Home LATEST NEWS ताजी बातमी दिल्ली पोलिसांनी आंदोलनावेळी महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप; तपास क्राइम ब्रांचकडे

दिल्ली पोलिसांनी आंदोलनावेळी महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप; तपास क्राइम ब्रांचकडे

4
0

Source :- BBC INDIA NEWS

दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करताना आंदोलक

दिल्लीत 2 महिला पत्रकार आणि एका आंदोलक तरुणीने दिल्ली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान AISA या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेताना ही घटना घडल्याचे या महिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महिला पत्रकाराचा आरोप आहे की, AISA या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष नेहा बोराला ताब्यात घेताना एसीपी विवेक भगत यांनी त्यांच्या छातीवर हात मारला आणि त्यांना धक्का देऊन पुढे गेले.

तसेच, एक वरिष्ठ महिला पत्रकार आणि आंदोलक युवतीने आरोप केला आहे की दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक हल्ला केला आहे.

बीबीसीकडे संसद मार्ग पोलीस स्टेशनला दिलेल्या तिन्ही महिलांच्या तक्रारीची कॉपी आहे. दिल्लीतील एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या संबंधी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. पुराव्यांच्या आधारावर आता पुढील कारवाई करण्यात येईल.

महिला पत्रकारांनी केलेल्या आरोपांबाबत बीबीसीने एसीपी विवेक भगत यांना प्रतिक्रिया विचारली, त्यांनी याबाबत काही उत्तर दिले नाही.

कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनबाहेर जमलेले आंदोलक

याच वेळी दिल्ली पोलिसांनी एक्सवर निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले, “3 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत आंदोलन झाले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना 3 महिला पत्रकारांनी पोलिसांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप लावले आहेत.”

“नवी दिल्ली जिल्ह्याला त्यांची तक्रार मिळाली आहे आणि त्याची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी क्राइम ब्रांचकडे पाठवण्यात आले आहे.”

कॉक्ररोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात एक महिला पत्रकार आपला अनुभव सांगत आहे.

व्हीडिओत महिला पत्रकाराने म्हटलं की, तक्रार दाखल करण्यासाठी त्या संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्या, पण जवळपास 3.5 तास वाट पाहून देखील त्यांच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आली नाही.

जंतर मंतर वर आंदोलनादरम्यान उपस्थित पोलीस कर्मचारी

एका महिला पत्रकाराने सांगितले की, त्यांना पाठिंबा म्हणून अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते पोलीस स्टेशन बाहेर बसले आहेत, पण पोलिसांनी त्यावर काही कारवाई केली नाही.

या प्रकरणात पोलिसांनी पत्रकारांना रविवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता संसद मार्ग पोलीस स्टेशनजवळ येण्याचे आवाहन केले होते.

लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिलांनी काय म्हटले?

एका वरिष्ठ महिला पत्रकाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की प्रदर्शनादरम्यान जेव्हा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतलं जात होतं तेव्हा त्या त्यांचे बाईट घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांना पाठीमागून कुणी स्पर्शन करत आहे. नंतर त्यांना असं वाटलं की कुणीतरी प्रायव्हेट पार्टने त्यांच्या पाठीमागच्या बाजूला स्पर्श करत आहे. जसं त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर त्यांना दिसलं की एक पोलीस कर्मचारी त्यांच्या अतिशय जवळ उभा आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की या घटनेचा व्हीडिओ त्यांच्याकडे आहे.

अभिजीत दिपकेंनी ज्या महिला पत्रकाराचा व्हीडिओ शेअर केला आहे त्या महिलेनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की जेव्हा पोलीस नेहा बोरांना ताब्यात घेत होते तेव्हा त्या व्हीडिओ बनवत होत्या. त्या लिहितात, मी पाहिलं की नेहा यांना ताब्यात घेण्यासाठी पुरुष पोलीस अधिकारी होते महिला अधिकारी नव्हत्या.

यावर मी प्रश्न विचारला तर पोलीस अधिकारी विवेक भगत यांनी माझ्या छातीवर हात मारला आणि मला धक्का दिला. त्यांनी मला तिथून जाण्यास सांगितले. दुसऱ्यांदा प्रश्न विचारल्यावर माझ्याजवळ व्हीडिओ आहे असं सांगून मला महिला काँस्टेबलकडून घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तक्रारदारांपैकी महिला आंदोलकानी आपल्या तक्रारीत लिहिले की जेव्हा जंतर-मंतरवर आंदोलनावेळी आंदोलकांना ताब्यात घेतले जात होते तेव्हा पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना कथितरीत्या अनुचित, आपत्तीजनक, अमर्यादित स्वरूपात शारीरिक व्यवहार केला. त्यांना पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या छातीवर हल्ला करण्यात आला.

‘पोलीस आपल्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?’

पोलीस आपल्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का? असा प्रश्न सीजेपीने विचारला आहे.

सीजेपीच्या लीगल अफेअर्स हेड रत्ना सिंह यांनी विचारले, “दिल्ली पोलीस या गंभीर तक्रारीवर कारवाई करण्याचे सोडून एसीपीला पाठिशी घालत आहेत का?”

“दिल्ली पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या अंतर्गत एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. त्या ऐवजी पोलिसांचे असे म्हणणे आहे की, ते आधी प्राथमिक चौकशी करतील आणि सीसीटीव्ही तपासतील. यामुळे ललिता कुमारी जजमेंटवेळी सांगण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे,” असा प्रश्न रत्ना सिंह यांनी विचारला.

सीजेपीच्या लीगल अफेअर्स हेड रत्ना सिंह आणि सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास (संग्रहित फोटो)

रत्ना सिंह यांनी म्हटले की, जोपर्यंत एक महिला असुरक्षित नाही तोपर्यंत सर्वच महिला सुरक्षित नाहीत.

सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनी म्हटले की, अनेक पत्रकार आणि आंदोलक 5 ऑक्टोबरला समोर येतील आणि हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतील की, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर होईल.

सौरव दास यांनी म्हटले की, पोलिसांनी आमच्याकडे लेखी तक्रार आणि व्हीडिओची तपासणी करण्यासाठी वेळ मागितला आहे. आम्ही ही गोष्ट सहन करून घेणार नाहीत.

सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते योंगेंद्र यादव यांनी म्हटले की, या प्रकरणात ताबडतोब एफआयआर व्हायला हवी.

त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, कायद्यानुसार लगेच एफआयआर व्हायला हवी! दिल्लीतील महिला आपल्या सुरक्षेसाठी या अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवतील का?

राहुल गांधी यांनी काय म्हटले?

पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे त्या कार्यपद्धती विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर शनिवारी रात्री म्हटले की जंतर मंतरवर एका महिला पत्रकाराने पोलीस अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप लावला आहे. कित्येक तासांपासून शेकडो पत्रकार फक्त ही मागणी करत आहे की एफआयआर दाखल करुन घ्यावी. हे तर पोलिसांचे मूलभूत काम आहे ना? पण त्यांनी ते देखील केले नाही.

ते पुढे म्हणाले, “आज जंतर मंतरहून अनेक लोकांना ताब्यात घेतले. महिला आंदोलकांसोबत गैरवर्तन केले. त्यांचे कॅमेर हिसकावून घेण्यात आले. पत्रकारांना फरपटत ओढण्यात आले. हे पहिल्याच वेळी नाही झालं. हे याआधी देखील आम्ही व्हीडिओत पुराव्यानिशी पाहिलंय की पोलीस अधिकारी महिला आंदोलकांसोबत कसं खराब वर्तन करतात.”

ज्या पोलिसांवर महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच महिलांवर हात उचलत आहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून निवेदन प्रसिद्ध

दिल्ली पोलिसांच्या कथित वर्तनाप्रकरणी प्रेस क्लब ऑफ इंडियाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी महिला पत्रकारांसोबत केलेल्या वर्तनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रेस क्लब ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की “एका महिला पत्रकाराने आरोप लावला आहे की एसीपीने तिच्यासोबत कथितरीत्या गैरवर्तन केले आणि लैंगिक शोषण केले. पत्रकारानुसार ती शनिवारी रात्री कित्येक तास संसद मार्ग पोलीस स्टेशनबाहेर एफआयआर नोंदवण्यासाठी प्रयत्न करत होती पण तिच्या तक्रारीवर पोलिसांनी अजून कारवाई केली नाही.”

“अनेक स्वतंत्र संस्थान आणि पोर्टलच्या पत्रकारांनी त्यांना सांगितले की त्यांच्याकडे प्रेस कार्ड होते आणि त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की आम्ही मीडियातून आलो आहोत. तरीदेखील पोलिसांनी त्यांच्यासोबत हिंसक आणि आक्रमक व्यवहार केला. काही पत्रकारांना आंदोलकांसोबत ताब्यात घेण्यात आले.”

प्रेस क्लब ऑफ इंडियाने म्हटले की दिल्ली पोलिसांनी महिला पत्रकाराच्या तक्रारीवर लगेच कारवाई करावी.

त्याच बरोबर या गोष्टीचा देखील पोलिसांनी काळजी घ्यायला हवी की पत्रकारांना त्यांचे काम करण्याचे योग्य वातावरण मिळावे. त्यांना पोलिसांच्या धमक्या आणि आक्रमकतेचा सामना करावा लागू नये असे देखील प्रेस क्लबने म्हटले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC