Home LATEST NEWS ताजी बातमी तुमच्या श्वासाला फळांसारखा वास येतोय? डॉक्टरांनी सांगितली डायबेटिसची 6 लक्षणं

तुमच्या श्वासाला फळांसारखा वास येतोय? डॉक्टरांनी सांगितली डायबेटिसची 6 लक्षणं

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मधुमेहाची 6 लक्षणे

अलीकडेच, इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशननं जागतिक स्तरावर डायबेटिससंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2024 मध्ये भारतात 38.6 कोटी लोकांना आपल्याला डायबेटिस आहे हे माहीत नव्हतं आणि त्यांचं निदानही झालेलं नव्हतं.

पहिल्या दहा देशांमध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. 20 वर्षांखालील 3,01,000 मुलं आणि किशोरवयीन टाइप 1 डायबेटिसनं ग्रस्त आहेत.

अनेक लोक भीतीमुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत किंवा तपासणी करून घेत नाहीत असा निष्कर्ष तज्ज्ञांनी या आकडेवारीच्या आधारे काढला आहे.

अनेक लोकांना खूप तहान लागणं, वारंवार लघवी होणं, भूक न लागणं आणि वजन कमी होणं यांसारखी सामान्य लक्षणं माहिती असतात.. मात्र अशी अनेक लक्षणं आहेत ज्यांच्याकडे अनेक लोक लक्ष देत नाहीत, पण ती डायबेटिस किती गंभीर आहे हे सांगू शकतात. अशा लक्षणांची लोकांना माहिती नसते असं डॉक्टर सांगतात.

“डायबेटिस असलेल्या 50% लोकांमध्ये अनेकदा कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. म्हणूनच आम्ही दर 6 महिन्यांनी तपासणी करून घेण्याचा सल्ला देतो. काही वेळा कोणतीही लक्षणं नसतानाही रक्तातील साखरेची पातळी 300-400 पर्यंत असू शकते. लक्षणं असणं आवश्यक नाही,” असं डायबेटिसतज्ज्ञ आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट एस. राजकुमार सांगतात.

1. मानेसह शरीराचे इतर भाग काळे दिसणं

डॉ. राजकुमार सांगतात, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरावरील त्वचेच्या घड्या, विशेषतः मानेच्या घड्या, काळ्या पडतात. लठ्ठपणाही यासाठी कारणीभूत ठरू शकतो. या स्थितीला अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हटलं जातं.

इन्सुलिन हे स्वादुपिंडातून स्रवणारं हार्मोन आहे, जे पेशींना रक्तातील साखरेचा ऊर्जेच्या स्वरूपात वापर करण्यास मदत करतं.

मधुमेहाची 6 लक्षणे

डॉ. राजकुमार म्हणतात, “जेव्हा शरीराचं वजन जास्त असतं, तेव्हा इन्सुलिनही जास्त स्रवतं. परिणामी, मान आणि त्वचेच्या इतर घड्या काळ्या पडतात. ज्यांचं वजन जास्त आहे, तसंच ज्यांना उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, पीसीओडी आहे, जे कमी शारीरिक हालचाल करतात आणि ज्यांच्या कुटुंबात डायबेटिसचा इतिहास (फॅमिली हिस्ट्री) आहे, त्यांनी निश्चितपणे डायबेटिसची तपासणी करून घ्यावी.”

2. श्वासाला फळांसारखा वास येणं

डॉ. राजकुमार सांगतात, “डायबेटिस असलेल्या लोकांमध्ये ही समस्या गंभीर परिणामांसह दिसून येते. शरीरात साखरेचं प्रमाण जास्त असताना कीटोन आम्लं तयार होतात. त्यापैकी एक आम्ल बीटा-हायड्रॉक्सीब्युटिरिक आहे. त्यामुळे श्वासाला फळांसारखा वास येऊ लागतो.”

मधुमेहाची 6 लक्षणे

” जेव्हा शरीरात पुरेसं इन्सुलिन नसतं, तेव्हा ही स्थिती येतेय इन्सुलिन रक्तातील साखर पेशींमध्ये जाऊन ऊर्जेच्या स्वरूपात वापरली जाण्यास मदत करतं. परिणामी, शरीर ऊर्जेसाठी चरबीचं विघटन करू लागतं.

“जेव्हा कीटोन अतिशय वेगानं आणि मोठ्या प्रमाणात तयार होतात, तेव्हा ते शरीरात धोकादायक पातळीपर्यंत साचू शकतात आणि गंभीर नुकसान करू शकतात.” असा इशारा डॉ. राजकुमार देतात.

3. हात आणि पायांमध्ये वेदना

डॉ. राजकुमार सांगतात, “जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा हात-पायांमध्ये टोचल्यासारख्या वेदना किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हेदेखील शरीरातील साखरेची पातळी जास्त असल्याचं लक्षण आहे. विशेषतः रात्री, तुम्हाला हात-पायांमध्ये मुंग्या येणं (पॅरेस्थेसिया) जाणवू शकतं.”

मधुमेहाची 6 लक्षणे

रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे मज्जातंतूंचं नुकसान होतं, त्याला डायबेटिक न्युरोपॅथी असं म्हटलं जातं. त्यामुळे वेदना किंवा स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात. हा त्रास पायांमध्ये किंवा तळपायांमध्ये होऊ शकतो. हात-पायांमध्ये मुंग्या येणं, जळजळ होणं किंवा बधिरपणा यांसारखी लक्षणंही दिसू शकतात.

लक्षणं कोणत्या प्रकारच्या मज्जातंतूंवर परिणाम झाला आहे यावर अवलंबून असतात.

4. जननेंद्रियांजवळ जखमा आणि फंगल इन्फेक्शन

डॉ. राजकुमार सांगतात, “हे पुरुष आणि महिला दोघांमध्येही होऊ शकतं. फंगल इन्फेक्शनमुळे जननेंद्रियांवर जखमा होऊ शकतात. पुरुषांमध्ये बॅलेनोपोस्थायटिस नावाची स्थिती विकसित होऊ शकते, ज्यामध्ये लिंगाच्या टोकावर पांढरे डाग दिसून येतात. महिलांमध्ये जननेंद्रियांमध्ये व्हजायनल कॅन्डिडायसिस नावाचा फंगल संसर्ग होऊ शकतो.”

  • जननेंद्रियांचा संसर्ग
  • यीस्ट संसर्ग
  • मूत्राशयाचा संसर्ग
  • त्वचेचा संसर्ग

रक्तातील साखरेची पातळी जास्त असताना पांढऱ्या रक्तपेशींना रक्तप्रवाहात फिरणं कठीण होतं, त्यामुळे संसर्गांशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते.

मधुमेहाची 6 लक्षणे

5. तोंड कोरडं पडणं

डॉ. राजकुमार सांगतात, “तोंड कोरडं पडणं हेदेखील डायबेटिसचं एक लक्षण आहे (ऑस्मोटिक लक्षण). डायबेटिस असलेल्या लोकांमध्ये अतिनिर्जलीकरण होतं, ज्यामुळे खूप तहान लागते.”

तोंडात लाळेचं उत्पादन कमी झाल्यामुळे दात किडणं आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डायबेटिसचं निदान झाल्यानंतरही तोंड कोरडं पडण्याची समस्या कायम राहू शकते. डायबेटिसच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा हा दुष्परिणामदेखील असू शकतो.

याचप्रमाणे, ते स्पष्ट करतात, “डायबेटिसमध्ये शरीराला असं वाटतं की शरीरात ग्लुकोज नाही, कारण ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही. मात्र, शरीरात आधीपासूनच भरपूर साखर असतानाही तिचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही. शरीरात ऊर्जेची कमतरता असल्यामुळे चक्कर येऊ शकते. त्याचप्रमाणे, शरीरात अॅसिटोनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे उलटीही होऊ शकते.”

6. दृष्टीमध्ये बदल

मधुमेह

डॉ. राजकुमार सांगतात, “डोळ्यांच्या भिंगामध्ये सॉर्बिटॉलच्या स्वरूपात साखर साचल्यानंतर दृष्टी कमकुवत होऊ शकते. त्यामुळे धूसर दिसू शकतं. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवून ही समस्या दूर केली जाऊ शकते.”

ते इशारा देतात की लोकांमध्ये वर नमूद केलेली लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी डायबेटिसची तपासणी करून घ्यावी. विशेषतः, जे लठ्ठ आहेत, ज्यांच्या कुटुंबात डायबेटिसचा इतिहास आहे आणि ज्यांचं वय 30 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनी दर 6 महिन्यांनी तपासणी करून घ्यावी आणि मागील तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवणारी HbA1c चाचणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC