Source :- BBC INDIA NEWS
Bhagyashree Raut
एका घरात माणसं, तर त्याच्या सभोवतालची चार-पाच घरं बंद. काही घरांसमोर फक्त वृद्ध आपल्या मुलांची आणि नातवंडांची वाट बघत बसले होते. गावातल्या अनेक गल्ल्या अगदी निर्मनुष्य दिसत होत्या. गावात जवळपास 60 टक्के घरं कुलूपबंद दिसत होती.
हे चित्र आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या वाकद इजारा गावातलं.
दुष्काळाचा गावांवर काय परिणाम होतो आहे? हे बघण्यासाठी आम्ही सर्वाधिक दुष्काळी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि महागाव तालुक्यात पोहोचलो. तिथल्या अनेक गावांमध्ये आम्हाला असंच चित्र दिसलं. पण या गावांमधील लोक घरांना कुलूप लावून नेमकी कुठं गेली?
तर दुष्काळामुळे कामाच्या शोधात लोकांनी गाव सोडून शहराची वाट पकडली. कोणी पुणे, मुंबई, गुजरातला गेले तर कोणी तेलंगणात कापूस वेचणीला गेले.
Bhagyashree Raut
महत्वाचं म्हणजे, या दुष्काळानं शेतकऱ्यांना सुद्धा गाव सोडायला भाग पाडलं. यापैकीच एक शेतकरी प्रल्हाद राठोड आहेत. त्यांच्या घरी साडेचार एकर शेती आहे. पण यावर्षी शेतात काहीच पिकलं नाही. सोयाबीन पूर्णपणे करपलं. तसेच कापूस देखील सुकायला लागला.
शेतात काहीच पिक होणार नाही असा अंदाज आल्यानं त्यांचा मुलगा वामन यांनी ऑगस्ट महिन्यातच कुटुंबासह पुण्याची वाट धरली. तिथं ते हमालीचं काम करतात.
तसेच, दिवाळीनंतर प्रल्हाद यांचे दोन्ही मुलं सुद्धा दुसऱ्या गावाला रोजगाराच्या शोधात जाणार आहेत.
प्रल्हाद सांगतात, “माझा मुलगा शेती करायचा. कोणाची मजुरी आली तर ती पण करायचा. पण, यावर्षी शेतात काहीच पिकलं नाही. सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच असल्यानं मजुरीही मिळत नाही. त्यामुळे आता मुलगा कुटुंबासह पुण्याला केला. गावात खाण्या-पिण्याचा काही आधारच राहिला नाहीतर काय करायचं?”
Bhagyashree Raut
तर प्रल्हाद यांच्या घराच्या मागच्या बाजूला आणि गावाच्या शेवटच्या भागात काही महिला बसलेल्या दिसल्या. तिथंही काही घरांना अशीच कुलूप लागलेली होते. आम्ही त्यांच्यासोबत बोललो तर त्यांच्या घरातील देखील व्यक्ती रोजगाराच्या शोधात बाहेर गेले होते.
त्यापैकीच 50 वर्षीय ललिता राठोड. त्यांचा मुलगा आणि नवरा एक महिन्यापूर्वी रोजगाराच्या शोधात पुण्याला गेला. आता ललिता एकट्याच राहतात.
त्या म्हणाल्या, “असा दुष्काळ पडलाय. इकडे कोणी 200 रुपये मजुरी द्यायला तयार नाहीत. आमच्या घरचे पुण्याला गेले. आता दिवळीनंतर मी पण जाईल. तिथं कोणाच्या घरी भांडी किंवा स्वयंपाकाचं काम बघायला लागेल. पोटापाण्यासाठी जायला लागतं. इकडं थांबून उपाशी मरू शकत नाही.”
तसं, यवतमाळ जिल्ह्यातल्या गावांची रचना वस्ती आणि तांडा अशी आहे. वस्तीमध्ये सगळ्या जात-समूहाचे किंवा आदिवासी लोक राहतात, तर तांड्यावर फक्त बंजारा समाजाचे लोक राहतात.
वाकद इजारा या गावातही आदिवासी, दलित समूहाचे लोक राहतात, तर तांड्यावर बंजारा समाजाचे लोक राहतात. तांड्यावर घरांना कुलूप तर लागलेच. पण, वस्तीतही तीच परिस्थिती आहे.
या गावात नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे स्थलांतरीत झालेली काही लोक परत आली होती. त्यांच्यासोबत आमची भेट झाली.
Bhagyashree Raut
गोकर्णा कांबळे या 15 दिवसांपूर्वी पुण्यातील नारायणगावला कामाला गेल्या होत्या. पण, तिकडे कुटुंबातील मुलीचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्या गावात आल्या.
त्या सांगतात, “शेतात काहीतरी पिकेल या आशेवर आम्ही होतो. पण, काहीच पिकलं नाही. 15 दिवस झाले आम्ही पुण्याला गेलो. तिकडे कोणी 200 रुपये मजुरी देते, तर कोणी 300 रुपये. पण, चार दिवस काम लागलं की आठ दिवस घरीच राहायला लागतं. कामच लागत नाही.”
आता दिवाळीनंतर त्या पुन्हा पुण्याला कामासाठी जाणार आहेत. त्यांच्या शेती आहे. पण, काहीच पिकलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली आहे.
या भागाला दुष्काळाची झळ इतकी बसलीय की, आताच नद्या-नाले कोरडे पडले आहेत. बोरी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी राहायचं. पण, तो नाला कोरडा पडला आहे. तलाव सुद्धा कोरडे पडलेले आहेत.
जमिनीला भेगा गेल्या. कापसाची उंची वाढलेली नाही, तर कोरडवाहू शेतांमध्ये कापूसही फुटलेला नाही. त्यामुळे शेतमजुरांसह शेतकऱ्यांवर स्थलांतर करण्याची पाळी आली आहे.
पण, गावातच मजुरी असती, त्यासाठी सरकारनं आधीच मायक्रोप्लॅनिंग केलं असतं तर आमचं गाव असं ओस पडलं नसतं असं या शेतकरी मनिष जाधव सांगतात.
ते म्हणतात, “आमचा शासनाला तोच प्रश्न आहे. एल निनोचा प्रभाव होणार हे शासनाला माहिती होतं तर केवळ आता कागदी घोडे नाचवण्यापेक्षा यांनी मायक्रोप्लॅनिंग केलं असतं. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आधीच नियोजन केलं असतं तर आज ही वेळ शेतकरी आणि शेतमजुरांवर आलीच नसती. केवळ कागदोपत्री घोषणा वांझोट्या घोषणा करायच्या एवढंच काम केलं. रोजगार हमी योजनेचं नाव बदलून रोजगार मिळणार नव्हते.”
Bhagyashree Raut
या स्थलांतराचा परिणाम मुलांच्या शाळेवर सुद्धा झाला आहे. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत स्थलांतर केलं आहे.
गावातल्या प्राथमिक शाळेतून सहा मुलांनी शाळा सोडून आपल्या पालकांसोबत मजुरीसाठी बाहेर गेले आहेत, तर स्थलांतरीत झालेल्यांमध्ये सगळ्यात जास्त माध्यमिकच्या मुलांचा समावेश असल्याचं ग्रामस्थ सांगतात.
प्रल्हाद राठोड यांचे दोन नातूही त्याचा भाग आहेत. त्यांनी शाळा सोडून पुण्याला आपल्या आई-वडिलांसोबत गेले.
प्रल्हाद म्हणतात, शाळा नाहीये. शाळा सोडून गेले. इथं होते तर शाळेत जायचे. त्यांना आधारच नाही दिसून राहिला खाण्या पिण्याचा तर शिक्षणाचं कसं काय राहावं?
तर गोकर्णा सुद्धा आपल्या मुल, सून नातवांना घेऊन पुण्याला गेल्या होत्या. त्या काही दिवसांसाठी गावात परतल्या असल्या तरी त्यांचा मुलगा, सून आणि नातू पुणे जिल्ह्यातच आहेत.
त्या म्हणतात, “सरकारनं आमच्या हाताला काम द्यावं जेणेकरून लेकरांचं शिक्षण झालं पाहिजे. आम्ही नातू सोबत घेऊन गेलो. त्यांची शाळा बुडाली. आता कामच नाहीतर आम्ही काय करायचं. पोटाला खायला पाहिजे की नाही? शाळा पुढच्या वर्षी शिकतील.”
इथल्या प्राथमिक शाळेची पटसंख्या 43 आहे. पण, त्यापैकी सहा मुलं आपल्या आई-वडिलांसोबत मजुरीसाठी स्थलांतर झाली, तर काही आजीजवळ किंवा नातेवाईकाजवळ राहून शिक्षण घेत आहेत.
दरवर्षी असा प्रश्न नाही जाणवत. यावर्षी दुष्काळ आहे आणि सर्वसामान्य माणसाचं हातावर पोट आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. मुलांना घेऊन पोटापाण्यासाठी स्थलांतरीत झाले आहेत, असं शाळेतील शिक्षक उत्तम देशमुख सांगतात.
सध्या गावात 30-40 टक्के लोक दिसतात. पण, ते फक्त दिवाळीसाठी थांबली आहेत. त्यानंतर आम्ही देखील मजुरीसाठी बाहेर जाऊ, असं ग्रामस्थ सांगत होते. त्यानंतर पूर्ण गाव निर्मनुष्य होण्याची भीती देखील ते व्यक्त करत होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




