Home LATEST NEWS ताजी बातमी ‘कदाचित मी जिवंत परतू शकणार नाही’; इम्रान खान यांची तातडीने वैद्यकीय उपचार...

‘कदाचित मी जिवंत परतू शकणार नाही’; इम्रान खान यांची तातडीने वैद्यकीय उपचार देण्याची मागणी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या तुरुंगात असलेले इम्रान खान यांनी आपल्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. त्यांची आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास केलेले इम्रान खान यांनी त्यांचे वकील सलमान सफदर यांच्यामार्फत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे, “वयाच्या 74 व्या वर्षी माझ्यावर ओढवलेली ही असह्य परिस्थिती मला अशा टप्प्यावर घेऊन जात आहे, जिथून कदाचित मी जिवंत परतू शकणार नाही.”

मात्र, इस्लामाबादमधील प्रशासनाने इम्रान खान यांची दर आठवड्याला डॉक्टरांकडून तपासणी केली जात असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी इम्रान खान यांनी प्रकृती समाधानकारक असल्याचं सांगितल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.

इम्रान खान यांच्यावर 100 हून अधिक गुन्ह्यांचे आरोप आहेत. ऑगस्ट 2023 पासून ते तुरुंगात आहेत. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही गेल्या वर्षी त्यांच्यासोबत तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

दुसरीकडे भ्रष्टाचार आणि सरकारी भेटवस्तूंची विक्री यासारख्या प्रकरणांमध्ये आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेले खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

तुरुंगात आपल्याला दिवसातील तब्बल 22 तास एकांतवासात ठेवलं जात असल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान यांनी आपल्या पत्रात डॉक्टरांनी आपल्याला मेंदूत रक्तस्राव होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा मोठा धोका असल्याचंही नमूद केलं आहे. तसेच आपल्या हृदयाचे आधीच नुकसान झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पत्नी बुशरा बीबी यांच्या प्रकृतीबाबतही इम्रान खान यांनी चिंता व्यक्त केली. एप्रिल महिन्यात त्यांच्या डोळ्याचा पडदा (रेटिना) सरकल्यामुळे त्यांना त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुप्तपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं. पुन्हा शस्त्रक्रिया न झाल्यास बुशरा बीबी यांची दृष्टी जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

“मी अनेक प्रकरणांमध्ये अत्यंत कठीण कायदेशीर लढाया लढलो आहे आणि अजूनही माघार घेतलेली नाही. मात्र, व्यवस्थेने मला न्याय देणेच बंद केले आहे,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

तुरुंगात आपल्याला दिवसातील तब्बल 22 तास एकांतवासात ठेवलं जात असल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला आहे. या काळात कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच पुस्तकं वाचण्याची किंवा टीव्ही पाहण्याची सुविधाही उपलब्ध नाही. या परिस्थितीचा आपल्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात केवळ 4 वेळाच वकिलांना भेटता आल्याचा दावाही त्यांनी केला.

“मी जिवंत राहिलो, तरच मी माझं निर्दोषत्व सिद्ध करू शकेन,” असंही इम्रान खान यांनी या पत्रात म्हटलं आहे.

आपल्या पत्रात इम्रान खान यांनी डॉक्टरांनी आपल्याला मेंदूत रक्तस्राव होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा मोठा धोका असल्याचं सांगितल्याचंही नमूद केलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे संसदीय कामकाज मंत्री तारिक फजल चौधरी यांनी इम्रान खान यांचे दावे फेटाळून लावले आहेत. तुरुंगात त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण देण्यासह सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

“सध्या पाकिस्तानमधील सर्वाधिक चांगल्या सुविधा मिळणारा कैदी इम्रान खान हेच आहेत,” असं मंत्री तारिक फजल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

आठवडाभरापूर्वी इम्रान खान यांना डोळ्यात इंजेक्शन देण्यासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिर असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती प्रशासनाने दिली.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेले इम्रान खान यांनी 2018 ते 2022 या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.

मे 2023 मध्ये त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शनं केली होती. या आंदोलकांनी लाहोरमधील लष्कराच्या कॉर्प्स कमांडरच्या निवासस्थानाची तोडफोड केली होती. तेथील झुंबरं फोडली, फर्निचर, चित्रे आणि अगदी मोरही पळवून नेले होते.

या आंदोलनांमध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले होते.

इम्रान खान यांच्या समर्थकांचा एक जुना फोटो

दरम्यान, इम्रान खान तुरुंगात असूनही पाकिस्तानच्या राजकारणात त्यांचा प्रभाव कायम आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी रस्त्यावर उतरून अनेक दिवस मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने आंदोलनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, इम्रान खान यांच्या पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक माजी कर्णधारांनी इम्रान खान यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे अनेकदा आवाहन केल्याचीही माहिती आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC