Home LATEST NEWS ताजी बातमी मुस्लीमबहुल अझरबैजान देशात देवनागरी लिपीत ‘ॐ श्री गणेशाय नमः’ लिहिलेल्या या अग्नि...

मुस्लीमबहुल अझरबैजान देशात देवनागरी लिपीत ‘ॐ श्री गणेशाय नमः’ लिहिलेल्या या अग्नि मंदिराचा इतिहास काय आहे?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अझरबैजानच्या अतेशगाह अग्नि मंदिराला भेट दिली.

वाचन वेळ: 5 मिनिटे

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अझरबैजानला नुकतीच भेट दिली.

23 ऑक्टोबरला एस. जयशंकर यांनी अझरबैजानची राजधानी बाकू येथील अतेशगाह अग्निमंदिराला भेट दिली.

या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. परराष्ट्रमंत्र्यांनी लिहिलं, “बाकू येथील ऐतिहासिक अतेशगाह अग्निमंदिराला भेट दिली. हे मंदिर दोन्ही देशांच्या लोकांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.”

अझरबैजान हा कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक मुस्लीमबहुल देश आहे. पूर्वी तो सोव्हिएत संघाचा भाग होता.

सुराखानीजवळील अतेशगाह अग्निमंदिरात देवनागरी लिपीत ‘श्री गणेशाय नमः’ असं तर लिहिलेलं आहेच सोबत, देवनागरी लिपीत लिहिलेल्या आणखी 5 ओळीदेखील आहेत. त्यामध्ये हिंदू अग्निदेवता ज्वालाजी यांच्यासह इतर देवी-देवतांचे आवाहन करण्यात आलं आहे.

बहुतांश शिलालेखांची सुरुवात ‘ॐ श्री गणेशाय नमः’ या शब्दांनी होते.

देवी ज्वालाजींचा उल्लेख अनेकवेळा करण्यात आला आहे.

6 शिलालेखांमध्ये हिंदू धर्मातील पवित्र स्वस्तिक चिन्ह आढळून येते.

अग्निवेदी आणि भारतीय शिलालेखांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर अबशेरॉन द्वीपकल्पातील अग्निपूजेच्या परंपरा आणि भारतीय उपखंडातून येणारे व्यापारी व तीर्थयात्री यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधोरेखित करते.

युनेस्कोच्या माहितीनुसार, येथील इमारतींचं बांधकाम 17 व्या ते 19 व्या शतकातील आहेत.

मंदिराचा इतिहास

अबशेरॉन द्वीपकल्पात भूगर्भातून नैसर्गिक वायू बाहेर पडत असल्याने अनेक ठिकाणी अग्निज्वाळा उठत असत. या नैसर्गिक अग्निज्वाळांमुळे या स्थळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.

या मंदिराचा सुरुवातीचा इतिहास पारशी धर्माशी जोडला जातो. मात्र, आज अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा परिसर पाहिल्यास त्याचे बांधकाम प्रामुख्याने नंतरच्या काळात केल्याचं दिसून येतं.

त्यामुळे या स्थळाशी संबंधित प्राचीन धार्मिक श्रद्धा आणि येथे सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूंचा प्रत्यक्ष बांधकामाचा काळ यातील फरक लक्षात घेणं आवश्यक आहे.

अझरबैजानने युनेस्कोला सादर केलेल्या दस्तऐवजात त्याचं वर्णन मुलतानच्या भक्तांसाठी एक तीर्थक्षेत्र आणि तात्विक केंद्र असं केलं आहे.

17 व्या शतकात येथे पुन्हा तीर्थयात्रा वाढू लागल्या. अधिकृत नोंदीनुसार, त्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तीर्थयात्रेकरूंनी मंदिराच्या पुनर्बांधणीला सुरुवात केल्याचा उल्लेख 1683 मध्ये येथे भेट दिलेल्या जर्मन प्रवासी एंगेलबर्ट कॅम्फर यांच्या दस्तावेजात आढळून येतो.

मात्र, याचं बांधकाम त्यानंतरही सुरू राहिलं आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीस या स्थळाला सध्याचं स्वरूप प्राप्त झालं.

अतेशगाहचा भारताशी असलेला संबंध हे या मंदिराचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

अझरबैजानने युनेस्कोकडे सादर केलेल्या दस्तावेजात त्याचे वर्णन मुलतानहून येणाऱ्या भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक केंद्र असे केले आहे.

हे भाविक कॅस्पियन समुद्राच्या परिसरात व्यापारही करत असत.

मुलतान हे शहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. मात्र, एकेकाळी हे शहर भारतीय उपखंडातील व्यापक व्यापारी आणि धार्मिक संपर्कव्यवस्थेचं एक महत्वाचं केंद्र होतं.

भारतीय व्यापारी आणि यात्रेकरूंनी या मंदिराच्या बांधकामासाठी आणि देखभालीसाठी आर्थिक मदत केली. तसेच, त्यांनी या मंदिराचा वापरही केला.

सिल्क रूट आणि भारतीय प्रवाशांचे ठिकाण

येथील शिलालेखांमध्ये हिंदू आणि शीख परंपरांशी संबंधित संस्कृत आणि पंजाबी भाषेतील लेख आढळतात. हिंदू प्रार्थनांमध्ये गणपती आणि शिव यांच्यासह विविध देवतांचा उल्लेख आहे. तर, पवित्र अग्नीच्या पूजेचा संबंध ज्वालाजींशी जोडला गेला आहे.

‘द श्राइन ऑफ डेथ’ या पुस्तकाच्या लेखिका दिव्या कुमार यांनी 2018 मध्ये या मंदिराविषयी इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्ये एक लेख लिहिला होता.

दिव्या कुमार या लेखात लिहितात, “अतेशगाह हा इतिहास, जागतिकीकरण आणि भारतीय उपखंड व युरोप यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीची रंजक साक्ष देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या इतिहासाची मुळं 16व्या शतकापर्यंत जातात.”

युनेस्कोच्या मते, येथील इमारती 17व्या ते 19व्या शतकातील आहेत.

दिव्या कुमार यांनी लिहिलं, “अझरबैजान हा आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या सिल्क रूटचा एक महत्वाचा भाग होता. भारतीय उपखंडातील व्यापाऱ्यांना येथूनच अबशेरॉन द्वीपकल्पातील ‘ज्वाळांची भूमी’ आणि ‘अखंड ज्वाळा’ यांच्याशी संबंधित आख्यायिकांची माहिती मिळाली असावी, असं मानलं जातं.

“नैसर्गिक अग्निज्वाळांसाठी हा द्वीपकल्प प्रसिद्ध होता. खरं तर अझरबैजानला अनेकदा ‘अग्नी भूमी’ असंही म्हटलं जातं.”

“16व्या शतकाच्या अखेरीस आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय प्रवासी आणि तीर्थयात्री येथे पोहोचले. त्यांनी अतेशगाहला सध्याचं स्वरूप दिलं. गणेश आणि शिव यांसारख्या हिंदू देवी-देवतांची पूजा करण्यासोबतच ते येथील पवित्र अग्नीचीही पूजा करायचे.”

ग्राफिक्स

दिव्या कुमार पुढे लिहितात, “आम्ही हे मंदिर पाहण्यासाठी तेथे पोहोचलो, त्या दिवशी खूप जोराचा वारा वाहत होता आणि सर्वत्र धूळ उडत होती. आम्ही अझरबैजानची राजधानी बाकूपासून 20 किमीपेक्षाही कमी अंतरावर होतो.”

“बाकूला स्थानिक अझेरी भाषेत अनौपचारिकपणे ‘वाऱ्यांचं शहर’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, जोरदार वारे वाहत असूनही मंदिर परिसराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य अग्निकुंडातील पवित्र ज्योत अविरतपणे तेवत होती.”

“मध्यभागी तेवत असलेली ज्योत आणि बाजूला असलेल्या दोन गोलाकार चौथऱ्यांवर जळणाऱ्या खुल्या अग्नीला आज बाकूच्या मुख्य गॅस पाइपलाइनमधून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, भूतकाळात शेकडो नव्हे, तर कदाचित हजारो वर्षे या ज्वाला नैसर्गिकरीत्या पेटत होत्या.

“देशातील प्रचंड नैसर्गिक वायुसाठ्यातील वायू खडकाळ जमिनीच्या पृष्ठभागावरील छिद्रांमधून बाहेर पडत असे. हवेच्या संपर्कात येताच पेट घेत असे,” असं त्यांनी सांगितलं.

पारशी धर्माशी संबंधित उत्पत्ती

दिव्या कुमार लिहितात, “अझरबैजानच्या इतिहासात अग्निपूजकांनी या ‘अखंड ज्वाळांची’ पूजा केली आहे. या प्रदेशाला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या वर्णनांमध्ये 7व्या शतकापासून या ज्वाळांचा उल्लेख आढळतो.”

“इतिहासकारांच्या मते भारतीय प्रवासी येथे येण्याच्या कितीतरी आधी पारशी धर्माच्या अनुयायांनी या अग्निमंदिराचे जुने स्वरूप उभारले असावे. ‘अतेशगाह’ हा शब्द फारसी भाषेतून आला असून त्याचा अर्थ ‘अग्नीचं घर’ असा होतो.”

“1969 मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान सध्याच्या वास्तूखाली एका जुन्या इमारतीचे अवशेष आढळले होते. जुन्या मंदिराचं बांधकाम सध्याच्या बांधकामाच्या सीमेपलीकडे विस्तारलं असल्यचे काही संकेत आढळले आहेत. मात्र, 19 व्या शतकापासून सभोवतालच्या परिसरात तेल आणि वायूच्या शोधासाठी करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान त्याचे उर्वरित अवशेष नष्ट झाले असावेत.”

युनेस्कोकडे सादर करण्यात आलेल्या अझरबैजानच्या दस्तावेजानुसार, सुराखानी परिसरात पेट्रोलियम उद्योगाशी संबंधित आस्थापनांच्या विस्तारानंतर 1883 मध्ये मंदिरातील पूजा बंद झाली.

त्यानंतर या वास्तूचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. सध्या हे स्थळ ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय राखीव क्षेत्र म्हणून संरक्षित आहे.

अतेशगाह मंदिरात ठेवलेली गणेशाची मूर्ती

दिव्या कुमार आपल्या लेखात म्हणतात, “सुदैवानं, सुमारे 500 वर्षं जुनं असलेलं हे मंदिर आजही शाबूत असून आपल्या सांस्कृतिक विविधतेच्या भूतकाळातील खुणा जपून आहे. मंदिराच्या मध्यभागी असलेल्या अग्निवेदीची रचना पूर्णपणे हिंदू शैलीतील नसून तिच्यात पारशी धर्मातील पारंपरिक अग्निवेदींचंही साम्य दिसून येतं. विशेष म्हणजे, मंदिराच्या परिसरात फारसी भाषेतील एक शिलालेखही आढळून येतो.”

“अझरबैजानच्या इतिहासात पारशी धर्माला फार जुनं आणि महत्त्वाचं स्थान आहे. इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी या प्रदेशावर फारसी राजवंशांचे राज्य होते. त्या काळापासून पारशी संस्कृतीच्या खुणा आजही येथे पाहायला मिळतात.”

“पारशी नववर्ष म्हणून साजरा केला जाणारा नवरोज हा आजही अझरबैजानमधील प्रमुख सणांपैकी एक आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, 19 व्या शतकात बाकू येथील अतेशगाह मंदिर हे मुंबईहून येणाऱ्या पारशी भाविकांसाठीही श्रद्धास्थान बनलं होतं. पारशी धर्मीय एकेकाळी ज्या मंदिरात पूजा करत असत, त्याच ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घेण्यासाठी हे भाविक भारतातून येथे येत असत,” असं दिव्या कुमार यांनी म्हटलं आहे.

1969 मध्ये जीर्णोद्धार केल्यानंतर 1975 साली या मंदिराचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. 1998 मध्ये या स्थळाचा अधिकृतपणे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC