Home LATEST NEWS ताजी बातमी ‘सुपर एल निनो’मुळे 6 महिन्यांत 4.50 लाख मृत्यूंचा इशारा; भारताला एवढा आहे...

‘सुपर एल निनो’मुळे 6 महिन्यांत 4.50 लाख मृत्यूंचा इशारा; भारताला एवढा आहे धोका

3
0

Source :- BBC INDIA NEWS

नळ

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

एल निनोच्या परिणामामुळे यावेळी भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, यंदाच्या ‘सुपर एल निनो’मुळे जगभरात निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे पुढील वर्षापर्यंत सुमारे 4.50 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

जागतिक संशोधन संस्था क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार, एल निनोमुळे दुष्काळ, काही भागांमध्ये पूर आणि जंगलातील आगींच्या घटनांमध्ये वाढ होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता आहे.

सध्या एल निनोमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. युरोपसह अनेक भागांमध्ये यंदा उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, शास्त्रज्ञ तिला ‘गॉडझिला लेव्हल’ अशी उपमा देत आहेत.

अहवालात काय म्हटलं आहे?

क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार, जून 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत उष्णतेमुळे होणाऱ्या नेहमीच्या मृत्यूंपेक्षा 4.51 लाख अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे.

1996 ते 2025 या कालावधीत एल निनोमुळे झालेल्या सरासरी मृत्यूंच्या तुलनेत सुपर एल निनोच्या काळात मृत्यूंचा आकडा अधिक वाढू शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

अहवालात असंही म्हटलं आहे की, वर्षभरात अत्यंत उष्ण दिवसांची संख्या 44 टक्क्यांनी वाढू शकते.

हवामान

अहवालानुसार, एल निनो म्हणजे भविष्यातून आलेलं पोस्टकार्ड आहे. याचा अर्थ पुढील काही दशकांत जास्त तापमान ही अपवादात्मक नव्हे, तर सामान्य बाब होऊ शकते.

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, सुपर एल निनोच्या परिणामामुळे येत्या काही महिन्यांत जगभरातील जमिनीच्या तापमानात 1.2 अंश सेल्सियसपर्यंत वाढ होऊ शकते. सुपर एल निनोची सुरुवात जून महिन्यापासून झाली असून त्यामुळंच असामान्य उष्णता निर्माण झाली आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी माणसाला पुरेसा वेळ मिळण्याआधीच तापमानात मोठी वाढ होऊ शकते.

अहवालात भारताविषयी काय म्हटलं आहे?

प्रचंड वाढलेल्या तापमानाचा त्रास सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार, उष्णतेमुळं सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा चौथा क्रमांक लागतो.

या यादीत भारताच्या पुढं नायजेरिया, इंडोनेशिया आणि सुदान यांचा समावेश आहे.

याशिवाय ब्राझील, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, नायजर, चाड, फिलिपिन्स आणि दक्षिण सुदानमध्येही उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त असेल अशी शक्यता आहे.

सुदान

सुपर एल निनोमुळं फेब्रुवारी 2027 अखेरपर्यंत भारतात सुमारे 15,800 मृत्यू होण्याचा अंदाज आहे. यानुसार 1600 ने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

नायजेरिया, सुदान, नायजर आणि चाडमधील एकूण मृतांचा आकडा 66,800 असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यात 2700 ने वाढ होण्याची शक्यता आहे.

या अहवालानुसार, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका जगाच्या दक्षिणेकडील देशांना बसेल. म्हणजे उप-सहारा आफ्रिकेतील देशांमध्ये सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सामान्य वर्षाच्या तुलनेत 66,800 अधिक मृत्यू होऊ शकतात.

यापैकी निम्मे मृत्यू (31,400) एकट्या नायजेरियामध्येच नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

सुदानमध्ये सामान्यपेक्षा 17,500 नायजरमध्ये 10,000 आणि चाडमध्ये 8,000 अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे.

हे मृत्यू कसे टाळता येतील?

कांदा

सुपर एल निनोच्या परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आपत्कालीन निधीचा योग्य वापर करावा लागेल असं अहवालात म्हटलं आहे.

राष्ट्रीय, राज्य आणि शहरांतील सरकार आणि प्रशासनांना प्रभावी उपाययोजनांवर काम करावं लागेल.

त्यात आरोग्यविषयक सूचना देणे, दुर्बल घटकांना आरोग्य सुविधा पुरवणे, शीतकरण केंद्रं आणि पाणीपुरवठा केंद्रं उभारणे आणि कामगारांचं संरक्षण करणं यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

लोकांसाठी पाण्याच्या सुविधा वाढवणे, तापमानाबाबत लवकर आणि अचूक सूचना देणे इत्यादी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

सुपर एल निनो म्हणजे काय?

सुपर एल निनो म्हणजे काय, जे जाणून घेण्याआधी एल-निनो म्हणजे काय ते पाहायला हवं.

एल-निनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे.

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं.

प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं.

त्यात समुद्राच्या पाण्याच्या तापमानात आणखी वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते, या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात.

प्रातिनिधिक फोटो

एल निनो आणि भारतातील दुष्काळ

प्रशांत महासागर हा जगातील सर्वांत मोठा महासागर असल्यामुळे त्यात घडणाऱ्या गोष्टी जसं की, वाऱ्यांचा जोर, त्यांच्या दिशा आणि कमी-अधिक होणारे तापमान यांचा परिणाम सगळ्या जगातील हवामानावर होतो.

ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे, त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एल निनो आणि भारतीय मान्सूनचा परस्पर संबंध आहे. 1871 नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी 6 दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत. ज्यात अलीकडील 2002 आणि 2009 मधील दुष्काळांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सर्वच एल निनो वर्षांमुळे भारतात दुष्काळ पडलेला नाही. उदाहरणार्थ 1997-98 या वर्षी एल निनो प्रचंड सक्रिय होता, पण त्यावेळी दुष्काळ पडला नव्हता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC