Home LATEST NEWS ताजी बातमी अमेरिकेत प्राथमिक शाळेत गोळीबार, 3 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू

अमेरिकेत प्राथमिक शाळेत गोळीबार, 3 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू

5
0

Source :- BBC INDIA NEWS

या घटनेसाठी जबाबदार असलेल्या 16 वर्षीय संशयित हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 3 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या मुलांचं वय हे 5, 8 आणि 11 वर्षं होतं. या गोळीबारात 7 वर्षांचा विद्यार्थी आणि 54 वर्षांचे शिक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेतील 16 वर्षीय संशयित हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (15 ऑक्टोबर) दुपारी बेंड शहरातील सिल्व्हर रेल एलिमेंटरी स्कूलमध्ये संबंधित संशयिताने जबरदस्तीने प्रवेश केला.

बेंडचे पोलीस प्रमुख माइक क्रँट्झ यांनी सांगितले की, एका नागरिकाने हल्लेखोराचा पाठलाग करत शाळेत प्रवेश केला आणि त्याच्याशी सामना केला. या नागरिकाने केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला.

हल्लेखोराचा या शाळेशी काही संबंध होता का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी काय माहिती दिली?

ओरेगॉन राज्यातील बेंड शहरातील सिल्व्हर रेल एलिमेंटरी स्कूलमध्ये हल्लेखोराकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजून 59 मिनिटांनी आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, अशी माहिती बेंड पोलीस विभागाच्या प्रवक्त्या शीला मिलर यांनी पत्रकारांना दिली.

नकाशा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एक फोन आला. त्या व्यक्तीने आपल्या गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगितलं.

घटनास्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये गोळ्यांच्या खुणा असलेला एक लाल रंगाचा ट्रक दिसत आहे.

काही मिनिटांनंतर स्थानिक काउंटीच्या आपत्कालीन सेवा नियंत्रण कक्षाला 911 या क्रमांकावर पाठोपाठ फोन आले. त्यात हल्लेखोराने शाळेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली.

शाळेत जबरदस्तीने प्रवेश करण्यासाठी हल्लेखोराने बंद दरवाजांवर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले.

एका नागरिकाने गोळीबार सुरू झाल्याचे पाहिले. त्याने हल्लेखोराचा पाठलाग करत शाळेत प्रवेश केला. दोघांमध्ये झटापट झाली, त्यातच हल्लेखोराचा मृत्यू झाला.

त्यानंतर 3 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोराचा मृत्यू झाल्याची खात्री केली आणि त्यानंतर संपूर्ण शाळेची तपासणी केली.

गोळीबार करणारा मुलगा स्थानिक रहिवासी असून त्याचे वय 16 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तपास सुरू असल्यामुळे त्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

पोलिसांनी मृत मुलांची, हल्लेखोराची किंवा त्याला गोळ्या घालणाऱ्या नागरिकाची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.

सिल्व्हर रेल एलिमेंटरी स्कूलमध्ये सुमारे 450 मुले शिकतात. या शाळेत 40 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर बेंड शहरातील सर्व शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“या निरर्थक हिंसक घटनेमुळे आम्हाला मोठा धक्का बसला असून आम्ही दुःखी झालो आहे,” असं वरिष्ठ शालेय प्रशासकीय अधिकारी स्टीव्हन कुक यांनी म्हटलं आहे.

त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

“आम्ही समाज म्हणून ज्या दुःखातून जात आहोत, ते व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे ठरणार नाहीत,” असंही त्यांनी म्हटलं.

के-12 स्कूल शूटिंग डेटाबेसनुसार, गेल्या वर्षी अमेरिकेतील शाळांमध्ये गोळीबाराच्या 235 घटना घडल्या होत्या. चालू वर्षात आतापर्यंत अशा किमान 140 घटना घडल्या असून, त्यात या घटनेचाही समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC