Home LATEST NEWS ताजी बातमी पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, 10 प्रश्नांच्या उत्तरातून जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, 10 प्रश्नांच्या उत्तरातून जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

4
0

Source :- BBC INDIA NEWS

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, पण हे कसं शक्य आहे?

दिल्लीतील एका 26 वर्षीय तरुणानं लग्नाला दोन वर्षे होऊनही मूल होत नसल्यानं डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळून आलं की, त्याच्या शरीरात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स देखील आहेत.

मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, त्याचं शरीर बाहेरून एका सामान्य पुरुषासारखं दिसत होतं आणि त्याच्यात पुरुषांसारखी शारीरिक वैशिष्ट्यं देखील होती.

शिवाय, त्याची शारीरिक रचना इतरांहून वेगळी आहे, हे दर्शवणारी कोणतीही स्पष्ट लक्षणं वरकरणी तरी त्याच्यात नव्हती.

दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात रुग्णावर उपचार करणारे मुख्य मूत्ररोगतज्ञ डॉ. सुशील खरबंदा यांच्या मते, वंध्यत्व तपासणीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स देखील असल्याचं दिसून आलं.

डॉक्टरांच्या मते, हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्याला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम (PMDS) म्हणतात आणि तो जन्मजात असतो.

आतापर्यंत जगभरात याची फारच कमी म्हणजेच 300 पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

नेचर रिव्ह्यूज युरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, पीएमडीएस असलेल्या व्यक्तीमध्ये 46XY गुणसूत्र असतात आणि शरीराचा विकास सामान्यपणे पुरुषाप्रमाणे होतो. मात्र, मुलेरियन डक्टपासून विकसित होणारे अवयव, जसे की गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब हे शरीरातच राहतात.

जानेवारी 2026 मध्ये ‘ग्लोबल जर्नल ऑफ सर्जरी अँड केस रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, एका 48 वर्षीय पुरुषाला वारंवार लघवी होणं आणि वीर्यामध्ये रक्त येणं याचं निदान झालं आणि सीटी स्कॅनमध्ये गर्भाशयासारखी रचना आढळून आली.

शस्त्रक्रियेदरम्यान, प्रोस्टेटला जोडलेली ही दोन भागांची रचना काढून टाकण्यात आली. हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीमध्ये ते गर्भाशयाचं ऊतक (टिश्यू) असल्याचं स्पष्ट झालं. या रुग्णाचा शारीरिक विकास पुरुषाप्रमाणेच सर्वसाधारण होता.

त्याचप्रमाणे, 2019 च्या एका रिपोर्टमध्ये दीड वर्षाच्या बाळाच्या शरीरात गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशय यांसारख्या रचना सापडल्याचा उल्लेख आहे.

पुरुषांसारखी शारीरिक वैशिष्ट्यं असलेल्या व्यक्तीला गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स कशा असू शकतात? ही स्थिती का उद्भवते आणि तिचं निदान कसं केलं जातं? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, आम्ही रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, डॉ. सुशील खरबंदा यांच्याशी संवाद साधला.

  • प्रश्न: या प्रकरणात काय आढळलं आणि तुम्ही वैद्यकीय परिभाषेत त्यामागचं स्पष्टीकरण कसं द्याल?

उत्तर: एका 26 वर्षीय पुरुषाचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं. तो पूर्णपणे लैंगिकदृष्ट्या सक्रिय होता आणि पुरुषांमध्ये विकसित होणारी सगळी सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर त्याच्यामध्ये होती.

वंध्यत्वाच्या समस्येच्या तपासणीदरम्यान असं आढळून आलं की, त्याचे दोन्ही वृषण त्यांच्या नेहमीच्या जागी नव्हते.

हार्मोन चाचण्यांमध्ये टेस्टोस्टेरॉन, एफएसएच (फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन) आणि एलएच (ल्युटेनायझिंग हार्मोन) यांची पातळी सामान्य असल्याचं दिसून आलं.

क्रिप्टोरकिडिझम किंवा अनडिसेन्डेड टेस्टीस (अंडकोष खाली न उतरलेल्या) रुग्णांमध्येही असेच परिणाम आढळू शकतात.

पण एमआरआय दरम्यान एक अतिशय असामान्य स्थिती उघडकीस आली. तपासणीदरम्यान असं दिसून आलं की, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स वृषणांना जोडलेले होते.

हे अवयव आतून पूर्णपणे विकसित झाले होते, जसे ते सामान्यतः स्त्रीच्या शरीरात आढळतात.

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, पण हे कसं शक्य आहे?

  • प्रश्न: पुरुषाच्या शरीरात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स कशा असू शकतात? ही जन्मजात स्थिती असू शकते का?

उत्तर: जेव्हा बाळ गर्भात असतं, तेव्हा त्याचं लिंग गुणसूत्र आणि संप्रेरकांच्या प्रभावानं निश्चित होतं. पुरुषांमध्ये सामान्यतः 46XY गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये 46XX गुणसूत्र असतात.

या काळात, शरीर अँटी-म्युलरियन हार्मोन (AMH) तयार करतं, जे पुरुषांच्या शरीरात नैसर्गिकरित्या विकसित न होणाऱ्या अंतर्गत प्रजनन अवयवांच्या विकासास प्रतिबंध करतं.

जर एखाद्या व्यक्तीमध्ये 46XY गुणसूत्र असतील तर त्यांची वाढ पुरुष म्हणून होते. त्याचं शरीर अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) तयार करतं.

हे अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्ससारख्या अवयवांच्या विकासात अडथळा आणतं.

परंतु, पीएमडीएसमध्ये, हे हार्मोन एकतर अनुपस्थित असतं किंवा त्याचे रिसेप्टर खराब झालेले असतात. यामुळे, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्ससारख्या रचना शरीराच्या आतच राहतात.

यामुळे, त्यांच्या अंतर्गत अवयवांची रचना वेगळी असते. असं असूनही, शरीराची बाह्य रचना पुरुषासारखीच राहते. शिश्न आणि पुरुषाची इतर शारीरिक वैशिष्ट्यं सामान्यपणे विकसित होतात.

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, पण हे कसं शक्य आहे?

  • प्रश्न: या रुग्णामध्ये वृषणांसोबत अंडाशय (ओव्हरी) देखील होते का?

उत्तर: या रुग्णामध्ये दोन्ही बाजूंना गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स होत्या, परंतु अंडाशय नव्हतं.

अंडाशयांऐवजी त्याला वृषण होतं. या जननग्रंथी आहेत, ज्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये भिन्न असतात. रुग्णाचे दोन्ही जननग्रंथी खरंतर वृषण होत्या, अंडाशय नव्हत्या.

  • प्रश्न: ही स्थिती आधीच्या स्कॅन किंवा वैद्यकीय चाचण्यांमध्ये ओळखता आली नसती का?

उत्तर: जेव्हा रुग्ण आमच्याकडे आला, तेव्हा त्याचे दोन्ही टेस्टीकल्स अनडिसेंडेड (वृषण खाली उतरलेले नव्हते) होते, म्हणजेच ते त्यांच्या योग्य जागी नव्हते. त्यामुळे, हार्मोन टेस्टसोबतच, त्याच्या वीर्याच्या मापदंडांचेही मूल्यांकन करण्यात आले. वीर्यामध्ये अझोस्पर्मिया, म्हणजेच शुक्राणूंची संख्या शून्य असल्याचं आढळलं.

त्यानंतर एमआरआय करण्यात आला. त्यामध्ये गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब्स आणि त्यांना जोडलेले वृषण दिसून आले.

त्यानंतर गुणसूत्र विश्लेषण करण्यात आलं. त्यामध्ये 46XY गुणसूत्र असल्याचं दिसून आलं. या स्थितीची पुष्टी करण्यासाठी एमआरआय आणि क्रोमोसोमल ऍनालिसीस या मुख्य चाचण्या वापरण्यात आल्या.

वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत ही स्थिती सहसा लक्षात येत नाही, असं काही नाही. जर वेळेवर स्कॅन करण्यात आलं असतं, तर ही गोष्ट लवकर लक्षात आली असती.

या रुग्णानं सुरुवातीला या गोष्टीकडं लक्ष दिलेलं नव्हतं की, त्याचे दोन्ही वृषण त्यांच्या नेहमीच्या जागी नाहीयेत.

  • प्रश्न: या आजाराची काही विशिष्ट लक्षणं आहेत का?

उत्तर: या स्थितीमध्ये सहसा वेदना, उलट्या किंवा ताप यांसारखी कोणतीही विशिष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. वृषण त्यांच्या नेहमीच्या जागी नसणं हे एक लक्षण असू शकतं.

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, पण हे कसं शक्य आहे?

  • प्रश्न: रुग्णाला कोणत्या मानसिक आव्हानांना किंवा जीवनातील बदलांना सामोरं जावं लागू शकतं?

उत्तर: आपल्या शरीरात स्त्री जननेंद्रियं असल्याचं अचानक लक्षात आल्यानंतर हा 26 वर्षीय तरुण चिंतेत आणि तणावात होता. त्याला त्याच्या भविष्याचीही काळजी वाटत होती.

आम्ही बराच वेळ त्याचं समुपदेशन केलं आणि ही एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे, हे समजावून सांगितलं. ही गोष्ट निश्चितच दुर्मिळ असली तरी, त्यामुळे त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होईल, असं काही नाही.

हे अवयव काढून टाकणं आवश्यक होतं कारण त्या स्थितीमध्ये कर्करोग होण्याची शक्यता होती. आता, ते काढून टाकल्यानंतर, तो सामान्य जीवन जगू शकतो.

  • प्रश्न: अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया किंवा उपचार नेहमीच आवश्यक असतात का?

उत्तर: या रुग्णाच्या बाबतीत शस्त्रक्रिया आवश्यक होती. गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स अविकसित होत्या आणि शरीरात त्यांचं कोणतंही कार्य नव्हतं.

शस्त्रक्रियेनंतर केलेल्या बायोप्सीमध्ये एका वृषणात कर्करोगपूर्व स्थिती असल्याचंही उघड झालं. त्यामुळे, हे अवयव काढून टाकणं आवश्यक होतं आणि शस्त्रक्रिया हा उपचाराचा एक भाग होता.

  • प्रश्न: शस्त्रक्रियेचा रुग्णाच्या आरोग्यावर काय परिणाम झाला आणि भविष्यात काय परिणाम होईल?

उत्तर: रुग्ण शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांनी कामावर परतला.

वृषण टेस्टोस्टेरॉन तयार करत असल्यामुळे, ते काढून टाकल्यानंतर त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन तयार होणार नाही. त्यामुळे, त्याला दर तीन महिन्यांनी टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन घ्यावं लागेल.

याव्यतिरिक्त, त्याच्या लैंगिक किंवा सामाजिक जीवनात कोणतेही मोठे बदल करण्याची गरज भासणार नाही.

आम्ही लॅपरोस्कोपिक पद्धतीनं, म्हणजेच दुर्बिणीच्या साहाय्यानं शस्त्रक्रिया केली. यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टळली आणि त्याला लवकर कामावर परतणं शक्य झालं.

पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, पण हे कसं शक्य आहे?

  • प्रश्न: अशा बाबींबद्दल लोकांमध्ये कोणते सामान्य गैरसमज आहेत?

उत्तर: या प्रकरणानंतर, हा पुरूष गर्भवती असू शकला असता का, त्याला मासिक पाळी येत होती का किंवा तो बाहेरून स्त्रीसारखा वावरत होता का, असेही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापैकी कोणतीही गोष्ट खरी नाहीये. त्याला गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब्स होत्या, पण त्या अविकसित होत्या आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा होणं अशक्य होतं.

त्याच्या शरीरात स्त्रियांप्रमाणे हार्मोनल स्थितीसुद्धा नव्हती.

  • प्रश्न: या प्रकरणातून वैद्यकीय क्षेत्राला मिळणारा सर्वात महत्त्वाचा धडा कोणता आहे?

उत्तर: या प्रकरणातून आपल्याला हा धडा मिळतो की, शरीरातील कोणत्याही असामान्य बदलाकडे दुर्लक्ष करू नये किंवा त्याबद्दल लाज बाळगू नये.

अशा परिस्थितीत, योग्य डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. जर नवजात बाळाच्या शरीरात कोणतीही असामान्य रचना आढळली किंवा एखादा अवयव नसेल, तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा, कारण लवकर निदान झाल्यास परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC