आणि वैयक्तिक आयुष्यातही अवघड वळणावर होत्या. अशावेळी हा ड्रेस त्यांच्या सर्वांत ठाम संदेशांपैकी एक ठरला.”

“जेव्हा त्यांच्या आयुष्याची कहाणी इतरांकडून सांगितली जात होती, तेव्हा डायना यांनी या ड्रेसच्या माध्यमातून स्वतःचा संदेश दिला आणि सूत्रं पुन्हा स्वतःच्या हातात घेतली.”

सर्पेन्टाईन गॅलरीच्या निधी संकलनासाठी आयोजित केलेल्या त्या डिनरच्या संध्याकाळीच एक माहितीपट प्रसारित झाला होता, त्यात प्रिन्स ऑफ वेल्स (आताचे राजे) यांनी अनेक वर्षांच्या अफवा आणि माध्यमांतील वृत्तांनंतर विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली होती.

आयटीव्हीवरील या मुलाखतीची माहिती काही दिवस आधीच बाहेर आली होती. त्यामुळे मुलाखत प्रसारित झाल्यानंतर डायना जेव्हा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या, तेव्हा अनेकांनी त्यालाच त्यांचं उत्तर मानलं.

प्रिन्सेस डायना यांनी परिधान केलेला आणि त्यांचा

फोटो स्रोत, Martin Keene/PA Wire

त्यावेळच्या त्यांच्या स्टायलिस्ट अॅना हार्वी यांच्या मते, त्या दिवशी डायना यांना सर्वोत्तम दिसायचं होतं.

त्या कार्यक्रमासाठी निघण्यापूर्वी त्यांनी शेवटच्या क्षणी पोशाख बदलला. तुलनेनं कमी उठून दिसणारा व्हॅलेंटिनो गाऊन बाजूला ठेवून त्यांनी ग्रीक डिझायनर क्रिस्टिना स्टॅम्बोलियन यांनी डिझाईन केलेला, ऑफ द शोल्डर, एका बाजूने लांब आणि दुसऱ्या बाजूने लहान काठ असलेला आणि शिफॉन ट्रेल असलेला ड्रेस निवडला. त्यासोबत त्यांनी राजघराण्यातील नेकलेस, काळा क्लच आणि काळ्या हिल्स वापरल्या.

निधी उभारण्यासाठी ड्रेसचा लिलाव

या “रिव्हेंज ड्रेस”ला विक्रीपूर्वी जगभर प्रदर्शित केलं जाणार आहे. तो 18 ते 24 सप्टेंबरदरम्यान सोथेबीजच्या लंडन शोरूममध्ये प्रदर्शित केला जाईल. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो हाँगकाँगमध्ये, नोव्हेंबरच्या सुरुवातीला जिनिव्हामध्ये आणि त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये नेला जाईल, जिथे त्याचा लिलाव होईल.

यापूर्वी हा ड्रेस स्वतः डायना यांनीच लिलावात विकला होता. कर्करोग आणि एड्सविषयक धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी विकल्या गेलेल्या डझनावारी वस्तूंमध्ये त्याचा समावेश होता.

ग्लासगोमध्ये राहणाऱ्या ब्रिज मॅकेंझी आणि त्यांचे पती ग्रेम यांनी हा ड्रेस 39,098 पौंड (सुमारे 44 लाख 96 हजार रुपये) देऊन विकत घेतला होता.

मॅकेंझी यांनी त्यावेळी इंडिपेंडन्टला सांगितलं होतं की, त्यांनी हा ड्रेस घालण्यासाठी विकत घेतला नव्हता. “मला तो बसणारच नाही,” असं त्या म्हणाल्या होत्या. तर यामधून मिळणारा निधी चिल्ड्रेन फर्स्ट या धर्मादाय संस्थेला मिळणार असल्यामुळे त्यांनी तो विकत घेतला होता.

गुरुवारी सोथेबीजने जारी केलेल्या निवेदनात मॅकेंझी म्हणाल्या, “माझे दिवंगत पती आणि मला माहिती होतं की हा ड्रेस काहीतरी विशेष आहे.”

“प्रिन्सेस डायना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांपैकी एका क्षणाला सामोरं जात होत्या. पण त्यांच्याकडे पाहून त्याचा अंदाज येत नव्हता. त्यांचे फोटो प्रसिद्ध होताच हा साधा कॉकटेल ड्रेस राहिला नाही, तर तो एक ठाम संदेश बनला.”

“30 वर्षांनंतरही तुम्ही जगात कुठेही त्या ड्रेसचं नाव घेतलं तरी लोकांना नेमका कोणता ड्रेस अभिप्रेत आहे हे समजतं.”

त्या पुढे म्हणाल्या की, पतीच्या निधनानंतर त्यांनी हा ड्रेस विकण्याचा निर्णय घेतला. या ड्रेसवर बोली लावणं “आमच्या एकत्रित आयुष्यातील सर्वात आनंददायी दिवसांपैकी एक” होतं.

सोथेबीजने सांगितलं की, 1997 मधील लिलावाच्या कॅटलॉगची एक दुर्मिळ प्रतही या ड्रेससोबत विकली जाईल. त्यावर डायना आणि स्टॅम्बोलियन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच, ड्रेसचा लिलाव करण्याची कल्पना प्रिन्स विल्यम यांची होती, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतील काही हिस्सा एनएचएस लोथियन चॅरिटीमार्फत रॉयल एडिनबरो हॉस्पिटलला दान केला जाणार आहे.

डायना सर्पेन्टाईन गॅलरीच्या कार्यक्रमासाठी ज्या विंटेज जग्वार XJ40 कारमधून आल्या होत्या, ती कार याच वर्षी लिलावात 66,250 पौंड (सुमारे 76 लाख 19 हजार रुपये) किंमतीला विकली गेली.

तथापि, या ड्रेसची किंमत त्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रिन्सेस डायना यांच्या वॉर्डरोबमधील एखादी वस्तू मोठ्या रकमेला विकली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

काळ्या मेंढीचं चित्र आणि त्याच्या आजूबाजूला पांढऱ्या मेंढ्या असलेला डायना यांचा एक स्वेटर 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये सोथेबीजने आयोजित केलेल्या लिलावात 9,20,000 पौंड (सुमारे 10 कोटी 58 लाख रुपये) किंमतीला विकला गेला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC