Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI Video Grab
आयआयटी मुंबईमध्ये शिकत असलेल्या साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांकडून एक आंदोलन उभं करण्यात आलं. यातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर साहिलला जातिवाचक शिवीगाळ आणि जाच करण्यात येत होता असा आरोप करत त्याच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी होत आहे.
आयआयटीमध्ये आरक्षित वर्गातून येणाऱ्या मुलांना भेदभावाचा सामना करावा लागतो असा आरोप विद्यार्थी करतात.
तेव्हा या संस्थेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना बीबीसी मराठीने विचारले की त्यांचा याबाबतचा अनुभव काय आहे. तसेच तेथील फॅकल्टीला देखील विचारले की त्यांना जातिभेदाबद्दलचा काय अनुभव आलाय. त्यांच्याशी बोलून बीबीसीने हा रिपोर्ट केला आहे.
बीबीसी मराठीने आयआयटी मुंबईची बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनआस्था हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)
आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भेदभाव होण्याबाबत काय सांगितलं?
आयआयटी मुंबईच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये पीएचडी विद्यार्थी राहिलेला आणि आयआयटी कानपूर येथून मास्टर्स आणि आयआयटी मद्रास येथून रिसर्च स्कॉलर राहिलेल्या प्रणव जीवन यांनी बीबीसी मराठीला आपले अनुभव सांगितले.
प्रणव यांनी 2022 मध्ये आयआयटी मुंबईच्या एससी-एसटी सेलमध्ये टिचींग असिस्टंट म्हणूनही काम केलं आहे.
प्रणव जीवन सांगतात की, “मी स्वत: पाहिलं आहे आणि अनुभव सुद्धा घेतला आहे की आयआयटीमध्ये कशापद्धतीने जातीय भेदभाव केला जातो. विद्यार्थी आणि फॅकल्टी यांच्याकडूनही हा भेदभाव केला जातो. याचं कारण हे आहे की फॅकल्टी कॉम्पोजीशन 90 टक्यांहून अधिक समाजात उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या वर्गातून येतात. एससी, एसटी, ओबीसी फॅकल्टीची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना सहकार्य आणि पाठिंब्यासाठी फॅकल्टीच उपलब्ध नाही.”
बहुजन समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत काय होतं याची अनुभवातून आलेली समज या लोकांकडे नसते. आयआयटीमध्ये बहुतांशकरून आरक्षणविरोधी मानसिकता आहे त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना टोमणे मारले जातात असं प्रणव सांगतात.
“या विद्यार्थ्यांना तुम्ही हुशार नाही, तुम्ही पात्र नाही, तुम्ही दुसऱ्याची सीट घेतली आहे, तुम्ही सरकारचे पैसे मोफत खाताय असे टोमणे मारले जातात. त्यांच्या वैयक्तिक अपयाशाला त्यांच्या पूर्ण समाजाशी जोडलं जातं.
“उच्चवर्णीय समुदायातून आलेला विद्यार्थी नापास झाला तर कोणी सर्व समुदायाला नावं ठेवत नाही. पण आरक्षणातून आलेला विद्यार्थी नापास झाला तर पूर्ण समाजाला म्हटलं जातं.”
“मी एसएसी एसटी सेलमध्ये होतो त्यावेळी आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की, त्यांना ग्रुप डिसकशनमध्ये सामावून घेतलं जात नाही, त्यांचं मत विचारलं जात नाही. अनेकदा संशोधनासाठी फॅकल्टीसुद्धा आरक्षणाअंतर्गत आलेल्या विद्यार्थ्याला घ्यायला तयार नसते. कधी कधी त्याला शिफारस पत्र द्यायलाही संकोच केला जातो.”

जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे ‘सेंसिटायजेशन’ म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वग्रहांची जाणीव करून देण्यासाठी वर्कशॉप घेणे आवश्यक असल्याचे प्रणव सांगतात.
विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जीवन संपवल्याच्या घटना घडल्यानंतर एक समिती बनवण्यात आली होती. त्यांनी शिफारस केली होती की आरक्षणव्यतिरिक्त वर्गवारीतून आलेल्या विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्यासाठी सेन्सिटायजेशन ट्रेनिंग आवश्यक आहे, पण याची अंमलबजावणी झाली नाही असं प्रणव सांगतात.
आताच्या घटनेत प्राध्यापकावर आरोप झाल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ फॅकल्टी उतरले परंतु ही बाब कधी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सर्व फॅकल्टी एकत्र आल्याचं आम्ही पाहिलं नाही असं प्रणव सांगतात.
आणखी एका माजी विद्यार्थ्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला. संबंधित विद्यार्थ्याने आयआयटीतून पीएचडी केली आहे. या माजी विद्यार्थ्याने देखील म्हटले की वंचित समाजातून आलेले काही विद्यार्थी कॅम्पसमध्ये आल्यावर मनाने कमकुवत का होतात याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
या विद्यार्थ्याने सांगितलं, साहिलच्या वडिलांनी म्हटलं की माझा मुलगा धाडसी होता. तसंच दर्शन सोलंकीच्या वडिलांनी देखील म्हटल्याचं आम्ही पाहिलं. या दोघांनीही मेहनत करून प्रवेश मिळवला होता. मग असं काय झालं की ते कॅम्पसमध्ये आल्यावरच मनाने खचले, याचा शोध घेण्याची गरज आहे.
“त्यांना मिळणारी वागणूक ही समान नसते. हे उघडपणे केलं जातं असं नाही. सूक्ष्म पद्धतीने हा भेदभाव होतो. सगळेच करतात असंही नाही पण तो बऱ्याच उदाहरणांमधून दिसतो,” असं माजी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नेमकी अशी काय उदाहरणं आहेत किंवा शिकत असताना काय जाणवलं? यावर माजी विद्यार्थ्याने सांगितलं की, “आरक्षणाअंतर्गत आलेल्या विद्यार्थ्यांना कमी लेखलं जातं. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना वारंवार स्वत:ला सिद्ध करावा लागतं. आरक्षणाअंतर्गत आलेला मुलगा थोडा जरी कमी पडला किंवा त्याच्याकडून चूक झाली की त्यांना दाखवलं जातं की बघा तुम्ही पात्र नाहीत. हे खूप सूक्ष्म पद्धतीने होतं. तुझी रँक काय आहे यावरून अंदाज लावला जातो की तुमची रिझर्वेशन कॅटगरी कोणती आहे.”

“ग्रुप अॅक्टिव्हिटी करत आहात आणि यात एखादा मार्जीनलाईज कम्युनीटीतला मुलगा असेल तर त्याला बोलायची संधीच दिली नाही तर ते यातूनही दिसतं. तुम्हाला संवादात भाग घ्यायचा अधिकार नाही, तुम्ही तो कमवलेला नाही हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो. हा या मुलांसाठी रोजचा झगडा आहे. बऱ्यापैकी कल्चरचाही भाग आहे.
“फॅकल्टी ज्यापद्धतीने त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या मुलांशी कसं बोलतात आणि त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या मुलांशी कसं बोलतात यातही फरक जाणवतो. सर्व फॅकल्टी नाही पण काही जण नकळतही या गोष्टी करत असतात. कपड्यांवरून बोलणं, मत मांडलं तर खिल्ली उडवली जाते,” असं या माजी विद्यार्थ्याने सांगितले.
‘अभ्यासक्रम झेपत नसल्याचे नरेटिव्ह निरर्थक’
आयआयटी मुंबईमधून पीएचडी करणारे माजी विद्यार्थी संदीप सावरकर यांनी सांगितलं की, “ओपन आणि रिझर्व्ह्ड कॅटगरीमधल्या कटऑफमध्ये इतकं अंतर राहिलेलं नाही. अगदीच एक ते दोन टक्क्यांचा फरक असतो यामुळे विद्यार्थी मेरीटनेच प्रवेश घेतात. यामुळे या आधारावर समाज माध्यमांवर जो प्रचार केला जातो कि आरक्षणामुळे 40% घेऊन मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात आणि खुल्या प्रवर्गातून 90% घेऊन विद्यार्थी येतात, त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम झेपत नसल्यामुळे ते कॉपी करतात, हे नरेटिव्ह निरर्थक आहे.
हा प्रचार करणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांनी विद्यापीठाचा दरवाजा सुद्धा बघितलेला नसतो.
“फॅकल्टीमध्ये सर्व समाजाचं अपेक्षित प्रतिनिधित्व आहे हे आयआयटी मुंबईने स्पष्ट करायला हवं. गेल्या 5 वर्षात “Mission mode recruitment” माध्यमातून किती फॅकल्टी रिक्रूट केल्या गेल्या. त्यांनी तसा डेटा समोर आणला तर समजायला सोपं जाईल. ज्या जागा भरलेल्या नाहीत त्यांची भरती करायला हवी”, असा मुद्दा सावरकर यांनी मांडला.
आकडेवारी काय सांगते?
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या व्यासपीठाचे संस्थापक धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकारातून आणि मीडिया रिपोर्ट्समधून गोळा केलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या 20 वर्षांत देशातील विविध आयआयटींमध्ये किमान 171 विद्यार्थ्यांनी जीवन संपवले किंवा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आहे.’
फोटो स्रोत, ANI
ग्लोबल आयआयटी अॅल्युमनी सपोर्ट ग्रुप आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह सांगतात, “गेल्या 20 वर्षांत एससी आणि एसटी विद्यार्थ्यांचा स्वतःचं आयुष्य संपवण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. कोव्हिडनंतर या दोन्ही गटांमधील हे अंतर लक्षणीयरीत्या वाढले आहे.”
त्यांनी सांगितलं की, “गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीत आयआयटी विद्यार्थ्यांच्या आयुष्य संपवण्याचा घटना आणि अनैसर्गिक मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. यावरून आयआयटी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती झपाट्याने खालावत असल्याचे तसेच आयआयटींमध्ये स्वतःचे आयुष्य संपवून घेण्याचे संकट निर्माण होत असल्याचे संकेत मिळतात.”
“कोव्हिडनंतर विशेषतः आयआयटी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणामध्ये होणारी झपाट्याने होणारी घसरण रोखण्यासाठी सध्याच्या व्यवस्था प्रभावी ठरत नसल्याचेही या आकडेवारीतून सूचित होते,” असं धीरज सिंह सांगतात.
आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकाने काय सांगितलं?
आयआयटीत होणारा जातीय भेदभाव हा अप्रत्यक्ष आणि सूक्ष्म पद्धतीचा असल्याचे एका प्राध्यापकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. जर समाजात जातीय भेदभाव असेल तर त्याचं प्रतिबिंब कॅम्पसमध्येही आहेच.
आरक्षणातून आलेल्या विद्यार्थ्याचे गुण कमी आहेत असं एक वेळ मान्य जरी म्हटलं तर त्या विद्यार्थ्याने आपल्या जीवनात केलेला संघर्ष अधिक आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला इथे पाठबळ दिले पाहिजे, त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे ते सांगतात.
“अशा विद्यार्थ्यांवर आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, त्यांच्यावर वेळ खर्च करावा लागेल तेव्हा ते चांगले गुण मिळवतील. त्यांच्यावर थोडी मेहनत घेतली नाही तर बदल कसा होईल?,” असा प्रश्न या प्राध्यापकांनी विचारला.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आरक्षणातून आलेल्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो?
या विषयी बोलताना आयआयटी मुंबईचे एक प्राध्यापक सांगतात, “आडनाव ऐकल्यावर लगेच कळतं की दलित आहे की कोणत्या जातीचा आहे. यात मी जातीयवाद करत असेल तर आपण ते सिद्ध नाही करू शकत इतक्या सटल पद्धतीने ते होतं. ही सिस्टम सर्वच संस्थांमध्ये दिसते. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षी कसा परिणाम होतो तर तुम्ही इंग्रजी बोलत नसाल. मग त्यांचा सहभाग कमी होत जातो. हे बदलायला हवं.”
कोणते बदल अपेक्षित आहेत?
प्राध्यापक सांगतात की, आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी बॉडी नाही. जे काही होतं ते प्रशासनाकडूनच होतं. हे बदलायला हवं. जेएनयूमध्ये जशी निवडणूक होते तसं काही होत नाही. विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करेल अशी व्यवस्थाच नाही.
विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण हवे, जेणेकरुन या समुदायातून येणारे विद्यार्थी आपल्या समस्या मांडू शकतील, असं या प्राध्यापकाला वाटतं.
माजी विद्यार्थी आणि फॅकल्टी यांनी जातिभेदासंदर्भात व्यक्त केलेल्या मतांबाबत विचारण्यासाठी बीबीसी मराठीने आयआयटी जनसंपर्क विभागाशी आणि संचालकांशी संपर्क साधला, परंतु प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
आयआयटी मुंबईची प्रतिक्रिया
वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही आयआयटी मुंबईतील प्रशासनाचा बीबीसी मराठीशी संपर्क होऊ शकला नाही.
याआधी, साहिलचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती तेव्हा आयआयटी मुंबईने निवेदन प्रसिद्ध केले होते त्यात त्यांनी जातिभेदाचे आरोप फेटाळून लावले होते.
आधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात साहिलचा मृत्यू कसा झाला या परिस्थितीचे वर्णन केले होते. त्याबद्दल आयआयटी मुंबईने क्षमा मागितली होती.
साहिलचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे प्रकरण तपासाधीन असताना तसे वर्णन करणे अयोग्य होते असे आयआयटीने म्हटले होते.
तसेच आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरमने देखील साहिलच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले होते आणि प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्या पाठीशी आहोत असे देखील म्हटले होते.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
अधिक शोधा
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
-

व्हीडिओ, घरात शिरलेल्या चोराचं गोल्डन रिट्रीव्हरने कसं केलं स्वागत? पाहा, वेळ 0,32
-

व्हीडिओ, चिखलात अडकलेल्या बैलांना कसं वाचवण्यात आलं?, वेळ 0,24
-

व्हीडिओ, लाडू खाण्याची अनोखी स्पर्धा, साखरेचे तब्बल 28 लाडू खाल्ले, वेळ 1,19
-

व्हीडिओ, हत्ती दुचाकीवर हल्ला करतो तेव्हा…, वेळ 0,29
-

व्हीडिओ, आईसाठी मुलाने हजारो झाडांनी संपूर्ण घर सजवलं, वेळ 1,14
-

व्हीडिओ, मुंबईत गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी, वेळ 0,30
-

व्हीडिओ, दुष्काळामुळे युरोपमध्ये ऊर्जेचा तुटवडा, कालवा फोडून सोडलं नदीत पाणी, वेळ 0,56
-

व्हीडिओ, साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यात नागरिकांचा संताप, वेळ 1,23
-

व्हीडिओ, ‘गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची’ या सीरिजच्या पहिल्या भागात बोलूयात ‘लग्न’ या विषयाबद्दल., वेळ 1,19
-

व्हीडिओ, बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक, महिला कंडक्टरने CPR देत वाचवला जीव, वेळ 0,55
-

व्हीडिओ, ‘शिव्या दिल्यावर केस होणार असेल, तर सर्वाधिक केसेस भाजप आयटी सेलवर व्हायला हव्या’; अभिजीत दिपकेंची टीका, वेळ 1,19
-

व्हीडिओ, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंनी म्हटलं,’वुई हॅव्ह डन इट’, वेळ 0,51
-

व्हीडिओ, ‘मी अजून जिवंत आहे’, हॉस्पिटलमधून सोनम वांगचूक यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी, वेळ 1,58
-

व्हीडिओ, जंतर-मंतरवर जेवणाच्या ऑर्डर कुठून आणि कशा येतायत?, वेळ 2,41
शॉर्ट व्हीडिओचा शेवट
SOURCE : BBC


















