Home LATEST NEWS ताजी बातमी पायांच्या तळव्यांवर कच्चा कांदा ठेवल्याने खरंच सर्दी आणि ताप बरा होतो का?...

पायांच्या तळव्यांवर कच्चा कांदा ठेवल्याने खरंच सर्दी आणि ताप बरा होतो का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य

5
0

Source :- BBC INDIA NEWS

सोशल मीडियावर अनेक व्हीडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की, मोज्यांमध्ये (सॉक्स) कच्चा कांदा ठेवून ते घातल्याने सर्दी बरी होते.

सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये हातात लाल कांदा घेतलेली एक महिला तिच्या मुलीमध्ये दिसत असलेल्या लक्षणांबद्दल सांगत आहे.

ती म्हणते, “तुम्हाला सर्दी झाली असेल, तर कांदा गोल कापून मोज्यात (सॉक्स) ठेवा आणि ते मोजे घालून रात्रभर झोपा.”

कच्च्या कांद्यामुळे आजार बरा होतो, असा दावा करणारा हा एकमेव व्हीडिओ नाही. सोशल मीडियावर असे दावे वारंवार पाहायला मिळतात.

काही लोक आजारी मुलांच्या पालकांनाही हा उपाय करून पाहण्याचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, पायांवर कच्चा कांदा ठेवल्याने ‘तीव्र ताप कमी होतो’, ‘जंतू आणि बॅक्टेरिया मरतात’, ‘शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात’ आणि ‘रक्तही शुद्ध होतं’.

पण कांदा ठेवल्याने खरंच असं काही होऊ शकतं का?

कांदा ही ॲलियम कुळातील भाजी आहे आणि तो आरोग्यासाठी चांगल्या किंवा सकस आहाराचा एक भाग असू शकतो.

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यात क्वेर्सेटिन नावाचा घटकही असतो. हा वनस्पतींमध्ये आढळून येतो आणि त्याच्या दाह किंवा सूज कमी करण्याच्या गुणधर्मांवर संशोधन झालं आहे.

संशोधनातून असं दिसून आलं आहे की, कांद्यातील हे घटक हृदय आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही ते मदत करू शकतात.

परंतु, कांदा खाल्ल्याने होणारे हे फायदे आणि कांदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो किंवा कोणताही संसर्ग बरा करतो, या दाव्यात मोठा फरक आहे.

अमेरिकेतील साथरोग आणि संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. केटी सुलेटा म्हणतात की, कांदा खाण्याचे फायदे आणि कांदा आजार बरा करतो, या दाव्यांचा संबंध जोडू नये किंवा तशी गल्लत करू नये.

दरम्यान, अमेरिकेतील कांदा उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल ओनियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कांद्याबाबत असे दावे 1500च्या दशकापासून केले जात आहेत.

त्या काळात लोकांना वाटत होतं की, घरातील वेगवेगळ्या ठिकाणी कांदे ठेवल्याने ब्युबॉनिक प्लेगपासून त्यांचा बचाव होऊ शकतो.

पूर्वी लोक सुजलेल्या लसिका ग्रंथीवरही (लिम्फ नोड्स) कांदा चोळत असत. कांदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो, असा त्यांचा समज होता.

कांदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर का काढू शकत नाही?

आपली त्वचा शरीराला जंतूंपासून वाचवणारी पहिली ढाल आहे. तज्ज्ञांच्या मते, काही विषारी पदार्थ त्वचेवाटे शरीरात जाऊ शकतात. परंतु, ते त्वचेतून बाहेर पडू शकत नाहीत. घामातूनही हे विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत.

डॉ. सुलेटा म्हणतात की, कांदा त्वचेतून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. असं होण्यासाठी ‘भौतिकशास्त्राचे नियमच बदलावे किंवा मोडावे’ लागतील.

त्या म्हणतात, “कांद्यामध्ये असा कोणताही जादुई गुणधर्म नाही की, तो त्वचेतून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकेल.”

‘असं पायांच्या तळव्यांमधूनही होऊ शकत नाही आणि शरीराच्या इतर कोणत्याही भागाच्या त्वचेवाटेही नाही.’

कांदा पौष्टिक आहे, पण तो खाल्ल्याने कोणताही आजार बरा होत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अनेकदा रात्रभर मोज्यात ठेवल्यानंतर कांद्याचा रंग बदलतो. सोशल मीडियावर हा बदल कांद्याने शरीरातील विषारी घटक शोषून घेतल्याचा पुरावा असल्याचं सांगितलं जातं.

परंतु डॉ. सुलेटा यांच्या मते, कांद्याचा रंग बदलण्यामागचं खरं कारण वेगळंच आहे.

हवेच्या संपर्कात आल्यावर कांद्याचे ऑक्सिडेशन होतं. त्याचबरोबर तो त्वचेवरील सूक्ष्म जंतूंच्या संपर्कातही येतो. या कारणांमुळे कांद्याचा रंग बदलतो.

आहार (डाएट) आणि शरीरातील विषारी पदार्थ (डिटॉक्स) बाहेर काढण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये ‘टॉक्सिन’ हा शब्द वारंवार वापरला जातो. परंतु, हे विषारी घटक नेमक्या कोणत्या पदार्थांपासून येतात हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही.

फक्त इतकंच सांगितलं जातं की, हे विषारी पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात. ते हळूहळू शरीरात साचत राहतात आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर काढणं आवश्यक असतं.

परंतु, वैद्यकीय भाषेत ‘टॉक्सिन’ या शब्दाचा एक स्पष्ट अर्थ आहे. बॅक्टेरियांसारखे (जीवाणू) सजीव जे विषारी पदार्थ तयार करतात, त्यांना टॉक्सिन म्हणतात.

ग्राफिक्स

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, शरीराला हानी पोहोचवणारी रसायनं आणि औषधांचा अतिप्रमाणात घेतलेला डोस यांचाही यात समावेश होऊ शकतो.

परंतु, हे पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी शरीरात स्वतःची अशी एक यंत्रणा असते.

यकृत (लिव्हर) रक्तातील नको असलेले पदार्थ फिल्टर करतं म्हणजे ते गाळून वेगळं करतं आणि शरीराला हानिकारक पदार्थांपासून वाचवण्यास मदत करतं. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि नको असलेले पदार्थ लघवीतून बाहेर टाकतं.

लिव्हर आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्याही विशेष घरगुती उपायाची गरज नसते. संतुलित आहार घेणे, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे आणि पुरेसं पाणी पिणे यामुळे हे अवयव व्यवस्थित कार्य करण्यास मदत होते.

घरी स्वतःहून शरीर डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस म्हणजेच एनएचएसने दिला आहे.

एखाद्याने हानिकारक पदार्थ गिळला असेल, श्वासावाटे आत घेतला असेल किंवा औषधांचा जास्त डोस घेतला असेल, तर त्याने लगचेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सर्दी झाल्यावर काय केल्याने आराम मिळू शकतो?

एनएचएसच्या मते, सर्दी विषाणूंमुळे होते आणि ती सहसा आपोआप बरी होते. लवकर बरं वाटण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणं, भरपूर पाणी पिणं आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

कांद्याचं सूप प्यायल्याने शरीराला पाणी आणि पोषक घटक मिळू शकतात. यामुळे घशातील खवखव कमी होण्यापासूनही काहीसा आराम मिळू शकतो.

परंतु तज्ज्ञांच्या मते, आजार बरा होणं आणि त्याची लक्षणं थोडी कमी होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

डॉ. सुलेटा म्हणतात, “सर्दी सहसा आपोआप बरी होते. तुम्ही त्यावर कोणताही उपचार केला किंवा नाही केला, तरी ती साधारण आठवडाभरात बरी होते. कांद्याचं सूप त्याला लवकर बरं करत नाही.”

कांदा

कांदा शिजवताना त्यातील काही ‘व्हिटॅमिन सी’ नष्ट होतात. परंतु, त्यातील काही भाग पाण्यात मिसळतो. त्यामुळे सूप प्यायल्यावर हे ‘व्हिटॅमिन सी’ शरीराला मिळू शकतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

पण संशोधनानुसार कच्च्या कांद्यात ‘व्हिटॅमिन सी’ जास्त प्रमाणात टिकून राहतं. कांदा बराच वेळ उकळल्यास त्यातील ‘व्हिटॅमिन सी’चं प्रमाण कमी होतं.

सर्दीसोबत तीव्र ताप किंवा इतर लक्षणं काही दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज भासू शकते.

परंतु, मुलांच्या बाबतीत त्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज पडू शकते.

दाव्यांपेक्षा योग्य उपचारांवर भर द्या

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील प्रत्येक सूज किंवा दाह कमी करण्याची गरज नसते.

खरं तर, शरीरात संसर्ग झाला किंवा दुखापत झाली की, त्याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती काम करते. सूज ही त्याच प्रक्रियेचा एक भाग असते.

यामुळे शरीराला स्वतःचा बचाव करण्यास आणि खराब झालेल्या भागाची (उतींची) दुरुस्ती सुरू करण्यास मदत होते.

सूज शरीराच्या कोणत्या भागात आहे आणि ती कशामुळे झाली आहे, हे समजून घेतल्यानंतरच पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला पाहिजे.

सूज, वेदना आणि त्या जागी उष्णता जाणवणं ही त्याची सामान्य लक्षणं असू शकतात.

पण ही लक्षणं कायम राहिली किंवा त्यासोबत कारण समजत नसलेली इतर लक्षणं दिसली, तर कांदा वापरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

डॉ. सुलेटा म्हणतात, “अशा दाव्यांमुळे लोक योग्य उपचार घेण्यास उशीर करतात, ही एक गंभीर समस्या आहे.”

त्या इशारा देतात की, इंटरनेटवरील आरोग्यविषयक दावे खरे वाटावेत म्हणून अनेकवेळा वैद्यकीय आणि वैज्ञानिक शब्दांचा वापर केला जातो. परंतु, बऱ्याचदा या दाव्यांमागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नसतो.

जर कोणी कांदा, एखादं सप्लिमेंट किंवा दुसरं उत्पादन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं किंवा शरीर डिटॉक्स करतं, असा दावा करत असेल, तर डॉ. सुलेटा त्यांना काही थेट प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात.

त्या म्हणतात, “थोडं अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारा. नेमके कोणते विषारी पदार्थ? ही पद्धत नेमकी कशी काम करते?”

“समोरची व्यक्ती हा उपाय कसा काम करतो, हे नीट समजावून सांगू शकत नसेल, तर ती एक धोक्याची सूचना समजा.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC