Home LATEST NEWS ताजी बातमी झोहरान ममदानींच्या पत्नीवर नेतन्याहूंनी केली अशी टीका; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात उल्लेख

झोहरान ममदानींच्या पत्नीवर नेतन्याहूंनी केली अशी टीका; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात उल्लेख

3
0

Source :- BBC INDIA NEWS

इस्रायल

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी (24 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. शिवाय नेतन्याहू यांनी यावेळी ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांच्यावरही टीका केली.

महापौर ममदानी हे ज्यू विरोधी असल्याचा आरोप नेतन्याहू यांनी केला. इस्रायलवर टीका करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे न्यूयॉर्कमधील ज्यू समुदायाची सुरक्षा धोक्यात आली आहे, असं नेतन्याहू म्हणाले.

“ममदानी यांनी महापौरपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून अनेक ज्यू नागरिक आता स्वतःला न्यूयॉर्कमध्ये सुरक्षित समजत नाहीत”, असं त्यांनी म्हटलं.

न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम महापौर असलेले ममदानी हे पॅलेस्टिनींबाबत इस्रायलच्या धोरणावर दीर्घ काळापासून टीका करत आहेत. त्यांनी नेतन्याहू यांना ‘युद्ध गुन्हेगार’ असंही म्हटलं आहे.

नेतन्याहू हे ममदानी यांच्यावर वैचारिक मतभेदांमुळं सातत्यानं टीका करत आले आहेत. गुरुवारच्या भाषणातही त्यांनी ममदानी यांच्याबद्दल यापूर्वी केलेल्या अनेक आरोपांची पुनरावृत्ती केली.

इस्रायलबाबत ममदानी यांच्या भूमिकेमुळे ते नेतन्याहू यांच्यासाठी महत्त्वाचे राजकीय विरोधक बनले आहेत.

नेतन्याहू सध्या पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी प्रचार करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील नेतन्याहू यांच्या भाषणापूर्वी दोन्ही नेत्यांमधील तणाव आणखी वाढला होता.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

ममदानी यांनी एका मुलाखतीत नेतन्याहू यांना पुन्हा एकदा ‘युद्धगुन्हेगार’ म्हटलं आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर नेतन्याहू यांनीही ममदानी यांच्यावर टीका करणारा एक व्हीडिओ जारी केला.

गुरुवारी सुमारे 37 मिनिटांच्या आपल्या भाषणात नेतन्याहूंनी काही मिनिटं खास ममदानी यांच्या एका आरोपावर भाष्य केलं. ममदानी यांनी गाझामधील इस्रायलची लष्करी कारवाई म्हणजे नरसंहार असल्याचं म्हटलं होतं.

रमा दुवाजींना लक्ष्य केलं

संयुक्त राष्ट्रांच्या एका आयोगासह आंतरराष्ट्रीय आणि इस्रायली मानवाधिकार संघटनांनी गाझातील युद्धादरम्यान इस्रायलने नरसंहार केल्याचा निष्कर्ष काढला आहे.

हे युद्ध 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालं होतं.

नेतन्याहू यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गुरुवारच्या आपल्या भाषणात ते म्हणाले, “इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करणे, हा या शतकातील सर्वात मोठा खोटारेडापणा आहे.”

नेतन्याहूंनी ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांचाही उल्लेख केला. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर लगेचच पॅलेस्टाइनच्या समर्थनातील काही सोशल मीडिया पोस्ट त्यांनी लाईक केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

नेतन्याहू यांनी ममदानी यांच्या पत्नीचा उल्लेख करत यूएन महासभेत म्हटलं, “तुमच्या पत्नीने 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचं समर्थन करणारी एक पोस्ट लाईक केली होती. त्यांनी आणखी एक पोस्टही लाईक केली होती, ज्यात तेल अवीवचं अस्तित्व नसावं, असं म्हटलं होतं. तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करण्यास नकार देता.”

कोट कार्ड

ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी या सीरियन वंशाच्या चित्रकार (इलस्ट्रेटर) आणि ॲनिमेटर आहेत. त्या न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिनमध्ये राहतात.

त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर न्यूयॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.

ममदानी आणि रमा यांचं लग्न गेल्या वर्षीच झालं. त्याआधी 2024 मध्ये दोघांनी दुबईत साखरपुडा केला होता आणि नंतर पारंपरिक पद्धतीने निकाह केला.

नेतन्याहूंच्या वक्तव्याला उत्तर देताना ममदानी यांनी त्यांच्यावर संयुक्त राष्ट्रातील भाषणाचा वापर ‘पॅलेस्टिनींच्या नरसंहाराचं समर्थन करण्यासाठी खोटे आणि निराधार दावे पुन्हा मांडण्यासाठी’ केल्याचा आरोप केला.

महापौरांनी एका निवेदनात म्हटलं, “कितीही खोटे दावे केले तरी हे सत्य बदलत नाही की, त्यांच्याविरोधात अजूनही आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे अटक वॉरंट आहे. त्यांच्यावर युद्धगुन्हे आणि मानवतेविरोधातील गुन्ह्यांचे आरोप आहेत.”

ममदानी हे नेतन्याहू यांच्या भाषणावेळी तिथे उपस्थित नव्हते. त्यावेळी ते नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत ‘एलजीबीटीक्यू+ तरुणांशी चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होणार होते.

झोहरान ममदानी आणि पत्नी रमा दुवाजी

भाषण सुरू होण्याच्या काही वेळ आधी ममदानी यांनी सोशल मीडियावर कोणताही मजकूर नसलेला एक मिनिटाचा व्हीडिओ पोस्ट केला होता

नेतन्याहू आपल्या निवडणूक प्रचारातही ममदानींचा उल्लेख करत आहेत. त्यांच्या लिकुड पक्षाने इस्रायलमध्ये लावलेल्या होर्डिंग्ज आणि प्रचार पोस्टरवर ममदानी यांचा फोटो इराण, तुर्की आणि हिजबुल्लाहच्या नेत्यांच्या फोटोंसोबत लावला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नेतन्याहू यांनी एआयच्या मदतीने तयार केलेला एक निवडणूक प्रचाराचा व्हीडिओ पोस्ट केला होता.

या व्हीडिओमध्ये नेतन्याहू निवडणुकीत हरू शकतात, याचा झोहरान ममदानी, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, इराणचे अयातुल्लाह मोज्तबा खामेनेई आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत आनंद साजरा करताना दाखवले होते.

ममदानींविरोधात नेतन्याहू यांची आक्रमक भूमिका

2024 मध्ये नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्राचं वर्णन ‘अंधाराचं घर’ आणि ‘ज्यू-विरोधी विचारांनी भरलेलं दलदल’ असं केलं होतं. संयुक्त राष्ट्रात जाण्यापूर्वीच नेतन्याहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यासोबतचा वाद आणखी वाढवला होता.

ममदानी यांनी जुलैमध्ये म्हटलं होतं की, नेतन्याहू यांना अटक करता येईल का, याचा न्यूयॉर्क शहरातील वकील अभ्यास करत आहेत.

2024 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. या वॉरंटमध्ये गाझामध्ये युद्धगुन्हे केल्याचे आरोप आहेत. इस्रायलसोबतच्या संघर्षात गाझामध्ये हजारो पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

नेतन्याहू आणि इस्रायल सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी अटक वॉरंटच्या कायदेशीर वैधतेलाही आव्हान दिलं आहे.

ममदानी यांनीही मान्य केलं आहे की, स्थानिक अधिकारी हे अटक वॉरंट लागू करू शकत नाहीत. परंतु, या वादामुळे नेतन्याहू यांना निवडणूक प्रचारात ममदानींवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.

न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी एका व्हीडिओमध्ये ममदानींचा उल्लेख करत नेतन्याहू म्हणाले होते, “मी संयुक्त राष्ट्रात जात आहे. मी आमच्या शूर सैनिकांबद्दलचं सत्य सांगेन आणि तुमच्याबद्दलही सत्य सांगेन.”

ममदानी यांनी मंगळवारी पलटवार करत नेतन्याहू यांच्यावर पॅलेस्टिनींविरोधातील भीषण नरसंहार घडवून आणल्याचा आरोप केला.

जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रात केलेल्या भाषणात प्रामुख्याने इस्रायलवर टीका केली.

बेंजामिन नेतन्याहू

नेतन्याहू यांना यावेळी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. सध्याच्या जनमत चाचण्यांनुसार, 27 ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर त्यांच्या आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळताना दिसत नाही.

इस्रायली जनता नेतन्याहू यांच्या नेतृत्वाबाबत विभागलेली आहे. जूनमध्ये इस्रायल डेमोक्रसी इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के इस्रायली लोकांनी नेतन्याहू यांनी पुन्हा निवडणूक लढवू नये, असं म्हटलं होतं.

नेतन्याहू 1990च्या दशकापासून अनेक वेळा इस्रायलचे पंतप्रधान झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 19 वर्षे पंतप्रधानपद सांभाळलेलं आहे.

त्यांच्या लष्करी कारवायांना अनेक इस्रायली लोकांचा पाठिंबा आहे. परंतु, त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे की, 7 ऑक्टोबरचा हल्ला रोखण्यात नेतन्याहू अपयशी ठरले. अमेरिकेसोबतचे इस्रायलचे संबंध आणि इतर प्रमुख देशांसोबतचे संबंधही त्यांनी कमकुवत केल्याचा त्यांचा दावा आहे.

ट्रम्प प्रशासनाने या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलसाठी 2.8 अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्र पॅकेजचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, इराणसोबतचं युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांदरम्यान गेल्या काही महिन्यांत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यातील मतभेद अनेकदा उघडपणे समोर आले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC