Home LATEST NEWS ताजी बातमी लॉटरीत 270 कोटी जिंकले, पण विसरून गेला? शेवटच्या क्षणी विजेता समोर आला

लॉटरीत 270 कोटी जिंकले, पण विसरून गेला? शेवटच्या क्षणी विजेता समोर आला

4
0

Source :- BBC INDIA NEWS

लोटो मॅक्स

जवळपास वर्षभर कुणीच दावा न केलेल्या 4 कोटी कॅनेडियन डॉलर्स (सुमारे ₹270.6 कोटी) किमतीच्या लॉटरी तिकिटाच्या विजेत्यानं अखेर तिकिटाची मुदत संपण्याच्या काही तास आधी येऊन बक्षिसावर दावा केला आहे, असं ऑन्टारियो लॉटरी अँड गेमिंग कॉर्पोरेशन (OLG) ने म्हटलं आहे.

ओएलजी (OLG)चे मीडिया रिलेशन्स संचालक टोनी बिटोंटी यांनी बीबीसीला सांगितलं की, लॉटरी टर्मिनलद्वारे तिकिटाची पडताळणी करण्यात आली. या तिकिटाची मुदत बुधवारी मध्यरात्री संपत होती.

लॉटो मॅक्सच्या जॅकपॉट तिकिटाच्या मालकाचा शोध लॉटरी कॉर्पोरेशन घेत होतं. हे तिकीट 28 ऑक्टोबर 2025 रोजी ऑन्टारियोमधील ग्रे काउंटीतील एका विक्रेत्याकडून खरेदी करण्यात आलं होतं आणि त्याला जवळपास एक वर्ष उलटलं होतं.

ओएलजीनं विजेत्याची ओळख नावासह उघड केली नाही आणि त्यांना खरा मालक असल्याची पुष्टी करण्यासाठी संपर्क साधल्याचं सांगितलं.

“जर खऱ्या मालकीची खात्री झाली, तर ओएलजी विजेत्याचा सन्मान समारंभ आयोजित करेल आणि आमच्या विजेता जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांची कहाणी माध्यमांशी आणि जनतेशी शेअर करेल,” असं कंपनीने एका निवेदनात म्हटलं.

ओएलजीने म्हटलं होतं की, ब्लू माउंटन्स आणि ओवेन साउंड यांचा समावेश असलेली ग्रे काउंटी हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्ती व्यक्तीनं तिकीट खरेदी करून घरी परतल्यानंतर ते तपासायचं राहिलं असेल.

बिटोंटी यांनी बुधवारी याआधी सीटीव्ही न्यूजला सांगितलं होतं की, “वाईट गोष्ट म्हणजे हे तिकीट ओएलजी अ‍ॅपवर किंवा दुकानात तपासलं गेलं नव्हतं.”

ओएलजीच्या म्हणण्यानुसार, जॅकपॉटसाठीचे विजेते क्रमांक 06, 14, 17, 19, 26, 43, 45 होते आणि बोनस क्रमांक 27 होता.

लॉटरी कॉर्पोरेशनने लोकांना कपड्यांचे खिसे, हँडबॅग, बॅकपॅक, पाकिटे आणि वाहनांच्या ग्लोव्ह कंपार्टमेंट्स यांसारख्या ठिकाणी तिकीट शोधण्याचं आवाहन केलं होतं.

जर तिकिटाची मुदत संपली असती, तर 4 कोटी डॉलर्स (सुमारे ₹270.6 कोटी) चे बक्षीस भविष्यातील खेळांसाठी लॉटरीकडेच राहिलं असतं.

लॉटरी जिंकूनही बक्षिसावर दावा न करणारे लोक

28 जून 2022 रोजी, ऑन्टारियोमधील स्कार्बरो येथे कुणीतरी 7 कोटी डॉलर (सुमारे ₹473.5 कोटी) च्या लॉटो मॅक्स ड्रॉमध्ये विजय मिळवला होता, पण त्या तिकिटाचा मालक कधीच पुढे आला नाही.

ओएलजीने त्यावेळी सांगितलं होतं की, त्या तिकिटाबाबत 2,700 लोकांनी फोन आणि ई-मेलद्वारे संपर्क साधला होता, पण त्यापैकी एकही व्यक्ती विजेती नव्हती.

बिटोंटी यांनी सांगितलं की, दरवर्षी सुमारे एक टक्का बक्षिसांवर दावा केला जात नाही, मात्र ती बहुतेक वेळा खूपच कमी रकमेची असतात.

गेल्या आठवड्यात, अल्बर्टामधील एका रहिवाशानं कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा 9 कोटी डॉलर्स (सुमारे ₹608.8 कोटी) चा लॉटरी जॅकपॉट जिंकला. त्या विजेत्याची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC