Home LATEST NEWS ताजी बातमी न्यूमोनिक प्लेगची भीती किती खरी? हा आजार जगभर पसरण्याची शक्यता कमी का...

न्यूमोनिक प्लेगची भीती किती खरी? हा आजार जगभर पसरण्याची शक्यता कमी का आहे?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्लेग

सायबेरियामधील प्लेग संशोधन केंद्रात एका रशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. पण, न्यूमोनिक प्लेगचा संसर्ग सहसा सहजपणे नियंत्रणात आणता येतो, यामागे अनेक कारणं आहेत.

हे काहीसं ओळखीचं आणि भीतीदायकही वाटू शकतं.

मागील आठवड्यात शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सायबेरियात एका महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. या न्यूमोनियाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या महिलेला प्लेगचा संसर्ग होण्याची शक्यता होती.

रशियन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे 200 लोकांना खबरदारी म्हणून वेगळं म्हणजेच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी मात्र लगेचच लोकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. तरीही सोशल मीडियावर याबाबत अनेक तर्क-वितर्क आणि भीती पसरत आहे.

28 वर्षीय दार्या शिपिलोव्हा या सायबेरियातील इर्कुत्स्क भागातील अँटी-प्लेग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होत्या. काही खात्री न झालेल्या वृत्तांनुसार, प्लेगचे जीवाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटल्यानंतर किंवा मंगोलियाच्या सीमेजवळील बुर्याटिया भागात फील्ड ट्रिपवरून परतल्यानंतर त्यांना न्यूमोनियासारखी लक्षणं दिसू लागली. या भागात वन्य प्राण्यांमध्ये प्लेगचा संसर्ग आढळून येतो.

सध्या दार्या शिपिलोव्हा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्याबाबत प्रयोगशाळेत तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एक गोष्ट स्पष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे प्लेगचा जगभर फैलाव होण्याची शक्यता नाही. यामागची कारणं काय आहेत, ते आपण जाणून घेऊया.

प्लेग हा येर्सिनिया पेस्टिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. या आजाराचे मुख्य 3 प्रकार आहेत- ब्युबोनिक प्लेग, न्यूमोनिक प्लेग आणि सेप्टिसीमिक प्लेग.

ब्युबोनिक प्लेग हा प्लेगचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा आजार संक्रमित पिसू चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. शरीरात गेल्यानंतर हा जीवाणू लसिका ग्रंथीपर्यंत (लिम्फ नोड्स) पोहोचतो. त्यामुळे जांघ, मान आणि काखेत वेदनादायक गाठी किंवा सूज येते. यांना ‘ब्युबोज’ म्हणतात.

ब्युबोनिक प्लेग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची शक्यता खूपच कमी म्हणजे दुर्मीळ असते. पण, हा जीवाणू रक्तात पसरला तर सेप्टिसीमिक प्लेग, तर फुफ्फुसांमध्ये पोहोचला तर न्यूमोनिक प्लेग होऊ शकतो.

इतर प्रकारच्या प्लेगपेक्षा न्यूमोनिक प्लेग जरा वेगळा आहे. हा आजार खोकताना किंवा शिंकताना हवेत मिसळणाऱ्या बारीक म्हणजेच अतिसूक्ष्म थेंबांमधून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास न्यूमोनिक प्लेग जीवघेणा ठरू शकतो. संसर्ग झाल्यापासून अवघ्या 24 तासांतही त्याची लक्षणं दिसू शकतात.

मात्र, आजच्या काळात प्लेग इतक्या सहजपणे पसरत नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होणारा न्यूमोनिक प्लेग उपचार न केल्यास जवळपास नेहमीच जीवघेणा ठरतो. मात्र, आज या आजारावर सहज उपलब्ध असलेल्या साध्या अँटिबायोटिक्सनेही उपचार करता येतात.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ प्राध्यापक पिएरो ऑलियारो म्हणतात, “ब्युबोनिक प्लेगवर अत्यंत प्रभावी ठरणारे दोन उपचार आमच्याकडे उपलब्ध आहेत.”

जैविक दहशतवादाचा धोका

यात संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं, रुग्णालयांना मार्गदर्शन करणं आणि आवश्यक औषधं व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

प्लेगचा जैविक हत्यार म्हणून वापर होण्याचा धोका कमी मानला जातो. पण, इतिहासात प्लेगचा अशा प्रकारे वापर झाल्याच्या घटनांची नोंद आहे. काही वृत्तांनुसार, 14व्या शतकामध्ये संक्रमित मृतदेह शत्रूंच्या भागात फेकले जात असत. तसेच, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी सैनिकांनी चीनमधील नागरिकांमध्ये प्लेग पसरवण्यासाठी संक्रमित पिसूंचा वापर केला होता.

प्लेग

2025 मध्ये पिएरो ऑलियारो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मादागास्करमध्ये ब्युबोनिक प्लेगवरील उपचारांसाठी पहिली रँडमाइज्ड कंट्रोल्ड चाचणी घेतली. या चाचणीमध्ये दोन अँटिबायोटिक्स प्रभावी ठरल्याचं दिसून आलं. तोंडावाटे घेण्याच्या सिप्रोफ्लोक्सासिनने 91 टक्के, तर इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या अमिनोग्लायकोसाइड अँटिबायोटिकने 92 टक्के रुग्ण बरे झाले.

काही रुग्णांमध्ये प्लेग फुप्फुसांपर्यंत पोहोचून न्यूमोनिक प्लेग झाला. परंतु, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे असे सुमारे 85 टक्के रुग्ण बरे झाले आणि बचावले.

प्लेगची महासाथ पसरण्याची शक्यता कमी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे कोव्हिड-19 प्रमाणे न्यूमोनिक प्लेग लक्षणं दिसण्याआधी पसरत नाही. साधारणपणे संसर्ग झाल्यानंतर 24 तासांच्या आत लक्षणं दिसू लागतात.

ही लक्षणं तीव्र आणि सहज लक्षात येण्यासारखी असतात. त्यामुळे रुग्णांची लवकर ओळख पटवून त्यांना विलगीकरणात ठेवता येतं आणि उपचार करता येतात. त्यामुळे इतर लोकांना संसर्ग होण्याआधीच आजाराचा फैलाव रोखता येऊ शकतो.

बर्मिंगहॅम विद्यापीठातील व्हायरल इम्युनॉलॉजीच्या सहयोगी प्राध्यापिका झानिया स्टॅमाटाकी म्हणतात, “हा आजार लपून राहणारा नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती विमानाने प्रवास करत राहील आणि अनेक ठिकाणी संसर्ग पसरत राहील, असं होणार नाही.”

त्यांच्या मते, हा आजार पसरू लागला तर तो फार लवकर लक्षात येईल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. सध्या यापैकी कोणालाही आजाराची लक्षणं दिसून आलेली नाहीत.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या (सीडीसी) मार्गदर्शक सूचनांनुसारही धोका असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर लक्ष ठेवणं, तपासणी करणं, गरज असल्यास त्यांना विलगीकरणात ठेवणं आणि अँटिबायोटिक्स देता येतील.

मानवाच्या इतिहासात प्लेगच्या तीन मोठ्या साथी किंवा महामारी येऊन गेल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमायर यांनी मंगळवारी सुरुवातीचा धोका किती आहे, याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, “इर्कुत्स्क भागात धोका मध्यम ते कमी आहे. संपूर्ण रशियासाठी हा धोका कमी असून, डब्ल्यूएचओच्या युरोपियन भागासाठी तो अत्यंत कमी आहे.”

सर्वसाधारणपणे, प्रयोगशाळेत प्लेगचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. कारण अशा ठिकाणी अपघाती संसर्ग टाळण्यासाठी कडक नियमावली (प्रोटोकॉल्स) आणि सुरक्षेच्या उपाययोजना असतात. स्टॅमाटाकी म्हणतात, “ही अतिशय विशेष प्रकारची प्रयोगशाळा असते. तिथे सुरक्षेचे अनेक स्तर असतात.”

उदाहरणार्थ, स्टॅमाटाकी सांगतात की, संशोधक संपूर्ण सुरक्षा साधनं पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) परिधान करून काम करतात. तसेच, नमुने केवळ खास बायोसेफ्टी कॅबिनेटमध्येच हाताळले जातात.

या कॅबिनेटमध्ये हवा बाहेर न जाता आत खेचली जाते. त्यामुळे एखादी टेस्ट ट्यूब फुटली तरी ती कॅबिनेटच्या आतच फुटते आणि तिथे काम करणारी व्यक्ती सुरक्षित राहते.

स्टॅमाटाकी सांगतात की, टेस्ट ट्यूब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतानाही ती आणखी एका सुरक्षित कंटेनरमध्ये (सेकंडरी कंटेनमेंट व्हेसल) ठेवली जाते. अशा प्रयोगशाळांमध्ये काम करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना कठोर प्रशिक्षणही दिलं जातं.

चौदाव्या शतकात प्लेग इतक्या वेगाने पसरण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्यावेळची राहणीमानाची खराब परिस्थिती. रस्त्यांवर कचरा आणि अन्न पडलेले असायचे. त्यामुळे प्लेग पसरवणाऱ्या पिसू असलेल्या काळ्या उंदरांना वाढण्यासाठी अनुकूल जागा मिळायची.

लोक एकमेकांच्या अत्यंत जवळ राहत आणि व्यापारीही अनेक महिने गर्दीच्या जहाजांमध्ये प्रवास करत असत. आज जगातील बहुतांश भागात अशा परिस्थिती राहिलेली नाही.

दरवर्षी माणसांमध्येही प्लेगची काही प्रकरणं आढळून येतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये दरवर्षी सरासरी साधारण 7 लोकांना प्लेगची लागण होते. जगातील काही भागांमध्ये अधूनमधून प्लेगची स्थानिक साथही येते. अशा वेळी न्यूमोनिक प्लेग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो.

2017 मध्ये मादागास्करमध्ये प्लेगची मोठी साथ आली होती. त्यावेळी 2417 रुग्ण आढळून आले आणि 209 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, ऑलियारो सांगतात की ही साथ काही काळानंतर थांबली. यावरून प्लेगची साथ सहसा एखाद्या विशिष्ट भागापुरतीच मर्यादित राहते आणि तिचं रूप जगभर पसरलेल्या महामारीमध्ये होत नाही, हे दिसून येतं.

प्लेगची साथ जगभर पसरण्याची शक्यता कमी असली, तरी प्लेगचा उपचार आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि गुंतवणूक करणं गरजेचं आहे.

ऑलियारो म्हणतात, “जगभरात या आजाराचा फार मोठा परिणाम होत नसला, तरी प्लेगमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. हा एक महत्त्वाचा आजार आहे. त्यामुळे प्लेग आजही अस्तित्वात आहे, हे आपण विसरता कामा नये.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC