Home LATEST NEWS ताजी बातमी पायलट जखमी झाला तर विमान कोण उडवतं? फ्लायदुबईच्या घटनेनंतर कॉकपिटची रचना चर्चेत

पायलट जखमी झाला तर विमान कोण उडवतं? फ्लायदुबईच्या घटनेनंतर कॉकपिटची रचना चर्चेत

4
0

Source :- BBC INDIA NEWS

कॉकपिट हा विमानाचा पुढचा भाग असतो. इथून पायलट विमान चालवतात आणि त्यावर नियंत्रण ठेवतात. (प्रतिकात्मक फोटो)

Published

वाचन वेळ: 9 मिनिटे

दुबईहून बुधवारी (30 सप्टेंबर) इस्रायलमधील तेल अवीवला येणाऱ्या एफझेड1073 या विमानातील घटनेनंतर कॉकपिटच्या सुरक्षेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

असं सांगितलं जात आहे की, को-पायलटने पायलटवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं आणि विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.

कॉकपिट म्हणजे काय? तिथून विमान कसं चालवलं जातं?

कॉकपिट हा विमानाचा पुढचा भाग असतो. इथून पायलट विमान चालवतात आणि त्यावर नियंत्रण ठेवतात. प्रवासी विमानांमध्ये कॉकपिटला ‘फ्लाइट डेक’ असंही म्हणतात. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात.

कॉकपिटमध्ये नेमकं काय असतं?

बोइंग 737 मॅक्ससारख्या प्रवासी विमानाच्या कॉकपिटमध्ये साधारणपणे या गोष्टी असतात-

  • दोन पायलट सीट असतात – एक कॅप्टनसाठी आणि दुसरे फर्स्ट ऑफिसरसाठी. फर्स्ट ऑफिसरलाच साधारणपणे को-पायलट म्हटलं जातं.
  • फ्लाइट कंट्रोल: यात कंट्रोल कॉलम/योक, रडर पेडल आणि थ्रस्ट लीव्हर असतात. यांचा वापर विमान वळवण्यासाठी, वर-खाली करण्यासाठी आणि इंजिनची शक्ती नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
  • डिजिटल स्क्रीन आणि उपकरणे: यावर विमानाची उंची, वेग, दिशा, इंजिनची स्थिती, विमानाचं ठिकाण, हवामान आणि रडारची माहिती दिसते. काही धोका असल्यास त्याचा इशाराही यावर दिलेला असतो.
  • कम्युनिकेशन उपकरणे: रेडिओच्या मदतीने पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी), एअरलाइनच्या ऑपरेशन्स टीम आणि केबिन क्रूशी संपर्क साधतात.
  • नेव्हिगेशन आणि ऑटोमेशन सिस्टिम: यामध्ये विमानाचा मार्ग ठरवण्यासाठी फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टिम आणि विमान आपोआप नियंत्रित करण्यासाठी ऑटोपायलटचा समावेश असतो.
  • चेकलिस्ट, आपत्कालीन (इमर्जन्सी) नियंत्रण आणि सुरक्षा उपकरणे: दोन पायलटांच्या सीटच्या मागे अनेकदा आणखी एका व्यक्तीसाठी अतिरिक्त ऑब्झर्व्हर किंवा जम्प सीटही असते.
30 सप्टेंबर 2026 रोजी फ्लायदुबईचं एक पर्यायी विमान तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरलं. या विमानात एफझेड1073 फ्लाइटमधील प्रवासी होते. एफझेड1073 विमानाने जॉर्डनच्या हवाई हद्दीतून जात असताना आपत्कालीन कोड (इमर्जन्सी कोड) पाठवला होता. त्यानंतर हे विमान सौदी अरेबियाकडे  वळवण्यात आले होते.

कॉकपिटला प्रवाशांच्या केबिनपासून एका मजबूत आणि साधारणपणे लॉक असलेल्या दरवाजाने वेगळं केलं जातं. कॉकपिटमध्ये केवळ अधिकृत फ्लाइट क्रूच्या सदस्यांनाच प्रवेश असतो.

अत्यंत नियंत्रित परिस्थितीत, ‘ऑब्झर्व्हर सीट’वर बसणाऱ्या ड्युटीवर नसलेल्या पायलटसारख्या अन्य अधिकृत व्यक्तीलाही प्रवेश दिला जाऊ शकतो.

या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्य उद्देश प्रवासी किंवा इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला विमानाचा ताबा घेता येऊ नये, हा आहे.

यामुळे कॉकपिटमध्ये आधीपासूनच असलेल्या एखाद्या पायलटशी संबंधित घटना ही सामान्य सुरक्षा उल्लंघन न मानता ‘इनसाइडर थ्रेट’ (अंतर्गत धोका) म्हणजेच आतून निर्माण झालेला धोका म्हणून पाहिला जातो.

आतापर्यंत काय समोर आलं?

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या बोइंग 737 मॅक्स 8 विमानात 174 जण होते. कॉकपिटमध्ये झालेल्या हाणामारीनंतर हे विमान सौदी अरेबियातील तबुककडे वळवण्यात आलं.

असं सांगितलं जात आहे की, यावेळी को-पायलटने कॅप्टनवर हल्ला केला. प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी हल्लेखोराला पकडलं. त्यानंतर विमानात असलेल्या फ्लायदुबईच्या दोन पोजिशनिंग पायलटांनी (जे त्या वेळी ड्युटीवर नव्हते पण दुसऱ्या एअरपोर्टला जाण्यासाठी त्या विमानात बसलेले होते) विमानाचा ताबा घेतला आणि ते सुरक्षितपणे उतरवलं.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवासी आणि क्रू मेंबर्स कॉकपिटमध्ये गेले आणि त्यांनी को-पायलटवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर त्याच विमानात असलेल्या फ्लायदुबईच्या दोन इतर पायलटांनी विमान सौदी अरेबियातील तबुक येथे सुरक्षितपणे उतरवण्यास मदत केली.”

कॉकपिटमध्ये दोन सीट असतात. एक कॅप्टनसाठी आणि दुसरी फर्स्ट ऑफिसरसाठी. फर्स्ट ऑफिसरलाच को-पायलट असंही म्हटलं जातं. (प्रतिकात्मक फोटो)

विमानाने आधी 7700 हा आपत्कालीन कोड (नॉर्मल इमर्जन्सी कोड) पाठवला. त्यानंतर 7500 हा कोड पाठवण्यात आला, जो विमानात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचा संकेत मानला जातो. यानंतर इस्रायली लढाऊ विमानांना सतर्क करण्यात आलं होतं.

महत्त्वाची बाब म्हणजे हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, त्याचा दहशतवादाशी संबंध होता का, शस्त्र नेमकं कोणतं होतं किंवा ते कुठे होतं आणि ते कॉकपिटपर्यंत कसं पोहोचलं, याबाबत अधिकाऱ्यांनी किंवा एअरलाइनने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

इस्रायलचं आकलन पुढे बदलू शकतं. परंतु, नेतन्याहू यांनी या घटनेत इराणचा सहभाग होता की नाही, हे सांगणं सध्या घाईचं ठरेल, असं म्हटलं आहे. फ्लायदुबईनेही तपास पूर्ण होईपर्यंत या घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार नाही, असं सांगितलं.

कॉकपिटमध्ये दोन पायलट का असतात?

कॉकपिटमधील दोन व्यक्तींच्या नियमाचा अर्थ असा की, कॉकपिटमध्ये नेहमी दोन अधिकृत व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे.

एखादा पायलट काही वेळासाठी म्हणजे तात्पुरत्या काळासाठी कॉकपिटबाहेर गेला, उदाहरणार्थ टॉयलेटला जाण्यासाठी, तर तो परत येईपर्यंत प्रशिक्षित केबिन क्रूचा एक सदस्य कॉकपिटमध्ये उपस्थित राहतो.

2015 मध्ये जर्मनविंग्स फ्लाइट 9525च्या घटनेनंतर या नियमाकडे पुन्हा लक्ष देण्यात आलं. या घटनेत कॅप्टन कॉकपिटच्या बाहेर गेल्यानंतर को-पायलटने त्यांना पुन्हा आत येण्यापासून रोखलं होतं.

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (ईएएसए) सुरुवातीला एअरलाइन कंपन्यांना कॉकपिटमध्ये नेहमी दोन अधिकृत व्यक्ती ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

30 सप्टेंबर 2026 रोजी फ्लायदुबईचं एक पर्यायी विमान तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरलं. या विमानातून एफझेड1073 फ्लाइटमधील प्रवाशांना आणण्यात आलं होतं.

2016 मध्ये या नियमात काहीशी शिथिलता आणण्यात आली. आता पुन्हा कॉकपिटमध्ये 2 व्यक्ती असण्याला प्राधान्य दिलं जात आहे. पण, हा जगभरात लागू होणारा कोणताही एकसमान किंवा बंधनकारक नियम नाही. अमेरिका, चीन आणि जपानसह अनेक देशांमध्ये हा नियम अनिवार्य आहे.

‘टू पर्सन रूल’चा अर्थ, कॉकपिटमध्ये नेहमीच दोन पायलट उपस्थित असलेच पाहिजे असा नाही.

सामान्य प्रवासी विमानात आधीपासूनच विमानाचं नियंत्रण दोन परवानाधारक पायलटांकडे असतं.

अतिरिक्त व्यक्तीचा नियम तेव्हा लागू होतो, जेव्हा दोन पायलटांपैकी एक पायलट काही वेळासाठी कॉकपिटच्या बाहेर जातो.

प्रत्येक छोट्या किंवा मध्यम अंतराच्या विमानात तिसरा पायलट ठेवणं ही वेगळी आणि अधिक खर्चिक व्यवस्था ठरेल.

एखादा पायलट जखमी झाला किंवा विमान चालवण्याच्या स्थितीत राहिला नाही, तर दुसरा पायलट विमानाचा ताबा घेऊ शकतो. मात्र, दोन पायलटांमध्येच हल्ला झाला, तर ही व्यवस्था तो हल्ला रोखू शकत नाही.

या घटनेमध्ये ड्युटीवर नसलेल्या दोन पायलटांची उपस्थिती खूप फायदेशीर ठरली. ते ‘क्रू-पोझिशनिंग’साठी प्रवास करत होते. याला ‘डेडहेडिंग’ असं म्हटलं जातं.

बोइंग 737 मॅक्स आणि कॉकपिटची सुरक्षा

ही घटना बोइंग 737 मॅक्सच्या डिझाइनमधील एखाद्या समस्येमुळे घडल्याचं सध्या कोणतेही अधिकृत संकेत नाहीत.

सुरक्षेशी संबंधित प्रश्न हे कॉकपिटमध्ये प्रवेश, क्रू मेंबर्सची तपासणी, शस्त्रांवर नियंत्रण आणि कॉकपिटमधून निर्माण होणाऱ्या धोक्याला कसं हाताळायचं, यांच्याशी संबंधित आहेत.

737 मॅक्ससह आधुनिक मोठी प्रवासी विमानं 9/11 नंतर लागू करण्यात आलेल्या कॉकपिट सुरक्षा मानकांनुसार चालवली जातात.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) नियमांनुसार, अशा विमानांच्या कॉकपिटला मजबूत फ्लाइट डेक दरवाजा असणे आवश्यक आहे. हा दरवाजा जबरदस्तीने आत शिरण्यापासून तसेच बंदुकीच्या गोळ्या आणि ग्रेनेडच्या तुकड्यांपासून संरक्षण करण्यासाठी तयार केलेला असतो.

साधारणपणे प्रवासी विमानात बसल्यानंतर आणि विमानाचे बाहेरचे दरवाजे बंद झाल्यापासून ते विमान उतरल्यानंतर दरवाजे पुन्हा उघडेपर्यंत कॉकपिटचा दरवाजा लॉक असतो. परंतु, अधिकृत व्यक्तींना कॉकपिटमध्ये प्रवेश करता येऊ शकतो.

केबिनमधून व्हीडिओ रेकॉर्ड करणारे आणि पायलटला काबूत आणण्यास मदत करणारे असाफ रेगाविम यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील त्साफ्रिया येथील बेन गुरियन विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

पायलट ‘फ्लाइट डेक’वरील दोन्ही सीटवरून कॉकपिटचा दरवाजा लॉक किंवा अनलॉक करू शकतात. तसेच, दरवाजाबाहेर कोण आहे, हेही ते पाहू शकतात. केबिन क्रू कोड टाकून कॉकपिटमध्ये प्रवेशाची विनंती करू शकतात.

अनेक विमानांमध्ये पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर ठराविक वेळेनंतर कॉकपिटमध्ये प्रवेशाची परवानगी मिळू शकते. पण, पायलटने प्रवेशाला स्पष्टपणे नकार दिला असेल, तर दरवाजा उघडत नाही.

अमेरिकन एअरलाईन्ससाठी बनवल्या जाणाऱ्या नवीन प्रवासी विमानांमध्ये मुख्य कॉकपिटच्या दरवाजामागे आणखी एक सुरक्षा अडथळा असणे बंधनकारक आहे. दरवाजा उघडल्यावर कॉकपिटच्या पुढच्या भागाचं संरक्षण करण्यासाठी हा अडथळा (बॅरियर) असणे आवश्यक आहे.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनचा (एफएए) हा नियम भविष्यात तयार होणाऱ्या नवीन विमानांना लागू आहे. जुन्या सर्व विमानांमध्ये ही सुरक्षा व्यवस्था बसवणे बंधनकारक नाही.

ही सुरक्षा व्यवस्था कॉकपिटमध्ये जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. परंतु, कॉकपिटमध्ये आधीपासूनच असलेल्या पायलटपासून धोका असेल, तर ती तितकी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे, वृत्तांमध्ये सांगितलेली घटना खरी ठरल्यास, हा ‘इनसाइडर रिस्क’ म्हणजेच कॉकपिटच्या आतून निर्माण झालेला धोका मानला जाऊ शकतो.

कॉकपिटच्या आतला धोका

आयसीएओनुसार, विमानतळ किंवा विमान कंपनीतील कर्मचारी आपल्या अधिकृत प्रवेशाचा किंवा मिळालेल्या विशेष माहितीचा गैरवापर करून बेकायदेशीर कारवायांना मदत करतात, तेव्हा त्याला ‘इनसाइडर थ्रेट’ म्हणजेच अंतर्गत धोका म्हटलं जातं.

यामध्ये कर्मचारी, कंत्राटी कामगार, तात्पुरते कर्मचारी आणि विमानतळाच्या प्रतिबंधित भागात किंवा संवेदनशील माहितीपर्यंत पोहोच (ॲक्सेस) असलेल्या इतर व्यक्तींचा समावेश असू शकतो.

दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचे कॅप्टन भारतीय नागरिक स्मित मच्छर हे होते.

आयसीएओ असंही सांगतं की, ‘इनसाइडर थ्रेट’ ओळखण्यासाठी एखाद्या ठराविक प्रकारच्या व्यक्तीचं प्रोफाइल तयार करणं योग्य नाही. हा धोका जाणूनबुजून किंवा हेतुपुरस्सर केलेली चुकीची कृती, वैचारिक कारणं, दबाव, बदला घेण्याची भावना किंवा आर्थिक अडचणींमुळे निर्माण होऊ शकतो.

परंतु, निष्काळजीपणा, अतिआत्मविश्वास, थकवा, योग्य देखरेख नसणे किंवा नियमांचं पालन न करणं यामुळेही असा धोका निर्माण होऊ शकतो.

9/11 नंतर विमानाच्या सुरक्षेची व्यवस्था प्रामुख्याने कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाहेरील व्यक्तींना रोखण्यासाठी अधिक मजबूत करण्यात आली.

कॉकपिटचा मजबूत दरवाजा बाहेरून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराला रोखू शकतो. पण, कॉकपिटमध्येच असलेल्या एका पायलटकडून दुसऱ्या पायलटला तो वाचवू शकत नाही. एफझेड1073च्या घटनेबाबतचा अहवाल खरा ठरल्यास, यातून विमान सुरक्षेतील हा धोका समोर येतो.

पायलटची तपासणी

या प्रकरणात वापरलेल्या शस्त्राची अद्याप पुष्टी झालेली नाही.

एक शक्यता म्हणून ‘कॉकपिट क्रॅश ॲक्स’चा उल्लेख केला जात आहे. विमानात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी किंवा एखाद्या पॅनेलच्या मागे लागलेली आग विझविण्यासाठी या कुऱ्हाडीचा वापर केला जाऊ शकतो.

अन्वेषक अनेक शक्यतांचाही विचार करू शकतात-

– कॉकपिटमध्ये असलेल्या आपत्कालीन साधनाचा (इमर्जन्सी टूल) चुकीच्या पद्धतीने वापर.

– क्रूच्या प्रवेशाच्या मार्गात किंवा त्यांच्या तपासणीच्या प्रक्रियेत प्रवाशांच्या तपासणीपेक्षा वेगळी व्यवस्था असणे.

– कर्मचाऱ्यांची तपासणी, अचानक होणारी तपासणी (रँडम स्क्रीनिंग), पुन्हा केली जाणारी तपासणी किंवा प्रतिबंधित भागात प्रवेश देण्याच्या व्यवस्थेतील त्रुटी.

– अधिकृत प्रवेश असलेल्या एखाद्या व्यक्तीने प्रतिबंधित वस्तू विमानतळाच्या सुरक्षित भागात किंवा एअरसाइड क्षेत्रात नेणे.

30 सप्टेंबर 2026 रोजी इस्रायलमधील तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. यावेळी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचं त्यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं.

आयसीएओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांव्यतिरिक्त इतर व्यक्ती आणि त्यांच्या सोबतच्या वस्तूंचीही सुरक्षा तपासणी झाली पाहिजे. ही तपासणी विमानतळाच्या सुरक्षित भागात प्रवेश करण्यापूर्वी केली जाते.

यामध्ये कर्मचाऱ्यांची अचानक आणि कोणत्या वेळी तपासणी होईल हे आधी सांगता येणार नाही, अशी तपासणी करण्याची गरज सांगितली आहे. कारण सुरक्षा व्यवस्थेची माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांना नेहमीची तपासणी कशी चुकवायची, हे समजू शकतं.

कोड 7500 आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

ट्रान्सपॉन्डर स्क्वॉक हा 4 अंकी कोड असतो. विमान हा कोड एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) पाठवतं.

7500 हा कोड विमानात अवैधरित्या हस्तक्षेप झाल्याचा संकेत देतो. त्याला सामान्यपणे ‘हायजॅक कोड’ म्हटलं जातं. 7600 हा रेडिओ संपर्कात बिघाड झाल्याचा संकेत देतो.

7700 हा सामान्य आपत्कालीन परिस्थितीचा कोड आहे. विमानात वैद्यकीय, तांत्रिक, आग, नियंत्रणाशी संबंधित किंवा इतर कोणतीही गंभीर अडचण असल्यास हा कोड वापरला जातो. त्यामुळे संबंधित विमानाला तातडीने प्राधान्य दिलं जातं.

7500 कोड वापरला म्हणजे विमान हायजॅक झालं आहे, असं आपोआप सिद्ध होत नाही. हा कोड विमानात कोणीतरी अवैधरित्या हस्तक्षेप करत असल्याचा संकेत देतो.

यात विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, कॉकपिटमध्ये जबरदस्तीने किंवा हिंसक पद्धतीने घुसणे, पायलटवर दबाव आणणे किंवा विमानाच्या नियंत्रणाला धोका निर्माण करणारी इतर कोणत्याही कृतीचा समावेश असू शकतो.

हा कोड महत्त्वाचा आहे कारण विमानातील परिस्थितीमुळे रेडिओवर बोलणं शक्य नसल्यास किंवा सुरक्षित नसल्यास, क्रू हा कोड पाठवून एअर ट्रॅफिक कंट्रोलला गुपचूप धोक्याचा इशारा देऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, एफझेड1073 विमानाने आधी 7700 आणि त्यानंतर 7500 हा कोड पाठवला होता.

हा क्रम परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचं सूचित करतो. सुरुवातीला सामान्य आपत्कालीन परिस्थिती असल्याचा संकेत देण्यात आला आणि त्यानंतर अवैधरित्या हस्तक्षेपाचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला.

तबुकमध्ये आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळू शकली. तसेच सुरक्षा व्यवस्था करता आली, संशयिताला ताब्यात घेता आलं आणि घटनेशी संबंधित पुरावे सुरक्षित ठेवता आले.

भूराजकीय संदर्भ महत्त्वाचा आहे. परंतु, पुरावे नसताना केवळ अंदाज बांधण्यासाठी त्याचा वापर करू नये. हे विमान यूएई आणि इस्रायलदरम्यान प्रवास करत होतं.

हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मार्ग आहे. ‘अब्राहम करारानंतर’ हा मार्ग सुरू झाला. या विमानात मोठ्या संख्येने इस्रायली प्रवासी होते. घटनेनंतर विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आलं. सौदी अरेबियाचे इस्रायलसोबत अजून राजनैतिक संबंध नाहीत.

7500 कोड पाठवल्यानंतर इस्रायलने आपली हवाई सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क केली. दुसरीकडे, सौदी अरेबियाने विमानाला तातडीने उतरवण्याची परवानगी दिली आणि वैद्यकीय मदत व तपासाची जबाबदारी घेतली.

या घटनेमुळे यूएई, इस्रायल आणि सौदी अरेबियाशी संबंधित अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. यात प्रवाशांची सुरक्षा, विमानाचा मार्ग ठरवण्याची व्यवस्था, गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि संशयित व्यक्तीच्या चौकशीपर्यंत पोहोच यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

विमानाचा मार्ग आणि त्या भागातील सुरक्षा परिस्थितीमुळे या घटनेमागचा राजकीय हेतूही तपासाचा एक भाग असू शकतो. परंतु, हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC