Home LATEST NEWS ताजी बातमी कोल्ह्याचं मांस आणि तक्षक पाल खाल्ल्याने आजार बरे होण्याचं हे आहे सत्य;...

कोल्ह्याचं मांस आणि तक्षक पाल खाल्ल्याने आजार बरे होण्याचं हे आहे सत्य; दमा ते लैंगिक समस्यांवरही उपचाराचे दावे

4
0

Source :- BBC INDIA NEWS

दम्यापासून लैंगिक समस्यांपर्यंत: कोल्ह्याचं मांस आणि तक्षक सरडा उपाय देतील का?

‘कोल्ह्याचं मांस खाल्ल्यानं संधिवात बरा होतो’, ‘तक्षक पाल (बांगला भाषेत मोठ्या झाडावरच्या पालीला तक्षक पाल म्हणतात. इंग्रजीत तिला टोके गेको असं म्हणतात) दम्यापासून लैंगिक समस्यांपर्यंतच्या विविध समस्यांवर उपाय ठरू शकते’, ‘जळूच्या तेलानं वेदना व विविध आजार बरे होतात’, अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा बांगलादेशच्या अनेक भागांमध्ये फार पूर्वीपासून प्रचलित आहेत.

एकेकाळी बांगलादेशच्या विविध भागांमध्ये हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळत होते. पारंपरिक औषधं बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून हे प्राणी वापरले जात.

त्यामुळे त्यांच्या असण्याबद्दल आणि उपयोगाबद्दल अनेक समजुती होत्या. परिणामी, चीन, तैवान आणि व्हिएतनामसह विविध पूर्व आशियाई देशांमध्ये त्यांची तस्करी केली जात असे.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, या सगळ्याचा परिणाम म्हणून या प्राण्यांची संख्या आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

दुसरीकडे, जळूच्या तेलासारखी उत्पादनं अजूनही अनेक भागांमध्ये विकली जात आहेत.

विक्रेत्यांचा असा दावा आहे की, हे तेल संधिवात, सांधेदुखी आणि पाठदुखी यांसारखे विविध आजार बरे करू शकतं.

त्याचप्रमाणे, विविध प्रदेशांमध्ये कोल्ह्याच्या मांसाविषयीच्या लोकसमजुतीही प्रचलित आहेत.

पण या समजुतींमागे वैज्ञानिक आधार काय आहे? हे प्राणी किंवा त्यांच्या शरीरापासून बनवलेली उत्पादनं खरोखरच मानवी आजार बरे करू शकतात का?

कोल्ह्यांना मारण्याची कारणं काय आहेत?

बंगाली कोल्हा असो वा साधा कोल्हा, बांगलादेशात कोल्ह्यांच्या हत्येच्या घटना वारंवार घडतात.

यामागे अनेक कारणं आहेत. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की कोल्हा हा दुष्ट, धूर्त आणि धोकादायक प्राणी आहे.

ग्रामीण भागात कोल्ह्यांकडून कोंबड्या आणि पाळीव जनावरं मारली जातात, अशा तक्रारी वारंवार येतात. त्यामुळेच कोल्हा दिसल्यावर लोक त्याला मारहाण करतात किंवा ठार मारतात.

जहांगीरनगर विद्यापीठातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद अब्दुल अझीझ बीबीसी बंगालीशी बोलताना म्हणाले की, कोल्ह्यांविषयी लोकांमध्ये विविध गैरसमज आहेत.

त्यांच्या मते, “शेतकऱ्यांना वाटतं की कोल्हा त्यांच्या कोंबड्या खातो. पण आमच्या संशोधनात याबाबतचा कोणताही पुरावा आढळला नाही. कोल्हा क्वचितच असं करतो.”

ते म्हणाले की, कोल्हा हा नैसर्गिकरित्या मोठा असतो आणि तुलनेनं मोठी शिकार तो पकडू शकतो. म्हणूनच त्याच्यावर इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचा आरोप केला जातो.

याव्यतिरिक्त, बांगलादेशच्या अनेक भागांमध्ये रात्री कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज अजूनही अशुभ मानला जातो. अर्थात, यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पण तिथल्या लोकांमध्ये ही अंधश्रद्धा पसरलेली आहे.

बंगाली कोल्हा असो वा साधा कोल्हा, बांगलादेशात कोल्ह्यांच्या हत्येच्या घटना वारंवार घडतात.

कोल्ह्यांना मारण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे कोल्ह्याच्या मांसातील औषधी गुणधर्मांबद्दल विविध लोकमान्यता आहेत.

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की कोल्ह्याचं मांस खाल्ल्यानं दमा, संधिवात किंवा इतर जुनाट आजार बरे होऊ शकतात. या दाव्यांना पाठिंबा देणारा कोणताही विश्वसनीय वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

अलीकडेच, पॅरिसल परिसरात सात कोल्ह्यांना मारहाण करून ठार करण्यात आलं.

कोल्ह्याचं मांस खाल्ल्यानं अनेक आजार बरे होतात यासह इतर कारणांसाठी कोल्ह्यांना मारण्यात आलं होतं.

याला दुजोरा देताना स्थानिक रहिवाशांनी विविध माध्यमांना सांगितलं की, काही लोक रात्री कोल्ह्याचं मांस शिजवून खातात.

अशा घटना वेळोवेळी दिसून येतात. मात्र, जहांगीरनगर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि वन्यजीव तज्ञ डॉ. मोनिरुल एच खान म्हणाले की, “कोल्ह्याच्या मांसात कोणतेही औषधी गुणधर्म नसतात. ते खाल्ल्यानं आजार बरे होतात हा एक चुकीचा समज आहे.”

कोल्ह्याचं मांस खाल्ल्यानं आजार बरे होतात, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असं ढाका विद्यापीठाच्या क्लिनिकल फार्मसी आणि फार्माकोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. मोहम्मद अब्दुल मुहीददेखील म्हणतात.

ते पुढे म्हणाले की, “अशी माहिती वैद्यकीय इतिहासात किंवा आधुनिक औषधशास्त्रात कुठेही उपलब्ध नाही. ती प्रामुख्यानं अंधश्रद्धा असून लोकमान्यतांमधून ती लोकांमध्ये दिसून येते.”

बांगलादेशातील हमदर्द बांगलादेश विद्यापीठाच्या आयुर्वेदिक औषध विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मोहम्मद मोनीर अहमद म्हणाले की, त्यांच्याकडे कोल्ह्याच्या मांसातील औषधी गुणधर्मांविषयी कोणतीही वैज्ञानिक माहिती नाही.

तक्षक पालीची किंमत खरंच जास्त आहे?

अशा तक्षक पालींची कोट्यवधी टाका (बांगलादेशचे चलन) किमतींत विक्री केल्याची विविध फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत.

कर्करोगासह असाध्य आजार बरे करण्यासाठी किंवा लैंगिक क्षमता वाढवण्यासारखी अनेक औषधी वैशिष्ट्ये तक्षक पालीमध्ये असल्याचा दावा करून तिची किंमत अनेक कोटी टाका असल्याचं सांगण्यात आलं.

खरेदीदारांकडून त्यासाठी अॅडव्हान्स पैसे घेतल्याच्या घटनाही घडल्या. मात्र, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा वैध बाजारभावाची माहिती उपलब्ध नाही.

उलट, अशा अफवांमुळं फसवणूक आणि पैसे उकळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

दीर्घकाळापासून, विशेषतः औषधं तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून याचा वापर केला जातो. या समजुतीवरून या प्राण्यांची चीन, तैवान आणि व्हिएतनामसह पूर्व आशियातील विविध देशांमध्ये तस्करी केली जात आहे.

दम्यापासून लैंगिक समस्यांपर्यंत: कोल्ह्याचं मांस आणि तक्षक सरडा उपाय देतील का?

परिणामी, एकेकाळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या प्राण्यांची संख्या आता कमी झाली आहे.

दशकभरापूर्वी बीबीसी बंगालीच्या एका रिपोर्टनुसार, तत्कालिन सरकारी अधिकाऱ्यांनी तक्षक नावाच्या या वन्य प्राण्याच्या आठ प्रजाती असल्याचं सांगितलं होतं. बांगलादेशात अद्याप हा प्राणी नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं नसलं तरी त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

पण परदेशातील वाढत्या मागणीमुळं ज्या वेगाने त्यांची शिकार होत आहे, त्यानुसार लवकरच ते नामशेष होऊ शकतात असंही त्यात म्हटलं होतं.

याबाबत डॉ. मोनिरुल एच. खान म्हणाले की, “तक्षकबाबतच्या या अफवेनं एक दुष्टचक्र निर्माण केलं आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. पूर्वी लोक मोठ्या प्रमाणात तक्षक पाली पकडत होते, पण आता ते कमी झालं आहे. कारण फसवणूक होत असल्याचं लोकांना आता समजू लागलं आहे.”

याबाबत डॉक्टर मोहम्मद अब्दुल मुहीत म्हणाले की, “एखादी तक्षक पाल कुठेतरी असू शकते. त्यामुळंच तिची किंमत जाणीवपूर्वक वाढवली गेली असावी.”

उपचारासाठी जळू कसे वापरतात?

कोल्ह्याचं मांस आणि जळू यांत औषधी गुणधर्म असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण, जळूंचा वापर करून उपचार करण्याचा उल्लेख भारतीय उपखंडातील प्राचीन युनानी ग्रंथांमध्ये आढळतो. हे ग्रंथ हजारो वर्षे जुने असल्याचं मानलं जात.

जिवंत जळूंचा वापर करून शरीरातील दूषित रक्त किंवा द्रव काढून टाकण्याच्या पद्धतीचा उल्लेख युनानी वैद्यक पद्धतीत आहे.

याबाबत डॉक्टर मोहम्मद मोनीर अहमद म्हणाले की, “शरीराच्या एखाद्या भागात जसे की सांध्यामध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यास शरीरातून ते रक्त काढण्यासाठी आम्ही जळू उपचाराचा वापर करतो.”

मात्र, या उपचारासाठी विशिष्ट प्रकारचे जळू आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

दम्यापासून लैंगिक समस्यांपर्यंत: कोल्ह्याचं मांस आणि तक्षक सरडा उपाय देतील का?

“औषधी गुणधर्म असलेल्या जळूच अशाप्रकारे रक्त शोषून घेतात. सगळ्या प्रकारचे जळू ते करत नाहीत. सामान्य जळू विषारी असतात, त्यामुळं आम्ही त्यांचा वापर करत नाही. त्यांना पाळलं जातं. ते प्रामुख्यानं भारतातून आणले जातात. आता अनेक लोक देशातही त्यांचं पालन करतात.”

“एकदा वापरेला जळू निर्जंतूक केल्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा वापरता येतो. एकदा वापरल्यानंतर त्याला हळदीच्या पाण्यात भिजवल्यास तो उलटी करतो. त्यानंतर स्वच्छ होतो आणि तीन महिन्यांनंतर पुन्हा वापर करता येतो,” असं त्यांनी पुढं सांगितलं.

शरीरातील विविध प्रकारच्या वेदना कमी करण्याशिवाय, मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या जखमा आणि मुरुमांसाठीही जळू उपचाराला वापर करता येतात, असं त्यांनी सांगितलं.

मात्र, सांधेदुखीच्या वेदना आणि लैंगिक समस्यांसह विविध आजारांवर जळूच्या तेलानं उपचार करता येतात, असे दावे दीर्घकाळापासून केले जात आहेत. पण त्याच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

“जळूचं बनावट तेल वैद्यांकडून विकलं जातं. पण अशा तेलाला कोणतेही औषधी गुणधर्म नाहीत,” असं डॉक्टर मोहम्मद अब्दुल मुहीत म्हणाले.

आरोग्यासाठी किती धोकादायक? कायदा काय सांगतो?

आधुनिक वैद्यकीय उपचारांचा प्रसार झाल्यानंतरही बांगलादेशातील विविध शहरांमधील फूटपाथवर आणि ग्रामीण बाजारपेठांत जळूच्या तेलाच्या उपचारांची जाहिरात केली जाताना दिसते.

मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा उपचारांचा प्रचार करून ते देणे कायदेशीर नाही.

दरम्यान, कोल्हे आणि पाली यांच्याबाबत कायद्यात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.

बांगलादेशच्या ‘वन्यजीव संरक्षण कायदा, 2026’ मधील अनुसूची I (B) आणि (C) नुसार, कोल्ह्यांना संरक्षित घोषित करण्यात आलं आहे.

संशोधन किंवा वैज्ञानिक गरजांसाठी अथवा परवाना किंवा मालकी प्रमाणपत्राशिवाय या दोन्ही प्राण्यांची शिकार करणं, त्यांना त्रास देणं, वाहतूक करणं, खरेदी-विक्री करणं, आयात किंवा निर्यात करणं शक्य नाही असं या कायद्यात म्हटलं आहे.

सरकारने तक्षक पालीलाही अनुसूची एकच्या (C) अंतर्गत संरक्षित प्राणी घोषित केलं आहे.

दम्यापासून लैंगिक समस्यांपर्यंत: कोल्ह्याचं मांस आणि तक्षक सरडा उपाय देतील का?

याबाबत वन विभागाच्या वन्यजीव गुन्हे प्रतिबंधक विभागाचे वन्यजीव आणि जैवविविधता संरक्षण अधिकारी रतींद्र कुमार बिस्वास म्हणाले, “कोल्ह्यांबाबत अंधश्रद्धा आहेत. त्याचे तेल शरीराला लावल्यास आजार बरे होतात, असे अनेक जण सांगतात. तक्षक पालीच्या बाबतीत शेजारील देशांशी चर्चा करण्यात आली. त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचं कोणतेही मूल्य नसल्याचं आढळून आले.”

मात्र, कायद्यानुसार हे प्राणी संरक्षित असल्याचं सांगताना त्यांनी म्हटलं की, कायद्याचं उल्लंघन झाल्यास वन विभाग, पोलीस, सीमाशुल्क, नौदल आणि तटरक्षक दल या यंत्रणाही संबंधित वन्यजीव किंवा पुरावे जप्त करून आवश्यक ती कारवाई करतील.

बांगलादेशात यासंदर्भात कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं वन्यजीव तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या बांगलादेश रेड लिस्ट 2015 मध्ये कोल्ह्यांना संरक्षित म्हणून सूचीबद्ध करण्यात आलं आहे.

IUCN बांगलादेशने 2026 मध्ये तक्षक पालीच्या संवर्धन स्थितीचंही मूल्यांकन केलं.

“हा प्राणी अजूनही चिंताजनक यादीत असल्याचं आढळून आले आहे. मात्र, बांगलादेशच्या संदर्भात चिंतेची बाब म्हणजे, त्यांना जंगलातून व्यावसायिक पद्धतीनं गोळा केलं जात आहे,” असं IUCN बांगलादेशचे प्रकल्प व्यवस्थापक सरवार आलम यांनी बीबीसीला सांगितलं.

“कोल्ह्याचे मांस किंवा तक्षक पाली शिजवून न घेता कच्चे खाल्ल्यास, त्यांच्यामध्ये असलेले अज्ञात विषारी पदार्थ मानवी शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात,” असं डॉक्टर मोहम्मद अब्दुल मुहीत म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC