Source :- BBC INDIA NEWS
ANI
वाचन वेळ: 5 मिनिटे
रविवारी (25 ऑक्टोबर) बिहारची राजधानी पाटणा इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेत, नरेंद्र मोदी सत्तेवरून पायउतार होणार नाहीत, असं एका व्यक्तीनं म्हटल्यानं गदारोळ झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कार्यक्रमाच्या व्हीडिओमध्ये, खर्गे यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती उभी राहून नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसत आहे. त्यानंतर खर्गे संतापतात आणि पंतप्रधान मोदींबद्दल एक वक्तव्य करतात.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खर्गे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
नेमकं काय झालं?
बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. श्री कृष्ण सिंह यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त 25 ऑक्टोबर रोजी पाटणा इथं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावर खर्गे खूप संतापलेले दिसले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा उल्लेख करत असं काही वक्तव्य केलं, ज्यावरून भाजप नेते आता त्यांच्यावर हल्ला चढवत आहेत.
खर्गे यांच्या वक्तव्यानंतर त्या व्यक्तीला कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं.
भाजपने केली टीका
गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलंय की, “काँग्रेस पक्षानं मोदीजी किंवा त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरण्याची ही पहिली वेळ नाही. कधी त्यांनी त्यांच्या आदरणीय आईविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली, कधी त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटलं, तर कधी ‘चायवाला’ म्हणून त्यांच्या गरिबीची खिल्ली उडवली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दररोज असभ्यतेच्या मर्यादा ओलांडत आहे.”
त्यांनी लिहिलं की, “जेव्हा जेव्हा त्यांनी मोदीजी किंवा त्यांच्या कुटुंबावर अपमानजनक वक्तव्य केलं आहे, तेव्हा जनतेनं काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं आहे.”
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलंय की, “आज पाटणा इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल वापरलेली असभ्य आणि असंसदीय भाषा काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी दर्शवते.”
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या वक्तव्याबद्दल खर्गे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
Getty Images
गोंधळ घालणारी व्यक्ती भाजप कार्यकर्ता – काँग्रेस
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी खर्गे यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालणारी व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाकडून खर्गेजींना वाईट वागणूक मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. आधी, ते दलित असल्यामुळे त्यांनी उत्तराखंडमध्ये शुद्धीकरणाची घृणास्पद प्रथा अवलंबली. आणि आज, जेव्हा खर्गेजी बिहारमध्ये भाषण देत होते, तेव्हा भाजपच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं की मोदी जाणार नाहीत.”
त्यांनी सांगितलं की, भाजप कार्यकर्त्यांनी खर्गेजींसारख्या ज्येष्ठ नेत्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली.
पवन खेरा म्हणाले की, “हे सर्व पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरून होत आहे. मल्लिकार्जुन खर्गेजींचा वारंवार अपमान केला जात आहे. देश त्यांना माफ करणार नाही.”
खर्गे म्हणाले की, ‘भाजपनं मतं चोरून सरकार स्थापन केलं.’
बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. श्रीकृष्ण सिंह यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत खर्गे यांनी एनडीए सरकारवर ‘मतचोरी’ केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, “भाजपनं ‘मते चोरून’ सरकारं चोरली आहेत. पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रात चोरलेली सरकारं आहेत. आम्ही या चोरांना नक्कीच धडा शिकवू.”
ANI
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “ज्ञानेश कुमार केवळ एका पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठीच काम करत नाहीत, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपचं तिकीट मिळवून देऊन मंत्री बनवण्याचं कंत्राटही घेत आहेत. ही माहिती केरळच्या एका माजी मुख्य सचिवांनी दिली आहे.”
पुढे ते म्हणाले की, “अमित शाह देशाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगात आपल्या अनुयायांना बसवलं आहे आणि मतांची चोरी करत आहेत. याच आधारावर ते 30 वर्षे सत्तेत राहण्याबद्दल बोलतात.”
खर्गे म्हणाले की, “नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याची सवय आहे. ते म्हणाले होते, मी 100 दिवसांत काळा पैसा परत आणीन. मी प्रत्येकाला 15 लाख रुपये देईन. मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करीन. मी अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सची करीन. आज 2026 मध्ये त्यांचं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही.”
आरएसएसवर निशाणा
आरएसएसच्या विचारधारेवर टीका करताना ते म्हणाले की, “जोपर्यंत या देशात आरएसएसची विचारधारा आहे, तोपर्यंत शांतता नांदणार नाही.”
खर्गे म्हणाले की, “आरएसएस आपल्या स्थापनेपासूनच जातीयवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे.”
पुढे ते म्हणाले की, “आज जर आपण आरएसएसबद्दल बोललो, तर लोक त्याचा वेगळा अर्थ लावू शकतात. पण तुम्हाला लक्ष्य केलं जात आहे कारण तुम्ही तुमच्या स्थापनेपासून तेच काम करत आला आहात. म्हणूनच तुम्हाला लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे, जोपर्यंत या देशात आरएसएसची विचारधारा टिकून राहील, तोपर्यंत शांतता नांदणार नाही.”
ऑगस्ट 2026 मध्ये उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं घडलेल्या कथित शुद्धीकरण घटनेचा संदर्भ देत खर्गे यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेचा निषेध केला.
Getty Images
खर्गे म्हणाले की, “आजही आरएसएस-भाजप अस्पृश्यतेच्या भावना आणि संविधानाविरोधी विचार असलेल्या लोकांनी भरलेली आहे. मला खेद वाटतो की, समाजवादाच्या विचारधारेनं राजकारणात आलेले नितीश कुमार अखेरीस भाजप आणि आरएसएसच्या मांडीवर बसले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती कमकुवत होऊन आपली विचारधारा सोडून देते, तेव्हा असंच घडतं.”
हल्द्वानी घटनेचा संदर्भ देत खर्गे म्हणाले की, “8 ऑगस्ट 2026 रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानीमधील एका मंदिराजवळील मंचावर शुद्धीकरण विधी पार पडला. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही जर अस्पृश्यता कायम राहिली, तर ऐक्य कसं साधलं जाईल?”
हल्द्वानीतील रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या सभेनंतर शुद्धीकरणासंदर्भात हा वाद सुरू झाला.
रॅलीनंतर, एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनी कार्यक्रमस्थळी शुद्धीकरणाचा विधी केला, ज्यावर काँग्रेस नेत्यांनी अस्पृश्यतेचं उदाहरण म्हणून टीका केली आहे.
मात्र, तत्कालीन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
धामी म्हणाले होते, “तिथं ज्यांनी कुणी शुद्धीकरण केलं, त्यात एकाही भाजप कार्यकर्त्याचा सहभाग नव्हता.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




