Source :- BBC INDIA NEWS

एसी

फोटो स्रोत, Getty Images

सध्या उकाडा आणि अति उष्णतेनं आपण सर्व हैराण होतो आहोत. बऱ्याचवेळा तर पंखा किंवा कूलरचाही पुरेसा फायदा होत नाही. मग एसीचा पर्याय निवडला जातो.

मोठी शहरं आणि छोट्या शहरांबरोबरच आता गावांमध्येही एअर कंडिशनर मोठ्या संख्येनं दिसू लागले आहेत. त्यामुळेच एसीच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून येते आहे.

मात्र, अनेकांना एसीचा अपेक्षित असा फायदा मिळत नाही.

एसी विकत घेताना नेमका कोणत्या प्रकारचा एसी निवडावा, त्याच्यासाठी निगडीत कोणते घटक लक्षात घ्यावेत, एसीचा वापर करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा लेख नक्की वाचा.

जसजसा एसी जुना होत जातो, त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे एसी अधिकाधिक विजेचा वापर करू लागतो. विजेचा खप वाढल्यामुळे वीजबिल देखील वाढत जातं.

अलीकडेच बातम्या आल्या होत्या की, जुने एसी बदलण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना आणणार आहे. मात्र त्या बातम्या चुकीच्या ठरल्या. सरकारनं स्पष्ट केलं आहे की अशी कोणतीही योजना आणली जाणार नाही.

काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, जुने एसी देऊन त्याऐवजी 5-स्टार मानांकन असलेले नवीन एसी मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पीएम मोदी एसी योजना सुरू केली जाणार आहे.

सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकनं म्हटलं आहे की, या सर्व बातम्या किंवा माहिती खोटी आहे.

त्यांनी या बातम्या फेटाळल्या आहेत की नवीन ‘पीएम मोदी एसी योजना 2025’ अंतर्गत केंद्र सरकार मोफत 5-स्टार एसी देणार आहे आणि त्यासाठी 1.5 कोटी एसी आधीच तयार करण्यात आले आहेत.

प्रत्यक्षात एसी नेमके किती दिवस टिकतात? आपण वापरत असलेल्या एसीचं मानांकन किंवा रेटिंग कसं असतं? एसीचा वापर करत असताना नेमकी कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊया.

एसीचं आयुष्य किती असतं?

एसीचे फिल्टर वारंवार बदलले पाहिजेत. त्याचे कॉईल साफ केले पाहिजेत. एसीचं आयुष्य जेव्हा कमी होतं, तेव्हा आपलं वीजबिल वाढतं. तसंच एसीकडून कूलिंगदेखील योग्यप्रकारे होत नाही.

एसीमधून आवाज येतो आहे, गळती होते आहे. जेव्हा अशा प्रकारचे इशारे मिळत असतात, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला एसी वापरण्यायोग्य राहिलेला नाही.

एम. रिहान हे अर्बन कंपनीच्या एसी दुरुस्ती सेवा विभागात काम करतात. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, वर्षातून किमान एकदा तरी एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे. यामुळे एसीची कार्यक्षमता वाढते.

त्याचबरोबर एसीचे फिल्टर्स आणि कॉईल्सचीदेखील नियमितपणे तपासणी आणि देखभाल केली पाहिजे. आपल्या वीजबिलावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आवश्यकता पडल्यास आपण एसीच्या दर्जेदार भागांवर देखील खर्च केला पाहिजे, असं क्रोमानं त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

एसीचा कूलिंग फॅन नियमितपणे तपासला पाहिजे. जर त्यात काही समस्या असेल तर त्याची लगेचच दुरुस्ती केली पाहिजे.

3-स्टार आणि 5-स्टार एसीमध्ये काय फरक असतो?

ऊर्जेच्या बाबतीतील एसीची कार्यक्षमता मोजण्यासाठी रेटिंग किंवा मानांकन हा महत्त्वाचा घटक असतो.

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (बीईई) हे रेटिंग देतं.

एसीकडून विजेचा जो वार्षिक खप (अॅन्युअल एनर्जी कन्झम्पशन) होतो, त्याआधारे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी हे रेटिंग देतं.

व्होल्टाज कंपनीनं म्हटलं आहे की विजेचा वार्षिक वापर किंवा खप आणि कूलिंग क्षमता, याआधारे ते एसीचं अॅन्युअल एनर्जी कन्झम्पशन मोजतात.

विजेच्या वापराच्या बाबतीत, 3-स्टार एसीच्या तुलनेत 5-स्टार एसी अधिक कार्यक्षम असतात.

3-स्टार एसीच्या तुलनेत 5-स्टार एसी 10 ते 15 टक्के कमी वीज वापरतात. त्यामुळेच 5-स्टार एसीमुळे तुलनात्मकरित्या विजेचं बिल देखील कमी येतं. मात्र, अनेक ग्राहक एसीच्या वापरानुसार 3-स्टार किंवा 5-स्टार रेटिंग असलेले एसी निवडतात.

जे लोक दिवसभरात एसीचा कमी वेळ वापर करतात ते 3-स्टार एसी निवडतात.

एसी, कूलर

फोटो स्रोत, Getty Images

एका एसी उत्पादक कंपनीनं त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, सामान्य हवामान असलेल्या आणि अधूनमधून एसीचा वापर करणाऱ्या लोकांसाठी हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय आहे.

तज्ज्ञ म्हणतात की, ज्या ठिकाणी खूप जास्त उष्णता असते आणि जे लोक दिवसभरात अधिक वेळ एसीचा वापर करतात, तिथे 5-स्टार एसी हा चांगला पर्याय ठरतो.

असं सुचवलं जातं की, जे लोक दिवसभरात फक्त 3 ते 4 तासच एसी वापरतात, ते 3-स्टार एसीची निवड करू शकतात…मात्र जर ते यापेक्षा अधिक वेळ एसी वापरणार असतील तर 5-स्टार एसी वापरल्यामुळे विजेची बचत होऊ शकते.

एसी

फोटो स्रोत, Getty Images

एम रिहान एसी सर्व्हिसिंग तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, “त्याचप्रमाणे खोलीच्या क्षेत्रफळानुसार एसीची निवड केली पाहिजे. जर खोलीचं क्षेत्रफळ 120 ते 140 चौ. फूट असेल तर अशावेळी 1 टन क्षमतेचा एसी वापरणं पुरेसं ठरतं.”

“त्याचप्रकारे जर खोलीचं क्षेत्रफळ 150 ते 180 चौ. फूट असेल तर अशावेळी 1.5 टन क्षमतेचा एसी वापरणं योग्य ठरतं. जर खोलीचं क्षेत्रफळ त्याहून अधिक असेल म्हणजेच 180 चौ. फुटांहून अधिक असेल तर तुम्ही 2 टन क्षमतेचा एसी वापरला पाहिजे,”

ते पुढे म्हणाले, “जर छोट्या खोलीमध्ये जास्त टन क्षमतेच्या एसीचा वापर केला तर त्यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाऊन वीजबिलाचा खर्च वाढेल.”

“त्याचवेळी, मोठ्या खोल्यांसाठी कमी टन क्षमतेच्या एसीचा वापर करणं योग्य ठरत नाही. म्हणूनच एसीची निवड करताना आपण आपल्या घराचा आकार लक्षात घेतला पाहिजे.”

एसीचा स्फोट का होतो?

काहीवेळा प्रचंड उष्णतेमुळे एसींचा स्फोट होतो. आयआयटी बीएचयूचे मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक जहर सरकार यांनी यापूर्वी यामागची वैज्ञानिक कारणं, बीबीसीला सांगितली होती.

प्राध्यापक जहर सरकार यांनी बीबीसीला सांगितलं की एसीमुळे खोली थंड होण्यासाठी, एसीच्या कॉम्प्रेसरच्या भोवतीचं बाहेरील तापमान त्याच्या कंडेन्सरच्या तापमानापेक्षा जवळपास 10 अंश सेल्सिअस कमी असणं आवश्यक असतं.

प्राध्यापक सरकार म्हणाले, “सर्वसाधारणपणे, भारतात वापरल्या जाणाऱ्या एसींच्या कंडेन्सरचं तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. मात्र जर बाहेरील तापमान कंडेन्सरच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर एसी काम करत नाही.”

“अशा परिस्थितीत, कंडेन्सरवरील दाब वाढतो. त्यामुळे कंडेन्सर फुटण्याची किंवा त्याचा स्फोट होण्याची शक्यता देखील वाढते.”

एसी

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा एसीच्या कॉईल्स घाणेरड्या होतात आणि धुळीनं माखतात, तेव्हा त्यांना होणाऱ्या गॅस पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कंडेन्सर अधिक गरम होतो.

त्यामुळे आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एसीच्या कॉईल्सची नियमितपणे सफाई केली पाहिजे.

विजेच्या व्होल्टेजमध्ये वारंवार चढउतार झाल्यामुळे कॉम्प्रेसरच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अपघात होऊ शकतात.

तज्ज्ञ म्हणतात की जर सूर्यप्रकाश थेट एसीवर येत असेल तर गरम हवा थंड करण्याची एसीची क्षमतादेखील कमी होते.

“सूर्यकिरणांमुळे खोली थंड करण्यासाठी एसीला जास्त वेळ लागतो. परिणामी, विजेचा अधिक वापर होतो,” असं रिहान यांनी सांगितलं.

एसीचा स्फोट होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी?

जेव्हा तापमान जास्त असतं, तेव्हा एपी कॉम्प्रेसर सावलीत राहील याची खातरजमा करा.

एसीच्या कॉम्प्रेसर आणि कंडेसरभोवतीची हवा खेळती असली पाहिजे. जर तिथे पुरेशी खेळती हवा असेल, तर ते अधिक गरम होणार नाही.

एसीची नियमितपणे सर्व्हिसिंग केली पाहिजे. असं केल्यामुळे एसीची आवश्यक दुरुस्तीदेखील होईल.

‘एसी दिवसभर सुरू ठेऊ नये’

अविकल सोमवंशी, सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट (सीएसई) मध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. त्यांनी सुचवलं की 24 तास एसी सुरू ठेवू नये आणि त्यासाठी टायमरचा वापर करावा.

“सध्या जवळपास सर्वच एसींमध्ये टायमर असतात. आपली खोली थंड होण्यासाठी किती वेळ लागतो हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार एसीचा टायमर सेट केला पाहिजे. असं केल्यामुळे 24 तास एसी सुरू ठेवण्याची आवश्यकता राहत नाही. परिणामी विजेची बचत होते,” असं अविकल म्हणतात.

ते पुढे म्हणतात, “जेव्हा आपण मधूनमधून एसी बंद करतो, तेव्हा एसीचे सर्व भाग थंड होतात. त्यामुळे आपण एसी पुन्हा सुरू केल्यावर एसी अधिक चांगल्या प्रकारे काम करतो. जर तुमच्या एसीमध्ये एनर्जी सेव्हिंग मोड म्हणजे ऊर्जेची बचत करणारा पर्याय उपलब्ध असेल, तर तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC