Home LATEST NEWS ताजी बातमी कालव्यात सापडले शरीराचे तुकडे; हातावरील टॅटूमुळे पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

कालव्यात सापडले शरीराचे तुकडे; हातावरील टॅटूमुळे पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

कल्याणी अनाथाश्रमात वाढली.

(महत्त्वाचंः या बातमीतील काही तपशील अस्वस्थ करणारे आहेत.)

ही एका अशा महिलेची कहाणी आहे, जिच्या आईचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यामुळे ती स्वतः अनाथाश्रमात वाढली. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, तिच्या मुलालाही लहान वयातच अनाथाश्रमात जावं लागलं आहे.

विजयवाडा मधील इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या हत्येचं प्रकरण समोर आल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आईची हत्या आणि सावत्र वडील तुरुंगात गेल्याने 4 वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे.

इब्राहिमपट्टणमचे पोलीस निरीक्षक सुब्रह्मण्यम आणि एसीपी दुर्गाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीटीपीएसमध्ये सापडलेला मृतदेह कारी दुर्गा ऊर्फ कल्याणीचा असल्याचं समोर आलं आहे.

शफी नावाच्या व्यक्तीनं ही हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

कालव्यात धड सापडलं, शरीराचे बाकीचे अवयव कुठे?

पोलिसांनी सांगितलं की, 18 सप्टेंबरला सायंकाळी विजयवाड्याच्या बाहेर असलेल्या व्हीटीपीएस कालव्यात एक धड सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शरीराचे इतर भाग शोधण्यासाठी तपास सुरू केला.

धडावर कपडे होते, त्याशिवाय मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

औष्णिक विद्युत प्रकल्पाकडे जाणाऱ्या या कालव्यावर एक जाळी आहे. 19 सप्टेंबर रोजी पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने त्या जाळीजवळ शोध घेतला. तेव्हा तिथं त्यांना एक हात आणि दोन पाय सापडले.

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे कपड्यांवरील ब्रँडच्या नावाशिवाय दुसरा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

व्हीटीपीएस कालव्यावरील एखाद्या पुलावरून मृतदेह कालव्यात फेकला असावा, या शक्यतेचा शोध घेत पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजचीही कसून तपासणी केली.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले.

या प्रकरणाच्या तपासात मृत महिलेच्या हातावरील मोर पिसाच्या टॅटूमुळे एक अत्यंत महत्त्वाचा धागा मिळाला. या टॅटूमुळे पोलिसांना मृत महिलेची आणि आरोपीची ओळख पटवण्यास मदत झाली.

पोलिसांनी तिच्या पायातील पैंजण, कानातले, टॅटू आणि कपडे यांसारख्या ओळख पटवण्यास मदत करणाऱ्या सर्व वस्तूंचे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून, या महिलेची ओळख पटवण्याचं आवाहन केलं.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. अंगावरील कपड्यांच्या कंपनीची माहिती घेऊनही पोलिसांनी तपास केला.

पोलिसांनी म्हटलं की, सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यानंतर काही लोकांनी मंगलागिरी पोलीस ठाण्यात फोन करून, हा टॅटू असलेली तरुणी त्यांनी पाहिल्याचं सांगितलं.

त्याचदरम्यान कल्याणीच्या भावानेही पोलिसांशी संपर्क साधला. त्याने हा टॅटू आपल्या बहिणीचा असून, मृतदेहावरील कपडेही आपल्या बहिणीच्या कपड्यांसारखे असल्याचं सांगितलं.

घटनास्थळी सापडलेले कपडे.

कल्याणीच्या भावानं पोलिसांना सांगितलं की, त्याचं बहिणीसोबत आठवडाभरापासून बोलणं झालं नव्हतं. पोलिसांचा फोन आल्यानंतर तो तिच्या घरी गेला, पण घराला कुलूप होतं. आजूबाजूला चौकशी केली असता, ती 3 दिवसांपासून घरी आली नसल्याचे समजलं, असं इब्राहिमपट्टणमचे सीआय सुब्रह्मण्यम यांनी सांगितलं.

व्हीटीपीएस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृत महिलेचं नाव आणि इतर माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या फोन नंबरच्या मदतीनं तांत्रिक तपास सुरू केला.

पोलिसांनी तिच्या फोनचा कॉल रेकॉर्ड तपासला. ती शेवटचं कुणाशी बोलली, कुणाशी वारंवार बोलत होती, याची माहिती घेतली.

या तपासातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर शफी नावाच्या व्यक्तीवर संशय घेऊन पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव कारी दुर्गा ऊर्फ कल्याणी असं होतं. ती एलुरू जिल्ह्यातील कालिदिंडी मंडलमधील चिन्न ताडिनाड गावची रहिवासी होती.

लहानपणीच तिच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे तिच्या वडिलांनी कल्याणी आणि तिच्या भावाला कृष्णा जिल्ह्यातील गन्नवरमजवळील एका आश्रमात दाखल केलं होतं.

कल्याणी आणि तिचा भाऊ सुमारे 18 वर्षांचे होईपर्यंत त्याच आश्रमात वाढले. त्यानंतर दोघेही आश्रमातून बाहेर पडले. कल्याणी मंगलागिरी इथं राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम करत होती.

कल्याणीसोबत राहत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचीही पोलिसांनी चौकशी केली. तिच्या पायात लग्नाचे जोडवे होते. पण, त्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं की ते दोघे केवळ एकत्र (लिव्ह-इन) राहत होते, हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही.

आरोपीला ताब्यात घेतल्याचं इब्राहिमपट्टणम पोलिसांनी सांगितलं.

या दोघांच्या नात्यातून एका मुलाचा जन्म झाला. पण, मुलाच्या वडिलांशी मतभेद झाल्यानं कल्याणी त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर मुलाच्या वडिलांचा नातेवाईक असलेल्या शफी नावाच्या मांस विक्रेत्यानं त्या मुलाला दत्तक घेतलं.

पोलिसांनी सांगितलं की, शफीला आधीच 3 मुली होत्या. पण, मुलगा हवा असल्यानं त्यानं या मुलाला अनौपचारिक पद्धतीने दत्तक घेतलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला दत्तक दिल्यानंतरही कल्याणी शफीच्या संपर्कात होती. दत्तक घेताना शफीनं कल्याणीला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही कल्याणीनं आणखी पैसे मागितल्यावर शफीनं तिला काही रक्कम आणि थोडं सोनंही दिलं, असं एसीपी दुर्गाराव यांनी सांगितलं.

मात्र, कल्याणी वारंवार पैशांची मागणी करत असल्यानं शफीनं तिला संपवण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.

‘ती सतत पैसे मागत होती’

पोलिसांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या 17 तारखेला शफीनं पत्नी आणि मुलांना गुंटूरमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी पाठवलं. त्यानंतर त्यानं कल्याणीला आपल्या घरी बोलावलं. दोघांनी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर शफीनं चाकूनं तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली.

यानंतर त्यानं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. दोन टप्प्यांत तो हे तुकडे दुचाकीवरून घेऊन गेला आणि व्हीटीपीएस कालव्यात फेकले. यावेळी त्याच्यासोबत दुर्गाराव ऊर्फ अब्दुल्ला नावाचा त्याच्यासोबत काम करणारा सहकारीही होता.

अब्दुल्ला सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

“कल्याणी वारंवार पैसे मागत होती. पैसे न दिल्यास मुलाला परत नेण्याची धमकी देत होती. शफीचं त्या मुलावर खूप प्रेम होतं. मुलाला परत द्यायचं नसल्यानं कल्याणीची हत्या केली तर हा वाद संपेल, असं शफीला वाटलं. त्यानं मांस कापण्यासाठी वापरत असलेल्या चाकूनेच तिची हत्या केली. या हत्येमागे दुसरं कोणतंही कारण दिसून आलेलं नाही,” असं एसीपी दुर्गाराव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, शफीनं कल्याणीच्या दत्तक घेतलेल्या मुलाचं वय 4 वर्षे आहे. ही दत्तक प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनं झालेली नसल्यानं, कायदेशीर सल्ला घेऊन त्या मुलाला एखाद्या बालसुधारगृहात ठेवण्यात येईल, असं पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली, तर कल्याणीची ओळख पटणार नाही, असं शफीला वाटलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

आरोपीच्या नातेवाईकांशी आणि कल्याणीच्या भावाशी बोलण्याचा बीबीसी प्रयत्न करत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC