Source :- ZEE NEWS

Chatgpt Divorce: सध्या चॅट जीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. शाळेच्या प्रोजेक्टपासून ऑफिसच्या कामापर्यंत सर्वच गोष्टींसाठी चॅट जीपीटीची मदत घेतली जाते. पण या चॅट जीपीटीचे दुष्परिणामही समोर येऊ लागलेयत. ग्रीसमध्ये अलिकडेच एक विचित्र प्रकरण समोर आलंय. जिथे एका महिलेने तिच्या पतीच्या कथित प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतील. यानंतर आता ती  घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे. 

ग्रीसमधील एका महिलेने तिच्या पतीच्या अफेअरची माहिती मिळविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) टूल चॅटजीपीटीची मदत घेतल्याचे सांगण्यात येतंय. यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सोशल मीडियावर (एआय कॉफी रीडिंग) या विषयावर खूप चर्चा आहे.

कॉफी कपच्या फोटोवरुन मागितले उत्तर 

एआयच्या विश्वात एक धक्कादायक घटना समोर आलीय. ग्रीसमधील एका महिलेने चॅटजीपीटीने दिलेल्या उत्तराच्याआधारे तिच्या पतीकडून घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. वृत्तानुसार ही महिला गेल्या 10 वर्षांपासून वैवाहिक आयुष्यात असून तिला 2 मुले आहेत. तिने पारंपारिक ‘कॉफी रीडिंग’ किंवा ‘टॅसोग्राफी’ डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे ‘कॉफी कपचे फोटो’ चॅटजीपीटीला पाठवले. चॅट जीपीटीकडून मिळालेल्या उत्तराने महिलेला धक्का बसला. 

चॅटजीपीटीने असं काय सांगितलं?

चॅटजीपीटीने सांगितले की, ‘तुझा नवऱ्याचे ‘ई’ नावाच्या एका तरुणीशी संबंध आहेत आणि हे नाते तुझ्या कुटुंबाला हानी पोहोचवू शकते. तुझ्या आयुष्यात विश्वासघात आणि कौटुंबिक अस्थिरतेची चिन्हेदेखील आढळत असल्याचे एआयने तिला दिलेल्या उत्तरात सांगितले.

घटस्फोटासाठी अर्ज दाखल

समोर आलेल्या अहवालानुसार, महिलेला काही काळापासून तिच्या पतीच्या वागण्यात बदल जाणवत होता. तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असू शकतात, असा तिला संशय होता. आपल्या संशयाला दुजोरा देण्यासाठी तिने एक मनोरंजक पद्धत अवलंबली. या पद्धतीला टॅसिओग्राफी म्हणतात. जी भाकिते करण्यासाठी कॉफी ग्राउंड्स किंवा चहाच्या पानांचे वाचन करण्याची प्राचीन कला आहे. हे उत्तर पूर्णपणे खरे आहे असे मानून महिलेने तिच्या पतीला घराबाहेर काढले आणि मुलांनाही घटस्फोटाबद्दल सांगितले. फक्त 3 दिवसांनंतर तिने तिच्या पतीला ‘कायदेशीर नोटीस’ पाठवली आणि कोणतेही भाष्य करण्यास किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.

नवऱ्याला वाटले की बायको मस्करी करतेय

पतीने एका स्थानिक टीव्ही शोमध्ये ही घटना शेअर केली. यात पती म्हणाला, ‘पत्नी विनोद करतेय असे मला सुरुवातीला वाटले. पण तिने खरोखरच मला घराबाहेर पडण्यास सांगितले आणि नंतर वकिलाने फोन केल्याचे पतीने सांगितले. माझी पत्नी पूर्वी ज्योतिष आणि गूढ श्रद्धांमध्ये खोलवर गुंतलेली होती.  तुझी नोकरी जाईल आणि तू परदेशात जाशील, असे काही दिवसांपुर्वी, असे मला काही दिवसांपुर्वी एका ज्योतिषाने सांगितले होते पण  असे काहीही घडले नाही, असेही त्याने पुढे सांगितले. 

‘घटस्फोटाची कागदपत्रे सादर करा’

एआय कॉफी रीडिंगला न्यायालयात वैध पुरावा मानले जाऊ शकत नाही, असे पतीच्या वकिलाने स्पष्टपणे सांगितले. हा एक वैयक्तिक गैरसमज आहे,कायदेशीर फसवणूक नाही. माझा अशिल निर्दोष आहे आणि त्याची बदनामी होतेय. एआयचा सुज्ञपणे वापर केला जात नाही, तेव्हा त्याने संबंधदेखील तुटू शकतात, असेही पतीच्या वकिलाने सांगितले.

SOURCE : ZEE NEWS