Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images
सोशल मीडिया आणि मीम्सच्या दुनियेत 2 ऑक्टोबर या तारखेचा आणखी एक अर्थ म्हणजे- ‘दृश्यम’.
आतापर्यंत तुम्हाला समजलं असलंच असेलच की, 2 ऑक्टोबरला विजय साळगावकर आपल्या कुटुंबासोबत स्वामी चिन्मयानंदजींच्या आश्रमात सत्संगाला गेला होता, तिथे त्यांनी पावभाजी खाल्ली आणि 3 ऑक्टोबरला ते परत आले होते!
चित्रपटाच्या रिलीजची तारीखसुद्धा आता या कथेचाच एक भाग बनली आहे. अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम’चा तिसरा आणि अखेरचा भाग आता त्याच ऐतिहासिक तारखेला, म्हणजेच 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
2022 मध्ये कोव्हिडनंतर जेव्हा थिएटर्स पुन्हा सुरू झाली, तेव्हा एक प्रश्न वारंवार विचारला जात होता- प्रेक्षक पुन्हा पूर्वीसारखं चित्रपटगृहांमध्ये येतील का?
ओटीटीचा प्लॅटफॉर्म्सचा वाढता प्रभाव, प्रेक्षकांच्या बदललेल्या सवयी आणि कोरोनाचा मोठा काळ यामुळे चित्रपट व्यवसायाला मोठा फटका बसला होता. अशा वेळी ‘दृश्यम 2’ हा चित्रपट निर्णायक ठरला, ज्याने प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे खेचून आणलं आणि चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली.
345 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘दृश्यम 2’ हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला होता.
‘स्क्रिन’च्या माहितीनुसार ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ या चित्रपटाची जगभरातील कमाई 300 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
‘स्क्रिन’च्या मते, “धमाकेदार ओपनिंग वीकेंडनंतर अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ या चित्रपटाच्या कमाईत पहिल्या सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. चित्रपटाने चौथ्या दिवशी 16,274 शोमधून 21 कोटी रुपयांचे निव्वळ (नेट) कलेक्शन केले.”
“रविवारी (4 ऑक्टोबर) या चित्रपटाने 61 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासोबतच चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 197 कोटी रुपये, तर एकूण (ग्रॉस) कलेक्शन 237 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सध्या या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 303 कोटी रुपये झाली आहे.”
फोटो स्रोत, ANI
एका सामान्य कुटुंबाच्या या असामान्य कथेमध्ये नक्की काय जादू आहे? लोक वारंवार या सस्पेन्सच्या चक्रव्यूहात का ओढले जात आहेत?
या प्रश्नाचं उत्तर केवळ ‘दृश्यम 3’ मध्येच नाही, तर सुमारे 13 वर्षांपूर्वी मल्याळम सिनेमापासून सुरू झालेल्या संपूर्ण कथेत दडलं आहे.
कथेतील वेगळेपण
‘दृश्यम’ हा मूळ मल्याळम चित्रपट 2013 मध्ये आला होता. लेखक-दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी मल्याळम सुपरस्टार मोहनलालची ‘जॉर्जकुट्टी’च्या भूमिकेसाठी निवड केली होती.
या भूमिकेशी आणि कथेतील सस्पेन्सशी प्रेक्षक इतकं जोडलं गेले की, ‘दृश्यम’ हा त्या काळातील सर्वात यशस्वी मल्याळम चित्रपट ठरला होता.
नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या भारतीय भाषांव्यतिरिक्त श्रीलंका, चीन आणि इंडोनेशियामध्येही या चित्रपटाचे यशस्वी रिमेक झाले. म्हणजेच, या कथेनं भाषिक आणि प्रादेशिक सीमा सहज ओलांडल्या.
फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images
या चित्रपटाची हिंदी आवृत्ती 31 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाली आणि तो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. याचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. हिंदी प्रेक्षकांसाठी अजय देवगण ‘विजय साळगावकर’ बनला, तर तब्बू ‘आयजी मीरा देशमुख’च्या भूमिकेत दिसली.
पण प्रत्येक भाषेत ‘दृश्यम’चा खरा हिरो त्याची स्क्रिप्ट म्हणजे पटकथाच राहिली. ती एक अशी अनोखी कथा आहे, जिथे डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक गोष्ट नेहमीच खरी नसते.
आपल्याला जे दाखवलं जातं, त्यावरच आपण विश्वास ठेवतो आणि इथूनच ‘दृश्यम’चा खरा खेळ सुरू होतो. विजयने पुरावे नष्ट केले नाहीत, तर त्याने लोकांच्या आठवणीच बदलून टाकल्या.
प्रत्येक वेळी प्रेक्षकांना वाटतं, “आता तर विजय नक्की अडकणार!” परंतु, दरवेळी कथा आश्चर्याचा धक्का देते. जबरदस्त सस्पेन्ससोबतच पात्रांचा अतिशय साधेपणा या चित्रपटाला खास बनवतो.
एक नवा प्रकार – फॅमिली थ्रिलर
चित्रपट आणि ओटीटीवर ‘थ्रिलर’ हा अतिशय यशस्वी प्रकार मानला जातो. खून, रहस्य, पोलिसांचा तपास आणि गुन्हेगारी अशा विषयांवर आधारित चित्रपट आणि वेब सिरीजची अजिबात कमतरता नाही.
परंतु, सहसा थ्रिलर चित्रपट हे कौटुंबिक मनोरंजनाचा प्रकार मानला जात नाही. त्यात अनेकदा हिंसाचार, गुन्हेगारी, शिवीगाळ, अश्लील भाषा किंवा बोल्ड सीन असतात, जे एकत्र बसून पाहताना भारतीय कुटुंबांना अस्वस्थ किंवा अवघडल्यासारखं वाटू शकतं.
‘दृश्यम’ने हे समीकरणच बदलून टाकलं आणि ‘फॅमिली थ्रिलर’ नावाचा एक नवीन प्रकार म्हणजेच जॉनर तयार केला.
फोटो स्रोत, STR/AFP via Getty Images
थ्रिलर चित्रपटांचं सर्वात मोठं आव्हान असतं प्रेक्षकांना वारंवार धक्का देणं. ‘दृश्यम’ने हा नियमसुद्धा बदलला. इथे खरा सस्पेन्स गुन्हेगार कोण आहे हा नाहीच, कारण ती गोष्ट प्रेक्षकांना आधीपासूनच माहीत असते.
खरा सस्पेन्स यात आहे की, हे कुटुंब वाचू शकेल का? विजयने आखलेल्या प्लॅनमध्ये काही चूक होईल का? म्हणजेच, हा चित्रपट रहस्य लपवण्याऐवजी, ते रहस्य उघडं पडण्याच्या भीतीतून थरार निर्माण करतो.
या सिरीजची एक फारशी चर्चा न झालेली खास गोष्ट म्हणजे, यातला हिरो वारंवार जिंकूनही त्याला दिलासा किंवा सुटका झाल्यासारखं वाटत नाही.
सामान्य थ्रिलर चित्रपटात ‘सत्य बाहेर येण्याची भीती’ किंवा गुपित उघड होण्याच्या भीतीमुळे प्रेक्षकांना थरार अनुभवता येतो. पण ‘दृश्यम’मध्ये तीच भीती पात्रांसाठी एक मानसिक ताण ठरते. हाच फरक या चित्रपटाला केवळ सस्पेन्स न ठेवता एक सखोल मानसशास्त्रीय (सायकोलॉजिकल) कथा बनवतो.
कोणताही चित्रपट दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी केवळ चांगली कथा पुरेशी नसते. प्रेक्षकांचे त्या चित्रपटाशी भावनिक नातं जुळणंही तितकंच गरजेचं असतं.
‘दृश्यम’मध्ये हे भावनिक नातं खूप घट्ट आहे. ही अशा माणसाची कथा नाही, ज्याच्याकडे प्रचंड पैसा, ताकद किंवा राजकीय वजन आहे. ही एका सामान्य कुटुंबाची गोष्ट आहे, जे एका अचानक आलेल्या मोठ्या संकटात अडकलं आहे.
याच भावना प्रेक्षकांना या कथेशी आणि पात्रांशी जोडून ठेवतात.
कथेला ‘भारतीय’ स्पर्श का वाटतो?
‘दृश्यम’च्या यशाचं एक मोठं कारण म्हणजे हा चित्रपट केवळ भारतीय भाषेत तयार झाला आहे असं नाही, तर ही कथा पूर्णपणे भारतीय समाज आणि संस्कृतीत रुजलेली आहे. परंतु तरीही, यातील भावना प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत.
भारतीय समाजात कुटुंबाचं स्थान खूप मोठं आहे. आई-वडिलांसाठी मुलं म्हणजे केवळ मुलं नसतात, तर त्यांच्या सुरक्षिततेविषयी, भविष्याविषयी आणि सन्मानाविषयीच्या भावना अतिशय खोलवर जडलेल्या असतात.
अशा वेळी जेव्हा कथेमध्ये एक वडील आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी कायद्याशी संघर्ष करताना दिसतो, तेव्हा प्रेक्षक आपोआपच त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात.
या थ्रिलरमध्ये मोठे गॅजेट्स, धोकादायक स्टंट किंवा मसाला चित्रपटांसारखा ग्लॅमर नाही. विजय हा काही खूप श्रीमंत किंवा ताकदवान माणूसही नाही.
तो पोलीस नाही, गुप्तहेर नाही किंवा मारामारी करणारा हिरोसुद्धा नाही. तो केवळ चौथी नापास एक साधा केबल ऑपरेटर आहे.
फोटो स्रोत, STR/AFP via Getty Images
हा असा माणूस आहे, ज्याला आपण रोज सकाळी गल्लीत दूध विकत घेताना, मुलांना शाळेत सोडताना आणि सर्वांशी हसून बोलताना दिसतो. एकदम सामान्य माणूस.
त्याची खरी ताकद त्याचं डोकं म्हणजेच त्याची बुद्धिमत्ता आहे, जी पोलिसांपेक्षा दोन पावलं पुढचा विचार करते. तो आपल्या बायकोला आणि मुलींना फक्त वाचवत नाही, तर त्यांना स्वतःच्या प्लॅनमध्ये सहभागीसुद्धा करून घेतो. संकटाच्या वेळी हे संपूर्ण कुटुंब एकमेकांवर विश्वास ठेवून एकजुटीने, खंबीरपणे उभं राहतं.
‘दृश्यम’ प्रेक्षकांना एक नैतिक प्रश्नसुद्धा विचारतो- विजयने जे काही केलं, ते योग्य होतं की अयोग्य?
हा चित्रपट याच नैतिक गोंधळाचा अतिशय प्रभावीपणे वापर करतो.
एका खुनाने सुरू होणारा हा चित्रपट अखेरीस कुटुंबाची कथा बनतो. हा सामना पोलीस आणि एका गुन्हेगार ठरलेल्या वडिलांमधला आहे, परंतु प्रेक्षकांचं मन मात्र त्या वडिलाच्याच पाठीशी उभं राहतं.
‘दृश्यम’चं यश कदाचित याच एका प्रश्नावर अवलंबून आहे- जर तुमच्या कुटुंबावर असा प्रसंग आला, तर तुम्ही काय कराल?
हाच एक प्रश्न या चित्रपटाला केवळ एक सामान्य क्राईम थ्रिलर न ठेवता, एक कौटुंबिक चित्रपटाचं स्वरूप देतो.
‘सिनेमा’ हेच विजयचं मुख्य हत्यार
‘दृश्यम’ची सर्वात सुंदर बाजू म्हणजे यातल्या नायकाचं सिनेमावर असणारं प्रेम. इथे नायक चित्रपटांचा कमालीचा वेडा आहे. जॉर्जकुट्टी किंवा विजयने आयुष्याचं शिक्षण किंवा धडे कोणत्याही कॉलेजमध्ये नाही, तर सिनेमे पाहून घेतले आहे. हीच गोष्ट ‘दृश्यम’ला अधिक रंजक बनवते.
ज्या लोकप्रिय सिनेमाला मोठे विचारवंत किंवा बुद्धिजीवी केवळ वेळ घालवण्याचं किंवा हलकं-फुलकं मनोरंजनाचं साधन मानतात, ‘दृश्यम’ त्याच सिनेमाला आपल्या नायकाची सर्वात मोठी ताकद बनवतो.
तो चित्रपटांमधूनच लोकांच्या वागण्या-बोलण्याचा म्हणजेच वर्तणुकीचा अंदाज घेतो, पोलिसांच्या तपासाची पद्धत समजून घेतो आणि एखादा गुन्हा घडल्यावर चौकशी कशी पुढे जाऊ शकते, हे समजून घेतो.
‘दृश्यम 2’ पर्यंत पोहोचता पोहोचता विजय स्वतः एक चित्रपट निर्माता बनतो. आपल्या या नवीन ओळखीचा वापरसुद्धा तो आपल्या प्लॅनमध्ये अतिशय हुशारीने करतो.
प्रत्येक वेळी नवीन डाव आणि नवीन खेळी
‘दृश्यम’ हा बुद्धिबळासारखा विचारांचा खेळ आहे, जिथे प्रत्येक वेळी डाव आणि चाल बदलते. ‘दृश्यम 2’ समोर हेच आव्हान होतं की, पहिल्या भागासारखाच थरार पुन्हा कसा निर्माण करायचा.
चित्रपटाने याचं उत्तर अतिशय प्रभावीपणे दिलं. या वेळी प्रश्न होता की- भूतकाळ कधी पूर्णपणे गाडला जाऊ शकतो का? शेवटी मृतदेह लपवण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतचा प्लॅन खूपच थरारक होता.
परंतु ‘दृश्यम 3’ पर्यंत येता येता परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली.
मल्याळम भाषेतील ‘दृश्यम 3’ मे 2026 मध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप मोठं यश मिळवलं असलं, तरी समीक्षकांच्या मते हा भाग पहिल्या 2 चित्रपटांच्या तोडीचा ठरला नाही.
‘दृश्यम 3’चे (मल्याळम) परीक्षण करताना ‘मिड-डे’ या वृत्तपत्राने लिहिलंय, “पहिल्यांदा पाहताना असं वाटू शकतं की, या तिसऱ्या भागातील ट्विस्ट आणि वळणं पहिल्या दोन भागांइतकी धक्कादायक किंवा प्रभावी नाहीत. परंतु, खरी गोष्ट हीच आहे! आधीच्या चित्रपटांसारखं या वेळी जॉर्जकुट्टीच्या हातामध्ये कथेची सूत्रं पूर्णपणे राहत नाहीत.”
फोटो स्रोत, Universal
दुसरीकडे, ‘हिंदुस्तान टाईम्स’ने ‘दृश्यम 3’ला “जीतू जोसेफ यांच्या या सुपरहिट सीरिजचा (फ्रँचायझीचा) सर्वात कमकुवत भाग” म्हटलं आहे.
अजय देवगणच्या हिंदी ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांमध्ये जीतू जोसेफ यांच्या मूळ मल्याळम चित्रपटांची कथाच जशीच्या तशी घेण्यात आली होती.
त्यानंतर अशी बातमी आली की, हिंदी ‘दृश्यम 3’च्या कथेत बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी अजय देवगणनेही या गोष्टीला दुजोरा दिला.
तो म्हणाला की ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ पूर्णपणे नवीन पटकथेसह तयार करण्यात आला आहे. हे कथेत केलेले किरकोळ बदल नसून, हिंदी भाग मल्याळम ‘दृश्यम 3’ पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा या सिरीजचा शेवटचा चित्रपट असेल. प्रत्येक चांगल्या कथेचा असा एक टप्पा असतो, जिथे ती थांबली पाहिजे.
‘दृश्यम’ हा सिनेमा यासाठीही लक्षात राहिला पाहिजे की, निव्वळ हिट झाला म्हणून त्याची कथा उगाच पुढे ताणली गेली नाही, तर योग्य वेळीच तिला पूर्णविराम दिला गेला.
13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर या कथेवर पडदा पडणार आहे. अपेक्षा हीच आहे की ‘दृश्यम’च्या या जादूमध्ये शेवटचा डाव यशस्वी ठरेल आणि या कथेचा शेवट कायम स्मरणात राहील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




