Home LATEST NEWS ताजी बातमी ‘तो मला शिव्या देतो, मारतो, वारंवार बलात्कार करतो’; तरीही ती तरुणी त्याच्याशी...

‘तो मला शिव्या देतो, मारतो, वारंवार बलात्कार करतो’; तरीही ती तरुणी त्याच्याशी लग्नाला का तयार होती?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

क्रिस्टोफर माल्कम (उजवीकडे) याने होणाऱ्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. तिने तिची ओळख गुप्त ठेवून ही संपूर्ण घटना  बीबीसीला सांगितली आहे.

(या बातमीत हिंसाचारासह काही गंभीर तपशील आहेत. संवेदनशील वाचकांसाठी हे तपशील अस्वस्थ करणारे ठरू शकतात.)

घरच्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी वेळीच रोखलं नसतं, तर ज्या माणसाने पावलोपावली तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, त्याच्याशीच एमीने लग्न केलं असतं.

लग्न झालंच असतं, तर पुढे जाऊन त्याने आपला जीवच घेतला असता, अशी भीती तिच्या मनात आजही येते.

गुन्ह्यांसाठी नुकतीच तुरुंगात रवानगी झालेला सराईत गुन्हेगार क्रिस्टोफर माल्कम याने आपल्या होणाऱ्या पत्नीला आयुष्यभर विसरता येणार नाहीत अशा गंभीर जखमा दिल्या.

फादर्स डेच्या दिवशी ती आजारी वडिलांना भेटायला जाणार होती, पण त्याच्या अगदी आधी माल्कमने तिला इतकं मारलं की, तिचा चेहरा काळानिळा पडला होता, असं तिने सांगितलं.

एमी (बदललेले नाव) हिने बीबीसीला सांगितले की, हिंसाचार रोखणे आणि स्वतःचा जीव वाचवणे हाच अनेकदा या नात्यात टिकून राहण्यामागचा मार्ग असायचा.

जोपर्यंत माल्कम मोकाट फिरत होता तोपर्यंत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस आपल्याला वाटत नव्हते, असेही तिने नमूद केले.

दुसऱ्या बाजूला, तिच्या जवळच्या लोकांची आणि कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली होती.

एमीच्या सुरक्षिततेची काळजी वाटल्याने त्यांनी अनेक वेळा ‘स्कॉटलंड पोलीस’ घरगुती हिंसाचार विरोधी कक्षाकडे (इंग्लंड आणि वेल्समध्ये ‘क्लेअर्स लॉ’ म्हणून ओळख) तक्रार नोंदवली. तसेच मेसेज आणि तिच्या जखमांचे फोटो यांसारखे पुरावेही पोलिसांच्या हवाली केले.

त्यामुळे अखेर पोलिसांना माल्कमला बेड्या ठोकण्यासाठी एक भक्कम पुरावा मिळाला आणि सप्टेंबर 2024 मध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं.

तो गजाआड होताच एमीने तिच्यावर बलात्कार, जीवघेणे हल्ले आणि अमानुष छळ झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली.

विशेष म्हणजे या अटकेच्या अवघ्या 4 आठवड्यांमध्येच तिचं माल्कमशी लग्न होतं.

एमी क्रिस्टोफर माल्कमशी लग्न करणार होती, पण लग्नाच्या अवघ्या 4 आठवड्यांआधी त्याला अटक करण्यात आली.

ऑगस्ट 2023 च्या शेवटी एमीची माल्कमशी ‘टिंडर’ या डेटिंग ॲपवर ओळख झाली होती.

ते कॉफी पिण्यासाठी आणि फिरायला एकत्र बाहेर पडले (तो दारू पीत नव्हता). तिच्या आठवणीनुसार तो खूप ‘गोड आणि मनमिळाऊ’ वाटला होता. पण तिने विचारही केला नव्हता त्यापेक्षा खूप झपाट्याने हे नातं पुढे सरकलं.

पहिल्याच आठवड्यात तिची त्याच्या आई-वडिलांशी भेट झाली. काही महिन्यांतच दोघं एकत्र राहू लागले आणि ख्रिसमस येईपर्यंत तर त्यांचा साखरपुडाही उरकला.

“आम्ही दोघं खूश असायचो, तेव्हा तो माझ्या जिवाभावाच्या मित्रासारखा वाटायचा,” असं ती सांगते.

“पुढे पुढे तर, मी काय बोलणार आहे हे त्याला आधीच समजायचं. माझ्या मनातले विचार त्याला आधीच कळायचे. हे सगळं छान वाटायचं, पण सोबत मनात कुठेतरी धडकीही भरायची.”

माल्कमने खूप लवकर एमीच्या संपूर्ण आयुष्यावर ताबा मिळवायला सुरुवात केली. आपले नाते फक्त आपल्या दोघांत राहावे, असा बहाणा करून त्याने तिचं सोशल मीडिया खातं बंद करायला लावलं, असं तिने सांगितलं.

एमीच्या सांगण्यानुसार, घरात कुटुंबीयांचे फोन उचलण्यासही तिला बंदी होती. कारण त्यांची बोलण्याची पद्धत माल्कमला आवडत नव्हती. तो तिचा फोन लपवून ठेवायचा किंवा तिच्या हातातून बळजबरीने ओढून घ्यायचा.

अनेकदा तो थेट तिच्या ऑफिसमध्ये जायचा आणि गोंधळ घालण्याची धमकी देत तिला तत्काळ बाहेर पडायला सांगायचा.

त्याचे ऐकले नाही, तर घरी गेल्यावर रात्री आपले काय हाल होतील, हे तिला चांगलं ठाऊक होतं, असं तिने सांगितलं.

“या सगळ्याने मी पुरती खचून गेले होते,” असं एमी सांगते.

“खूप संघर्ष करून मी या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. मला माझ्या कामावर जीवापाड प्रेम होतं. नोकरी गमावण्याच्या भीतीने जणू मी स्वतःचेच अस्तित्व गमावून बसले होते.”

“मी ऑफिसमधून कधी बाहेर पडायचे हे दुसराच कोणीतरी ठरवत होता आणि मी ते निमूटपणे सहन करत होते. त्यामुळे माझे सहकारी आता मला मान देत नाहीत, असे मला वाटू लागले. तिथे नेमकं काय चाललं आहे, याची त्यांना कुणकुण लागली आहे याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.”

क्रिस्टोफर मॅल्कमला त्याच्या गुन्ह्यांसाठी जुलैमध्ये तुरुंगात टाकण्यात आले.

फोटो स्रोत, Police Scotland

हळूहळू नात्यात मारहाणही सुरू झाली. सुरुवातीला अधूनमधून होणारा हा हिंसाचार पुढे जवळपास प्रत्येक वीकेंडला घडू लागल्याचे एमीने नमूद केलं.

अशाच एका प्रसंगाची आठवण सांगताना ती म्हणाली की, माल्कम सलग 3 दिवस नुसता अंगावर धावून जात होता. त्याने चाकूने घरातील सोफा अक्षरशः फाडून चिंध्या केल्या आणि स्वतःचा जीव देण्याची धमकीही दिली.

माल्कम तिच्या छातीवर बसून गळा आवळायचा, अशा भयानक आठवणीही एमीने सांगितल्या. मारहाण करताना तो तिच्यावर सतत शेरेबाजी करायचा आणि अजून मारण्याची धमकी द्यायचा.

त्याच्या या मारहाणीमुळे तिच्या शरीरावर कधीही न मिटणाऱ्या जखमा आणि व्रण राहिले आहेत. एका हल्ल्यात त्याने तिचे मनगटच मोडले आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ दिले नाही. त्यामुळे आज ती एका हाताने पुस्तकही उचलू शकत नाही.

“बायका नेहमी माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात,” असा संताप काढत त्याने हा हल्ला केला होता, असं एमी म्हणाली.

त्याने तिच्यावर एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार केला

एका प्रसंगी तर घरात एक मूल असतानाही त्याने हे कृत्य केलं होतं. त्या मुलाला घाबरवल्याबद्दल एमीला त्याच्यासमोर जमिनीवर बसवून माफी मागायला लावली गेली.

काही प्रसंगांबद्दल सांगताना तिने म्हटलं की, त्याच्या स्वभावात अचानक एखादा ‘स्विच’ फिरल्यासारखा बदल व्हायचा. तर इतर वेळी आता पुढे काय घडणार आहे याची तो तिला आधीच जाणीव करून द्यायचा.

“ज्या दिवशी तो क्रूरपणे वागणार असायचा, त्या दिवशी सकाळीच बरोबर 6 वाजता तो लाऊड हेवी मेटल म्युझिक लावायचा,” ती सांगते.

“मी त्याला सांगितलं होतं की, याने माझा जीव कसा कासावीस होतो आणि मला किती त्रास होतो. तो एक प्रकारचा मानसिक छळच होता आणि ‘आज जे काही घडणार आहे त्यासाठी तयार राहा’ असाच तो एक इशारा असायचा.”

या मारहाणीनंतर एमी माल्कमची समजूत काढण्याचा प्रयत्न करायची. माझ्यासोबत असे वागणे चुकीचे आहे, हे त्याला पटवून द्यायची. पण तो लगेच विषय फिरवून स्वतःच्याच अडचणींचा पाढा वाचायचा. यामुळे ‘आपल्या हातून काहीच चांगले घडू शकत नाही’ अशी हतबलतेची भावना तिच्या मनात निर्माण व्हायची.

“आपल्या हातात काहीच उरलेलं नाही हे समजल्यावर हळूहळू या त्रासाने मन पूर्णपणे बधीर होऊन जातं,” असं एमीने सांगितलं.

“आपण कुठेतरी अडकून पडल्याची भावना सतत मनात असते. कारण दुसऱ्या कोणाजवळ मन मोकळं केलं, तर ते फक्त ‘त्याला सोडून दे’ एवढंच सांगतील, हे आपल्याला माहीत असतं. पण ते नातं तोडून थेट निघून जाण्याची ताकद किंवा परिस्थिती त्या वेळी आपल्यात नसते.”

व्हाट्सअप चॅट

एमी स्वतःच्याच कोषात बंदिस्त होऊन जगापासून पूर्णपणे तुटली नाही. यामागचं एक कारण म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय तिच्याशी ज्या पद्धतीने तिच्या काळजीबद्दल बोलायचे ते होतं… “अगदी थेट, पण कोणतीही जबरदस्ती न करता”.

त्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ती सुरक्षित राहावी एवढीच त्यांची इच्छा आहे हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं.

माल्कम हा काही चांगला माणूस नाही हेही त्यांनी तिला न लपवता सांगितलं होतं. पण सरतेशेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तिचा स्वतःचाच असला पाहिजे, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

तिच्या बहिणीने तिला एक भावूक पत्र लिहून लग्नाला न येण्याचं कारण सांगितलं. त्या पत्रात तिने पडणाऱ्या भयंकर स्वप्नांचा आणि ‘आपण बहिणीला कायमचे गमावून बसू’ या चिंतेचा उल्लेख केला होता.

पत्रात तिने पुढे लिहिलं, “फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटच्या क्षणी जरी तू लग्न मोडायचे ठरवलेस तरी कसलाही विचार न करता गाडी काढ आणि निघून ये, वाटल्यास सरळ माझ्याकडे ये. माझे घर तुझ्यासाठी नेहमीच उघडे आहे.”

एमीला कसलीही कल्पना न देता, 4 जणांनी स्वतंत्रपणे पोलिसांकडे तिच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. पहिल्या तक्रारीनंतर माल्कमला अटक झाली खरी, पण जामिनावर त्याची सुटका झाली. मात्र त्याच्याविरोधातील पुरावे सतत वाढत गेले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी एमीला स्वतःहून जबाब नोंदवण्याचा आग्रह केला.

“ते माझ्याशी अगदी स्पष्टपणेच बोलले,” असं ती सांगते.

“ते मला म्हणाले, ‘जर तू तुझा जबाब नोंदवला नाहीस, तर एखाद्या दिवशी तू आम्हाला रस्त्याच्या कडेला एखाद्या खड्ड्यात मृतावस्थेत सापडशील’.”

“मला आठवतंय, ते शब्द माझ्या मनाला खूप खोलवर लागले. कारण याआधी माझ्याशी कोणीच इतकं स्पष्टपणे बोललं नव्हतं. मी जर तशीच त्याच्यासोबत राहिले तर कधी ना कधी हे घडू शकतं याची मलाही कुठेतरी पूर्ण जाणीव होती.”

एमीला बहिणीने पाठवलेले पत्र

30 वर्षांच्या एमीने तिची ही कहाणी सांगण्यासाठी स्वतःहून बीबीसीशी संपर्क साधला. कारण तिचं कुटुंब, मित्र आणि या प्रकरणात सहभागी असलेले पोलीस अधिकारी यांनीच शेवटी तिचे प्राण वाचवले, असा तिचा ठाम विश्वास आहे.

तिच्या प्रकरणात यंत्रणेने खरोखरच योग्य काम केले, असं एमी सांगते.

स्कॉटलंड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा अत्याचाराला बळी पडलेल्या महिला भीतीपोटी तक्रार करायला पुढे येत नाहीत. अशा वेळी पोलीस केवळ त्यांच्यावर विसंबून न राहता इतर सर्व बाजूंनी पुरावे गोळा करतात.

यात पोलिसांच्या अंगावरील कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग, मोबाईल फोनचा डेटा, मारहाणीचे फोटो, डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल आणि मागील हिंसक घटनांचा इतिहास किंवा पूर्वीच्या सहभागी असलेल्यांचे पुरावे तपासले जातात.

आरोपीला न्यायालयात शिक्षा देता येईल इतपत भक्कम पुरावे असतील, तर अशा पुराव्यांच्या आधारे खटला पुढे चालवणे शक्य होते.

माल्कमच्या गुन्ह्यांचे संपूर्ण वास्तव समोर आणण्यासाठी एमीच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी दिलेली माहिती फार मोलाची ठरली, असं पोलीस प्रवक्त्यानी सांगितलं.

तब्बल 56 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेलेल्या या खटल्याअंती लोथियन आणि मोरे भागातील एमीसह 4 महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी 37 वर्षीय माल्कमला न्यायालयाने दोषी ठरवले.

या गुन्ह्यांची सुरुवात 2008 पासून म्हणजेच तो अल्पवयीन असल्यापासूनच झाली होती.

दरम्यान या निकालात झालेल्या 16 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला त्याने नुकतेच वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले आहे.

एमीच्या मते मॅल्कमचे अपील फेटाळले पाहिजे.

माल्कमच्या नसानसांत भिनलेली स्त्रीद्वेषाची विकृती पाहता त्याच्यात कधीही सुधारणा होऊ शकत नाही, असा एमीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच त्याचा जामीन किंवा अपील फेटाळलंच गेलं पाहिजे, असं तिला वाटतं.

स्टेसी हंटर आणि विकी सोलोमन यांसारख्या महिलांच्या त्यांच्याच जोडीदारांकडून झालेल्या हत्यांच्या बातम्या वाचून एमीच्या मनात स्वतःच्या भविष्यातील सुरक्षेबद्दल पुन्हा धडकी भरते.

स्कॉटलंडच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी याच आठवड्यात या सरकारी प्रस्तावांवर कडाडून आक्षेप घेतला. हिंसक गुन्हेगार आणि बलात्कार्‍यांना असं समाजात मोकळं सोडल्याने सर्वसामान्य जनतेची सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

महिलांचं हिंसाचारापासून रक्षण करणं हा ‘फर्स्ट मिनिस्टर’ जॉन स्विनी यांच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं दिसतं. त्यांनी स्त्रीद्वेषाला कायद्याने गुन्हा ठरवण्याचे आणि पीडितांना मदत करणाऱ्या संस्थांना निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. पण यासाठी केवळ आश्वासने नकोत, तर ‘निश्चित उद्दिष्टे आणि ठोस कालमर्यादा’ हवी, अशी मागणी ‘रेप क्रायसिस स्कॉटलंड’सारख्या संस्थांनी केली आहे.

सध्या तरी एमी नव्या उमेदीने जगण्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. अनेक संस्थांची तिला मदत मिळाली, तिने समुपदेशन घेतले, स्वतःसाठी नवीन गाडी आणि घरही घेतले असून आता नवीन कुटुंब सुरू करण्यासाठी ती पूर्णपणे तयार आहे.

मानसिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे, तिच्यासोबत जे काही वाईट घडले त्याचा कडवटपणा तिने आता मागे सोडला आहे. तसेच संकटकाळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे ती मनापासून आभार मानते.

एमी पुढे म्हणाली, “आपल्या माणसाला संकटात पाहून त्याच्यासाठी ठामपणे उभे राहिल्याने त्याला किती मोठा आधार मिळतो हे प्रत्येक कुटुंबाने आणि मित्रांनी लक्षात घेतले पाहिजे.”

“माझ्या जवळच्या लोकांना एकच भयंकर भीती वाटत होती की, मी त्यांच्यावर रागवेन आणि नंतर त्यांच्याशी कधीच बोलणार नाही. पण त्यांनी दाखवलेल्या या हिमतीमुळे मला प्रचंड मानसिक दिलासा मिळाला आणि त्यांच्याबद्दल आदर वाटला.”

“माझ्यासाठी इतके लोक झटत आहेत याची मला कल्पनाच नव्हती. मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन.”

(या वृत्तातील कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला असल्यास, ‘बीबीसी ॲक्शन लाइन’च्या माध्यमातून मदत मिळू शकते. घरगुती हिंसाचाराविरुद्ध ‘पोलीस स्कॉटलंड’कडे येथे तक्रार दाखल करता येईल. तातडीच्या वेळी 999 किंवा 101 वर थेट संपर्क साधा.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC