Home LATEST NEWS ताजी बातमी ‘अश्लील कृत्य’ केल्याचा आरोप, सौदी अरेबियात जोडप्याला दिली फाशीची शिक्षा

‘अश्लील कृत्य’ केल्याचा आरोप, सौदी अरेबियात जोडप्याला दिली फाशीची शिक्षा

5
0

Source :- BBC INDIA NEWS

ही घटना मक्का येथील कोणत्या मशिदीमध्ये घडली, हे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही. (फाइल फोटो)

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

सौदी अरेबियातील ‘पवित्र शहर मक्का’ येथे अश्लील कृत्यांचा आरोप असलेल्या बांगलादेशी पुरुष आणि महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

सौदी अरेबियाची सरकारी वृत्तसंस्था ‘सौदी प्रेस एजन्सी’ने (एसपीए) गृह मंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नजरुल इस्लाम अब्दुल बशीर आणि सिती अख्तर यांनी मक्केतील एका मशिदीमध्ये ‘अश्लील कृत्य’ केल्याचा आरोप होता.

सौदी अरेबियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं.

नजरुल इस्लाम अब्दुल बशीर आणि सिती अख्तर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, असं गृह मंत्रालयाने सांगितलं.

या दोघांना फाशी देण्यापूर्वी याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असं जेद्दाहमधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासाने सांगितलं.

या प्रकरणाची अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणीही दूतावासाने सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मंत्रालयाने काय सांगितलं?

“मंत्रालयाने दूतावासाला याबाबत आधी कोणतीही माहिती दिली नव्हती,” असं दूतावासाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी द डेली स्टार या वृत्तपत्राला सांगितलं.

अधिकाऱ्याने सांगितलं, “या प्रकरणाची अधिकृत माहिती द्यावी आणि मृत्युदंड दिल्याच्या वृत्ताची खात्री करून द्यावी, अशी विनंती करणारे पत्र (डिप्लोमॅटिक नोट) आम्ही सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलं आहे.”

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य, मशिदीचे पावित्र्य भंग करणारे कृत्य आणि त्यासंबंधीच्या परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात ‘ताझीर’ या कायदेशीर तरतुदीअंतर्गत मृत्युदंड दिला.

बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानुसार, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली.

या निर्णयानंतर शाही आदेशही जारी करण्यात आला. या आदेशानुसार, 14 ऑक्टोबर रोजी दोघांनाही मृत्युदंड देण्यात आला.

परंतु, कथित अश्लील कृत्याच्या वेळी नेमकं काय घडलं होतं, हे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

ही घटना नेमकी कधी घडली होती आणि मृत्युदंडाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील कधी करण्यात आलं होतं, हेही सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही.

सौदी अरेबियातील स्थानिक वृत्तपत्रांनीही या प्रकरणाबाबत सविस्तर वृत्त दिलेलं नाही. या वृत्तपत्रांनी केवळ सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने जारी केलेली निवेदनेच प्रसिद्ध केले आहेत.

‘ताझीर’ म्हणजे काय आणि शिक्षा कशी ठरते?

सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या दोघांना ‘ताझीर’ अंतर्गत मृत्युदंड देण्यात आला आहे.

परंतु, ही शिक्षा नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार देण्यात आली, हे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिकपणे स्पष्ट केलेले नाही.

ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, सौदी अरेबियातील न्यायालयं शरिया कायद्यातील तत्त्वे आणि न्यायाधीशांच्या निर्णयानुसार शिक्षा ठरवतात.

शरिया कायदा इस्लामच्या धार्मिक तत्त्वांवर आधारित आहे. त्यामध्ये कुराण आणि सुन्नत यांना महत्त्वाचं स्थान आहे.

‘ताझीर’ म्हणजे इस्लामी कायद्यात ज्या गुन्ह्यांसाठी ठराविक शिक्षा सांगितलेली नाही किंवा निश्चित नाही, अशा गुन्ह्यांमध्ये न्यायाधीशांकडून स्वतःच्या निर्णयानुसार दिली जाणारी शिक्षा.

ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, ‘ताझीर’ हा एक स्वतंत्र कायदा नसून इस्लामिक कायद्यातील शिक्षेचा एक प्रकार आहे.

या तरतुदीनुसार, ज्या गुन्ह्यांसाठी ठराविक किंवा निश्चित शिक्षा नाही, अशा प्रकरणांत न्यायाधीश स्वतः शिक्षा ठरवू शकतात.

या संदर्भात गुन्हा कोणता आहे हे ठरवण्याचा आणि त्यासाठी शिक्षा निश्चित करण्याचा अधिकार सौदी अरेबियातील न्यायाधीशांना आहे.

‘ताझीर’ अंतर्गत काही प्रकरणांमध्ये केवळ ताकीद किंवा इशारा देणे, दंड आकारणे किंवा तुरुंगवासाची शिक्षाही दिली जाऊ शकते. तर काही विशेष प्रकरणांत मृत्युदंडाचीही शिक्षा दिली जाऊ शकते.

ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, सौदी अरेबियामध्ये पारंपरिकरित्या गुन्हे आणि शिक्षांबाबतची सर्वसमावेशक लिखित दंड संहिता नाही.

शरिया कायदा इस्लामच्या धार्मिक तत्त्वांवर आधारित आहे. त्यामध्ये कुराण आणि सुन्नत यांना महत्त्वाचं स्थान आहे.

तिथली न्यायव्यवस्था बऱ्याच अंशी शरिया कायदा आणि न्यायाधीशांच्या विवेकाधिकार म्हणजेच निर्णयावर अवलंबून राहिली आहे.

ॲम्नेस्टीने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2026 पर्यंत म्हणजेच या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत सौदी अरेबियामध्ये 175 हून अधिक जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती.

सर्वाधिक मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये सौदी अरेबियाचा समावेश होतो.

या वर्षी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश परदेशी नागरिक होते. 2026 मध्ये 20 हून अधिक देशांतील किमान 94 परदेशी नागरिकांना सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

अलीकडच्या काही वर्षांत सौदी अरेबियातील न्यायालयांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी काही जणांना अनेक दशकांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. परंतु, अपील केल्यानंतर यातील काही शिक्षांमध्ये मोठे बदलही झाल्याचेही दिसून आले आहे.

सौदी अरेबियामध्ये पारंपरिकरित्या गुन्हे आणि शिक्षांबाबतची कोणतीही सविस्तर लिखित दंड संहिता नाही.

ॲम्नेस्टीच्या मते, अनेक गुन्ह्यांसाठी कायद्यात ठराविक शिक्षा नाही. अशा प्रकरणांत न्यायाधीश शरिया कायद्याचा स्वतःच्या अर्थाच्या आधारे निर्णय देतात.

परंतु, सौदी अरेबियामध्ये लिखित कायदेही आहेत. मात्र अधिकारी अनेकदा दहशतवादविरोधी आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित कायद्यांतील अस्पष्ट तरतुदींचा वारंवार वापर करतात.

या कायद्यांमध्ये ‘सार्वजनिक सुव्यवस्था’, ‘धार्मिक मूल्ये’ आणि ‘समाजातील नैतिकतेला’ धक्का पोहोचवणाऱ्या कृत्यांबाबतच्या तरतुदींचा समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC