Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Ajinkya Shinde/Instagram
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
भारतीय निवडणूक आयोगातील कथित गैरव्यवहार, मतदार यादीतील पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलन पुकारलं आहे. परंतु, त्यापूर्वीच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांच्याकडून एक व्हीडिओ जारी करत आपल्या गैरहजेरीत सीजेपी आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे दिलं आहे.
अभिजित दिपके यांनी आपल्या व्हीडिओत लोकांना आवाहन करत म्हटलं, “हा व्हीडिओ जर तुम्ही पाहत असाल तर समजून घ्या की मला (अभिजित दिपके), आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक करण्यात आली आहे. आमच्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे करतील. त्यामुळे सर्वांनी अजिंक्य शिंदेला फॉलो करावं. आमच्या गैरहजेरीत सीजेपीचं आंदोलन ते पुढे नेतील.”
या पार्श्वभूमीवर अजिंक्य शिंदे यांच्याविषयी जाणून घेऊयात.
आपण अर्धी लढाई जिंकलीय – अजिंक्य शिंदे
सीजेपीने एक प्रेस नोट जारी करून या घडामोडींची माहिती दिली.
आंदोलनाची धुरा हाती घेतल्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी आरोप केला की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं कठोर निर्बंध लादले आहेत.
सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा उल्लेख करत त्यांनी हे सरकार घाबरल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं.
फोटो स्रोत, UGC
“प्रचंड भीती आणि आंदोलन दडपण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली आहे. देशभरातील नागरिक एकजुटीने एकत्रित येत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे,” असं मत अजिंक्य शिंदे यांनी व्यक्त केलं.
प्रत्येक नागरिकाने जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
ते पुढे, “रस्त्यात कुठेही बॅरिकेड्स लावून किंवा पोलिसांनी तुम्हाला अडवलं, तर थांबू नका. जिथे अडवलं जाईल, तिथेच आंदोलन सुरू करा. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरूच राहील.”
कोण आहेत अजिंक्य शिंदे
अजिंक्य शिंदे मुळचे लातूर जिल्ह्यातील उजनीचे रहिवासी आहेत. ते कम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून (डीबीएटीयू) कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी घेतली आहे.
सामान्य कुटुंबातून आलेले अजिंक्य शिंदे यांचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. सुरुवातीला त्यांनी पुण्यामध्ये आयटी क्षेत्रात काम केलं. त्यानंतर ते आम आदमी पक्षाशी (आप) जोडले गेले.
फोटो स्रोत, UGC
सध्या ते सीजेपीमध्ये सक्रिय आहेत. सीजेपीच्या कोअर टीममधील ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत.
ऑगस्टमध्ये त्यांच्याकडे सीजेपीच्या राष्ट्रीय संघटन प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सीजेपीच्या शाळांशी संबंधित मोहिमेचं नेतृत्वही त्यांनी केलं आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात मुंबई येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाच्या आयोजनातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
लातूर जिल्ह्यातील उजनी येथे त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. कोव्हिडनंतर ते आपल्या गावी परतले. त्यानंतर त्यांनी गावातील छोट्या छोट्या दूध उत्पादकांना एकत्रित करून दूध संकलन केंद्र सुरू केलं. त्यातूनच त्यांनी बासुंदीचा एक स्थानिक ब्रँड तयार केला होता.
त्यांचं हे उत्पादन लातूर जिल्ह्यासह सोलापूर, धाराशिव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जात होतं. यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर आणि गावातील तरुणांच्या हाताला रोजगारही मिळाला.
‘स्कूल ठीक करो’ मोहिमेत महत्त्वाची भूमिका
देशभरातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपीने ‘स्कूल ठीक करो’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या सीजेपीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजिंक्य शिंदे यांचा समावेश होता.
फोटो स्रोत, Ajinkya Shinde/Instagram
अजिंक्य शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असून सीजेपीच्या आंदोलनाविषयी सातत्याने पोस्ट करत असतात. ते सीजेपीशी सुरुवातीपासूनच जोडले गेलेले आहेत.
सीजेपीचे प्रमुख चेहेरे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या गैरहजेरीत ते आता भारतीय निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




