Home LATEST NEWS ताजी बातमी प्रेमसंबंध, वाद अन् हत्या; पोलिसांनी जळालेल्या सांगाड्यावरून असा लावला हत्येचा छडा

प्रेमसंबंध, वाद अन् हत्या; पोलिसांनी जळालेल्या सांगाड्यावरून असा लावला हत्येचा छडा

6
0

Source :- BBC INDIA NEWS

[ photo caption- पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक' झाल्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.]

वाचन वेळ: 4 मिनिटे

काही दिवसांपूर्वी साबरकांठा जिल्ह्यातील हातमती नदीकाठी एका जळालेल्या कारमध्ये मानवी सांगाडा सापडला होता.

हा सांगाडा साबरकांठा जिल्ह्यातच कर्तव्य बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अश्विन तांबियाड यांचाच असल्याचं आता तपासात समोर आलं आहे.

हा सांगाडा सापडल्याच्या एका आठवड्यानंतर ही संपूर्ण घटना ‘हत्येचा एक पूर्वनियोजित कट’ असल्याचं उघड झालं आहे.

या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलसह चार जणांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे.

‘पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अटक’ झाल्यामुळं हे प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं आहे.

तपास करणाऱ्या पोलीस पथकाने या महिला पोलीस कर्मचाऱ्यासह इतर आरोपींचा माग कसा काढला, हे जाणून घेण्यासाठी ‘बीबीसी गुजराती’ने संबंधित पोलीस अधिकारी आणि इतर संबंधितांशी बातचीत केली.

नेमकं प्रकरण काय होतं?

प्राथमिक माहितीनुसार, साबरकांठातील चिठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 45 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अश्विन तांबियाड आणि त्याच पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या 37 वर्षीय महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल आल्फा क्लासवा यांच्यात ‘प्रेमसंबंध’ असल्याची चर्चा होती.

मिळालेल्या माहितीनुसार 8 नोव्हेंबर रोजी अश्विनभाई आपली अर्टिगा कार घेऊन कामावर गेले होते. ते दोन दिवस घरी न परतल्याने त्यांचे मोठे भाऊ सिद्धराज यांनी भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली.

त्याच दिवशी हातमती नदीकाठी पादरा गावाजवळ अश्विनभाईंची कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली आणि त्यामध्ये एक मानवी सांगाडाही सापडला होता.

[ photo कॅप्शन: एएसआयच्या हत्येचा आरोप 37 वर्षीय महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल आल्फाबेन यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अश्विनभाईंचे मोठे भाऊ सिद्धराजभाई तांबियाड यांनी स्वतः दिलेल्या पोलीस तक्रारीबाबत बोलताना सांगितलं की, “माझा भाऊ दोन दिवस घरी परतला नाही, त्यामुळे आम्ही शोधाशोध केली. पण त्याचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने आम्ही पोलिसांत तक्रार द्यायला गेलो.

नेमकी त्याच दिवशी त्याची अर्टिगा कार जळालेल्या अवस्थेत हाथमती नदीजवळ सापडली आणि त्या कारमध्ये एक जळालेला मानवी सांगाडा होता.”

“हा मानवी सांगाडा माझ्या भावाचाच असावा, असा संशय आम्हाला आला होता. म्हणून पोलिसांनी माझ्या वडिलांच्या (बाबूभाईं) च्या नमुन्यासोबत या सांगाड्याची डीएनए टेस्ट केली. त्यातून हा सांगाडा अश्विनचाच असल्याचं स्पष्ट झालं.

याच दरम्यान आम्हाला कळलं की, त्याच्यासोबत चिठोडा पोलीस स्टेशनमध्ये काम करणारी हेड कॉन्स्टेबल अल्फा आणि तिच्या भावांनी मिळून माझ्या भावाचा खून केला आणि त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून जाळून टाकला. आम्ही त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.”

पोलिसांचं म्हणणं काय आहे?

अरवलीचे पोलीस अधीक्षक मनोहरसिंह जाडेजा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला जेव्हा जळालेली अर्टिगा कार सापडली, तेव्हा गाडीच्या नंबरवरून ती चिठोडा पोलीस स्टेशनचे एएसआय अश्विन तांबियाड यांची असल्याचं कळलं.

पण जळालेला मानवी सांगाडा गाडीच्या मागच्या सीटवर सापडला होता. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होती की गाडी आपोआप जळाली नव्हती, तर मृतदेह आत ठेवून गाडी पेटवून देण्यात आली होती.”

डीएनए टेस्टमधून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

“आम्ही आसपासचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात 9 नोव्हेंबरला एक पांढऱ्या रंगाची इको कार आणि अर्टिगा कार दिसली. हाथमती नदीजवळच्या पादरा गावाकडून अर्टिगा कार परत येताना दिसली नाही. पण रात्री तीच इको कार परत येताना दिसली.”

[ photo कॅप्शन: अरवलीचे पोलीस अधीक्षक मनोहरसिंह जाडेजा]

“दुसरीकडे, तपासात असं समोर आलं की, कारच्या आत आणि बाहेर पेट्रोल शिंपडलं गेलं होतं. याचं वैज्ञानिक विश्लेषण केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की, ज्याने कोणाला कार पेटवून दिली असेल तोही नक्कीच भाजला असेल.

आम्ही तत्काळ संपूर्ण परिसरातील दवाखाने आणि पेट्रोल पंपांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा जी इको कार हाथमती नदीच्या पात्राकडे जाताना आणि येताना दिसली होती, त्याच कारमधील लोक कॅनमध्ये पेट्रोल विकत घेताना दिसले.

दुसरीकडे, दवाखान्यांमध्ये चौकशी केली असता कळलं की चिठोडा येथील महिला हेड कॉन्स्टेबल अल्फाबेन यांनी प्राथमिक उपचार घेतले होते आणि पुढील उपचारांसाठी त्या हिंमतनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. या

इको कारची माहिती काढली असता समजलं की, ही कार चिठोडा पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल अल्फाबेन यांनी त्यांचे वडील अशोकभाई यांच्या नावाने विकत घेतली होती.”

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे एकानंतर एक दुवे जुळत गेल्याने आरोपींवरील संशय अधिकच बळावत गेला.

जाडेजा सांगतात की, “त्यानंतर पोलिसांनी अल्फाचा भाऊ कल्पेश कलासवा, चुलतभाऊ पंकज आणि त्यांचा मित्र मनोज यांना ताब्यात घेतले. याशिवाय, हिंमतनगरच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अल्फाबेन यांनाही ताब्यात घेण्यात आलं.”

घरीच केला होता खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या चौघांनी तपासात सहकार्य केलं नाही, मात्र नंतर चौकशीत त्यांनी ‘गुन्ह्याची कबुली’ दिली.

पोलीस अधिकारी जाडेजा यांच्या सांगण्यानुसार, “या चौघांनी कबूल केलं की अल्फाबेन आणि अश्विनभाई यांच्यात प्रेमसंबंध होते. अल्फाला हे नातं संपवायचं होतं, पण अश्विन संबंध कायम ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.”

“8 नोव्हेंबरला अल्फाने अश्विनला घरी बोलावलं होतं आणि चिठोडा येथील भाड्याच्या घरात त्याचा खून केला. त्यानंतर इतरांसोबत मिळून अश्विनचा मृतदेह एका गोणीत भरून हाथमती नदीच्या पात्रात उभ्या केलेल्या त्याच्याच अर्टिगा कारमध्ये ठेवला आणि गाडीवर पेट्रोल ओतून पेटवून दिली.

यावेळी अचानक आगीचा मोठा भडका उडाल्याने अल्फाचे हात आणि शरीराचा काही भाग भाजला. सध्या आम्ही या चौघांना अटक केली असून, मृतदेह पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. या अहवालातून त्याची हत्या नेमकी कशी झाली, याचं अचूक कारण स्पष्ट होईल,” असं पोलिसांनी सांगितलं.

अल्फाच्या कुटुंबीयांचं म्हणणं काय आहे?

अल्फाचे चुलत काका आणि सोमैया गावातील डुंगरी गरासिया समाजाचे नेते रमेश क्लासवा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, “अल्फाचा स्वभाव पहिल्यापासूनच रागीट होता. पण तिला कुटुंबाची खूप ओढ होती. पोलिसांत नोकरी लागल्यानंतर घरच्यांना मदत व्हावी म्हणून तिने इको कार घेऊन दिली होती.

पण तिचे कोणासोबत प्रेमसंबंध आहेत याची कोणालाच माहिती नव्हती. ती खुनासारखं पाऊल उचलेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पोलीस तपासात जे काही समोर आलं आहे, ते ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC