Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
या घटनेमध्ये भारतीय नागरिकही प्रभावित झाले आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
मंत्रालयानं सांगितलं की, टोगोचा ध्वज असलेल्या अल्फा वतन, पलाऊचा ध्वज असलेल्या एबल आणि लायबेरियाचा ध्वज असलेल्या अफ्रामॅक्स रिओ या जहाजांवर हल्ला झाला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, एबल जहाजावर सात भारतीय नागरिकांसह एकूण 18 खलाशी होते. या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
बल्गेरियन अधिकाऱ्यांच्या मदतीनं सर्व खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांची बल्गेरियातील वर्ना शहरात राहण्याची सोय करण्यात आली आहे.
जखमी भारतीय नागरिकावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भारत सरकारनं बल्गेरियन अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
मंत्रालयानं सांगितलं की, अफ्रामॅक्स रिओ जहाजावरील सर्व 23 कर्मचारी भारतीय नागरिक असून त्यांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
मात्र, अल्फा वॅटन जहाजाच्या कर्मचाऱ्यांविषयीची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.
परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, व्यापारी जहाजांवर होणारे सततचे हल्ले भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहेत.
भारतानं असे हल्ले तात्काळ थांबवण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या घटना तात्काळ थांबल्या पाहिजेत.
आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांची सुरक्षा अबाधित राखणं आणि खलाशांचं संरक्षण करण्याचं महत्त्व या मुद्द्यांवरही भारतानं जोर दिला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




