Home LATEST NEWS ताजी बातमी कोल्हापूरच्या तरुणानं घेतली न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानींची भेट; कोण आहे दर्शन मगदूम?

कोल्हापूरच्या तरुणानं घेतली न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानींची भेट; कोण आहे दर्शन मगदूम?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

दर्शन मगदूम

कोल्हापूरमधील गडहिंग्लजच्या दर्शन मगदूम या मुलानं नुकतीच ‘बॉय थ्रॉब’ बँडच्या सहकाऱ्यांसोबत न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची भेट घेतली. यावेळी दर्शन आणि ममदानी यांच्यात हिंदी भाषेत संवाद झाला. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या भेटीचा व्हीडिओ या बँडने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या पोस्टनुसार, न्यूयॉर्क महापौर कार्यालयात येणारे तुम्ही पहिले बँड आहात, असं ममदानींनी म्हटलं.

दरम्यान, या व्हीडिओमध्ये दर्शनने म्हटलं, “मला किती आनंद होत आहे हे मी सांगू शकत नाही.

मी जेव्हा माझ्या मित्रांना सांगितलं की, मी न्यूयॉर्क शहराच्या महापौर झोहरान ममदानी यांना भेटणार आहे. तेव्ही त्यांनी ‘आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो’, असं तुम्हाला सांगायला सांगितलं.” या व्हीडिओमध्ये ममदानी दर्शनला तुम्ही भारतातील कुठल्या भागातून आहात असं विचारताना दिसले.

या भेटीनंतर दर्शन मगदूम पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दर्शन मगदूम कोण आहे, तो अमेरिकेच्या ‘बॉय थ्रॉब ‘ बँडचा सदस्य कसा झाला? त्याला अमेरिकेचा आर्टिस्ट व्हिजा कसा मिळाला? हे जाणून घेऊया.

दर्शनचे बालपण कसे होते?

दर्शनचे बालपण इतर अनेकांप्रमाणेच अगदी साधे होते. शाळेत जाणे, घरी आल्यावर शास्त्रीय संगीताचा सराव करणे, अभ्यास करणे आणि वेळेवर झोपणे असा त्याचा दिनक्रम असायचा.

बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या बालपणावर दर्शन म्हणाला, “खरं सांगायचं तर आजही माझी जीवनशैली बऱ्याच अंशी तशीच आहे. लवकर झोपणे आणि लवकर उठणे या गोष्टीवर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.”

दर्शन मकदूम

दर्शनचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे त्याच्या कुटुंबात शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिले गेले. दर्शन पदवीधर आहे. त्याच्या आई-वडिलांची त्याच्याकडून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचीही अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाही.

“मी कंटेंट तयार करायला सुरुवात केली आणि त्यातून सकारात्मक बदल घडू लागले. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्याऐवजी मी याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला,” असं तो याविषयी बोलताना सांगतो.

“मला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. मी आणि माझा भाऊ दोघांनीही शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आमचे जवळजवळ दररोज वर्ग असायचे. लहानपणापासून नियमित सराव केल्यामुळे संगीताची आवड अधिक वाढली. माझा संगीताचा प्रवास खऱ्या अर्थाने तिथूनच सुरू झाला, असे मला वाटते,” असं दर्शनने सांगितलं.

या प्रवासात किती अडचणी आल्या?

या क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण करताना किती अडचणी आल्या असं विचारल्यावर दर्शन म्हणतो की, त्याला फारशा अडचणी आल्या, असे तो म्हणणार नाही.

“याचे मुख्य कारण म्हणजे मी लोक काय म्हणतील याचा फार विचार न करता आणि स्वतःवर जास्त दबाव न आणता कंटेंट तयार करायला सुरुवात केली. या प्रवासात मला अनेक मजेशीर प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, नकारात्मक कमेंट्सपेक्षा सकारात्मक प्रतिक्रिया अधिक होत्या,” असं तो सांगतो.

तो पुढे म्हणतो, “सुरुवातीला आणि कदाचित आजही काही लोक मला कंटेंट क्रिएटरपेक्षा मीम म्हणूनच अधिक ओळखतात, याची मला जाणीव आहे. मात्र, कालांतराने माझे कामच माझी ओळख बनले आहे, असे मला वाटते.”

“मला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला, हे माझे भाग्य आहे. ब्रुनो मार्स आणि अॅडम लेव्हिन यासारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी माझ्या कामाचा उल्लेख करणे, भारतीय कलाकारांसोबत शूटिंग करणे, मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि प्रीमियम ब्रँड्ससोबत काम करणे किंवा अमेरिकेतील बॉय बँड ‘बॉय थ्रॉब’चा सदस्य होणे, अशा अनेक संधी मला मिळाल्या,” असंही तो नमूद करतो.

मागे वळून पाहताना चांगले किंवा वाईट प्रत्येक अनुभवाने आपल्याला आजच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यास मदत केल्याचंही तो नम्रपणे सांगतो.

बॉय थ्रॉब

‘बॉय थ्रॉब’ बँडच्या भेटीची रंजक गोष्ट काय?

दर्शनच्या आणि ‘बॉय थ्रॉब’ बँडच्या भेटीची गोष्टही रंजक आहे. सुरुवातीला त्याला लॉस एंजेलिसमधील एका टीमचा ईमेल येतो. तेव्हा त्याला या बँडबद्दल पहिल्यांदा समजले. ही टीम अमेरिकेत एक बॉय बँड तयार करण्याच्या विचारात होती.

‘बॉय थ्रॉब’ बँडची ही कल्पना दर्शन आणि त्याच्या टीमला आवडली आणि त्यांनी या बँडशी फोनवर बोलायचे ठरवले. मात्र, यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल आणि जगभरातील लोकांकडून त्याला इतके प्रेम मिळेल, याची कल्पनाही नव्हती.

‘बॉय थ्रॉब’ बँडच्या टीमने दर्शनची काही कव्हर गाणी आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांनी दर्शनच्या कामाचा केलेला उल्लेख पाहिला होता.

दर्शन मगदूम आणि सहकारी

दर्शन सांगतो, “त्या काळात माझा बराचसा कंटेंट अमेरिकेत व्हायरल होत होता आणि तिथे माझे फॉलोअर्स वाढत होते. लोक माझ्या कंटेंटचे मजेशीर एडिट्सही तयार करत होते. हे व्हीडिओ इन्स्टाग्राम रील्स आणि टिकटॉकवर फिरत होते.”

“त्या प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि आकडेवारी पाहिल्यानंतर ही संधी तपासून पाहण्यासारखी आहे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही ही संधी घेऊन पाहण्याचा निर्णय घेतला,” असं तो सांगतो.

या सर्व गोष्टी निश्चित झाल्यानंतर दर्शची बँडमधील इतर सदस्यांशी भेट झाली.

‘बॉय थ्रॉब’ बँडची सुरुवात

बॉय थ्रॉब बँडने सोशल मीडियावर लोकांना थक्क केले आहे. त्यांनी अवघ्या एका वर्षातच त्यांच्या फॉलोअर्सचे लक्ष्य पूर्ण केलें.

बॉय थ्रॉबच्या टीममध्ये दर्शनशिवाय इव्हान पापिए, अँथनी की, झॅकरी सोबानिया हे आहेत. त्यांची ओळख ऑनलाइन झाली, पण इव्हान आणि अँथनी यांची पहिली ओळख अमेरिकन आयडॉल या अमेरिकन गायन स्पर्धेतील अयशस्वी ऑडिशननंतर झाली.

2021 मध्ये शोच्या 19 व्या सीझन दरम्यान अँथनीने के-पॉप बँड बीटीएसच्या ‘डायनामाइट’ या गाण्याचे कव्हर सादर केले. मात्र यात त्याला यश मिळाले नाही.

एका वर्षानंतर इव्हाननेही ऑडिशन दिली आणि त्यालाही अपयश आले. त्याने गायलेलं गाणं प्रसारितच झालं नाही. यानंतर इव्हानने टिकटॉकवर आपला चाहतावर्ग तयार केला आणि पुढे हा बँड तयार झाला.

कोल्हापूरच्या दर्शन मगदूमने 3 ऑगस्टला त्याच्या बँडमधील बाकी सदस्यांना व्हीडिओ कॉल करून त्याला व्हिजा मिळाल्याचं सांगितलं. “आपण करून दाखवलं”, असं तो म्हणतो.

हा व्हीडिओ बॉय थ्रॉब बँडनं त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर टाकला आहे. या बँडमध्ये दर्शनशिवाय इव्हान पापिए, अँथनी की आणि झॅकरी सोबानिया यांचा समावेश आहे. मात्रं, या बॉय थ्रोब बँडची सुरुवात कशी झाली?

बॉय थ्रॉब

28 ऑक्टोबर 2025 रोजी या बँडने पहिला व्हीडिओ पोस्ट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडिओ पोस्टमध्ये त्यांनी त्यांची ओळख करून देत त्यांना ‘ग्रॅमी पुरस्कार’ मिळवायचा असल्याचं म्हटलं.

कॉस्मोपॉलिटन या मासिक आणि डिजिटल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बँडमध्ये कोण कसं सहभागी झालं याविषयी बोलताना इव्हानने सांगितलं, “मी अमेरिकन आयडल या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. मी पाहिलं की अँथनीसुद्धा या कार्यक्रमात आला होता. माझी ऑडिशन अमेरिकन आयडलने कधीच प्रसारित केली नाही, याचा मला खूप राग आला होता आणि निराशा वाटत होती. यामुळे ही निराशा कोणासोबत तरी बोलून व्यक्त करता यावी, एवढ्याच हेतूने मी आणि अँथनीने बोलायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला दर्शन आणि झॅकरी ऑनलाइन भेटले.”

याच मुलाखतीत अँथनी म्हणाला, “मी आणि इव्हान काही काळापासून स्वतंत्र गायक म्हणून काम करत होतो. आम्हाला वाटलं की, आम्हाला मोठं व्हायचं असेल, तर आपण एक ग्रुप तयार करायला हवा. आम्हाला काहीतरी वेगळा विचार करायचा होता आणि एक बॉय बँड तयार करायचा होता; पण तो आधीच्या सर्व बॉय बँडपेक्षा वेगळा असावा, अशी आमची इच्छा होती.”

“दरम्यान, आम्हाला दर्शन भेटला. तो भारतात अप्रतिम काम करत होता. आम्ही विचार केला, ‘या मुलाला आपल्या बँडमध्ये घेऊया’ पण अडचण अशी होती की, त्याच्याकडे अमेरिकेत येण्यासाठी व्हिजा नव्हता. आम्हाला एक बास गायकसुद्धा शोधायचा होता आणि तो म्हणजे झॅकरी. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी एकामागून एक घडत गेल्या आणि हा ग्रुप तयार झाला”, असं त्यानं सांगितलं होतं.

अमेरिकेचा व्हिजा मिळवतानाचे चढउतार

दर्शनचा आर्टिस्ट व्हिजा (O-1 व्हिसा) मिळवण्याचा प्रवासही चढ-उतारांनी भरलेला होता. त्याला अमेरिकेतील या बँडचा प्रकल्प खरा असल्याचे, बँड म्हणून ते करत असलेल्या कामाचे आणि संगीतनिर्मितीतील त्यांच्या प्रगतीचे पुरेसे पुरावे सादर करावे लागले. यासाठी त्यांनी काही मूळ गाणी प्रसिद्ध केली. त्यांना मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता, असं दर्शन सांगतो.

आपल्या पहिल्या व्हीडिओत या बँडने आपली ओळख करून देताना दर्शन मगदूमने तो त्याच्या बँडपासून दूर भारतात अडकल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या इमिग्रेशन वकिलाने सांगितल्यानुसार, दर्शनला अमेरीकेचा व्हिजा मिळवण्यासाठी त्यांच्या बँडच्या इन्स्टाग्राम पेजवर 1 मिलियन फॉलोअर्स असणं गरजेचं आहे, असं सांगण्यात आलं. या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दर्शनला अमेरीकेचा व्हिजा मिळवून देण्यासाठी 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करण्याचं आवाहन केलं.

तो सांगतो, “या प्रवासाची सुरुवात लोकांसाठी विनामूल्य कार्यक्रम करण्यापासून झाली. आमचा पहिला कार्यक्रम एका वृद्धाश्रमात झाला. त्या काळात मी झूमद्वारे या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो. वृद्धाश्रमातील कार्यक्रमानंतर इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर आमच्या कंटेंटला मोठा प्रतिसाद मिळू लागला. आमचे फॉलोअर्स वेगाने वाढले आणि अवघ्या 2 महिन्यांत फॉलोअर्सची संख्या 5 लाखांच्या जवळ पोहोचली.”

“10 लाख (1 मिलियन) फॉलोअर्सचा टप्पा गाठणे हा एका मोठ्या प्रवासाचा भाग होता. हे केवळ आकड्यांपुरते मर्यादित नव्हते. प्रत्येक कार्यक्रम, कंटेंट, मूळ गाणे आणि प्रेक्षकांशी झालेला संवाद यामुळे ‘बॉय थ्रॉब’ हा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्ग असलेला आणि वेगाने वाढणारा खरा संगीत प्रकल्प असल्याचे दाखवण्यास मदत झाली. या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला पुरावे गोळा करत राहावे लागले आणि आमची बाजू अधिक मजबूत करावी लागली,” असंही तो नमूद करतो.

दर्शन मगदूम

सुरुवातीच्या काळात दर्शनने ग्रीन स्क्रीनचा वापर करून बरेच व्हीडिओ तयार केले. त्यामुळे तो प्रत्यक्ष बँडसोबत अमेरिकेत उपस्थित नसतानाही स्वतःला प्रेक्षकांसमोर सादर करू शकला आणि अमेरिकेतील प्रेक्षकांशी कनेक्ट झाला.

“या अनुभवातून उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर करणे, सातत्य राखणे आणि कोणत्याही परिस्थितीत लोकांना आवडेल असा कंटेंट तयार करायला मी शिकलो,” असं तो सांगतो.

‘बॉय थ्रॉब’च्या अनेक कार्यक्रमांनंतर मूळ गाणी प्रसिद्ध केल्यानंतर आणि या बँडचा एक प्रेक्षकवर्ग वाढल्यानंतर अखेर जून 2026 मध्ये दर्शनला अमेरिकेचा ओ-वन व्हिसा मिळाला.

दर्शनने एक अनपेक्षित संधी स्वीकारली, कंटेंट आणि संगीतनिर्मितीत सातत्य राखलं आणि एका फोन कॉलने त्याला आंतरराष्ट्रीय बॉय बँडचा सदस्य होण्यापर्यंतचा प्रवास घडवला. हे सर्व घडले, याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो.

या टूरच्या तारखा जाहीर होणं बाकी आहेत. 28 ऑक्टोबर 2026 ला या बँडला 1 वर्ष पूर्ण होत आहे.

दर्शनच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?

दर्शनच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सामान्य आहे. त्यामुळे कंटेंट तयार करण्याच्या क्षेत्रात कोणत्या संधी मिळू शकतात, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागला.

याविषयी दर्शन सांगतो, “मी कंटेंटमधून पैसे कमवायला लागल्यानंतरही माझ्या कमाईबद्दल ते फारसे प्रभावित झाले नव्हते. त्यांनी मला पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्थिर नोकरी करण्याचा सल्ला देणे सुरूच ठेवले. त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. कारण ते अशा पिढीत आणि वातावरणात वाढले आहेत, जिथे इंटरनेटवरील कामाकडे करिअर म्हणून पाहिले जात नव्हते.”

“लोक मला सार्वजनिक ठिकाणी ओळखू लागले आणि माझ्यासोबत फोटो काढण्याची विनंती करू लागले, तेव्हा परिस्थिती बदलू लागली. लोक मला ओळखतात, माझे काम अनेकांपर्यंत पोहोचले आहे आणि कंटेंट तयार करणे हे प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणारे करिअर आहे, याची त्यांना जाणीव होऊ लागली,” असं दर्शन नमूद करतो.

दर्शन मगदूम

‘बॉय थ्रॉब’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याच्या कुटुंबाला स्वाभाविकपणे काळजी वाटली. विशेषतः तो अमेरिकेला जाणार असल्यानंही त्यांना चिंता होती. पण त्याच वेळी आपला मुलगा काहीतरी वेगळे करत असल्याचा त्यांना खूप अभिमानही होता.

दर्शनच्या कुटुंबात अशा प्रकारचे काम करणारा तो पहिलाच होतो. त्यामुळे हा प्रवास त्याच्या पालकांसाठी आणखी खास ठरल्याचं दर्शन अधोरेखित करतो.

दर्शनने अमेरिकेला जाण्यापूर्वीचा नेहमी लक्षात राहिल असा एक प्रसंगही सांगितला. दर्शनला ही संधी मिळाल्यानंतर त्याच्या गावात आणि शाळेत अनेक ठिकाणी त्याचे ‘बॉय थ्रॉब’मध्ये सहभागी होणार असल्याचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते.

“मी जिथे लहानाचा मोठा झालो, तिथे अशा प्रकारे माझी दखल घेतली जात असल्याचे पाहणे अविश्वसनीय होते. याचवेळी माझ्या कुटुंबाला माझ्या प्रगतीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली,” दर्शन सांगतो.

ट्रोलिंगचा काय परिणाम झाला, त्याचा सामना कसा केला?

सोशल मीडियावरील त्याच्या ट्रोलिंगवरही दर्शनने भाष्य केलं. तो म्हणाला, “लोकांना वाटते तितक्या मला द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला नाही. अशा कमेंट्स आल्याच, तर मी सहसा त्यांना उत्तर देत नाही. खरं सांगायचं तर, त्यांचा मला फारसा त्रास होत नाही किंवा त्याचा माझ्यावर वैयक्तिक परिणाम होत नाही.”

“इंटरनेटवर लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मनावर परिणाम करून घ्यायचा नसतो, हे मी शिकलो आहे. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक नकारात्मक कमेंटला उत्तर देण्याची किंवा सर्वांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.”

“खरं तर, कंटेंट क्रिएटरच्या दृष्टीने पाहिले तर नकारात्मक कमेंट्समुळेही व्हीडिओवरील सहभाग वाढू शकतो. त्यामुळे त्याचा मनःशांतीवर परिणाम होऊ देण्याऐवजी मी त्याकडे अशा दृष्टिकोनातून पाहतो. शेवटी, मला जे काम आवडते ते कंटेंट तयार करण्यावर आणि माझे काम मनापासून आवडणाऱ्या लोकांशी कनेक्ट राहण्यावरच माझी ऊर्जा खर्च करायची आहे,” असं तो नमूद करतो.

भविष्यासाठी स्वप्ने काय आहेत?

सध्या दर्शनचे सर्वाधिक लक्ष ‘बॉय थ्रॉब’वर आणि 2027 पर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या अमेरिकेतील दौऱ्यावर आहे. सध्या त्याची सगळी ऊर्जा याच गोष्टींवर केंद्रित आहे.

तो म्हणतो, “आमचे बरेच कार्यक्रम हाऊसफुल होत आहेत. प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे आणि त्यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.

'बॉय थ्रॉब'

“भविष्यात आम्हाला इतर देशांमध्येही कार्यक्रम सादर करायला आणि आमचे संगीत आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवायला आवडेल. मात्र, अमेरिकेतील दौरा पूर्ण झाल्यानंतरच आम्ही याबाबत निर्णय घेऊ,” असं तो सांगतो.

‘बॉय थ्रॉब’ बँडला 28 ऑक्टोबर 2026 रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या 1 वर्षांच्या प्रवासाविषयी तो म्हणतो की, खरं सांगायचं तर, हे सगळं अविश्वसनीय वाटतं. इंटरनेटवर रील्स तयार करण्यापासून सुरू झालेला प्रवास एका बॉय बँडचा भाग होण्यापर्यंत आणि संपूर्ण अमेरिकेतील प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करण्यापर्यंत घेऊन जाईल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती.

कोल्हापूर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा अनुभव कसा होता?

दर्शनसाठी कोल्हापूर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा अनुभव अविश्वसनीय वाटतं. तो म्हणतो, “कोल्हापुरात लहानाचा मोठा होताना इंटरनेटवर रील्स तयार केल्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता येईल आणि अमेरिकेतील एका बॉय बँडचा भाग होता येईल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती.”

“मला आवडणाऱ्या गोष्टी करत राहिलो आणि मिळणाऱ्या संधींसाठी स्वतःला तयार ठेवले, त्यामुळे हा प्रवास नैसर्गिकपणे घडत गेला. माझ्या गावी कंटेंट तयार करण्यापासून ते अमेरिकेत कार्यक्रम सादर करण्यापर्यंतचा हा प्रवास अविश्वसनीय आहे. कधी कधी आजही हे सगळं खरंच घडत आहे, यावर माझा विश्वास बसत नाही,” असंही तो नमूद करतो.

दर्शनचा सोशल मीडियावरील उदय कसा होता?

कोल्हापूरच्या दर्शनच्या सोशल मीडियावरील उदयाविषयी बोलताना अमुक तमुकचे प्रमुख आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओंकार जाधव म्हणाले, “सोशल मिडीया एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकतं याचं एक उत्तम उदाहरण दर्शन आहे. 1-2 वर्षांपूर्वी मी त्याला पाहिलं होतं ज्यावेळी तो ट्रोल होत होता. त्यावेळी मी त्याचं इन्स्टाग्राम पेज पाहिलं. त्याचे ग्रीन पडद्यावर केलेले सर्व व्हीडिओ पाहिले. त्यावेळी अमेरिकन गायक ब्रुनो मार्सने त्याचे व्हीडिओ शेअर केल्यानंतर तो लोकांच्या नजरेत आला.”

“दर्शन खूप प्रामाणिक आहे. त्याच्या कव्हर्समधून हे दिसत आलेलं आहे. तो जेव्हा ट्रोल झाला तेव्हा त्याने ते ट्रोलिंग फार गांभिर्याने न घेता तो त्याचं काम करत राहिला. कारण त्याला त्याचं काम आवडत होतं आणि ट्रोलिंग झाल्यानंतरही त्याने ते करणं थांबवलं नाही. जेव्हा व्हिजा मिळवण्यासाठी त्याने काँटेंट बनवायला सुरुवात केली, तेव्हा मला हे बघून फार चांगल वाटलं की, तुम्ही तुमच्या भाषेत जमेल तसा काँटेंट तयार करून टाकता आणि त्यातून खरंच काही तरी घडतं,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दर्शनच्या सोशल मीडियावरील उदयावर बोलताना डिजिटल क्रिएटर चिन्मय दामले म्हणाले, “दर्शनच्या गायकीवर सुरुवातीला विनोद झाले. अनेकांना वाटलं की हा खिल्ली उडवतोय किंवा काहीतरी प्रँक करतोय. पण त्याचे प्रेक्षक वाढतच गेले. इंटरनेटची गंमत अशी की, आपल्याला सहसा न आवडणार्‍य़ा गोष्टी आपण मजेत ऐकतो आणि पाहतो. त्याबद्दल बोलत राहतो. मित्रांना पाठवतो. या प्रक्रियेत तो गायक अधिक प्रसिद्ध होतो.”

“सुरुवातीला अनेक प्रेक्षक, ज्यांत जेन झी आणि सोशल मीडिया वापरणारे तरुण अधिक आहेत, या सगळ्याकडे चेष्टेनं किंवा गंमत म्हणून बघत होते. या चौघांचं एकत्र येणं, त्यासाठी जगभरातल्या लोकांनी प्रयत्न करणं, इतर तिघं जातील तिथे दर्शनचा कटआऊट नेत, या सार्‍यांतून त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

बॉय थ्रॉब

दर्शनच्या इतक्या मोठ्या स्टेजवर जाण्याच्या प्रवासाविषयी ओंकार जाधव म्हणाले, “बरेच छोटे क्रिएटर त्यांना जमेल तसा काँटेंट तयार करतात आणि टाकतात. त्यांना कळत नाही की, त्यांनी थोडं पॉलिश असलं पाहिजे का? मी प्रमाण भाषा बोलायला पाहिजेल का? माझं इंग्रजी चांगलं नाही. यासारखा आत्मविश्वास नसला तरी हे घडतं. त्यामुळे कोल्हापुरचा मुलगा त्याच्या पद्धतीने काँटेंट करून इतक्या मोठ्या स्टेजवर पोहचतो ही अभिमानाची बाब आहे.”

“आपण सोशल मिडीयावर वेगवेगळ्या प्रकारचे कोलॅबरेशन बघत असतो. मला हेही एक कोलॅबरेशनच वाटते. त्यामुळे, बॉय थ्रॉब या बँडला साउथ एशियन कम्युनिटीमध्ये, इंडियन कम्युनिटीमध्ये एक प्रेक्षक वर्ग मिळाला आणि त्याचं रुपांतर फॅन्समध्ये झालं. त्यामुळे घरच्याघरी बनवलेल्या काँटेंटमुळे हा बदल होऊ शकतो हे पाहणं प्रेक्षकांना प्रेरणा देणार पण आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

दर्शनचं हे यश का महत्त्वाचं?

दर्शनच्या यशाचं महत्त्व अधोरेखित करताना चिन्मय दामले म्हणाले, “दर्शनच्या गाण्यांचा विचार करताना सूर, ताल, स्वरांवरचं नियंत्रण, सादरीकरण यांचा फक्त विचार करता येत नाही. शिवाय आपल्याकडे ‘चांगलं’ आणि ‘वाईट’ संगीत कोणतं, याबद्दल बोलताना शास्त्रीय/अभिजात आहे ते चांगलं, बाकी बकवास, असा समज आहे.”

“अगदी चित्रपटसंगीतही दुय्यम असं मानणारे अनेक आहेत. लता-आशा-रफी-किशोर यांचे असंख्य चाहते पाश्चात्त्य लोकप्रिय संगीतास नाकं मुरडतात. त्यामुळे दर्शन या पारंपरिक चौकटीत बसत नाही. पण दर्शनचं सादरीकरण, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची प्रतिमा, त्याभोवती होणारे विनोद, प्रेक्षकांचं त्याच्या आयुष्यात गुंतणं यांनाही त्याच्या गायकीत महत्त्व आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

बॉय थ्रॉबनं आपली जी प्रतिमा तयार केली आहे, त्यात त्यांच्या कपड्यांची निवड अतिशय रंजक आहे. त्यांच्या गुलाबी ट्रॅकसूट आणि पिवळे स्नीकर्सवर बोलताना चिन्मय दामले म्हणतात, “यांच्याकडे व्हिजुअल पॅरडी म्हणून बघता येईल, असं मला वाटतं. 1990च्या दशकातल्या बॅकस्ट्रीट बॉइज्‌ किंवा एनसिंक अशा लोकप्रिय बॉय बँडचे कपडे असे एकसारखे असत. तीच पद्धत इथे वापरलेली दिसते.”

“सारखे कपडे घातल्यानं एकत्रित व्यक्तिमत्त्व तयार होतं. प्रेक्षकांना प्रत्येकाची नावं माहीत नसली, तरी दृश्यओळख तयार होते. पुरुष गायकाची ‘मॅचो’ इमेज अनेक दशकं जाणीवपूर्वक तयार केली गेली आहे. या प्रतिमेला हे कपडे छेद देतात. गुलाबी रंग आणि आक्रमक पौरुष हे परस्परविरोधी आहेत. म्हणजे पौरुषाच्या रूढ कल्पनांना आव्हान दिलं आहे. हे जाणीवपूर्वक केलं आहे का, हे माहीत नाही,” असंही ते नमूद करतात.

‘प्रचलित मानकांमध्ये न बसल्यानं खिल्लीही उडवली गेली’

दर्शन मगदूम

पाश्चात्य पॉप बँडमध्ये सहसा स्टिरिओटिपिकल ‘देखणे’ चेहरे असतात. दर्शन त्यात बसत नाही. प्रसिद्धी मिळवण्यापूर्वीही कव्हर्स गाताना दर्शनची वेशभूषा, त्याचे हावभाव हे प्रचलित मानकांमध्ये बसणारे नव्हते. त्यामुळे त्याची खिल्लीही उडवली गेली.

दर्शनला सुरुवातीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. त्यावर बोलताना चिन्मय दामले म्हणाले, “इन्स्टाग्रामवर मी प्रतिक्रिया वाचत आलो आहे. दर्शनचं गाणं, त्याचा वावर यांमुळे भारतीयांचा अपमान होतो, असं काही लोकांचं म्हणणं होतं. पण दर्शनला जगभरातून प्रेम मिळालं. त्याच्या सहसदस्यांनी त्याला कुठेही कमीपणाची वागणूक दिलेली दिसत नाही. त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळावा, म्हणून अनेक देशांतल्या लोकांनी प्रयत्न केले. त्यामुळे ही केवळ एका अंडरडॉगची किंवा शोषणाची गोष्ट नाही.”

“पॉप संगीताच्या इतिहासात एकसारखे कपडे, ठराविक रंग, नृत्याच्या हालचाली आणि सामूहिक सादरीकरण यांच्या माध्यमातून बँडची दृश्य ओळख तयार केली जाते. बॉय थ्रोबनं ही परंपरा विनोद, अतिरंजितपणा आणि सोशल मीडियाची भाषा यांच्याशी जोडली आहे.”

“पूर्वी प्रेक्षक गाणं ऐकायचा, कलाकाराचा कार्यक्रम पाहायचा आणि घरी परतायचा. आता तो कलाकाराच्या लोकप्रियतेच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतो. व्हीडिओ शेअर करणं, कमेंट करणं, त्याची नक्कल करणं, ऑनलाइन मोहिमेत सहभागी होणं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणं, या सगळ्या कृतींमधून तो कलाकाराची सार्वजनिक प्रतिमा घडवतो. बॉय थ्रॉबच्या चाहत्यांनीही हेच केलं,” असंही ते नमूद करतात.

दर्शनचा सच्चेपणा ट्रोलिंगला पुरून उरला

इंटरनेटच्या भाषेत ‘क्रिंज’ ही अत्यंत क्रूर भावना मानली जाते. समोरच्याचं सादरीकरण, उच्चार किंवा वर्तन पाहून अंगावर काटा येणं, त्याच्या फजितीवर हसणं याला क्रिंज म्हटलं जातं. दर्शनचे सुरुवातीचे कव्हर्स व्हायरल झाले, तेव्हा त्याला याच क्रिंजच्या चष्म्यातून पाहिलं गेलं.

यावर बोलताना चिन्मय दामले म्हणाले, “लोक ते व्हीडिओ एकमेकांना शेअर करत होते, कारण त्यातून त्यांना एक प्रकारचा श्रेष्ठत्वाचा आनंद मिळत होता. पण दर्शनचा सच्चेपणा पुरून उरला. त्यानं ट्रोलिंगला उत्तर दिलं नाही. शैली बदलली नाही. गाणं सुरूच ठेवलं. त्यामुळे ट्रोलिंग मागे पडलं. आजच्या ऑटोट्यूनच्या, एआयच्या काळात प्रेक्षकांना कलाकाराचं कच्चं असणं आवडतं.”

1964 मध्ये सुझन सॉन्टॅग यांनी ‘नोट्स ऑन कॅम्प’ या निबंधात ‘कॅम्प’ या सौंदर्यशास्त्राची व्याख्या मांडली होती. कॅम्प म्हणजे इतकं टोकाचं वाईट, अतिशयोक्तीपूर्ण आणि बेगडी की ते सुंदर वाटू लागतं. कॅम्प हे गांभीर्याचं विडंबन असतं, पण ते पूर्ण गांभीर्यानं केलं जातं.

बॉय थ्रॉब

बॉय थ्रॉबची दृश्यात्मक शैली कॅम्प आहे. 90च्या दशकातल्या बॉय बँडचे देखणे चेहरे, पुरुषी डौल यांना छेद दिला. त्यांचे एकसारखे कपडे तेवढे ठेवले, पण तेही गुलाबी रंगात आहेत. दर्शन जेव्हा तितक्याच सहजतेनं त्या गुलाबी कपड्यांमध्ये वावरतो, तेव्हा तो त्या ‘कॅम्प’ सौंदर्यशास्त्राचा अविभाज्य भाग बनतो.

कोल्हापुरातल्या एका मुलानं पाश्चात्य पॉपविश्वात केलेल्या प्रवेशावर बोलताना चिन्मय दामले सांगतात, “पाश्चात्त्य संस्कृतीत आशियाई आणि आफ्रिकी लोकांकडे विचित्र किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून बघितलं जातं. दर्शनकडे अमेरिकेत आणि इतरत्र ‘एक्झॉटिक’ म्हणून बघितलं जातं का, असा संशय सुरुवातीस वाटला. पण दर्शनच्या बोलण्यात, त्याच्या वावरात, गाण्यात त्याची स्वायत्तता दिसते. त्याला इतर तिघांइतकंच महत्त्वाचं स्थान आहे. कोल्हापुरातल्या एका मुलानं अल्गोरिदमचा ताबा घेऊन पाश्चात्य पॉपविश्वात प्रवेश केला, या कथेत तो व्हिक्टिम म्हणून दिसत नाही.”

“ही 4 मुलं विडंबन करत आहेत का, असा प्रश्न सुरुवातीस पडला असला, तरी प्रेक्षकांचा भावनिक पाठिंबा मिळाला. यात पॅरासोशल सॉलिडॅरिटी दिसते. प्रस्थापित संगीत कंपन्यांचे नियम डावलून, आपल्यासारख्या एका सामान्य तरुणाला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यास जेव्हा प्रेक्षक मदत करतात, तेव्हा त्यांना कुठेतरी आपणही त्याच्या यशात सहभागी होतो, असं वाटून जातं. लोकांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा त्यांना प्रत्यय येतो. आज विविध पातळ्यांवर हतबलता वाटत असताना दर्शनसारख्या मुलाच्या यशात आपणही वाटेकरी आहोत, ही भावना लोकांना आनंद देते,” असंही ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC