Home LATEST NEWS ताजी बातमी ‘माझ्या रेल्वे कोचमध्ये पुरुष दारू पीत आहेत’, असं फोनवरून घरी कळवणाऱ्या तरुणीचा...

‘माझ्या रेल्वे कोचमध्ये पुरुष दारू पीत आहेत’, असं फोनवरून घरी कळवणाऱ्या तरुणीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

4
0

Source :- BBC INDIA NEWS

हिमश्री बोरो

नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आसामहून विशाखापट्टणमला आलेल्या हिमश्री बोरो परीक्षा देण्यासाठी आपल्या गावी परत निघाल्या होत्या.

त्या कन्याकुमारी-दिब्रुगडदरम्यान धावणाऱ्या विवेक एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. या प्रवासात त्यांनी घरी फोन करून सांगितलं होतं की, या कोचमध्ये काही पुरुष मद्यपान करत आहेत आणि यामुळे भीती वाटतेय.

घरी असा फोन झाल्यानंतर काही वेळानंतर हिमश्री यांचा फोन बंद झाला.

दुसऱ्या दिवशी श्रीकाकुलम जिल्ह्यात रेल्वे रुळांजवळ त्यांचा मृतदेह आढळला.

या सर्व घटना 5 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून 7 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हिमश्री यांचा अपघाताने रेल्वेतून पडून मृत्यू झाला की कुणीतरी त्यांना ढकललं? त्या रात्री रेल्वेत नेमकं काय घडलं? रेल्वे सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळूनही हिमश्री यांचा शोध का लागू शकला नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आंध्र प्रदेश आणि आसाममधील पोलीस तपास करत आहेत.

हिमश्री यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पत्र लिहिलं आहे.

आसामपासून विशाखापट्टणमपर्यंत

आसाममधील गुवाहाटीच्या बोंडा परिसरातील रहिवासी असलेल्या हिमश्री बोरो नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी एका ग्रुपसोबत विशाखापट्टणमला आल्या होत्या.

ग्रुपमधील इतर लोक विशाखापट्टणममध्येच थांबले. मात्र, दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे हिमश्री यांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला.

हिमश्री बोरो

5 ऑक्टोबरला गुवाहाटीला जाण्यासाठी त्यांनी रेल्वेचं तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरक्षित तिकीट उपलब्ध झालं नाही, त्यामुळे त्यांनी सर्वसाधारण श्रेणीचं (जनरल) तिकीट काढून कन्याकुमारी-दिब्रुगडदरम्यान धावणाऱ्या विवेक एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला, असं श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

रेल्वेत आधीपासूनच मोठी गर्दी असल्यामुळे हिमश्री यांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे त्या डब्याच्या दरवाजाजवळ थांबल्या होत्या, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

आरक्षण नसलेले प्रवासीही स्लीपर कोचमध्ये चढल्यामुळे तिथे मोठी गर्दी झाली होती, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रेनमध्ये भीती वाटत असल्याचं फोनवर सांगितलं

हिमश्री कोच नंबर एस-2 मधून प्रवास करत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्या कुटुंबीयांशी फोनवरून बोलल्या.

डब्यात काही पुरुष मद्यपान करत असून आपल्याला भीती वाटत असल्याचं हिमश्री यांनी सांगितल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

रात्री अडीच वाजल्यानंतर हिमश्री यांना फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी रल्वे हेल्पलाईन 139 आणि गुवाहाटी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.

हिमश्री बोरो

हिमश्री यांनी डब्यातील परिस्थिती दाखवणारा एक व्हीडिओ आपल्या मैत्रिणीलाही पाठवला होता. या व्हीडिओमध्ये मद्यपान करताना दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

मात्र, या व्हीडिओमध्ये फारसं संशयास्पद काही दिसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तरीही व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींचा माग काढला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र, मदतवाहिनीला माहिती मिळाली, तेव्हा हिमश्री नेमक्या कोणत्या डब्यातून प्रवास करत होत्या, याची स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती, असं श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक म्हणाले.

महेश्वर रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं, “विजयनगरम स्थानक ओलांडल्यानंतर फोन आला. त्यानंतरचं स्थानक अमदालवलसा होतं. तिथल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हिमश्री यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.”

रेल्वे रुळांजवळ मृतदेह आढळला

7 ऑक्टोबरला श्रीकाकुलम जिल्ह्यातील अमदालवलसा-पोंदुरू रेल्वेमार्गावर बोड्डेपल्ली पेट परिसरात रेल्वे पोलिसांना हिमश्री यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या 2 बॅगा प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्यातच असल्याचं आढळलं.

मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यानंतर मृतदेह श्रीकाकुलमच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

कुटुंबीय श्रीकाकुलमला पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या.

रेल्वेत भीती वाटत असल्याचं सांगणाऱ्या आपल्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, हे स्पष्ट करावं आणि या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

अपघात की कुणी ढकललं?

हिमश्री यांच्या मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. त्या अपघाताने रेल्वेतून पडल्या का? कुणी जाणीवपूर्वक त्यांना ढकललं का? रेल्वेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या छळाचा सामना करावा लागला होता का? या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.

श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात हिमश्री यांच्यावर शारीरिक हल्ला झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

ट्रेन

मात्र, त्या अपघाताने रेल्वेतून पडल्या की त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी रेल्वेतून प्रवास केलेल्या काही प्रवाशांची चौकशी केली आहे. आतापर्यंत चौकशी केलेल्या प्रवाशांपैकी कुणीही डब्यात अशी एखादी घटना घडल्याचं सांगितलेलं नाही, असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं.

आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवणं कठीण जात असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘डब्यात पुरुषांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना भीती वाटली असावी’

या प्रकरणाच्या चौकशीसाठी आसाम सरकारने विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

आसामचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) जी. व्ही. शिवप्रसाद यांनी श्रीकाकुलमला भेट दिली. त्यांनी स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांशी चर्चा करून प्रकरणाची माहिती घेतली.

शिवप्रसाद म्हणाले, “विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे. डब्यातील सर्व प्रवाशांशी संपर्क साधला आहे. आतापर्यंत ठोस संशय निर्माण करणारी बाब समोर आलेली नाही.”

“डब्यात पुरुषांची संख्या जास्त असल्यामुळे हिमश्री यांना भीती वाटली असावी. हा अपघात होता की कुणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं, हे तपासातून स्पष्ट व्हायला हवं.”

घटनास्थळी पोलीस

हिमश्री यांच्या फोनमधील व्हीडिओचीही तपासणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. व्हीडिओमधील बाबींची चौकशी पूर्ण होईपर्यंत मृत्यूचं नेमकं कारण सांगता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नृत्याच्या पथकात मानधनावरून वाद झाला होता का?

हिमश्री यांच्या मृत्यूपूर्वी नृत्याच्या पथकात मानधनाच्या देयकावरून वाद झाल्याचा दावा आसाममधील दिमोरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तपन दास यांनी केला आहे.

विशाखापट्टणममधील कार्यक्रमाच्या आयोजकांकडून मिळणाऱ्या मानधनाची मागणी केल्यामुळे ग्रुपमधील 2 तरुणांवर हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी सांगितल्याचा उल्लेख ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात आहे.

या घटनेनंतर नृत्याचं पथक राहत असलेल्या वसतिगृहातून बाहेर पडलं आणि रेल्वे स्थानकावर पोहोचलं, असंही त्यांनी सांगितलं.

घटनास्थळी पोलीस

हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांपैकी एकाने हिमश्री यांना विवेक एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी मदत केली होती. ही बाब स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रणात दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मात्र, मानधनाच्या वादाचा आणि हिमश्री यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या आरोपांवर कार्यक्रम आयोजकांची प्रतिक्रिया आणि पोलीस तपासातून समोर येणारी माहिती अद्याप स्पष्ट व्हायची आहे.

हिमश्री बोरो या दिमोरिया विधानसभा मतदारसंघातील रहिवासी होत्या.

तपासासाठी विशेष पथकांची नियुक्ती

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्रीकाकुलम जिल्हा पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.

पोलीस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत. रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) 4 कर्मचारीही या चौकशीत सहभागी आहेत.

घटनास्थळाची तपासणी रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब एक्सपर्ट, पुरावे गोळा करणारे पथक, श्वानपथक आणि ड्रोन पथकांनी केली आहे.

घटास्थळी पोलीस

विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण, हिमश्री यांच्या फोनवरील संभाषणांच्या नोंदी, प्रवासाचा तपशील आणि त्यांनी मैत्रिणीला पाठवलेला व्हिडिओ यांची पोलीस तपासणी करत आहेत.

रेल्वेत मद्यपान करत असल्याचं हिमश्री यांनी सांगितलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांची चौकशी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि आसाममधील पोलीस समन्वयाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्र

हिमश्री यांचा मृत्यू अपघाताने झाला की त्यामागे कुणाचा हात आहे, या प्रश्नांची अद्याप स्पष्ट उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे याच मुद्द्यांवर तपास केंद्रित असल्याचं आसामचे पोलीस महानिरीक्षक शिवप्रसाद यांनी सांगितलं.

हिमश्री बोरो यांच्या मृत्यूची सखोल, निष्पक्ष आणि कालमर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 9 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्वतंत्र पत्रं लिहिली.

हिमश्री यांचा रेल्वे प्रवास, त्या बेपत्ता होण्याची घटना आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ज्या परिस्थितीत आढळला, या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC