Source :- BBC INDIA NEWS

वाचन वेळ: 16 मिनिटे
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर अभिनेत्री प्राजक्ता हनमघर या नेहमी ठामपणे आपली मतं मांडत असतात.
बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी प्राजक्ता हनमघर यांच्याशी विशेष संवाद साधला. या मुलाखतीत प्राजक्ता हनमघर यांनी नागरिकांना व्यक्त होण्यावरील बंधनं, ट्रोलिंग आणि पितृसत्ताक व्यवस्थेवर भाष्य केलं आहे.
यासोबत सध्या देशभर सुरू असणाऱ्या जेन झी आंदोलनावरही त्यांनी रोखठोकपणे आपली मतं व्यक्त केली आहेत.
प्रश्नः तुम्ही वेळोवेळी राजकीय, सामाजिक विषयांवर भूमिका घेत आला आहात. आता तुम्ही जास्त व्होकल पद्धतीने भूमिका घेत आहात. त्याच्यावर सातत्याने चर्चा पण होते, सोशल मीडियावरही याबाबत चर्चा होत असते. अशा प्रकारे भूमिका घेत असताना सर्वात कठीण गोष्ट काय वाटते? कलाकार म्हणून जेव्हा भूमिका घेता, त्यावेळी ती गरजेची का वाटते?
प्राजक्ता हनमघरः मी हे कायम म्हणते की, कलाकार-स्त्री या आधी मी माणूस आहे. या स्वतंत्र भारताची माणूस आहे. स्वातंत्र्य हा शब्द हा खूप व्यापक अर्थाने माझ्यापुढे कायमच येतो.
म्हणजे चार्वाक म्हणतो स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. माझे वडील म्हणायचे, ‘मी काही तुला स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. तू-तू तुझी स्वतंत्र जन्माला आलेली आहेस.’
आमच्या तात्यांमुळे म्हणजे आ. ह. साळुंखेंमुळे वेगळ्या पद्धतीने मला स्वातंत्र्याचा अर्थ समजला आहे. म्हणजे बुद्धाची गोष्ट सांगताना तात्या म्हणतात की, ‘चिमणीही तिच्या घरट्यात खूप स्वातंत्र्याने विहार करते.’
स्वातंत्र्य ही गोष्ट त्या छोट्या जीवासाठी इतकी महत्त्वाची असेल तर आपल्यासाठी त्याचा अर्थ किती व्यापक आहे. जर ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, तर तिच्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही मोठीच असणार.
नागरिक म्हणून आपण व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे सगळंच आपल्यासाठी कोणीतरी करणार हे किती दिवस चालणार? निवडणुका म्हणजे फक्त मतदान नाही ना?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
आपण कुणाला तरी निवडून देतोय ते आपल्या कामांसाठी आहे. तर ते योग्य प्रकारे होतं का? आपल्या आजूबाजूच्या गोष्टी सुविहित आहेत का? आणि जर त्या नाहीत तर त्या का आणि कशा नाहीत?
याकडे आपलं लक्ष का नाही? म्हणजे आपल्या पिढ्या इथेच जन्मलेल्या आहेत. मी इथेच आहे. माझ्या पुढची पिढी इथेच आहे, तर तिची काळजी मला वाटणं साहजिकच आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुतेची जी मूल्यं आपण बुद्ध विचारातून घेतलेली आहेत, ती मूल्यं मला फार महत्त्वाची आणि माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेत. माणूस म्हणून तुम्ही या मूल्यांपासून वेगळं नाही होऊ शकत.
आपल्याकडे प्रश्न विचारणं ही परंपरा आहे. मी कायमच म्हणते. म्हणजे ती बुद्ध परंपरा असेल, ती चार्वाक परंपरा असेल, ती महावीरांपासून ते तुकोबांपर्यंत. आपल्याकडे वेळोवेळी व्यवस्थेला प्रश्न विचारले गेलेले आहेत.
प्रश्न विचारणं हा इतका वेगळेपणा का वाटतो? बोलणं हा इतका वेगळेपणा का वाटतो? याचा मला खेद वाटतो, ही नैसर्गिक गोष्ट आहे.

मला प्रश्न पडणं, मला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल व्यक्त व्हावंसं वाटणं ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे, तर ती आपण नैसर्गिकच ठेऊयात.
जसं हल्ली आपलं होतं की, हा किती चांगला वागला ना? माझ्या मते हेच नैसर्गिक आहे ना? चांगलं वागण्याऐवजी आपण वाईट वागण्याचं आश्चर्य वाटून घेऊयात ना? चांगलं वागायचं नको?
ज्या आपल्या नैसर्गिक गोष्टी आहेत, त्या आपण तशाच ठेऊयात आणि राजकारण आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित आहे. ते आपण वेगळं काढू शकत नाही.
जसं ब्रेथ म्हणतो की, सगळ्यात निकामी निरक्षर कोण? तर राजकीय निरक्षर, आणि मला ते पटतं. कारण बाई म्हणून जेव्हा मी राजकारणाचा किंवा कुठलीही माझी माता-भगिनी माझ्या आपल्यातल्या स्त्रिया राजकारणाचा विचार करतात की, माझा याच्याशी काय संबंध? तर त्यांचा सर्वात जास्त संबंध येतो. कारण तिकडे काहीतरी हललं तर सिलिंडर हलतो. तिकडे काहीतरी हललं तर तेलाचे भाव हलतात.
तिकडे काहीतरी हललं तर डाळी महाग होतात आणि त्यांची किंमत तुम्हाला जेवढी मोजावी लागते. तितकीच माझ्याकडे काम करणाऱ्या मदतनीसाला सुद्धा मोजावी लागते.
शेवटच्या घटकाला परवडतील अशा गोष्टी राज्यामध्ये उपलब्ध असाव्यात ही अपेक्षा मला फार वाटत नाही. याच्यासाठी मी बोलते तर हे काही विशेष नाही.

प्रश्नः हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की, राजकारण आपल्यासाठी नाही, राजकारणाचा आम्हाला तिटकारा किंवा राजकारणात आम्हाला पडायचं नाही, हे असं साधारणतः सर्वच पातळ्यांवर आपल्याला पाहायला मिळतं. पण तुमच्या प्रत्येक गोष्टीशी राजकारण जोडलं गेलेलं आहे.
तुमच्या घराबाहेरचा रस्ता, त्यावर पडलेले खड्डे, तुमच्या घरात येणाऱ्या वस्तूंच्या किमती, पाणी, वीज या सगळ्या गोष्टी. तर ही जाणीव न होण्यामागे काय कारण असं वाटतं? हा कनेक्ट लोकांना का लक्षात येत नाही?
प्राजक्ता हनमघरः या घटना कायम घडतात किंवा या घडू शकतात. याला कारण मला माणसांचं गप्प राहणं वाटतं. जी माणसं तटस्थ राहतात त्याच्यामुळे हे वाढीला लागतं, असं मला कायम वाटतं. तटस्थ राहण्यालाही अनेक कारणं असतात. म्हणजे अनेक प्रकारची भीती आहे आपल्याकडच्या लोकांमध्ये.
मी व्यक्त झालो तर माझं काय होईल? इथून ती सुरू होते. ते मी व्यक्त झालो तर मी बाजूला पडेल, इथपर्यंत ती पोहोचते. आपल्याकडे साम, दाम, दंड, भेद हे सगळं वापरून या पद्धतीने केलं गेलेलंही आहे. म्हणजे असाही इतिहास आहे.
त्यामुळे भीती आहे. बोलणाऱ्यांना दाबलंही गेलेलं आहे, मारलंही गेलेलं आहे. आता तर ट्रोलर्स हा एक विचित्र प्रकार अंगावर सोडला जातो.
म्हणजे आयटी सेल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्यातून त्यांना काहीही माहिती नसतं काय झालेलं आहे. त्यांना सांगितलं जातं, हे करा आणि ती बिनचेहऱ्याची बिनमेंदूची माणसं आहेत. ती ते करतात. तर सामान्य लोकांना याची भीती वाटणं साहजिक आहे.
कारण त्यांचा मुद्दा हा माझं घर व्यवस्थित चालावं, आम्ही सुरक्षित वातावरणात राहावं, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आम्हाला दोन वेळेचं चांगलं अन्नधान्य मिळावं इतपतच त्यांच्या अपेक्षा असतात. याहून वेगळ्या अपेक्षा नसतात.
तर त्या आपल्या पूर्ण होणार नाहीत का? किंवा आपल्या आप्तस्वकीयांना त्रास होईल का? याची एक भीती असते. ती भीती त्यांना व्यक्त करण्यापासून रोखते. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही, परिस्थितीच तशी आहे.
स्वातंत्र्य याच परिस्थितीतून मिळवलंय आपण. त्यावेळी जर सर्वच जण आपण आपल्या पुरतं पाहुयात, असं म्हटलं असते तर. चार-दोन चेहरे लढतायत ते बघू. ते लढतील तेव्हा मिळेल. तर असं नाही झालं ना?
अगदी लहानांपासून, वृद्धांपर्यंत, स्त्रियांपासून सगळे बाहेर पडलेले आहेत आणि मग इतकी मोठी गोष्ट आपल्या वाट्याला आलेली आहे. तर आपण थोडी हिम्मत केली तर सगळ्यांसाठी हे बोलणं आणि व्यक्त होणं सोपं आहे.
facebook/Prajakta Hanamghar
प्रश्नः या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती वाटते?
प्राजक्ता हनमघरः दबाव, ज्या पद्धतीचा दबाव लोकांवर आणला जातोय, ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर गोष्टी ठेवल्या जातायत, ज्या पद्धतीने त्यांना धर्माच्या-जातीच्या राजकारणात गुरफटलं जातंय, त्यांना माणुसकीपासून फार दूर आणलं गेलंय.
या वातावरणात अंधश्रद्धेनं कळस गाठलेला आहे. श्रद्धेचा बाजार मांडलेला आहे. नवीन गोष्टी न्यू नॉर्मल होतायत. म्हणजे मी स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी जन्मलेली पिढी आहे. पण जी स्वातंत्र्यापासून जन्मलेली पिढी आहे, त्यांनी सुद्धा या गोष्टी अशा पद्धतीने कधी पाहिल्या नसतील असं मला वाटतं. म्हणजे त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा खेद वाटतो.
आपण माणूस आहोत. आपण माणुसकीला धरून राहिलं पाहिजे. आपण सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे. ही गोष्ट सांगावी लागते आता. हे मला फार भयानक वाटतं.
माणूस म्हणून, स्त्री म्हणून, कलाकार म्हणून, आई म्हणून तुमच्या व्यक्त होण्यावर निर्बंध लागलेले आहेत. आता भावना कुठेही दुखावू शकते.
प्रश्नः कुठल्याही व्यक्तीने भूमिका घेणं गरजेचं आहे. कलाकार त्याला अपवाद राहू शकत नाही. खासकरून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उघडपणे राजकीय, सामाजिक विषयांवर ती भूमिका घेणं खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये होतं. आपल्याकडे एक परंपरा राहिलेली आहे. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू या लोकांनी उघडपणे राजकीय सामाजिक विषयांवर भूमिका घेतलेल्या आहेत.
महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पण ती परिस्थिती आता तितकी ताकदीनं दिसत नाही. अतुल कुलकर्णी असतील, तुम्ही असाल या पद्धतीने थोडे बोलत राहता. बऱ्याच कलाकारांशी आम्ही ज्या वेळेस बोलतो, त्या वेळेस त्यांना अस्वस्थ वाटणाऱ्या गोष्टींविषयी ते खासगीमध्ये बोलतात, पण ते उघडपणे बोलत नाहीत. एक ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ बऱ्याच कलाकारांनी घालून घेतलेली आहे. ही परिस्थिती नेमकी काय आहे?
प्राजक्ता हनमघरः मी म्हटलं तसं की, व्यक्त होऊन चालेल का? किंवा व्यक्त झाल्यावर आपली कामं जातील का? किंवा आपण चौकटीतून बाहेर पडू का? आपण वेगळे होऊ का?, ही भीती खूप जणांना आहे.
म्हणजे तुमच्याकडे जसं मागून व्यक्त झालेले आहेत, तसे माझ्याकडेही मागून व्यक्त झालेले कलाकार आहेत. पण त्यांना समोर व्यक्त होण्याची भीती वाटते. काही जणांना ती मुभा नाहीये. कारण त्यांना असं वाटतं की आपलं कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे. उद्या आपलं काही झालं तर, कामं नाही मिळाली तर, आपण यातून बाहेर फेकला गेलो, तर अनेक प्रश्न आहेत. हे असं होतंय सुद्धा. म्हणजे माणसा-माणसांमध्ये द्वेषाच्या भिंती उभं करण्यात हे यशस्वी झालेले आहेत.
त्या मोडून काढण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत. मग कलाकार आणि सामान्य माणूस असा भेद न करता, माणूस म्हणून सगळ्यांकडे व्यापक अर्थाने पाहिलं पाहिजे.

प्रश्नः प्रत्येक व्यक्तीनेच भूमिका घेणं अपेक्षित आहेच. पण कलाकार म्हणून ज्या वेळेस ते भूमिका घेतात, त्या वेळेस त्याचा एक व्यापक परिणाम म्हणून होताना दिसतो. त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहता? कलाकाराने भूमिका घेणं महत्त्वाचं का वाटतं?
प्राजक्ता हनमघरः अगदीच परिणाम होतो. जेव्हा मी सुद्धा व्यक्त झाले, जो पाठिंबा महाराष्ट्रातून, भारतभरातून, भारताच्या बाहेरून मिळाला, तो मला अचंबित करणारा होता.
आता अशी वेळ आली आहे की, ट्रोलर्सला मला उत्तर द्यावीच लागत नाहीत. सगळे समविचारी लोक आहेत, तेच त्यांना उत्तरं देत आहेत. मला वाटलं नव्हतं की, इतका मोठा जनसमुदाय आपल्या पाठीशी असेल.
लोकांना व्यक्त होणारं कोणीतरी हवं होतं आणि एक ‘पुश’ मिळतो ना, तसं झालं आणि मग लोक व्यक्त व्हायला लागलेली आहेत. तर माझ्यासाठी आत्ताची ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
ज्या पद्धतीने जेन झी आंदोलन करताहेत आणि त्यात तरुण मुलं सामील होतायत हे किती आश्चर्यकारक आहे. या मुलांकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. यांनी काही केलेलंच नाहीये. त्यामुळे यांना भीती वाटण्याचं काही कारणच नाहीये. ज्या पद्धतीने त्यांना उचललं जातंय, ज्या पद्धतीने त्यांना मारलं जातंय, ज्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केला जातोय, या गोष्टी लक्षात ठेवल्या जाणार आहेत.
म्हणजे बदल ही अपरिहार्य गोष्ट वाटते. आणि तो होत आहे. तो तुमच्या माझ्या आवडीने होत नाही. तो होणार असतो. पण या गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे त्यावेळी लाला लजपतरायांवर हल्ला केला, म्हणून पेटून उठणारे आपले भगतसिंग होते ना? तर यांच्यावरचे हल्ले लक्षात ठेवले जाणार आहेत.
ज्या ताकदीने ही मुलं लढतायत आणि ज्या पद्धतीने यांना समर्थन आणि पाठिंबा मिळतोय, तो अचंबित करणारा आहे.
जेव्हा राहुल गांधी म्हणाले की, पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन करा, मला ही फार महत्त्वाची गोष्ट वाटली. एका राजकारण्याने असं म्हणणं किंवा पंतप्रधानांच्या घराबाहेर जाऊन विरोध करणं किंवा 7-7 तास त्या मुलाचा एफआयआर नोंदवला जात नाही म्हणून तिथे बसून राहणं, तर हे खूप माणूस पातळीवर उतरून केलेलं आहे आणि त्यामुळेच ते आम्हाला अधिक जवळचं वाटतं.
facebook/Prajakta Hanamghar
प्रश्नः पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन करा. ‘स्मॅश द पॅट्रियार्की’ हा विषय महत्त्वाचा का वाटतो? त्याच्यामागे काय-काय मुद्दे आहेत की, तो सध्या चर्चेत येणं आणि एकूणच समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं तुम्हाला वाटतं?
प्राजक्ता हनमघरः थोडक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’. बेटी पढाओ तर मला हे खूप पुढचं वाटतं. ‘बचाओ’ तर आधी.
आपल्याकडे बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या, आपल्याकडे बलात्कार होत असलेल्या बलात्काराचा आकडा, आपल्याकडे शारीरिक मानसिक हिंसेचा आकडा, हे सगळे आकडे आहेत. म्हणजे यापेक्षाही जास्त घडून गेलं असेल. हे सर्व पाहिलं तर हे किती गंभीर आहे.
हुंडाबळी अजून होताहेत. आणखी समाज म्हणून आपण काय घसरायचं बाकी राहिलोय आतासुद्धा. जेव्हा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तेव्हा 5-10 लाखांसाठी तुमच्या मुली आत्महत्या करतायत. तुम्ही त्यांना त्यापद्धतीने वाढवलेलं नाही की त्यांना वाटेल की, आपण परत जावं म्हणून. ही स्त्रीमुक्ती किंवा स्त्री-पुरुष समान, हे मला अजूनही कागदावर वाटतं.
जितकं तुम्ही खाली जाता, तितका स्त्रियांसाठीचा संघर्ष अधिक गडद होत जातो. आणि बेसिक गोष्टींचीही वानवा आहे. म्हणजे शिक्षणासाठी आजही मुलांना प्राधान्य दिलं जातं का? तर हो. किंवा चांगल्या गोष्टींसाठी दिलं जातं का? तर त्याचेही उत्तर हो असंच आहे.
संपत्तीत समान वाटा आला तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की, त्यांनी सही करावी का? तर हो. या छुप्या गोष्टी आहेत. पण या आपल्या इतक्या वाढीत आहेत ना की, त्या काढायला खूप वर्षे जावी लागणार आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की, मी हे सगळं बोलू शकते, कारण मी अशी वाढलेली नाही.
माझे वडील अत्यंत स्त्री-पुरुष समानतावादी होते आणि ते सगळ्यांना माणूस समजायचे. स्त्री-पुरुष ही आपण केलेली कॅटेगरी आहे. आपण सगळे माणूस आहोत. तर त्यामुळे मी अशी वाढलेली नाही.
त्यामुळे मला ही कामं पुरुषाची, ही कामं स्त्रियांची. या गोष्टी स्त्रियांनी बोलल्या नाही पाहिजेत, या गोष्टी फक्त पुरुषांनीच केल्या पाहिजेत, या पद्धतीत मी वाढलेच नाही. ही पुन्हा एकदा मुळातून शिकवण्याची गोष्ट आहे.
मला यात मुलांच्या आईचा अधिक सहभाग अपेक्षित आहे. मुलींना सांगताच आहात ना तुम्ही की, 7 वाजता घरी या, मुलालाही विचारा 7 नंतर तू काय करतोयस? मुलींना तुम्ही तू असे कपडे घातलेस म्हणून तसं झालं, हे सांगत आहातच ना.
मुलांनाही सांगा की हे नॉर्मल आहे. तू पण शॉर्ट्सवर फिरतोस हे नॉर्मल आहे, तर ती शॉर्ट्स वर फिरते हेही नॉर्मल आहे. तुझ्या जशा वेगळ्या चॉइसेस असू शकतात तशा मुली म्हणून तिच्याही असू शकतात.
मुलांच्या आई-वडिलांची जबाबदारी मला अधिक वाटते की, या पद्धतीने तुम्ही मुलं वाढवली पाहिजेत. कुठलंही काम हे लिंग आधारित नसलं पाहिजे. ते स्किल आहे. अगदी स्वयंपाक करणं सुद्धा हे स्किल आहे. ते जगातील सगळ्यांना आलं पाहिजे या मताची मी आहे. त्याचबरोबर नाही आलं तर ते कोणालाही नाही आलेलं चाललं पाहिजे. म्हणजे ते मुलाला आलं नाही तर चालतंय आणि माझ्या मुलीला नाही आलं तर नाही चालत आहे असं नको.
मुळात इतकी आंदोलनं करतच आहोत, इतक्या गोष्टींवर ऊहापोह करतच आहोत तर एक त्यात समानता ही गोष्ट लिंग या दृष्टीने सुद्धा विचारात आणूयात. एक खऱ्या अर्थाने लिंगरहित समाज म्हणून आपण जगूयात. ते जास्त सोपं आहे. ते जास्त आनंददायी आहे.

प्रश्नः एकूण सामाजिक परिस्थिती पाहता एक स्त्री म्हणून भूमिका घेणं, ठामपणे आपली भूमिका सार्वजनिक व्यासपीठावर मांडणं, सोशल मीडियावर मांडणं हे जास्त आव्हानात्मक वाटतं का?
प्राजक्ता हनमघरः आहे, कारण त्याचे परिणाम चांगल्या वाईट अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचणारच असतात. मी बऱ्याचदा म्हणते तसं, आधी आजूबाजूची लोकं तुम्हाला सल्ले देतात आणि ते गोड-गोड असतात की, कशाला करतेयस किंवा दुसरं कोणीतरी करेल किंवा एवढा विचार कशाला करायचा? आपलं बरं चाललंय ना? पासून ते चारित्र्य हननापर्यंत येतात. अशावेळी तुम्हाला खूप घट्ट राहावं लागतं. बाई म्हणून, माणूस म्हणून, मी अत्यंत घट्ट आहे. मी स्वतःला घट्ट केलंय.
माझं म्हणणं आहे की, ज्यांना चेहरे नाहीत अशा लोकांना मी का महत्त्व देऊ? ही पहिली गोष्ट आणि जेव्हा समाज म्हणून यांनी खरंच बोलायची गरज असते तेव्हा हे सगळे कुठे असतात? तेव्हा त्यांना सगळं चालतं.
तेव्हा त्यांना बलात्कार झालेले चालतात, तेव्हा त्यांना हुंडाबळी झालेले चालतात, तेव्हा त्यांना त्यांच्या धार्मिक विटंबना चालतात, महापुरुषांबद्दल अपशब्द चालतात. तेव्हा समाज म्हणून हे सगळे कुठे गेलेले असतात? मग जर हे सगळे तेव्हा नसतील तर मी यांना उत्तर देणं अपेक्षित नाही.
तात्यांनी (आ.ह.साळुंखे) मला खूप मऊ केलं. त्यामुळे मला हल्ली या लोकांबद्दल करुणा सुद्धा वाटते, हे लोक बिचारे सुद्धा वाटतात. कधी कधी वाटतं की असं करण्याचं काही तरी कारण असेल. पण ज्या दिवशी यांना कळेल ते परत फिरतील आणि ज्या दिवशी परत फिरतील ते आपलेच असतील.
facebook/Prajakta Hanamghar
प्रश्नः डॉ.आ. ह. साळुंखे यांचा तुम्ही उल्लेख केला. तुम्ही वेळोवेळी त्यांच्याविषयी बोलत राहता. त्यांचा तुमच्यावर नेमका कसा प्रभाव पडला?
प्राजक्ता हनमघरः तात्या माझ्या आयुष्यात आले महावीर जोंधळेंमुळे. महावीर जोंधळे यांची पण मी मानसकन्या आहे. इंद्रजीत घुले, तो माझा भाऊच आहे. त्यामुळे इंद्रजीत घुले आणि महावीर जोंधळे यांच्यामुळे तात्या माझ्या आयुष्यात आले. ते इतके आले की, ते आता माझं आयुष्य बनून गेले.
त्यांची विचारसरणी हे माझं आयुष्य झालं आहे. आत्ता आहे, त्यापेक्षा मी पूर्वी जास्त आक्रमक होते. तात्यांना मी कायम म्हणते की, ‘तुम्ही मला मऊ केलंत.’ तात्यांचं म्हणणं आहे, तुम्हाला ज्यांना यातून बाहेर काढायचं आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटलं पाहिजे. त्यांच्याबद्दल तुम्हाला माया वाटली पाहिजे, करुणा वाटली पाहिजे.
ही वाटणारी करुणा कधीच खोटी असू शकत नाही. ती उशिरा का होईना समोरच्या माणसांपर्यंत ती पोहोचते आणि अपेक्षित बदल घडतो. त्याला उशीर लागतो. पण तो बदल घडतो.
तात्यांचं एक-एक वाक्य पण असं आहे की, तुम्ही 2-2, 3-3 महिने फक्त त्या वाक्याचा विचार करू शकता. ते अनेक अंगाने तुम्हाला भेटतं. जसं ‘आपल्याच धडावर आपलाच मेंदू असेल’. जसं की ‘तण वाढवावे लागत नाहीत, पण पिकं वाढवावी लागतात.’
मला त्यांचं कुठलंही वाक्य समोर आलं तर असं वाटतं की बापरे! याच्यावर मी वर्षभर विचार केला तरी हे वेगवेगळ्या अर्थाने हे वाक्य माझ्यापर्यंत येईल.
स्त्री पुरुष समानतेबद्दल ते म्हणतात की, स्त्रियांची जी सर्जनशीलता आहे ती पुरुषांइतकीच आहे. ती मानणं म्हणजे 50 टक्के समाजाची प्रगती मानणं आहे. इतक्या व्यापक अर्थाने कोणी विचार केला असेल?
तात्यांची पुस्तकं, तात्यांचे विचार, तात्या असणं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी उपलब्धी आहे. जसं आधीची माणसं सांगायची की, आम्ही गांधी बघितले, आम्ही नेहरू बघितले. आपण सांगू ‘आम्ही तात्या पाहिले आणि इतक्या जवळून पाहिले, इतक्या जवळून अनुभवले.’

मी प्रेग्नंट असताना मला सातव्या महिन्यात तात्यांना पाहण्याची इच्छा झाली. मी पुण्याहून सातारला गेले. मला फक्त त्यांना पाहायचं होतं. मला इतकं भरून आलं, आई होण्याच्या प्रवासात तात्या आणि तात्यांची पुस्तकं माझ्या इतकी जवळ होते की माझी मुलगी पहिला शब्द ‘तात्या’ म्हणाली.
आई म्हणून काय देता येईल जे माझ्या वडिलांनी मला दिलं? मी म्हणते वारसाहक्कात माझ्याकडे विचारशक्ती आली, चांगली माणसं आली, चांगली पुस्तकं आली, स्वातंत्र्य आलं तर पुढे जोडून मी तिला करुणा देईन, तात्यांचं प्रेम देईन, जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देईल. ही गोष्ट जास्त मला महत्त्वाची वाटते.
भरत यादव यांच्याशी बोलताना त्यांनी आठवणी लिहिल्या आहेत. त्यात यशवंत मनोहर म्हणतात, ‘परत येताना मला बुद्धाचं थोडं मन घेऊन या आठवणीनं.’ मला असं वाटतं की, हे कुठे घेऊन जाऊ मी? असं काही वाचलं की, रात्र-रात्र मला झोप लागत नाही. कुठल्या हाडामासाची ही माणसं बनली आहेत?
आजूबाजूला हे सगळं चालत असताना, इतका मोठा काळ ही माणसं त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत, तरीही करुणेने ओथंबलेली आहेत. जगाबद्दल त्यांना प्रेम आहे, विश्वास आहे की, हे बदलेल. ती आज त्यांनी कायम आमच्यात कायम ठेवलेली आहे.
Instagram/Prajaktahanamghar
प्रश्नः आपल्याकडे एक चर्चा नेहमी होत आलेली आहे की कलेचं प्रयोजन काय? म्हणजे कला ही कलेसाठी की, त्याच्या मागे आणखी काही हेतू, काही गोष्टी असाव्यात का? कलेमध्ये सामाजिक दृष्टिकोन असणं, नसणं, फक्त मनोरंजन या सगळ्या गोष्टींची पण चर्चा होते.
तुम्ही या सगळ्या चर्चेकडे कशा पद्धतीने पाहता? जेव्हा एक कलाकार म्हणून एखादी कलाकृती करता, त्यावेळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब त्यात आणून त्या कलेतून तुम्ही तुमची अभिव्यक्ती मांडणं हे गरजेचं वाटतं का?
प्राजक्ता हनमघरः अगदीच गरजेचं वाटतं. कारण मला कला समाजाचा आरसा वाटते. समाजात जे घडत असतं ते कलेच्या माध्यमातून आपण पोहोचवत असतो. आपण जे पोहोचवतो त्याचा काही अंशी का होईना परिणाम होतो. म्हणूनच मला कलाकार म्हणून कला सादर करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
सिंहासनसारखा चित्रपट तुम्ही बघा, त्या काळचा तो आता आपण निर्माण करू शकू का?
आता ‘भावना’ ही गोष्ट इतकी कमकुवत तलवार झाली आहे की, ती कधीही, कुठेही, कुणाचीही दुखावली जाऊ शकते. त्यामुळे लेखकाला लिहिताना, कलावंताला कला सादर करताना या सगळ्याचा हल्ली खूप विचार करावा लागतो.
मी जेव्हा स्किट्स करायचे, तेव्हा पूर्वी इतका विचार करायला लागायचा नाही. आता प्रत्येक वाक्य आणि वाक्याचा विचार करावा लागतो की, हे वाक्य कशा पद्धतीने लोक घेतील आणि काय पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचेल.
पूर्वी दादा कोंडके, निळू भाऊ, राम नगरकर ही सगळी लोक जेव्हा प्रहसन सादर करायचे, तेव्हा त्यात राजकीय गोष्टी खूप यायच्या. त्यावेळी त्या तितक्याच उत्स्फूर्ततेने घेतल्याही जायच्या. आता त्या घेतल्या जातील का? याची मला शंका वाटते.
कलेच्या बाबतीत हे मला जरा निराश करणारे वातावरण वाटतं. आत्ता आम्हाला दाखवायचे तेच तुम्ही पहा. जे तुम्हाला पाहायचं आहे, ते आम्हाला दाखवायला फार प्रयत्न करावे लागतात.
मी ‘आता थांबायचं नाही’ सारखा चित्रपट केला, जो चतुर्थ श्रेणी कामगारांवर होता. त्यानंतर अनेक चतुर्थ श्रेणी कामगारांनी दहावी-बारावीच्या परीक्षा दिल्या. त्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
हे खूप छोटे बदल आहेत. हे कदाचित तुमचं-माझं आयुष्य काही ढवळून टाकणारे नाहीत. पण हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. जसं फुलपाखराचं पंख फडफडणं हा फार छोटा बदल आहे. पण त्याने एक व्यापक अर्थाने परिणाम घडू शकतो. तसा हा बदल आहे, असं मला वाटतं.

प्रश्नः तुम्ही एक आई आहात. रावी तुमची मुलगी आणि एका मुलाखतीमध्ये तुम्ही म्हटलं होतं की, मला ‘सुपरवुमन’ वगैरे काही व्हायचं नाहीये. एक आनंदी आई व्हायचं आहे, तर ते नेमकं काय? थोडं उलगडून सांगा.
प्राजक्ता हनमघरः त्यावर मी अजूनही ठाम आहे. ती मुलाखत होऊन वर्ष झालं. पण मी अजूनही या गोष्टीवर ठाम आहे की, ‘मला आनंदी आई व्हायचं आहे.’
मुलांना काय आठवतं?
म्हणजे, मला आज माझे वडील आठवताना मला त्यांनी दिलेल्या वस्तू आठवतात का? तर त्याचं उत्तर ‘नाही’.
त्यांनी मला दिलेला ‘वेळ’ आठवतो आणि तो वेळ इतका कमालीचा आहे की, मी रोज जेव्हा रात्री माझा वाचन-लिखाणाचा वेळ असतो. मला वडिलांबद्दल रोज काहीतरी आठवतं किंवा मी कुठून तरी फिरत असते, तेव्हा मला रोज त्या-त्या गोष्टी जाणवतात. त्या-त्या घटना आठवतात. आपण पालक म्हणून मुलांना काय देतो तर त्यांच्या आयुष्यातला एक चांगला वेळ.
‘सुपरवुमन’ ही कल्पनाच मला भीषण आणि दमवणारी वाटते. माझ्या हातात अनेक गोष्टी आहेत. मला अनेक हात आहेत आणि मी सगळ्या पातळीवर लढतेय हे नको आहे.
मला गोष्टी विभागता येतात. मला जबाबदाऱ्या विभागता येतात आणि मग मला वाटतं की, तिचा आणि माझा जो वेळ आहे तो आनंदी असावा. मुलांनी सतत काहीतरी शिकायला पाहिजे, अशी आई मी नाही.
म्हणजे तिला वाचायला आवडतं, म्हणून मी तिला पुस्तकं वाचून दाखवते आणि तिला त्याची लहानपणापासून सवय आहे. म्हणजे मी अशी ट्रोल झाले की, एवढी पुस्तकं वाचून दाखवतात? असं कुठं असतं का, इतक्या लहान मुलीच्या बाबतीत?
पण आता उलट झालं आहे. आम्ही कुठेही बसलो तरी माझी मुलगी पुस्तक घेऊन येते आणि ती म्हणते यातलं हे वाचूयात का? किंवा तू काय वाचतेयस? किंवा हे कोण आहेत? मग यांनी काय केलंय?
ती तिची आवड निर्माण झालेली आहे आणि ती खरंच अजूनही फोन पाहत नाही. ही गोष्ट खरी आहे की, तिला फोनची सवयच नाही आणि ती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने ती हाताळू शकते, बघू शकते.
facebook/Prajakta Hanamghar
आम्हाला स्वतःला दोघांना फिरायला खूप आवडत असल्यामुळे, आम्ही तिला घेऊन खूप फिरतो. त्यामुळे ती खूप निसर्ग पाहते, आजूबाजूच्या गोष्टी पाहते. त्याबद्दल प्रश्न विचारते. शाळेचा सहभागही खूप मोठा आहे. ती मराठी माध्यमात आहे.
जे माझं ठरलं होतं आणि जे माझ्या वडिलांनी मला मराठी माध्यमात घातलं. त्यामुळे मला खूप फायदा झाला. परिसर भाषा आणि आपली शिकण्याची भाषा एक असावी असं मला कायम वाटतं. त्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तिला मराठी माध्यमात घातलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात.
मुलांना कंटाळा येणं मला फार महत्त्वाचं वाटतं.
‘आम्ही मुलांना बोअरच होऊ देत नाही.’ पण, ‘बोअर झालं पाहिजे.’ कारण त्यातून पण नवीन निर्मिती होणार आहे ना? कधी कधी नुसतं बसणं सुद्धा नवनिर्मिती आहे ना? काही न करणं सुद्धा खूप करणं आहे ना? मी आज काहीच नाही केलं असं नाही होत. मी विचार केले असतील ना? ते कुठेतरी आतपर्यंत झिरपले असतील ना? त्याचं पुढे काहीतरी होईल ना?
त्यामुळे सतत ‘मुलांनी या क्लासवरून त्या क्लासला जाणं, सतत काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं आणि सतत मुलांसाठी आम्ही ॲव्हेलेबल आहोतच. बोल काय हवं आहे,’ हे जरा मला गंभीर वाटतं.
जरा त्यांना-त्यांना, त्यांच्या-त्यांच्या गोष्टी पण शोधू द्या, असं मला वाटतं.
रावी पुस्तक बघतच मोठी होत असल्यामुळे, ती एकदा तात्यांचं ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’ हे पुस्तक खूप निरखून बघत होती. मी तिला म्हटलं की, तुला माहिती आहे, ‘हा कोण आहे? तर ती म्हणाली, हो.’ मी तिला म्हटलं कोण आहे? तर ती म्हणाली, ‘बुद्ध मामा आहे.’
तर मी म्हटलं, तो आता कुठे आहे? ती म्हणाली, ‘तो फिरायला जातो. तो आता दूर फिरायला गेलाय. त्याचं तिथलं झालं की, तो येणार आहे भेटायला.’
मला वाटतं, तिने काहीतरी कल्पना शक्ती वापरली असेल ना?
किंवा 3 जानेवारीला तिला मी म्हटलं की, आज कुणाचा बर्थडे आहे माहिती आहे का? ‘सावित्रीबाईंचा’. तर ती म्हणाली, ‘अगं फोन करून बोलवू शकतेस का तिला तू? आपण साजरा करूयात.’
हे किती छान आहे. त्या वयाच्या कुठल्याही मुलांच्या डोक्यात हे सगळं येऊ शकतं ना? तर हे सगळं अनुभवू द्या त्यांना मुलं म्हणून. लगेच आपण मुलाला हे करूयात आणि ते करूयात आणि स्पर्धेमध्ये लगेच नको ढकलूयात. आपण मूल म्हणून त्यांची वाढ खुंटीत होऊ देऊ नये.
facebook/Prajakta Hanamghar
माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप केलंय. परवा मी प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईत फिरत होते. त्यावेळी मला आठवलं, मी दादरच्या गोल मंदिराजवळून गेले, तर अरे सौराष्ट्राची कचोरी. मला कचोरी खावीशी वाटली, तर पप्पा माझ्यासाठी घेऊन यायचे.
खूप छोट्या गोष्टी आहेत किंवा पुस्तक घेताना ते कधीच म्हणायचे नाही की, इतकं बजेट आहे आपलं. ते ‘पुस्तकं घे, तुला हवी तेवढी घे,’ असं म्हणायचे.
पुस्तक घेणं हा सोहळा होता माझ्या आयुष्यातला. जो आता माझ्या मुलीसाठी सुद्धा आहे. खूप पुस्तकं बघून ती म्हणते की, हे किती छान आहे. ती आपल्या पुस्तकांची पण नावं विचारते. तिला अजून माहिती नाही, मी काय करते.
तिला असं वाटतं की, इतकी पुस्तकं वाचते म्हणजे कुठे तरी लेखक असणार किंवा बोलायला जात असणार. तिला हे सगळं खूप छान वाटतं. ज्या पद्धतीने आपल्या मुलांना लगेच मोठं करायचं आहे, ती घाई पालक म्हणून मला भीतीदायक वाटते.
निकोप मूल वाढवण्याच्या वातावरणात आपण आहोत का? तर नाही आहोत. माझ्या 4 वर्षाच्या मुलीला पण मला ‘गुड टच-बॅड टच’ शिकवायला लागतं. तर समाज म्हणून आपण हरलो आहोत का याबाबतीत?
तर, हो हरलो आहोत आणि याचं कारण कायदा आणि सुव्यवस्था पण आहे का? तर एक आई म्हणून, मी हो म्हणेन. कारण आपल्याकडे बलात्कारी मोकाट फिरतायत. त्यांचे सत्कार होतायत. तर अशा वातावरणात मी तिला काय देऊ शकते?
‘तुझ्यासोबत काही झालं तर तर मी आहे!’ जे माझ्या वडिलांनी सांगितलं की, चुकलीस तरी मी आहे. तुला परत यायला एक वेगळा रस्ता आहे, माझ्याकडे आणि तो कायम असणार आहे.
चुका करूच नकोस हे सांगणं म्हणजे मुलाची वाढ थांबवण्यासारखं आहे. त्यांना करू देत ना. एक्सप्लोर करू देत जग. त्यांच्या अर्थाने जग त्यांना पाहू देत.
लगेच आपलं एक स्टॅम्प मारतो ना, ते जरा थांबूयात का मारताना?
धर्माचे, जातीचे, लिंगाचे, रंगाचे. तू कसं दिसतोयस? तुझे दात कसे आहेत? तुझे केस कसे आहेत? तुझी उंची कशी आहे? तू कुठले कपडे घालतोयस? तू कुठून येतोयस? तुझ्या घरात काय शिजतंय? पलीकडे जाऊन मुलांचा विचार करूयात का? आणि मला ही, दृष्टी माझ्या वडिलांनी आणि तात्यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




