Home LATEST NEWS ताजी बातमी दात घासत असताना चुकून गिळला अख्खा टूथब्रश; तो डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय कसा काढला?

दात घासत असताना चुकून गिळला अख्खा टूथब्रश; तो डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय कसा काढला?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

राजेंद्र मालुसरे यांनी दात स्वच्छ करताना चुकून ब्रश गिळला होता. (ब्रशचं चित्र प्रातिनिधिक)

  • वाचन वेळ: 5 मिनिटे

दात घासत असताना टूथब्रश हातातून सुटला आणि थेट पोटात गेला, हे ऐकायला किती विचित्र वाटेल. पण खरंच असं घडलं आहे.

रायगडच्या पेणमधील शिरवली गावातील राजेंद्र मालुसरे यांच्याबाबत घडलेल्या या दुर्मीळ प्रकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

50 वर्षीय राजेंद्र मालुसरे हे रिक्षाचालक आहेत.

सुरुवातीच्या तपासणीत टूथब्रश सापडला नाही; मात्र एंडोस्कोपीमध्ये तो पोटात अडकल्याचे स्पष्ट झालं. तब्बल 19 सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश कोणतीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीद्वारे बाहेर काढण्यात आला. उपचारानंतर काही तासांतच त्यांना घरी सोडण्यात आलं.

एंडोस्कोपी म्हणजे तोंडावाटे कॅमेरा असलेली बारीक आणि लवचिक नळी शरीरात सोडून अन्ननलिका, पोट आणि पचनमार्गाची आतून तपासणी करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे अडकलेल्या वस्तू शस्त्रक्रिया न करता बाहेर काढणंही शक्य होतं.

ब्रश

पेण येथील रहिवासी आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेले राजेंद्र मालुसरे हे नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत होते. त्यावेळी चुकून टूथब्रश घशातून खाली गेला. त्यानंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. एक्स-रे तपासणीत टूथब्रश आढळून आला नाही. त्यामुळे पुढील तपासणीसाठी त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले.

तेथे करण्यात आलेल्या एंडोस्कोपी तपासणीत संपूर्ण टूथब्रश पोटात अडकल्याचं दिसून आलं. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एन्डोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील टिमनं ही आव्हानात्मक प्रक्रिया यशस्वी पार पाडली.

19 सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश

टूथब्रश गिळल्यानंतर सुमारे 3 ते 4 तासांनी मालुसरे यांना पोटात सौम्य वेदना जाणवू लागल्या. एंडोस्कोपी तपासणीत 19 सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश पोटात असल्याचं स्पष्ट झाले. टूथब्रशसारखी लांब आणि कठीण वस्तू पचनमार्गातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडण्याची शक्यता अत्यल्प असते. अशा वस्तू अन्ननलिका किंवा पचनमार्गातील अरुंद भागांमध्ये अडकून अंतर्गत जखमा, पचनमार्गात अडथळा किंवा आतड्याला छिद्र पडण्यासारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितलं.

या रुग्णावर करण्यात आलेली एंडोस्कोपी प्रक्रिया सुमारे 30 मिनिटे चालली. टूथब्रश पोटात आडव्या स्थितीत अडकला असल्याने तो पकडणं आणि अन्ननलिकेच्या वळणांमधून सुरक्षितपणे बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. प्रक्रियेदरम्यान टूथब्रश पोट आणि अन्ननलिका जोडल्या जाणाऱ्या भागात अडकला. त्यानंतर घशातील अरुंद भागातून तो बाहेर काढतानाही विशेष काळजी घ्यावी लागली. अनेक प्रयत्नांनंतर अखेर कोणतीही शस्त्रक्रिया न करता संपूर्ण टूथब्रश तोंडावाटे बाहेर काढण्यात यश आलं.

टूथब्रश बाहेर काढल्यानंतर पुन्हा एंडोस्कोपी करून अन्ननलिकेला किंवा पचनमार्गाला दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. काही काळ निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आढळली आणि त्यांना त्याच दिवशी घरी सोडण्यात आलं.

दात घासत असताना चुकून गिळला पूर्ण टूथब्रश; तो डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय कसा काढला?

माशाचा काटा गिळणं, लहान मुलांनी वस्तू गिळणं, नाणी, बॅटरी पोटात जाणं अशा बातम्या किंवा घटना आपण वाचल्या ऐकलेल्या असतात. मात्र आता थेट ब्रशच गिळण्याची ही दुर्मिळ घटना असावी.

परंतु मालुसरे यांची सुरुवातीला एक्सरे तपासणी करुनही त्यात ब्रश गिळल्याचं का समजलं नाही असा प्रश्न आम्ही डॉ. रावसाहेब राठोड यांना विचारला.

ते म्हणाले, “प्लास्टिकच्या वस्तू सामान्यतः एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसत नाहीत. एक्स-रेमध्ये प्रामुख्याने हाडं आणि धातूसारख्या वस्तू स्पष्ट दिसतात. प्लास्टिकसारख्या वस्तू अनेकदा एक्स-रेमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे केवळ एक्स-रेच्या निष्कर्षावरून वस्तू शरीरात नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही. रुग्णाला वस्तू गिळल्याची खात्री असेल किंवा त्यानंतर त्रास जाणवत असेल, तर पुढील तपासण्या आवश्यक ठरतात. या रुग्णाच्या बाबतीत एंडोस्कोपी केल्यानंतर संपूर्ण टूथब्रश पोटात असल्याचे निदान झालं. त्यामुळे अशा घटनांमध्ये रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि लक्षणे यांनाही विशेष महत्त्व असतं.”

एंडोस्कोपीच का?

या रुग्णावर एंडोस्कोपीनं उपचार करायचा निर्णय कसा घेतला असं विचारल्यावर डॉ. राठोड म्हणाले, “रुग्णाच्या तपासणीनंतर टूथब्रश पोटात असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर एंडोस्कोपीद्वारे तो बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एंडोस्कोपीमध्ये तोंडावाटे एक लवचिक नळी शरीरात सोडली जाते. तिच्या टोकाला कॅमेरा असल्यामुळे पचनमार्गाच्या आतील भागाचे निरीक्षण करता येते.”

एंडोस्कोपीच का?

ते पुढं म्हणाले या प्रक्रियेत, “विशेष उपकरणांच्या मदतीने अडकलेली वस्तू पकडून बाहेर काढता येते. या प्रकरणात एंडोस्कोपच्या टोकाला विशेष हूड लावून टूथब्रशचे एक टोक पकडण्यात आलं. योग्य पद्धतीनं त्याला बाहेर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. रुग्णाची स्थिती आणि वस्तूचं स्थान लक्षात घेऊन एंडोस्कोपीद्वारे उपचार करणे शक्य असल्याने शस्त्रक्रिया टाळता आली. मात्र, अशा निर्णयासाठी वस्तूची स्थिती, पचनमार्गाची अवस्था आणि रुग्णाची एकूण प्रकृती तपासणं आवश्यक असते.

उपचारादरम्यान ब्रश अडकला तेव्हा…

हा ब्रश तोंडावाटे काढत असताना डॉक्टरांच्या टीमला अनेक अडथळे आले. एंडोस्कोपच्या टोकाला विशेष हूड लावून टूथब्रशचं एक टोक पकडण्यात आले. मात्र, पोट आणि अन्ननलिका जिथं जोडली जाते, त्या ठिकाणी तो अडकला. रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलून आणि वारंवार प्रयत्न करून तो पुढे सरकवण्यात आला. त्यानंतर घशातील अरुंद भागातही तो अडकला. टूथब्रश वाकत नसल्याने अत्यंत सावधगिरीनं ही प्रक्रिया करावी लागली.

प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. राठोड सांगतात, “टूथब्रश बाहेर काढल्यानंतर पुन्हा एंडोस्कोपी करण्यात आली. या तपासणीमध्ये अन्ननलिकेच्या वरच्या आणि खालच्या भागांची पाहणी करण्यात आली. टूथब्रश बाहेर काढताना त्याच्या कठीण स्वरूपामुळे अंतर्गत आवरणाला जखम झाली आहे का, रक्तस्राव झाला आहे का किंवा इतर काही दुखापत झाली आहे का, हे तपासण्यात आले. तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही. त्यानंतर रुग्णाला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याची खात्री झाल्यानंतर तीन ते चार तासांतच त्याला घरी सोडण्यात आलं”

याबाबत बीबीसी मराठीनं राजेंद्र मालुसरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यादिवशी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले, “दात घासल्यावर ब्रशनं जीभ स्वच्छ करायची मला सवय आहे. ते करताना ब्रश सटकला आणि आत गेला. त्यावेळेस घशाला जखमही झाली. त्यामुळे तो घशातच अडकला असेल असं वाटत होतं. पण नंतर तो पोटात म्हणजे जठरात गेल्याचं समजलं. सुरुवातीला ब्रश आत अडकला म्हणजे श्वास घ्यायला त्रास होईल असं वाटून भीती वाटली पण डॉक्टरांकडे लगेच गेलो. पेणमध्ये उपचार शक्य नसल्यानं नवी मुंबईला खारघरला गेलो. शस्त्रक्रिया करावी लागणार असं वाटत होतं. पण एंडोस्कोपीनं उपचार पार पडले आणि त्याच दिवशी घरी सोडण्यात आलं.”

या प्रकरणाचं वेगळेपण बाजूला ठेवलं, तर अशा घटनांमधून सर्वसामान्य नागरिकांनी कोणता महत्त्वाचा संदेश घ्यायला हवा? असा प्रश्न आम्ही डॉ. राठोड यांना विचारला.

ते म्हणाले, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे दात घासताना घाई करू नये. टूथब्रश तोंडात असताना बोलणं, हसणं किंवा इतर कामं करणं टाळावं. विशेषतः टूथब्रश तोंडात खोलवर नेऊन दात घासणं टाळावं. चुकून टूथब्रश किंवा अन्य कोणतीही मोठी वस्तू गिळल्यास तातडीने रुग्णालयात जावं”

डॉ. राठोड आणखी एक सल्ला देतात. ते सांगतात, “अशा वेळी स्वतःहून उलटी करण्याचा प्रयत्न करू नये किंवा अन्न खाऊन वस्तू खाली ढकलण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे अन्ननलिकेला दुखापत होऊ शकते किंवा वस्तू अधिक घट्टपणे अडकू शकते. सुरुवातीला वेदना कमी असल्या तरी अंतर्गत दुखापत किंवा इतर गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच निदान आणि योग्य उपचार घेणं अत्यंत गरजेचे आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC