Home LATEST NEWS ताजी बातमी ‘परीक्षेत प्रश्नपत्रिका चॅट जीपीटीवर टाकून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न’; आयआयटी मुंबई विद्यार्थी मृत्यूप्रकरण...

‘परीक्षेत प्रश्नपत्रिका चॅट जीपीटीवर टाकून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न’; आयआयटी मुंबई विद्यार्थी मृत्यूप्रकरण काय?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन

फोटो स्रोत, ANI Video Grab

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

आयआयटी मुंबईमध्ये एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्गात शिकणारा विद्यार्थी 18 सप्टेंबरला संध्याकाळी त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला.

या घटनेनंतर विद्यार्थांनी शिक्षणप्रणालीतील पारदर्शकता आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये आंदोलन केले.

पवई पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, आयआयटी बॉम्बेकडून अधिकृत निवेदन जारी करत या प्रकरणाची माहिती देण्यात आली. तसेच, मृत्यूमागील परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास केला जात असल्याचंही सांगण्यात आलं.

हा विद्यार्थी परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीचा वापर करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळून आल्याचं संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं. या प्रकारानंतर त्यांनं हे पाऊल उचललं असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं.

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)

आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसदर्भात आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणप्रणालीतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

तो म्हणाला, “मी आयआयटी बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आज आम्ही आंदोलन करत आहोत, कारण आमच्या महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत.”

आयआयटी पवई विद्यार्थी मृत्यू

पुढे बोलताना तो म्हणाला, “ही अशी पहिलीच घटना नाही. यावर्षी अशा 4 घटना घडल्या आहेत, त्यापैकी 2 घटना गेल्या 2 महिन्यांतच घडल्या आहेत. हे नेमकं का घडत आहे किंवा यामागची कारणं काय आहेत, याबाबत आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलं आहे.”

“आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की, डीन, संचालक आणि प्रशासनाने एक अहवाल द्यावा. त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची, जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याची आणि त्यांच्या कार्यकाळात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी,” अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

संस्थेने जारी केलेल्या निवदेनानुसार, “हा विद्यार्थी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रात मोबाईल फोन वापरताना आढळला होता. तसेच, त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका चॅट जीपीटीवर अपलोड करून त्यांची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात होता.”

“हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करत समुपदेशन केले. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिले होते. या प्रकरणी विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती.”

“यानंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत परतला. मात्र, संध्याकाळी उशिरा तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला,” अशी माहिती आयआयटी मुंबईने जारी केलेल्या निवेदनात दिली.

आयआयटी पवई विद्यार्थी मृत्यू

या घटनेने प्रभावित झालेल्या विद्यार्थ्याचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि इतरांना संस्थेकडून आवश्यक ते सहकार्य आणि मदत दिली जात असल्याचंही संस्थेकडून सांगण्यात आलं.

या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल केल्या असून या मृत्यूमागील परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेसंदर्भात माध्यमांशी बोलताना डीसीपी दत्तात्रय नलावडे म्हणाले, “आयआयटी पवईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर, काही आयआयटी विद्यार्थी एकत्र जमले आणि त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.”

“आयआयटी प्रशासनाकडून त्यांच्याशी चर्चा करून सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनीही येथे सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. आत्महत्या केलेला विद्यार्थी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा होता. प्रकरणी ADR दाखल असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC