Home LATEST NEWS ताजी बातमी बदलापूर येथील सिताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा ‘ऑस्कर’; राऊळ यांनी टिपलेले ‘हे’...

बदलापूर येथील सिताराम राऊळ यांना वन्यजीव फोटोग्राफीचा ‘ऑस्कर’; राऊळ यांनी टिपलेले ‘हे’ फोटो तुम्हाला थक्क करून टाकतील

5
0

Source :- BBC INDIA NEWS

सिताराम दिनकर राऊळ

‘लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे आयोजित छायाचित्रांच्या स्पर्धेला कलेच्या जगतात महत्त्वाचे स्थान आहे. या स्पर्धेला छायाचित्रांचे ऑस्करदेखील म्हटले जाते.

या संग्रहालयाने आयोजित केलेल्या ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026’ स्पर्धेत बदलापूरच्या सिताराम राऊळ यांच्या फोटोला पारितोषिक मिळाले आहे. त्यांना ‘अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन’ या गटात विजेता घोषित करण्यात आलं आहे.

त्यांच्या हालणारी वाळू (Shifting Sand) या छायाचित्राला हा पुरस्कार मिळाला आहे. वन्यजीव छायाचित्रणातील ‘ऑस्कर’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून 65,050 हून अधिक छायाचित्रे आली होती.

2025 मध्ये त्यांच्या ‘Nature Reclaims Its Space’ या वटवाघळांच्या फोटोला याच स्पर्धेत ‘Urban Wildlife’ या गटात विशेष उल्लेखनीय छायाचित्राचा सन्मान मिळाला होता.

त्यांना मिळालेल्या पारितोषिकाच्या निमित्ताने आपण त्यांची छायाचित्रं पाहूया.

बीबीसी मराठीने सिताराम राऊळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या छायाचित्रांमागची त्यांची भूमिका समजून घेतली.

‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026’ चा ऑस्कर मिळवणारा फोटो

राऊळ यांनी सांगितलं, हा विंचवाचा फोटो राजस्थानमधील जैसलमेर भागातील हालचाल करणाऱ्या वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये काढण्यात आलेला आहे. हा विंचू वाळूत बिळ बनवून स्वतःसाठी घर बनवत असल्याचं दिसत आहे.

राजस्थानमधील रेती वाऱ्यामुळे सारखी विखुरली जात असल्यानं या विंचवाला वारंवार घर बनवावं लागतं असल्याचं चित्र या फोटोमधून दिसत आहे.

हा फोटो काढण्यासाठी साधारण दीड मिनिटांचा वेळ मिळतो, त्यानंतर विंचू बिळात निघून जातो. वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये राहणारे हे विंचू जमिनीवर राहू शकत नाहीत. कारण ही विंचूंची प्रजात जमिनीवर राहण्यासाठी विकसितच झाली नाही, असं सिताराम राऊळ सांगतात.

पावसाळ्यात आढळून येणारा हिरवा बेडूक

राऊळ हे चित्रकार देखील आहेत आणि त्यांना वन्यजीव फोटोग्राफीची विशेष आवड आहे. त्यांनी देशातील विविध भागातून ही छायाचित्रं टिपली आहेत.

पावसाळ्यात आढळून येणारा हिरवा बेडूक (फोटो 2)

मुख्यतः हा बेडूक कोकणात आढळून येतो. याला ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ असं म्हणतात. हा बेडूक घरांच्या आजूबाजूलाही आढळून येतो.

बेडूक साधारणपणे पावसाळ्यात पाहायला मिळतात. या फोटोमध्ये बेडकाचं मूळ निवासस्थान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

वटवाघळांनी ताब्यात घेतलेली वास्तू

हा फोटो कोकणातील बांदा या गावातला आहे. या फोटोला 2025 ला एनएचएम ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफी ऑफ द इयर’ अर्बन वाइल्ड लाइफ कॅटेगरीमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं.

वटवाघळांनी ताब्यात घेतलेली वास्तु (फोटो 3)

या फोटोमधील बाजुला जो दरवाज्यांसारखा साचा दिसतोय तो दरवाजा साधारणः साडे तीनशे वर्षांपूर्वीचा मुघलांच्या काळातला आहे.

फोटोमधील या जागेवर कोणी राहत नसल्यानं या जागेवर साधारण 350 ते 400 वटवाघळांनी ताबा मिळवल्याचं दिसतं. या फोटोला ‘निसर्गाचे पुनरागमन’ असं नाव देण्यात आलं आहे.

मशरूमचा ‘आत्मा’ भासवणारं छायाचित्र

मशरुमचा 'आत्मा' भासवणारं छायाचित्र (फोटो 4)

या फोटोमध्ये मशरूम आणि त्यातील बीजाणू (Spores) दिसत आहेत. मशरूमवर एका विशिष्ट पद्धतीने प्रकाश टाकून हा फोटो काढण्यात आलाय.

या प्रकाशामुळे मशरूममधून निघणाऱ्या बीजाणूच रंगांमध्ये विभाजन होतं. या फोटोमधील मशरूम आणि बीजाणू (Spores) चा आकार सारखाच टिपला गेलाय. त्यामुळे खरोखरंच हा मशरूमचा आत्मा आहे असं वाटतं.

माथेरानमध्ये आढळणारी गोगलगाय

या फोटोमधील गोगलगाय उत्सुकतेने कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचं भासतं. ही गोगलगाय साधारणतः पावसाळ्यात सगळीकडे पाहायला मिळते. हा फोटो माथेरानमधील आहे.

माथेरानमध्ये आढळणारी गोगलगाय (फोटो 5)

फांदीवरच्या बुरशीमुळे चमकणारा विंचू

या फोटोमधील विंचू आणि त्याभोवतालचे रंग या फोटोला आकर्षक बनवतात. फोटोमध्ये दिसणारे रंग हे विंचू ज्या फांदीवर बसला आहे त्या फांदीच्या बुरशीमधुन तयार झालेले आहेत.

फांदीवरच्या बुरशीमुळे चमकणारा विंचू (फोटो 6)

फांदीला बुरशी लागल्यानं त्यावरील बीजाणू (Spores) हवेत उडत असतात. त्यांचा रंग मुळतः पांढरा असतो. मात्र, एका विशिष्ट पद्धतीने प्रकाश टाकल्यास ते रेगीबेरंगी चमकताना दिसतात.

विंचू फांदीवर बुरशी खाण्यासाठी आलेल्या किड्यांना खाण्यासाठी आला असताना हा फोटो टिपण्यात आला असल्याचं सिताराम राऊळ सांगतात.

दगडावर शांत बसलेला इंडियन रॉक पायथन

या फोटोमधील ‘इंडियन रॉक पायथन’ हा अजगर एका घरातून पकडला गेला होता. पकडल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

दगडावर शांत बसलेला इंडियन रॉक पायथन (अजगर) (फोटो 7)

मात्र, त्याला एका दगडावर सोडल्यानंतर तो बराचवेळ तिथे बसून होता. त्याच्या नैसर्गिक अधिवासात परतल्यानंतर तो शांत आणि स्थिर झाल्याचं स्वरूप या फोटोमधून प्रकर्षाने जाणवतं.

बलून फ्रॉग

या बेडकाचं शास्त्रीय नाव ‘उपेरोडॉन ग्लोब्युलोसस’ आहे. याला बलून फ्रॉग असंही म्हणतात. या बेडकाला एक डोळा नसल्याच फोटोमधून दिसत आहे.

बलून फ्रॉग (Uperodon globulosus) (फोटो 8)

हा एक प्रौढ बेडूक असल्याचं सिताराम राऊळ यांनी सांगितलं. तसंच, त्याच्या डोळ्यावर कोणतीही जखम किंवा निशाणी नसून एका डोळ्याचा भाग सपाट आहे. त्यामुळे या बेडकाला जन्मतःच एक डोळा असावा.

एक डोळा असूनही हा बेडूक प्रौढपणापर्यंत साप, पक्षी यांसारख्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करुन जिवंत राहिला असल्याचं राऊळ यांना विशेष आश्चर्य वाटतं.

विंचूसारखा दिसणाऱ्या व्हिप्स विंचूची प्रजात

फोटोमध्ये असणाऱ्या प्रजातीला ‘व्हिप स्कॉरपिअन’ म्हटलं जातं. हा विंचवासारखा दिसत असला तरी हा काही विंचू किंवा कोणती विषारी प्रजात नाही.

विंचूसारखा दिसणाऱ्या व्हिप्स विंचूची प्रजात (vips scorpion) (फोटो 9)

मात्र, हा दिसायला विंचवासारखा दिसतो. हा विंचू कोणत्यातरी प्राण्याच्या अंड्याची पिशवी खाताना हा फोटो टिपण्यात आला आहे.

हिरव्या गडद रंगाचा हरणटोळ

हिरव्या गडद रंगाची झोपलेली हरणटोळ (फोटो 10)

पश्चिम घाटात प्रामुख्यानं आढळणारा या सापाला हरणटोळ म्हणतात. माथेरानच्या भागात शांतपणे अंधारात झोपलेला असताना बऱ्याच प्रकाश किरणांचा वापर करुन या सापाचा फोटो काढण्यात आलेला आहे.

हिरव्या गडद रंगाचा हा साप दिसायला आकर्षक वाटतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC